उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्हेने सेवा करा
१ आकाश काळवंडले आहे; एक भीतीदायक आवाज हळूहळू वाढून, कानठळ्या बसतील इतकी मोठी गर्जना ऐकू येत आहे. एक धूसर ढग खाली उतरतो. हे नेमके काय असावे? हा, देशाचा पूर्ण नाश करण्यासाठी निघालेला असंख्य टोळांचा ताफा आहे! योएल संदेष्ट्याने वर्णन केलेल्या या दृश्याची पूर्णता प्रचाराच्या कार्याद्वारे पूर्ण होत आहे; प्रचाराचे हे कार्य आज देवाचे अभिषिक्त सेवक, मोठ्या लोकसमुदायाच्या सोबतीने पार पाडत आहेत.
२ मे १, १९९८ टेहळणी बुरूजमधील पृष्ठ ११, परिच्छेद १९ म्हणतो: “ख्रिस्ती धर्मजगताच्या ‘शहरामध्ये’ देवाच्या आजच्या टोळासमान सैन्याने पूर्णपणे साक्ष दिली आहे. (योए. २:९) . . . ते अद्यापही सर्व अडथळे पार करत आहेत आणि यहोवाच्या संदेशाची घोषणा करत असता कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहंचत आहेत, लोकांना रस्त्यांवर भेटत आहे, दूरध्वनीद्वारे लोकांशी बोलत आहेत आणि संभाव्य असणाऱ्या प्रत्येक मार्गाद्वारे लोकांशी संपर्क साधत आहेत.” देवाने सोपवून दिलेल्या या कार्यात सहभाग घेणे एक मोठा सुहक्क नाही का?
३ खरोखरच्या टोळांचा केवळ एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे सतत पोटपूजा करत राहणे; पण आपल्याला, म्हणजे यहोवाच्या सेवकांना लोकांच्या जिवांची काळजी आहे आणि म्हणूनच आपण या लोकांना प्रचार करतो. देवाच्या वचनात असलेली महान सत्ये इतरांना शिकवण्यास आणि सार्वकालिक उद्धार प्राप्त करण्यासाठी काही पावले उचलण्यास त्यांना मदत करणे ही आपली इच्छा आहे. (योहा. १७:३; १ तीम. ४:१६) आणि म्हणूनच आपल्याला उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्हेने सेवा करण्याची आपली इच्छा आहे. प्रचार कार्याची पद्धत कोणतीही असो पण उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्हेने आणि अशा वेळी आपण हे कार्य करत आहोत की नाही हे विचारात घेणे जरूरीचे आहे. ‘जगाचे बाह्यस्वरूप बदलत जात असल्यामुळे’ आपण आपल्या प्रचाराच्या पद्धतींचे आणि प्रस्तुतींचे बारकाईने परीक्षण करण्यास हवे; असे केल्यास शक्य तितके उत्तम परिणाम मिळवण्याचे मोठे काम देखील आपल्याला साध्य करता येईल.—१ करिंथ. ७:३१; पं.र.भा.
४ आपण निरनिराळ्या मार्गांनी लोकांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न करत असलो तरी घरोघरचे प्रचार कार्य ही आपल्या सेवेची सगळ्यात मुख्य पद्धत आहे. घरोघरचे प्रचार कार्य करताना अनेकदा लोक घरी नसतात किंवा ते झोपलेले असतात; असा तुमचा अनुभव आहे का? अशा लोकांना सुवार्तेचा संदेश सांगता न आल्यामुळे साहजिकच आपण निराश होतो. ही समस्या कशी सोडवता येईल?
५ बदल आणि तडजोडी करायला तयार असा: पहिल्या शतकातल्या इस्राएलमधले कोळी मासे पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी बाहेर पडत असत. रात्रीच्या वेळी मासे धरण्याचे कारण काय असावे? अर्थात, ही वेळ त्यांच्यासाठी तशी सोईस्कर नव्हतीच; पण या वेळीच त्यांना भरपूर मासे पकडता यायचे. त्यांच्या कामाचे सगळ्यात उत्तम फळ त्यांना याच वेळी मिळायचे. त्यांच्या या पद्धतीविषयी सप्टेंबर १, १९९२, टेहळणी बुरूज असे म्हणते: “याचप्रमाणे आम्हीही आमच्या क्षेत्राचा वेध घ्यावा व अशावेळी तेथे जावे की, आम्हाला अधिक लोक भेटतील व आमचे स्वागत होईल.” लोकांच्या सर्वसामान्य सवयी लक्षात घेतल्यावर असे दिसून आले, की शनिवार-रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळी आपण शहरातल्या आणि निवासी क्षेत्रांतल्या लोकांच्या घरी जातो तेव्हा अनेक लोक या वेळी सहसा आनंदाने आपले स्वागत करत नाही. तुमच्या क्षेत्राच्या बाबतीत देखील असेच असले तर तुमच्या वेळांमध्ये बदल करून सकाळी थोडे उशिरा किंवा दुपारी त्यांच्या घरी जाऊ शकता. सेवेत चांगले परिणाम मिळवण्याचा तसेच आपल्या शेजाऱ्यांबद्दल विचारशीलता दाखवण्याचा अर्थात खरे ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.—मत्त. ७:१२.
६ फिलिप्पैकर ४:५ (सुबोध भाषांतर) या शास्त्रवचनात प्रेषित पौल आपल्याला अशी आठवण करून देतो की, ‘तुम्ही समजूतदार आहात हे प्रत्येकाला दिसू द्या.’ देवाने दिलेल्या या सुचनेचे पालन करण्यासाठी आपण एक गोष्ट केली पाहिजे; ती म्हणजे, आपल्याला सोपवून दिलेले प्रचाराचे काम आवेशाने आणि उत्साहाने पार पाडत असताना आपण आपल्या प्रचाराच्या पद्धतींसंबंधी संतुलित आणि समजूतदार असले पाहिजे. “चार लोकात व घरोघरी शिकवण्यात” आपण कसूर करत नाही पण त्याच वेळी लोकांसाठी सोईस्कर असेल अशा वेळी आणि आपल्यालाही उत्तम परिणाम मिळतील अशा वेळी आपण घरोघरचे कार्य करण्यास हवे. (प्रे. कृत्ये २०:२०) पहिल्या शतकातल्या इस्राएलमधील कोळ्यांप्रमाणेच आपणही आपल्याला सोईस्कर असेल अशा वेळी नव्हे, तर आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळेल अशा वेळी ‘मासे पकडू’ इच्छितो.
७ आपल्याला कोण-कोणत्या तडजोडी करता येतील? शनिवार-रविवारच्या दिवशी क्षेत्र सेवेच्या सभा सहसा सकाळी नऊ-साडे नऊ वाजता होतात; त्यानंतर मग बांधव लगेच घरोघरचे कार्य करण्यासाठी क्षेत्रात जातात. पण, निवासी क्षेत्रात घरोघरचे कार्य करण्याआधी स्ट्रीट विटनेसिंग, व्यापारी क्षेत्र किंवा पुनर्भेटी अशा सेवेच्या इतर पैलूंमध्येही भाग घेता यावा म्हणून काही वडिलांनी आपापल्या गटात तशा योजना केल्या आहेत. इतर मंडळ्यांनी सकाळी उशिरा म्हणजे दहा, अकरा किंवा दुपारी १२ वाजता क्षेत्र सेवेच्या सभा ठेवल्या आहेत. त्यानंतर मग बांधव सरळ घरोघरचे कार्य करण्यासाठी जातात आणि दुपारी अडीज-तीन पर्यंत ते सेवा करतात. काही क्षेत्रांमध्ये, सकाळपेक्षा अशी दुपारची वेळच क्षेत्र सेवेच्या सभांसाठी सगळ्यात चांगली ठरते. अशा प्रकारच्या तडजोडी केल्याने घरोघरच्या कार्यात जास्तीत जास्त उत्तम परिणाम मिळू शकतील.
८ समंजसपणाने आणि चातुर्याने वागा: घरोघरचे कार्य करताना लोक निरनिराळ्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवतात. काही लोक आपले स्वागत करतात, इतरजण फारशी आस्था दाखवत नाहीत आणि काही विनाकारण वाद घालणारे किंवा भांडण करणारे असतात. वाद घालणारे किंवा भांडण करणारे यांच्याविषयी शास्त्रवचनांतून युक्तिवाद करणे (इंग्रजी) या पुस्तकात आपल्याला अशी आठवण करून दिली आहे, की “ज्यांना सत्याबद्दल आदर नाही अशांसोबत ‘विनाकारण वाद घालून आपलेच म्हणणे खरे करून दाखवायचा’ आपला प्रयत्न नाही.” घरमालक विरोध करणारा असेल तर तिथून काढता पाय घेणेच सगळ्यात उत्तम. लोकांनी आपल्याशी बोलावेच किंवा आपले म्हणणे ऐकून घ्यावेच असा आग्रह करून आपण कधीच विनाकारण लोकांशी वैर घेऊ नये. आपण बळजबरीने आपला संदेश लोकांवर लादू इच्छित नाही. असे करणे समजूतदारपणाचे ठरणार नाही, शिवाय त्यामुळे आपल्या इतर बांधवांवर आणि सर्वसामान्यपणे आपल्या कार्यावरही विपरीत परिणाम घडू शकतील.
९ एखाद्या क्षेत्रात कार्य सुरू करण्याआधी टेरिटरी कार्ड पाहणे केव्हाही चांगलेच असते. असे केल्यास ज्या घरमालकांनी आपल्याला त्यांच्या भेटी घेण्यास मना केले आहे अशांचे नावपत्ते आपल्याला माहीत होतील. असे काही नावपत्ते असतील तर कोठे भेट दिली जाऊ नये हे त्या विशिष्ट भागात कार्य करणाऱ्या प्रत्येक प्रचारकाला सांगितले पाहिजे. स्वतःहून अशा लोकांना भेटी द्यायला जाऊ नये; अर्थात, सर्व्हिंस ओव्हरसियरने तिथे जायला तुम्हाला सांगितले असेल तर गोष्ट वेगळी.—जानेवारी १९९४ च्या आमच्या राज्य सेवेतील प्रश्न पेटी पाहा.
१० घरोघरचे कार्य करताना आपण समंजसपणा दाखवला तर आपल्याला जास्तीत जास्त उत्तम परिणाम मिळतील. एखाद्या घरापाशी येता तेव्हा बारकाईने निरीक्षण करा. घराचे पडदे, दारे, खिडक्या बंद आहेत का? अगदी शुकशुकाट आहे का? याचा अर्थ त्या घरातली माणसे झोपलेली आहेत. आपल्या संभाषणाचा चांगला परिणाम व्हावा म्हणून अशा ठिकाणी नंतर आलेलेच बरे. कदाचित, हे घर सोडून पुढे जाणे सगळ्यात बरे राहील; पण असे करण्याआधी ते कोणते घर होते याची अचूक नोंद घेतली जावी. क्षेत्रातून बाहेर पडण्याआधी पुन्हा एकदा तुम्ही त्या घरी भेट देऊ शकता किंवा दुसऱ्या एखाद्या वेळी भेट देण्यासाठी त्या घराची नोंद घ्यावी.
११ पण एवढी काळजी घेऊन सुद्धा कधी कधी आपण जातो तेव्हा एखाद्याची झोपमोड होते किंवा त्याच्या दुसऱ्या कोणत्या कामात व्यत्यय येतो. अशावेळी घरमालक आपल्यावर चिडतो आणि आपल्याशी रागाने बोलतो. मग आपली काय प्रतिक्रिया असावी? नीतिसूत्रे १७:२७ असा सल्ला देते: “ज्याची वृत्ति शांत तो समंजस असतो.” आपण सेवा करतो याबद्दल दिलगिरी व्यक्त करत नसलो तरी आपण चुकीच्या वेळी आलो आहोत याबद्दल न विसरता दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. त्यांना कोणती वेळ सोईस्कर असेल हे आदरपूर्वक विचारून पुन्हा भेट घेण्याविषयी आपण त्यांना विचारू शकतो. घरमालकाच्या सोयी-गैरसोयीबद्दल आपल्याला काळजी आहे हे प्रामाणिकपणे आपण त्याला सांगतो तेव्हा सहसा असे आढळून आले आहे, की त्याला बरे वाटते, आणि तो आधीपेक्षा मोकळेपणाने बोलतो. (नीति. १५:१) आपण नेहमीच नाईट शिफ्ट करत असतो असे एखादा घरमालक आपल्याला सांगतो तेव्हा हे एखाद्या चिठ्ठीवर लिहून ही चिठ्ठी आपल्या टेरिटरी कार्डसोबत ठेवा म्हणजे पुढच्या वेळी जो कोणी तिथे जाईल तो योग्य वेळी जाऊ शकेल.
१२ क्षेत्र पूर्णपणे उरकण्याचा आपला प्रयत्न असला तरी असे करताना समंजसपणा दाखवणे फार जरूरीचे आहे. कित्येक वेळी असे होते, की आपण पहिल्यांदा भेट देतो तेव्हा अनेक लोक आपल्याला घरी भेटत नाहीत; पण अशा लोकांना देखील येणाऱ्या नाशातून बचावणारा संदेश ऐकायला मिळावा म्हणून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आपल्याला पुन्हा प्रयत्न करावा लागतो. (रोम. १०:१३) पण असे ऐकण्यात आले आहे, की काही प्रचारक एकाच दिवशी वारंवार त्याच घरी जाऊन ते लोक परत आले आहेत की नाही हे पाहण्यासाठी जातात. पण हे शेजारपाजारच्या लोकांच्या लक्षात येते. यहोवाचे साक्षीदार ‘सतत येतात’ अशी वाईट छाप लोकांवर पडते. यावर काही उपाय आहे का?
१३ समंजसपणा दाखवा. एखाद्या नॉट-ॲट-होम कॉलवर परत जाताना घरमालक परत आल्याची काही चिन्हे दिसतात का ते पाहा. टपाल दारातच पडलेले दिसल्यास घरमालक अजून आला नाही हे समजते; तेव्हा पुन्हा या घरी जाण्याचा काहीच फायदा होणार नाही. वेगवेगळ्या समयी जाऊनही घरमालक जर घरी सापडत नसेल तर मग कदाचित फोनवर बोलण्याचा प्रयत्न करता येईल; हे देखील जमले नाही तर एखादा ट्रॅक्ट किंवा हँडबिल दारातून आत टाकले जाऊ शकते; खास करून क्षेत्र अनेकदा उरकलेले असते तेव्हा असे केले जाऊ शकते. कदाचित पुढच्या वेळी पुन्हा ते क्षेत्र उरकले जाईल तेव्हा या घरमालकाला भेट दिली जाऊ शकते.
१४ ऊन, वारा, पाऊस किंवा इतर कारणांमुळे घरमालकाला जर दारात उभे राहून बोलताना त्रास होत असेल तर अशावेळी आपण अगदी थोडक्यात बोलले पाहिजे. घरमालकाने आत बोलावल्यास घरातील फरशी घाण होणार नाही याची काळजी घ्यावी. कुत्रे भुंकत असल्यास वेळीच सावध होऊन समंजसपणे वागा. अपार्टमेंट बिल्डिंग्समध्ये काम करत असताना हळू आवाजात बोला; राहणाऱ्यांना आपल्या आवाजामुळे त्रास होईल किंवा तुम्ही आला आहात हे सर्वांना कळेल असा मोठा आवाज करू नका.
१५ सुव्यवस्था राखा आणि सभ्यपणे वागा: आधीच नीट योजना केलेली असल्यास चटकन लोकांच्या नजरेत येतील असे मोठमोठे गट टाळता येतील. कार्स, मोटरसायकल्स, स्कूटर्स किंवा व्हॅन्सचा ताफाच लोकांच्या घरांसमोर येतो तेव्हा साहजिकच त्याना भीती वाटू शकेल. आपण त्यांच्या निवासी क्षेत्रांवर जणू “अतिक्रमण” करत आहोत असे आपण भासवू इच्छित नाही. कोण कोठे कार्य करील इत्यादी गोष्टी क्षेत्र सेवेच्या सभांमध्येच ठरवून घेणे उत्तम. गट लहान असल्यास उदाहरणार्थ, एखादे कुटुंब क्षेत्रात जाते तेव्हा तिथल्या लोकांना त्यांची भीती वाटत नाही शिवाय क्षेत्र वाटून देणे देखील सोपे होते.
१६ क्षेत्रात कार्य करत असताना पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावे; हा देखील सुव्यवस्था राखण्याचा एक भाग आहे. मोठ्यांसोबत घरोघरचे कार्य करताना मुलांनी नीट वागले पाहिजे. लहानग्यांना खेळू किंवा इकडे तिकडे फिरू देऊ नये कारण यामुळे राहणाऱ्यांचे, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे उगाच लक्ष वेधले जाते.
१७ अधूनमधून थांबून चहापाणी करण्याच्या बाबतीत देखील संतुलन राखण्याची गरज आहे. आमची राज्य सेवा १९९५, पृष्ठ ३ म्हणते: “क्षेत्र सेवेत असताना, चहापाणी घेण्यात आपला मूल्यवान वेळ घालवला जाऊ शकतो. तथापि, त्रासदायक हवामान असल्यास, थोडी सुटी घेतल्याने आपण ताजेतवाने होऊ आणि त्यामुळे आपल्याला कार्य करत राहण्यास मदत मिळेल. तथापि, पुष्कळ जण सेवेसाठी राखलेल्या वेळेत चहापाणी घेण्याद्वारे बांधवांसोबत सहवास राखण्याचे टाळतात आणि लोकांना साक्ष देण्यामध्ये व्यग्र राहण्याचे पसंत करतात.” अधूनमधून थांबून चहापणी घ्यावा की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी असे दिसून आले आहे, की काही वेळा बंधुभगिनी मोठा घोळका करून चहाच्या स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये जातात. ऑर्डर मिळेपर्यंत वेळ तर वाया जातोच शिवाय, अशा मोठ्या घोळक्यामुळे तिथे असलेल्या लोकांच्या मनातही शंका निर्माण होते. काही वेळा सकाळच्या क्षेत्र सेवेत आलेल्या अनुभवांविषयी मोठमोठ्याने चर्चा केली जाते; पण यामुळे आपल्या सेवेबद्दल आदर राहणार नाही आणि त्यामुळे सेवेतही आपल्याला उत्तम परिणाम मिळणार नाहीत. कोणत्याही एकाच ठिकाणी घोळका करण्याचे आणि विनाकारण वेळ वाया घालवण्याचे टाळून प्रचारक समंजसपणा दाखवू शकतात.
१.८ जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांच्याशी संभाषण करण्याचा आपला प्रयत्न असतो; आणि अनेक प्रचारकांना रस्त्यावर, पार्किंगच्या जागेत किंवा इतर कोणत्या सार्वजनिक ठिकाणी प्रचार केल्यामुळे चांगले परिणाम मिळाले आहेत. पण या बाबतीत देखील आपल्याला केवळ आपल्या बोलण्याद्वारेच नव्हे, तर आपल्या समंजसपणामुळे देखील चांगली साक्ष द्यायची आहे. प्रत्येक मंडळीतील प्रचारकांनी आपल्याला नेमून दिलेल्या क्षेत्रात कार्य करावे जेणेकरून व्यापारी क्षेत्रांत आणि बस किंवा रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारांत किंवा पेट्रोल पंपसारख्या चोवीस तास चालू राहणाऱ्या व्यापारी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना त्रास, अडखळण होणार नाही. ही काळजी घेण्यासाठी आपण आपली सेवा सुव्यवस्थितपणे, सभ्यपणे पार पाडतो आणि आपल्या नियुक्त क्षेत्रामध्येच कार्य करू; क्षेत्र उरकण्यात मदत व्हावी म्हणून दुसऱ्या मंडळीच्या काँग्रीगेशन सर्व्हिस कमिटीने काही खास योजना आखल्या असल्यास मात्र गोष्ट निराळी.—पडताळा २ करिंथकर १०:१३-१५.
१९ जेथे सार्वजनिक साक्षीकार्य करणे शक्य आहे असे अनेक विभाग काही मंडळ्यांकडे आहेत; अशा मंडळ्यांनी या विभागांचे क्षेत्रांत संघटन केले आहे. मग एखाद्या प्रचारकाला किंवा गटाला टेरिटरी कार्ड दिले जाते. यामुळे परिणामकारकपणे क्षेत्र उरकले जाते शिवाय एकाच वेळी, एकाच क्षेत्रात अनेक प्रचारक काम करतात अशी स्थिती निर्माण होत नाही; हे १ करिंथकर १४:४० मध्ये दिलेल्या सिद्धान्ताच्या एकमतात आहे जे म्हणते: “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.”
२० आपला पेहराव सभ्य असावा आणि यावरून आपण यहोवाचे नाव धारण करणारे त्याचे प्रतिनिधी आहोत हे सिद्ध झाले पाहिजे. आपण क्षेत्र सेवेसाठी वापरत असलेल्या साधनांना देखील हे लागू होते. फाटलेल्या, कुरतडलेल्या बॅग्स किंवा अगदी जुन्यापुराण्या, मळलेल्या बायबल्समुळे राज्य संदेशापासून लोकांचे लक्ष विचलित होईल. असे म्हटले जाते की, वेशभूषा आणि केशभूषा “पटकन संभाषण सुरू करण्यात मदत करतात आणि आपण कोण आहोत, कशा प्रकारचे लोक आहोत यांबद्दल पुष्कळ काही सांगून जातात.” म्हणून मग आपले बाह्यस्वरूप गबाळे, अस्ताव्यस्त भपकेबाज किंवा अवाजवी देखील नसावे; पण “ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे” असावे.—फिलिप्पै. १:२७; पडताळा १ तिमथ्य २:९, १०.
२१ पहिले करिंथकर ९:२६ मध्ये प्रेषित पौल म्हणतो: “मीहि तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धहि करितो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही.” पौलाप्रमाणे आपणही चांगले परिणाम मिळतील अशा प्रकारे सेवा करण्याचा निर्धार करू. यहोवाच्या ‘टोळांच्या सैन्याचा’ भाग या नात्याने आपण आज साक्षीकार्यात आवेशाने सहभाग घेताना आणि येणाऱ्या नाशातून लोकांना बचावणारा संदेश क्षेत्रात सांगताना ख्रिस्ती समजूतदारपणा आणि समंजसपणा दाखवू या.