पूर्व युरोपमध्ये सत्य उपासनेची अखंड वृद्धी
१ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना राज्य प्रचार कार्याबद्दल ज्वलंत आवेश होता. त्यांच्या आवेशी कार्यामुळे ‘मंडळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली’ तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. (प्रे. कृत्ये १६:५) त्यांच्या निर्भीड प्रचार कार्यामुळे सत्य उपासनेची मुळे आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये पसरली. याचा परिणाम असा झाला, की बरेच लोक खऱ्या देवाचे उपासक बनले.
२ या शेवटल्या काळात, सत्य उपासनेची अशीच अखंड वृद्धी पूर्व युरोपच्या अनेकानेक देशांत होत आहे. ज्या देशांवर १९९० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत बंदी होती खासकरून त्या देशांत आज अभूतपूर्व वृद्धी होत आहे. उदाहरणार्थ, रशिया आणि युक्रेन. आपल्या १९९९ च्या वार्षिक पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, या देशांत प्रत्येकी १,००,००० हून अधिक क्रियाशील प्रचारक आहेत. भूतपूर्व सोव्हियत युनियनच्या १५ क्षेत्रांत १९९१ पासून आतापर्यंत २,२०,००० हून अधिक लोकांनी यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला आहे! झपाट्याने होणाऱ्या या वाढीमुळे अधिकाधिक राज्य सभागृहे बांधण्याची आणि शाखा दफ्तरांमध्ये विस्तार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
३ ही गरज भागवण्यासाठी, अमेरिकेच्या मार्च १९९७ च्या आमची राज्य सेवा आवृत्तीत सांगितल्याप्रमाणे संस्थेच्या राज्य सभागृह निधीचा काही भाग आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या आणि जास्त सुविधा उपलब्ध असलेल्या देशांतील मंडळ्यांना कर्जाच्या रुपात दिला जातो. उदाहरणार्थ, मार्च १९९६ पासून ऑक्टोबर १९९८ पर्यंत संस्थेने पूर्व युरोपच्या ११ देशांचे काम पाहणाऱ्या शाखा दफ्तरांना ३५९ राज्य सभागृहे बांधण्यासाठी आलेल्या कर्ज विनंत्यांना संमती दिली. दिलेल्या अनुदानांचा उपयोग नवीन राज्य सभागृहांसाठी जागा आणि बांधकाम-साहित्य विकत घेण्यासाठी तसेच राज्य सभागृहांची डागडुजी करण्यासाठी केला जातो. राज्य सभागृह निधीसाठी अमेरिकेतील तसेच इतर देशांतील बांधवांनी दिलेल्या अनुदानांचा लाभ पूर्व युरोपातील बांधवांना कसा झाला याची कल्पना येथे दिलेल्या चित्रांवरून येते.
४ बल्गेरियामध्ये १९९८ साली १२% वाढ झाली आणि त्याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात बांधवांनी मोठ्या आनंदाने तिथल्या पहिल्या राज्य सभागृहाचे समर्पण केले. क्रोएशियामध्ये देखील ४% वाढ झाली आणि सत्य उपासनेच्या वृद्धीसाठी तिथले बांधव सध्या आणखीन राज्य सभागृहे बांधण्यात व्यस्त आहेत. हंगेरीमध्ये अशा १४४ मंडळ्या आहेत ज्या ८० सभागृहांचा उपयोग करतात. याचा अर्थ, तिथल्या एकूण २३५ मंडळ्यांपैकी ६१% मंडळ्यांचे स्वतंत्र राज्य सभागृह आहे. मासेडोनियाविषयी पाहू जाता, राज्य सभागृह बांधकाम प्रकल्पाने अलीकडेच दोन राज्य सभागृहांचे बांधकाम पूर्ण केले असून आणखीन बऱ्याच राज्य सभागृहांचे बांधकाम सध्या चालू आहे. स्कोप्ये या राजधानी शहरात १९९९ च्या उन्हाळ्यात एकाच ठिकाणी दोन राज्य सभागृहे बांधण्यात आली; या सभागृहात कमीतकमी सहा मंडळ्या सभा घेऊ शकतील.
५ रशियामध्ये १९९८ सेवा वर्षादरम्यान दर आठवडी सरासरी २६० हून अधिक लोकांचा बाप्तिस्मा झाला! ही वाढ लक्षात घेऊन भविष्यात अधिकाधिक राज्य सभागृहे बांधण्याच्या उद्देशाने रशियाच्या शाखेनेही इतर शाखांप्रमाणेच देशभरात १२ प्रादेशिक बांधकाम समित्या नेमल्या आहेत; तर, सेंट पीटर्झबर्गच्या उत्तरेकडच्या भागात देशाच्या पहिल्या संमेलन सभागृहाचे बांधकाम सध्या चालू आहे. सुमारे १,६०० लोक बसू शकतील इतके मोठे हे सभागृह असेल. याच ठिकाणी, प्रत्येकी २०० आसनांच्या पाच राज्य सभागृहांची देखील सोय केली जाईल. शेवटी, युक्रेनमधील आपल्या बांधवांच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यासाठी ८४ राज्य सभागृहांचे बांधकाम पूर्ण झाले असून आणखीन ८० राज्य सभागृहांचे काम सध्या चालू आहे.
६ पूर्व युरोपमध्ये सत्य उपासना किती झपाट्याने वाढत आहे हे जाणून आपल्याला आनंद होत नाही का? जगाच्या पाठीवर आपण कोठेही असलो तरी सत्य उपासनेची वृद्धी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देते आणि ती म्हणजे देव दुजाभाव करत नाही आणि मानवजातीबद्दल तो अद्याप धीर धरून आहे. त्याच्या या धीरामुळे ‘एका मोठ्या लोकसमुदायाचा’ उद्धार होईल. (२ पेत्र ३:९; प्रकटी. ७:९) दूरच्या देशांत राहणाऱ्या आपल्या बांधवांच्या आध्यात्मिक वाढीसाठी थोडासा का होईना हातभार लावायला मिळणे, हा आपल्यासाठी एक बहुमानच नाही का? नीतिसूत्रे २८:२७ यात असे आश्वासन दिले आहे: “जो दरिद्र्यांस देतो त्याला काही उणे पडत नाही.” या बांधकामाचा खर्च भागवण्यासाठी स्वेच्छेने अनुदान केल्यामुळे आवश्यक भौतिक गोष्टींमध्ये “समानता” होते. परिणामस्वरूप, इतरांना मदतीचा हात दिल्यामुळे तसेच जगभरातील सत्य उपासनेच्या वृद्धीमुळे मिळणाऱ्या आनंदात आपल्या सर्व बांधवांना सहभागी होता येईल.—२ करिंथ. ८:१४, १५; प्रे.कृत्ये २०:३५.
[३ पानांवरील चित्र]
सॅचेला, रूमानिया
[३ पानांवरील चित्र]
मार्ड, एस्टोनिया
[३ पानांवरील चित्र]
सेयूनेट्सा, स्लोवेनिया
[३ पानांवरील चित्र]
टिस्झावासवरी, हंगेरी
[४ पानांवरील चित्र]
यूरमाला, लॅटव्हिया
[४ पानांवरील चित्र]
टॅलन, एस्टोनिया
[४, ५ पानांवरील चित्र]
टॉरागे, लिथ्युएनिया
[४, ५ पानांवरील चित्र]
बेल्ग्रेड, युगोस्लाव्हिया
[५ पानांवरील चित्र]
प्रियविड्झा, स्लोव्हाकिया
[५ पानांवरील चित्र]
माटेसलका, हंगेरी
[६ पानांवरील चित्र]
रूमा, युगोस्लाव्हिया
[६ पानांवरील चित्र]
व्रॅनोव्ह नाद टोपलाउ, स्लोव्हाकिया
[६ पानांवरील चित्र]
टोरनाकान्स, लॅटव्हिया