तुम्ही केवळ बाह्यस्वरूप पाहता का?
१ प्रचार कार्य करत असताना काही लोकांना पाहताक्षणीच आपण त्यांच्याबद्दल एक विशिष्ट मत बनवून टाकतो आणि मग अशा लोकांना सुवार्ता सांगायला आपण थोडे बिचकतो. उदाहरणार्थ, सत्याबद्दल आस्था दाखवणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही भेट देता तेव्हा त्याच्या शेजारचा रागीट दिसणारा माणूस एकसारखा संशयाने तुमच्याकडे पाहत असेल तर तुम्ही काय कराल? एका पायनियर बहिणीला नेमका हाच अनुभव आला; तिने पुढाकार घेऊन त्या मनुष्यासोबत बोलण्याचे ठरविले. सुरवातीला तो तिच्याशी रागानेच बोलला. पण, आश्चर्य म्हणजे त्याने बायबलचा संदेश ऐकून घेतला आणि अभ्यास करण्यासही तो काहीशा उत्साहाने तयार झाला. या बहिणीने केवळ बाह्यस्वरूप पाहून आपले मत न बनवल्यामुळे, त्या मनुष्याला आणि त्याच्या पत्नीला सत्य शिकण्याची संधी मिळाली.
२ आणखीन एका बहिणीचे उदाहरण विचारात घ्या. ती जिथे काम करत होती त्या दुकानात लांब केस असलेला एक तरुण नेहमी यायचा; सुरवातीला ती त्याला पाहून घाबरली होती; पण, जेव्हा जेव्हा तो युवक यायचा तेव्हा तेव्हा ती सत्याबद्दल त्याच्याशी थोडक्यात बोलायची. तिच्या प्रयत्नांचे सार्थक झाले कारण आज तो युवक बाप्तिस्मा झालेला साक्षीदार आहे. तर मग, अशा प्रकारचे लोक कधीच आपले ऐकून घेणार नाहीत असे तडकाफडकी ठरवून टाकण्याचे आपण कसे टाळू शकतो?
३ येशूचे अनुकरण केल्याने: येशूला याची जाणीव होती की त्याला सर्वांसाठी आपले जीवन द्यायचे होते. म्हणूनच, लोकांचे बाह्यस्वरूप पाहून तो कधीही बिचकला नाही. समाजात बदनाम असलेल्या लोकांना देखील योग्यप्रकारे मदत आणि उत्तेजन दिले तर ते स्वतःमध्ये बदल करण्यास तयार होऊ शकतात, याची त्याला जाणीव होती. (मत्त. ९:९-१३) त्याने गरीब-श्रीमंत, सर्वांचे साहाय्य केले. (मत्त. ११:५; मार्क १०:१७-२२) तर मग, सेवेत भेटणाऱ्या लोकांबद्दल केवळ वरवर पाहून आपण मत बनवू नये; नाहीतर, चांगले मन ज्याला म्हणतात त्याकडे आपली डोळेझाक होण्याची शक्यता आहे. (मत्त. ७:१, पं.र.भा.; योहा. ७:२४) या बाबतीत येशूने घालून दिलेल्या उल्लेखनीय उदाहरणाचे अनुकरण करण्यास कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?
४ बायबलच्या आपल्या अभ्यासातून आपल्याला जाणीव झाली आहे, की देवाच्या वचनात माणसाची विचारसरणी, आचरण आणि व्यक्तिमत्त्व यांत बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे. (इफिस. ४:२२-२४; इब्री. ४:१२) तेव्हा, पुरेशी साधवगिरी बाळगतानाच पक्षपात न करता आपण सर्व लोकांना साक्ष द्यावी आणि हृदय पाहणाऱ्या यहोवा देवाच्या हाती बाकीचे सोपवून द्यावे.—१ शमु. १६:७; प्रे. कृत्ये १०:३४, ३५.
५ अशाप्रकारे, पक्षपात न करता सर्व माणसांना सुवार्ता सांगत राहिल्यामुळे या शेवटल्या काळातील महान कापणीच्या कामाला आपण हातभार लावू शकू.—१ तीम. २:३, ४.