यहुदी धर्माच्या व्यक्तीशी संभाषण कसे कराल?
१ पहिल्या शतकात, ‘इस्राएलाच्या संततीपैकी’ अनेकांनी येशूच्या आणि त्याच्या प्रेषितांच्या प्रचार कार्याची कदर करून त्यास प्रतिसाद दिला. (प्रे. कृत्ये १०:३६) त्याचप्रमाणे आजही, अनेक श्रद्धाळू यहुदी मनापासून सत्याला आपलेसे करत आहेत; आणि हे केवळ इस्राएलमध्येच नव्हे तर भारत, रशिया, संयुक्त संस्थाने आणि इतर देशांतही घडत आहे. यहुदी धर्माच्या लोकांना अधिक परिणामकारक पद्धतीने साक्ष देण्याची तुमची इच्छा आहे का? खाली सुचवलेले मुद्दे कट्टर आणि नामधारी अशा दोन्ही प्रकारच्या यहुद्यांना कुशलतापूर्वक साक्ष देण्यास तुम्हाला उपयोगी पडतील.
२ कट्टर यहुद्यांना साक्ष देणे: कट्टर यहुद्यांच्या बाबतीत एक लक्षात ठेवले पाहिजे, की विशिष्ट धर्मतत्त्वांचे पालन करण्याऐवजी रब्बींपासून पुढे आलेल्या रूढीपरंपरांचे पालन करण्यावर त्यांचा फार जोर असतो. किंबहुना, रूढीपरंपरेला आणि शास्त्रवचनांना ते समान दर्जा देतात. त्यामुळे, बायबलच्या विषयांवर खोलात जाऊन चर्चा करणे त्यांना आवडेलच असे नाही. शिवाय, बायबल म्हणजे ख्रिश्चन लोकांचा ग्रंथ असा त्यांचा ग्रह असतो. तेव्हा, बायबलचा उल्लेख करताना “हिब्रू शास्त्रवचने,” “तोराह” किंवा फक्त “शास्त्र” असे म्हणणे सगळ्यात चांगले. खास यहुदी लोकांना लक्षात ठेवून तयार केलेले एक उत्कृष्ट प्रकाशन म्हणजे युद्ध नसलेले जग कधी अस्तित्वात येईल का? (इंग्रजी) हे माहितीपत्रक.
३ कट्टर यहुद्यांना कोणत्या विषयांवर बोलायला आवडेल? देव एकच आहे आणि त्याला मनुष्याच्या जीवनातील घडामोडींत स्वारस्य आहे असे यहुदी लोक मानतात. शिवाय, मानवी घडामोडींमध्ये तो हस्तक्षेप करतो हेही ते मानतात. तेव्हा तुम्ही दोघेही सहमत व्हाल अशा काही मुद्द्यांना घेऊन तुम्ही संभाषण सुरू करू शकता. या शिवाय, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या लोकांचा जो अमानुष छळ करण्यात आला त्याची बहुतेक यहुद्यांना पूर्ण कल्पना असते. त्यामुळे देवाने आपल्यावर हा अन्याय का होऊ दिला, दुष्टाईचा कधी अंत होईल का असे प्रश्न त्यांना पडतात. पण, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय चांगल्या प्रकारे आपण देऊ शकतो; उदाहरणार्थ, हॉलोकॉस्टच्या (जातीसंहाराच्या) वेळी आपल्या बांधवांना काय काय सोसावे लागले याचा उल्लेख आपण करू शकतो.
४ अर्थात, सुरवातीलाच मतभेद होऊ नये म्हणून मशीहाचा विषय लगेच काढू नका. त्याऐवजी, इस्राएलच्या इतिहासात मोशेच्या भूमिकेविषयी चर्चा करून मोशेच्या शिकवणुकी आजही लागू होतात का असा प्रश्न घरमालकाला विचारा. मग, मशीहाचा विषय उचित आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, आधी अनुवाद १८:१५ हे शास्त्रवचन तुम्ही वाचू शकता; तिथे म्हटले आहे: “तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरिता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका.” मग, मोशे स्वतःसारख्या एका संदेष्ट्याविषयी बोलला तेव्हा तो खरे कोणाविषयी बोलत होता हे घरमालकाला विचारा. त्यानंतर, युद्ध नसलेले जग या माहितीपत्रकातील पृष्ठ १४ उघडा आणि परिच्छेद १७ आणि १८ यांतून काही मुद्दे सांगा.
५ नामधारी यहुद्यांची मते निराळी असतात: स्वतःला यहुदी म्हणणारी हरएक व्यक्ती यहुदी धर्माच्या शिकवणुकींचे पालन करणारी असते असे नाही. बऱ्याचशा यहुद्यांचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन असतो. यहुदी धर्माचे आचरण करण्यापेक्षा यहुदी संस्कृती, परंपरा आणि शिक्षण या गोष्टींचा वेगळेपणा टिकवून ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. नामधारी यहुद्यांपैकी काहींचे देवाच्या अस्तित्वाविषयी कोणतेही निश्चित असे मत नसते आणि काही तर नास्तिकही असतात. त्यामुळे अशा व्यक्तींशी सुरवातीलाच हिब्रू शास्त्रवचनांतून बरेच संदर्भ घेऊन संभाषण करण्याचा फारसा उपयोग होणार नाही. त्याउलट, देवाधर्मावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही जसे संभाषण केले असते तसेच या लोकांशीही करणे अधिक परिणामकारक ठरेल. उदाहरणार्थ, आपल्या काळातही बायबलची तत्त्वे किती समर्पक आहेत याचे स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता. बायबल देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आहे यावर घरमालकाचा विश्वास नसल्यास युद्ध नसलेले जग या माहितीपत्रकातील काही मुद्दे, खासकरून पृष्ठ ३ वरील “बायबल—ईश्वरप्रेरित आहे का?” या सदराखाली दिलेले मुद्दे कदाचित उपयुक्त ठरतील.
६ यहुदी व्यक्तीला साक्ष देताना तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचं दुःख आपल्यापैकी बहुतेकांनी अनुभवलंय. पण, माणूस मरतो तेव्हा नेमकं काय होतं असं तुम्हाला वाटतं?” घरमालकाचे उत्तर ऐकून घ्या. मग, युद्ध नसलेले जग या माहितीपत्रकातील पृष्ठ २२ वर, “मृत्यू आणि आत्मा—हे काय आहे” अशा शीर्षकाची जी पेटी दिली आहे ती घरमालकाला दाखवा. मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल बायबलचे आणि रब्बींचे काय म्हणणे आहे याची तुलना त्या पेटीत केली आहे. मग, पृष्ठ २३ वरील परिच्छेद १७ कडे घरमालकाचे लक्ष वेधा आणि शास्त्रवचनांनुसार नवीन जगात याच पृथ्वीवर मृतांचे पुनरुत्थान केले जाईल हे सांगा. त्यानंतर घरमालकाला माहितीपत्रक द्या. आणि पुनर्भेटीची तयारी म्हणून, कुलपिता ईयोब याला देखील पुनरुत्थानावर विश्वास होता असा उल्लेख तुम्ही करू शकता. परिच्छेद १७ च्या शेवटी दिलेली शास्त्रवचने उघडून वाचा आणि यावर पुढच्या वेळी अधिक चर्चा करू असे घरमालकाला सांगा.
७ बायबलमधील मत्तय, मार्क, लूक, योहान आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकांमध्ये, सत्य ऐकून त्यास आपलेसे करणाऱ्या यहुद्यांचे अनुभव नमूद केलेले आहेत. पण, आजही सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा मार्ग यहोवाने खुला ठेवला आहे. त्यामुळे अनेक श्रद्धाळू यहुद्यांना सत्य देव यहोवा याच्याबद्दल शिकून घेण्याची अजूनही संधी आहे, जेणेकरून देवाच्या नवीन जगात त्यांनाही सार्वकालिक जीवन मिळू शकेल.—मीखा ४:१-४.