प्रार्थना करा, यहोवाकडे साहाय्य मागा
१ आपल्या सेवेवर यहोवाचा आशीर्वाद असणे किती महत्त्वाचे आहे, हे येशूने आपल्या शिष्यांना जोर देऊन सांगितले होते. (मत्त. ९:३७, ३८) जेव्हा आपण मनःपूर्वक प्रार्थनेतून स्तुती आणि आभारप्रदर्शनासह, देवाला कळकळीची विनंती आणि याचना करतो, तेव्हा आपण दाखवून देत असतो की आपण यहोवाच्या मदतीवर पूर्णपणे विसंबून आहोत. (फिलिप्पै. ४:६, ७) बायबल आपल्याला सर्व प्रसंगी तसेच, “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी” करण्याचे प्रोत्साहन देते; यांत आपल्या सेवेसंबंधी केलेल्या प्रार्थनांचाही समावेश आहे.—इफिस. ६:१८.
२ प्रार्थनेत आपण यहोवाच्या अद्वितीय गुणांबद्दल आणि महान कार्यांबद्दल त्याची स्तुती करतो. तसेच, आपण ज्या सुवार्तेचा प्रचार करतो ती सुवार्ता आपल्याला दिल्याबद्दलही त्याची स्तुती करतो. आणि आपण त्याची स्तुती केलीच पाहिजे कारण केवळ तोच आपल्या प्रयत्नांना यश देऊ शकतो.—स्तोत्र १२७:१.
३ प्रार्थनेत आपण देवाचे आभार देखील मानतो, आणि यहोवाने आपल्याला त्याची इच्छा आणि उद्देश समजून घेण्यासाठी मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. देवाच्या राज्याचे सत्य आपण इतरांना सांगू शकतो हा एक बहुमानच नाही का? म्हणूनच, सेवेतून आपल्याला जे काही फळ मिळते त्यासाठी आपण यहोवाचे आभार मानतो.—स्तोत्र १०७:८; इफिस. ५:२०.
४ लोकांनी आपला बायबल अभ्यासाचा प्रस्ताव स्वीकारावा म्हणून आपण यहोवाकडे मदत मागतो, आणि त्यांना सत्य शिकवताना आपल्याला त्यांच्या अगदी मनापर्यंत पोचता यावे म्हणूनही आपण त्याची मदत मागतो; आणि असे करणे योग्यच आहे. कारण अशा विनंत्या करताना आपण एका अर्थाने कबूल करत असतो की केवळ देवच आपल्याला सेवेत यश देऊ शकतो.—१ करिंथ. ३:५-७.
५ एक बहीण एका स्त्रीला नियमित मासिके नेऊन द्यायची. पण तिला सारखे वाटायचे की ही स्त्री टेहळणी बुरूज आणि सावध राहा! वाचत नाही. अशाने आपल्या अमूल्य मासिकांचा काहीच उपयोग होणार नाही या विचाराने, त्या बहिणीने यहोवाला प्रार्थना केली की जर ती स्त्री मासिके वाचत नसेल तर तिने यापुढे ती स्वीकारू नयेत. पुढच्या वेळी जेव्हा ती गेली तेव्हा त्या स्त्रीचे पती तिला म्हणाले: “ही मासिकं नियमित आणून देण्याबद्दल धन्यवाद. मी ती वाचत असतो आणि मला ती खूप आवडतात.”
६ लोक आपल्या संदेशाला थंड प्रतिसाद देतात, आपली थट्टा करतात, तसेच मनुष्याची भीती आपल्यावर प्रबल होऊ लागते तेव्हाही आपण इतरांना निर्भयपणे साक्ष देत राहण्याकरता मदतीसाठी यहोवाकडे नम्रपणे कळकळीची याचना करू शकतो. (प्रे. कृत्ये ४:३१) आपण “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी” करत राहिलो, आणि त्यासोबतच आज्ञाधारकपणे पवित्र सेवाही करत राहिलो तर यहोवा आपल्याला मदत करेल याची आपण खात्री बाळगू शकतो.—१ योहा. ३:२२.