प्रश्न पेटी
◼ आपली लहान मुले क्षेत्र सेवेत सहभाग घेतात तेव्हा पालकांनी कोणती सावधगिरी बाळगणे जरूरीचे आहे?
ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना क्षेत्र सेवेत घेऊन जातात, इतरांना राज्याची सुवार्ता सांगण्याचे प्रशिक्षण त्यांना देतात आणि असे करणे योग्यच आहे. पण, हे करत असताना क्षेत्रातील तसेच जवळपासच्या तथाकथित ‘सुरक्षित’ परिसरातील संभाव्य धोक्यांपासून आपल्या लहानग्यांना सांभाळण्याचीही गरज आहे. हल्लीच्या ‘कठीण दिवसांतील’ बेसुमार हव्यासामुळे तसेच लैंगिक भ्रष्टाचारामुळे अधिकाधिक मुले हिंसेची आणि दुर्व्यवहाराची शिकार बनत आहेत. (२ तीम. ३:१-५) आपल्या मुलांवर झडप घालणाऱ्या लोकांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी पुरेशी सावधगिरी बाळगणे जरूरीचे आहे. त्याकरता पालक काय करू शकतात?
आपण सावध राहून संभाव्य धोक्याचा वेध घ्यावा असा सुज्ञ सल्ला बायबल आपल्याला देते. (नीति. २२:३; मत्त. १०:१६, मराठी कॉमन लँग्वेज बायबल) या ठिकाणी, कोणतेही नियम बनवण्याचा हेतू नसला तरीही क्षेत्र सेवेत असताना एखाद्या लहान मुलाने आपल्या पालकासोबत किंवा एखाद्या प्रौढ व्यक्तीसोबत कार्य करणे सुज्ञतेचे ठरेल. वयाने लहान असणारे दोन जबाबदार प्रचारक एकत्र कार्य करत असतील तर एखाद्या पालकाची किंवा प्रौढ व्यक्तीची त्यांच्यावर सतत नजर असावी. अर्थात, मूल मोठे होत जाते आणि अधिक जबाबदार बनते तसे त्याला किंवा तिला पालकांच्या प्रत्यक्ष देखरेखीची कितपत गरज आहे हे खुद्द पालकच ठरवू शकतात.—नोव्हेंबर १९९४ च्या आमची राज्य सेवा अंकातील प्रश्न पेटी देखील पाहा.
याशिवाय, वाहनातून प्रवास करताना किंवा पायी जात असताना देखील सुरक्षिततेची सतत काळजी घेणे जरूरीचे आहे. योग्य सावधगिरी बाळगल्याने अपघात, एवढेच नाही तर दुखापती, वैद्यकीय खर्च आणि हल्लीच्या भांडखोर प्रवृत्तीच्या लोकांच्या किचकट कोर्टकचेऱ्या आणि यांसारखे इतर दुष्परिणामही सहसा टळतात.
लहानग्यांच्या मुखांतून “परमेश्वराच्या नावाचे स्तवन” होणे यथोचित आहे. (स्तोत्र १४८:१२, १३) क्षेत्र सेवेतील त्यांच्या मोहक बोलण्यामुळे आणि त्यांच्या सदाचरणामुळे लोक अतिशय प्रभावित होतात; शिवाय, त्यामुळे यहोवाचा सन्मानही होतो. यास्तव पालकहो, सुवार्तेची घोषणा करण्याच्या कार्यात नियमित सहभाग घेण्यास तुमच्या मुलांना जरूर साह्य करा आणि असे करत असता कोणत्याही संभाव्य धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करण्याविषयीही नेहमी सतर्क असा!