हिंदू व्यक्तीशी संभाषण कसे कराल?
१ जगाच्या या भागात सेवा करत असताना आपल्याला अधिकांश लोक भेटतात ते हिंदू धर्मातलेच. तेव्हा, अशा एखाद्या व्यक्तीशी संभाषण कसे कराल?
२ हे मुद्दे लक्षात ठेवा: बायबल सत्याविषयी साध्यासोप्या आणि व्यवहारकुशल पद्धतीने संभाषण सुरू केल्यास सहसा होकारात्मक प्रतिसाद मिळतो. प्रथम, कुटुंबातल्या पतीशी बोलण्याची तयारी दाखवा. पतीने चांगला प्रतिसाद दाखवल्यास कुटुंबातल्या इतर सदस्यांना साक्ष देण्याचे काम सोपे होऊन जाते. हिंदू संस्कृतीत सर्व जिवांप्रती आदरभाव दाखवला जातो; शिवाय, या संस्कृतीचा रोख खासकरून लोकांवर असतो. तेव्हा, सर्वसामान्य चिंतेच्या विषयांवर बोला. यामुळे एका अर्थपूर्ण आणि परस्पर लाभदायक असणाऱ्या संभाषणाची सुरवात होऊ शकते. तसेच, आध्यात्मावरही हिंदू धर्माचा फार जोर असतो. म्हणूनच, ज्याच्याशी एक अतूट नातेसंबंध जोपासता येईल अशा एका देवाची उपासना करण्याची हिंदू लोकांची उत्कट इच्छा असते. तेव्हा, ज्या मुद्द्यांवर तुमचे आणि त्यांचे एकमत असेल अशा मुद्द्यांना धरून संभाषण करा आणि मानवाच्या सृष्टिकर्त्यासोबत मैत्री जोडण्यास बायबल आणि आपले इतर साहित्य त्यांची मदत करू शकते हे त्यांना दाखवून द्या. बहुतेक सर्वच हिंदू लोक सभ्य आणि मैत्रिपूर्ण असतात. तेव्हा आपणही त्यांच्याशी वाद न घालता तसेच वागावे. हिंदू धर्माच्या व्यक्तीशी संभाषण करण्यासाठी हिंदू धर्माचा दांडगा अभ्यास असण्याची गरज नसली तरी त्यांच्या विश्वासांची एकंदर कल्पना असल्यास ती लाभदायक ठरू शकते.
३ योग्य साधनांचा उपयोग करा: संस्थेने हिंदू लोकांना लक्षात ठेवून बरीच प्रकाशने काढली आहेत. आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक इंग्रजीशिवाय इतर १३ भारतीय भाषांमधून उपलब्ध आहे. “पहा! मी सर्व नवे करतो” आणि देव खरोखरी आपली काळजी करतो का? ही माहितीपत्रके देखील हिंदू व्यक्तींशी संभाषण करण्यात प्रभावी ठरली आहेत. मग, कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव ही पुस्तिका इंग्रजी, कन्नड, गुजराती, पंजाबी, बंगाली आणि मल्याळम या भाषांमध्ये उपलब्ध आहे. मरणावर विजय—तो तुम्हाकरता शक्य आहे का? ही पुस्तिका इंग्रजी, गुजराती, नेपाळी आणि पंजाबी भाषेत तर मुक्तीकडे नेणारा ईश्वरी मार्ग ही पुस्तिका इंग्रजी, मल्याळम, मिझो, तेलगू आणि उर्दू भाषांत उपलब्ध आहे. बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रकाचा आणि ज्ञान पुस्तकाचा प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो.
४ सर्वसामान्य जिव्हाळ्याच्या विषयांवर बोला: हिंदू व्यक्तींचे जिव्हाळ्याचे विषय कोणते हे सांगणे कठीण नाही. आपण कलीयुगात जगत आहोत आणि लवकरच परमेश्वर एक महासंकट आणून सर्व समस्यांचे उच्चाटन करील आणि मग एक सत्ययुग येईल असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या या विश्वासांचा संबंध बायबलमध्ये सांगितलेल्या शेवटल्या काळाशी, मोठ्या संकटाशी आणि येणाऱ्या नवीन जगाशी किती सहजासहजी लावला जाऊ शकतो हे तुमच्या लक्षात आले असेल. जीवन जणू कधीही न सुटणाऱ्या समस्यांची मालिकाच आहे असे हिंदू लोकांचे मत असल्यामुळे कौटुंबिक जीवन, गुन्हे, सुरक्षा आणि मृत्यूनंतर काय होते असे विषय त्यांना जवळचे वाटतात. संभाषण सुरू करण्यासाठी पुढे दिलेल्या पद्धतींचा तुम्ही उपयोग करू शकतात.
५ एखाद्या कुटुंबवत्सल मनुष्याला कदाचित हे अपीलकारक वाटेल:
◼ “आज सबंध जगभरात कौटुंबिक जीवन ढासळत चालले आहे; आणि याविषयी चिंता करणाऱ्या लोकांची मी खासकरून भेट घेत आहे. तुम्हाला काय वाटतं, कोणती गोष्ट कुटुंबांमध्ये एकता आणू शकते? [उत्तरासाठी थांबा.] अर्थात, कुटुंबाच्या विषयावर हिंदू धर्मशास्त्रे काय म्हणतात हे काही लोकांना ठाऊक आहे; पण, त्याच विषयावर बायबल जे काही म्हणते त्याच्याशी तुलना करण्याचा योग त्यांना अद्याप आलेला नाही. बायबलमध्ये कलस्सैकर नावाच्या पुस्तकातील अध्याय ३ आणि वचन १२ ते १४ यात काय म्हटले आहे ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो.” हे वचन वाचल्यानंतर, घरमालकाला ज्ञान पुस्तकातला १५ वा अध्याय दाखवा आणि असे म्हणा: “या अध्यायातून मी तुम्हाला काही वाचून दाखवू इच्छितो.”
६ एखाद्या तरुण व्यक्तीला कदाचित ही प्रस्तुती अपीलकारक वाटेल:
◼ “तुम्ही देवाला मानता यात शंका नाही. मग, आपल्याबद्दल देवाचा काय उद्देश आहे असं तुम्हाला वाटतं?” उत्तरासाठी थांबा. उत्पत्ति १:२८ वाचल्यानंतर असे म्हणा: “आज आपली ही पृथ्वी लोकांनी खच्चून भरली आहे, एवढंच नाही तर सर्वत्र समस्याच समस्या आहेत. या समस्या सोडवण्याकरता निर्माणकर्ता तुम्हा-आम्हाला मदत करू इच्छितो असं तुम्हाला वाटतं का?” घरमालकाचे उत्तर ऐकल्यानंतर, एखादे उचित प्रकाशन त्याला दाखवा.
७ चांगल्या परिणामांचा अनुभव घ्या: आपली एक बहीण बाजारात साक्षकार्य करत असताना २२ वर्षांचा एक हिंदू मुलगा तिच्यापाशी आला आणि बायबल अभ्यास करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. पुढे खुलासा करत त्याने तिला सांगितले, की आठ वर्षांपूर्वी त्याच्या आईचे आणि त्या बहिणीचे आपसात चाललेले बायबलवरचे संभाषण त्याने वरचेवर ऐकले होते. आणि मानवाच्या समस्यांवर बायबलमध्ये दिलेली व्यावहारिक उत्तरे ऐकून तो विलक्षण प्रभावित झाला होता; पण, त्याच्या आईला मात्र या विषयात काहीएक आस्था नव्हती, शिवाय स्वतःहून सत्य स्वीकारण्याइतके आपण मोठे नाही असे त्यावेळी त्याला वाटले होते. पण, आता प्रौढ झाल्यावर त्याला बायबलबद्दल आणखीन जाणून घ्यायचे होते. त्याने फार वेळ लावला नाही. केवळ २३ दिवसांत त्याने ज्ञान पुस्तकाचा अभ्यास संपवला आणि या बहिणीला तो बाजारात भेटला होता तेव्हापासून अवघ्या चार महिन्यांत त्याने बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त केली!
८ आणखी एका बांधवाने ट्रेनमध्ये भेटलेल्या एका हिंदू मनुष्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. या माणसाचे वैवाहिक जीवन बरेच विस्कटलेले होते. शिवाय, त्याला दारू पिण्याचीही सवय होते. कौटुंबिक जीवनावर बायबलचा सल्ला काय हे सांगण्यासाठी साक्षीदारांनी त्याच्या घरी येऊन त्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तो राजी झाला. नैतिकतेविषयीच्या बायबल शिकवणुकी त्याला अपीलकारक वाटल्या आणि बायबलचा अभ्यास करण्यास तो तयार झाला. तो आणि त्याचे संबंध कुटुंब मिळून सभांना येऊ लागले. नंतर, आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रपरिवाराशीही ते सत्याबद्दल बोलू लागले. यांपैकी आतापर्यंत सहा जण सत्यात आले आहेत!
९ “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीम. २:४) मग, यात हिंदू धर्मासारख्या ख्रिस्तेत्तर धर्मातले लोकही आलेच. तुमच्या क्षेत्रातील हिंदू लोकांची भेट घेताना या लेखातील काही सल्ल्यांचा उपयोग का करू नये?