प्रश्न पेटी
◼ राज्य सभागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी कोणाची असते?
आपले स्वच्छसुंदर, मनाला भावणारे राज्य सभागृह पाहून आपण लोकांना सांगत असलेल्या संदेशास लोक चांगला प्रतिसाद देतात. (पडताळा १ पेत्र २:१२.) तेव्हा, आपले राज्य सभागृह नीटनेटके ठेवणे जरूरीचे आहे. आणि असे करण्यात प्रत्येक जण हातभार लावू शकतो. राज्य सभागृहाची स्वच्छता करणे ही मंडळीतल्या ठराविक दोनतीन लोकांची जबाबदारी आहे असे आपण समजू नये. सहसा स्वच्छतेची योजना, मंडळीच्या पुस्तक अभ्यास गटामार्फत केली जाते आणि यात पुस्तक अभ्यास संचालक किंवा त्याला साहाय्य करणारा बांधव पुढाकार घेतो. ज्या ठिकाणी अनेक मंडळ्या एकाच सभागृहाचा उपयोग करतात अशा ठिकाणी राज्य सभागृह सुस्थितीत ठेवण्यात हरएक मंडळीला हातभार लावता यावा अशा तऱ्हेने वडील स्वच्छतेची योजना आखतील.
हे काम आपल्याला सगळ्यात चांगल्याप्रकारे कसे करता येईल? प्रथम, हे लक्षात घ्या, की राज्य सभागृहाची स्वच्छता एका ठरलेल्या आराखड्यानुसार केली जावी. दुसरी गोष्ट, स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर साधने उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करावी. मग, कोणकोणती कामे करायची याची यादी करून सर्वांना पाहता येईल अशा ठिकाणी ती लावावी. अशा दोन याद्या असू शकतात; एक, प्रत्येक सभा संपल्यानंतर केल्या जाणाऱ्या वरवरच्या स्वच्छतेसाठी तर दुसरी आठवड्यातून एकदा केल्या जाणाऱ्या संपूर्ण स्वच्छतेसाठी. आठवड्यातून एकदा केल्या जाणाऱ्या पूर्ण स्वच्छतेसाठी विशिष्ट दिवस आणि वेळ ठरवताना पुस्तक अभ्यास संचालकाने सर्वांना सोईस्कर पडेल असा एक दिवस आणि वेळ निवडावी. तसेच, सभा गृहातील लहान झाडांची आणि फुलांची देखील वेळोवेळी काळजी घेण्यास हवी. ये-जा करण्याचे मार्ग आणि वाहन पार्क करण्याचे ठिकाणही स्वच्छ ठेवले जावे. आणि शेवटी, वर्षातून एकदा, कदाचित स्मारकविधीच्या आधी संपूर्ण राज्य सभागृहाची पूर्णपणे स्वच्छता केली जावी. यात खिडक्या, भिंती आणि पडदे धुऊन स्वच्छ करणे अशी सर्व कामे केली जाऊ शकतात.
अर्थात, सभागृहाच्या आत आणि बाहेर केरकचरा न टाकण्याची दक्षता घेऊन प्रत्येक जण कामाचा भार हलका करू शकतो. तसेच, टॉयलेट वापरल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला ते वापरता यावे म्हणून प्रत्येक वेळी ते स्वच्छ ठेवावे. सभागृहातील उपकरणांची आणि इतर वस्तूंची मोडतोड होणार नाही याची काळजी घ्या. मोडलेल्या खुर्च्या, नळासंबंधीच्या समस्या, गेलेले बल्ब आणि अशा इतर बाबींची त्वरित दखल घेऊन राज्य सभागृह सुस्थितीत ठेवण्यास जबाबदार असलेल्या बांधवाला लगेच कळवावे.
अशाप्रकारे, राज्य सभागृहाची स्वच्छता करण्यासाठी आपण सर्वजण स्वेच्छेने पुढे येऊ या. यामुळे आपल्या उपासना-स्थानी सर्वांनाच सुखावह वाटेल आणि यहोवा देवाचा सन्मान करणारे लोक म्हणून आपला वेगळेपणा दिसून येईल.—१ पेत्र १:१६.