वेळेचा सदुपयोग करा
१ दर आठवडी प्रत्येकाच्या हातात तेवढाच वेळ असतो. त्यापैकी सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी आपण जो वेळ देतो तो अतिशय बहुमोल असतो, कारण आपण तो एका जीवन वाचवण्याच्या कार्यात खर्च केलेला असतो. (रोम. १:१६) या गोष्टीची आपल्याला जाणीव आहे हे आपण दाखवतो, ती नियोजित केलेल्या कार्यासाठी चांगली तयारी केल्याने, क्षेत्र सेवेच्या सभांना वेळेवर हजर राहिल्याने आणि ती झाल्यानंतर वेळ न घालवता लगेच क्षेत्रात निघून गेल्याने. विनाकारण थांबून राहण्याऐवजी प्रचार कार्य सुरू करणे केव्हाही चांगले. यहोवाने आपल्याला शिकवले आहे की, “प्रत्येक कार्याला समय असतो.” तेव्हा, आपण सेवेसाठी दिलेल्या वेळेचा खऱ्या अर्थाने सदुपयोग करण्याची गरज आहे.—उप. ३:१.
२ वेळेचे विचारपूर्वक नियोजन करा: क्षेत्र सेवेत नियमित सहभाग घेण्याच्या निश्चित योजना आखून जेव्हा आपण त्या नेमाने पूर्ण करतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. अर्थात, आपण जितका जास्त वेळ सेवेत खर्च करतो तितकेच अधिक उत्तम परिणाम आपल्याला मिळतील हे काही वेगळे सांगायला नको. आपल्या नित्यक्रमात किंचित फेरबदल करून क्षेत्र सेवेसाठी आपल्याला अधिक वेळ देता येईल का? उदाहरणार्थ, शनिवारच्या दिवशी नियतकालिक कार्य केल्यानंतर एखाददोन पुनर्भेटी करण्यासाठी तुम्हाला आणखी थोडा वेळ देता येईल का? रविवारी काही वेळ क्षेत्र सेवा केल्यानंतर पुनर्भेटी करण्यासाठी अथवा बायबल अभ्यास चालवण्यासाठी तुम्ही थोडा वेळ देऊ शकता का? घरोघरच्या प्रचार कार्यासोबतच तुम्ही रस्त्यावरचे साक्षीकार्यही करू शकता का? या किंवा इतर मार्गांनी आपण सेवेत अधिक सुधारणा करू शकतो.
३ क्षेत्र सेवा करत असताना खबरदारी बाळगली नाही तर आपला मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो. अर्थात, हवामान खराब असते तेव्हा ताजेतवाने होऊन पुन्हा कार्याला लागता यावे म्हणून छोटासा ब्रेक घ्यायला हरकत नाही. पण, प्रत्येक वेळी ब्रेक घेतलाच पाहिजे असे नाही. तेव्हा याबाबतीत कोणताही अतिरेक न होऊ देण्याची काळजी घ्यावी.
४ अलीकडे, काही वर्षांपासून लोक घरी सापडणे मुश्कील झाले आहे. यावर उपाय म्हणून बरेचसे प्रचारक घरोघरच्या साक्षीकार्याची आपली वेळ बदलतात. उदाहरणार्थ, दुपार सरत आल्यावर किंवा संध्याकाळी अंधार पडण्याआधी साक्षीकार्य करण्यात काय हरकत आहे?
५ रस्त्यावरचे साक्षीकार्य करताना आपण एकमेकांशी बोलण्यात वेळ घालवू नये. त्याऐवजी, एकमेकांपासून दूर उभे राहा आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांशी संभाषण सुरू करण्याकरता पुढाकार घ्या. अशाप्रकारे, वेळेचा सदुपयोग तर होईलच पण त्यासोबतच सेवेत अधिक आनंदही तुम्ही अनुभवाल.
६ साक्ष देण्यासाठी संधी साधून घ्या: आपल्याला या विषयाची आवड नसल्याचे एका घरमालकाने सांगितले, तेव्हा साक्षीदार बहिणीने घरात आणखी कोणाशी बोलता येईल का, असे विचारले. परिणामस्वरूप, गेली कित्येक वर्षे अंथरुणाला खिळलेल्या घरातील एका पुरुषाशी बोलण्याची तिला संधी मिळाली. देवाच्या वचनात दिलेल्या आशेबद्दल माहिती मिळाल्यावर त्याच्या जीवनात एक नवी उमेद आली. लवकरच तो सभांना उपस्थित राहू लागला आणि नव्यानेच लाभलेल्या या आशेविषयी इतरांनाही सांगू लागला!
७ एका किशोरवयीन बहिणीने, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाआधी तासभर क्षेत्र सेवा करण्याचा सल्ला उपयोगात आणायचे ठरवले. पहिल्याच घरात तिला १३ वर्षांची एक मुलगी भेटली, जिने तिचे लक्षपूर्वक ऐकले आणि वाचण्यासाठी साहित्यही घेतले. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये नेमक्या याच मुलीशी बहिणीची गाठ पडली. तिने लगेच त्या मुलीला बायबल अभ्यास करण्यासंबंधी विचारले आणि ती तयारही झाली.
८ खर्च केलेल्या वेळेचे चीज करा: क्षेत्र सेवेत नियमित सहभाग घेतल्याने सुवार्तेचा प्रचार करण्यात अधिकाधिक कुशल होण्यास आपल्याला मदत मिळेल. अधिक परिणामकारक प्रस्तावनेचा उपयोग करून तुम्ही घरमालकाशी संभाषण सुरू करण्याचे आपले कौशल्य वाढवू शकता का? गृह बायबल अभ्यास चालवण्यात तुम्हाला अधिक निपुण होता येईल का? असे प्रयत्न केल्याने, तुम्ही सेवेत खर्च केलेल्या वेळेचे चीज होईल आणि तुमची सेवा परिणामकारक ठरेल.—१ तीम. ४:१६.
९ “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे,” त्यामुळे आपण आपल्या जीवनातला जास्तीतजास्त वेळ ख्रिस्ती कार्यांनाच दिला पाहिजे. (१ करिंथ. ७:२९) नियमित वेळ काढून प्रचार कार्याला जाणे हे आपल्या सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक असले पाहिजे. सेवेत जास्तीतजास्त, आवेशी सहभाग घेण्याचा आपण निर्धार करू या. आपल्या हातात असलेला वेळ म्हणजे यहोवाने दिलेले मौल्यवान साधन आहे. तेव्हा त्याचा नेहमी सदुपयोग करा, खर्च केलेल्या वेळेचे चीज करा.
[४ पानांवरील चौकट]
पुढील सहायक सूचना विचारात घ्या:
◼ क्षेत्र सेवेच्या सभांना वेळेवर या.
◼ शक्यतो साक्षीकार्यासाठी मोठ्या घोळक्याने एकत्रित होण्याचे टाळा.
◼ वेळ न घालवता लगेच क्षेत्रात निघून जा.
◼ बहुतेक लोक घरी भेटतील अशा वेळी क्षेत्र सेवा करा.
◼ सुरक्षित असल्यास प्रसंगी एकटेच कार्य करा.
◼ घरोघरच्या कार्यासाठी नेमलेल्या क्षेत्राच्या जवळपासच पुनर्भेटी करा.
◼ गटातला कोणी एखाद्या घरात जास्त वेळ बोलत असल्यास त्याच्यासाठी थांबण्याची गरज नाही; आपले कार्य पुढे चालू ठेवा.
◼ परिस्थिती लक्षात घेऊन, शक्यतो एका तासापेक्षा अधिक वेळ कार्य करा.