सन १९९९ “देवाचे भविष्यसूचक वचन” प्रांतीय अधिवेशने
१ इस्राएल लोक वचनयुक्त देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना मोशेने त्यांना देवाच्या शिक्षणाविषयी कृतज्ञता दाखवण्याची विनवणी केली. “ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय,” असे मोशेने इस्राएल लोकांना म्हटले. (अनु. ३२:४५-४७) यहोवाच्या नजरेत आपल्यालाही मोल आहे आणि म्हणून त्याच्या अमूल्य वचनाद्वारे तो आपले निरंतर मार्गदर्शन करतो; याबद्दल आपण देखील त्याचे कृतज्ञ नसावे का? त्यामुळेच, “देवाचे भविष्यसूचक वचन” या तीन दिवसीय प्रांतीय अधिवेशनाची आणि यहोवाने आपल्यासाठी जे काही वाढून ठेवले आहे त्याची आतुरतेने आपण वाट पाहत आहोत.
२ भारतात यंदा २७ ठिकाणी ही प्रांतीय अधिवेशने होणार असल्यामुळे एकूण सर्वांनाच उपस्थित राहण्यास सोयीचे ठरेल. याशिवाय, भारतात पहिल्यांदाच मिझो भाषेतून देखील एक संक्षिप्त अधिवेशन होणार आहे.
३ या अधिवेशनांना तुम्ही उपस्थित राहावे अशी अपेक्षा यहोवा करत असल्यामुळे अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी जातीने उपस्थित राहण्यास तुम्ही आताच तयारीला लागला असाल यात शंका नाही. उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती जे काही प्रयत्न आणि त्याग करते ते यहोवा पाहतो आणि त्याची कदर राखून त्याचे स्मरण करतो याबद्दल विश्वस्त राहा. (इब्री ६:१०) अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी, सुरवातीच्या गीतापासून समारोपाच्या प्रार्थनेपर्यंत उपस्थित राहून आपण हेच दाखवून देतो की आपल्याला त्याच्या वचनांची किंमत आहे. (अनु. ४:१०) तसेच, या अधिवेशनासाठी ज्या अनेक बांधवांनी कष्ट केले त्यांच्याप्रतीही आपण कृतज्ञता दाखवतो.
४ प्रत्येक अधिवेशन स्थळी देवाच्या हजारो लोकांची व्यवस्था करण्यासाठी आगाऊ योजना आणि उत्तम व्यवस्था करण्याची गरज आहे. आपल्यासाठी अधिवेशनांची तयारी मोठ्या आपुलकीने करण्यात आली आहे या जाणीवेने सहकार्य करण्यास आपल्याला प्रवृत्त करावे; जेणेकरून “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे” पार पडेल. (१ करिंथ. १४:४०) तुम्हाला आध्यात्मिक अन्नाचा आणि ख्रिस्ती बांधवांच्या सहवासाचा आनंद घेण्यासाठी पूर्ण तयारीनिशी अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून काही माहिती आणि पुन्हा आठवण करून देणाऱ्या काही गोष्टी पुढे दिलेल्या आहेत.
अधिवेशनाच्या आधी
५ अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना आणि इतर आस्थेवाईक लोकांना काही मदत हवी आहे का? कारण अधिवेशनात ते जे काही पाहतील, ऐकतील त्यामुळे यहोवाचे उपासक बनण्याची प्रेरणा त्यांना मिळेल. (१ करिंथ. १४:२५) राहण्याच्या किंवा येण्या-जाण्याच्या सोयीसंबंधी कोणालाही मदत हवी असल्यास आणि खासकरून मंडळीतील वयोवृद्ध लोकांना मदत हवी असल्यास वडिलांना याची कल्पना असावी आणि या सर्व गोष्टींची त्यांनी प्रेमळपणे सोय करावी.—गलती. ६:१०.
६ तुमच्याविषयी काय? तुमच्या राहण्याची सर्व सोय झाली आहे का? तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहणार असल्यास तुमच्या रूमचे बुकींग कन्फर्म झालेले आहे का? तसेच, रूमचे अडव्हान्सही तुम्ही हॉटेलला पाठवून दिले आहे का?
७ एखाद्या विशिष्ट अधिवेशनाबद्दल काही माहिती हवी असल्यास तुमच्या मंडळीचे सचीव तुम्हाला त्या अधिवेशन स्थळाचा पत्ता देऊ शकतील. मात्र, अधिवेशन भरले जाते त्या सभागृहाच्या व्यवस्थापनाला फोन करू नका अथवा पत्र लिहू नका.
८ अधिवेशनातील प्रथमोपचार विभाग केवळ तातडीच्या प्रसंगांसाठी असल्यामुळे तुम्हाला लागणारे ॲस्प्रिन, बॅन्डेजस, इन्हेलर, पाचक गोळ्या आणि अशा इतर औषधांची आवश्यकता भासेल असे माहीत असल्यास ते तुम्ही स्वतः घेऊन यावे. तुम्हाला किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला हृदय विकाराची, मधुमेहाची किंवा झटके येण्याची गंभीर समस्या असल्यास तुम्ही घरी असता तेव्हा किंवा कुठे सुटीला जाता तेव्हा जशी दक्षता घेता तशीच अधिवेशनाला येतानाही आवश्यक ती औषधे सोबत घेऊन या. एखादा कौटुंबिक सदस्य किंवा ज्याला त्या व्यक्तीच्या आजाराविषयी माहिती आहे असा जवळचा मित्र सतत अशा व्यक्तीसोबत राहावा म्हणजे समस्या उद्भवलीच तर त्याला तो प्रसंग चांगल्याप्रकारे हाताळता येईल.
९ अधिवेशनाला येता-जाता अनौपचारिक साक्षकार्य करण्याची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. मग, इतरांना सत्य सांगण्यास तुम्ही तयार असाल का? पेट्रोल पंपावर, टोल घेणाऱ्यांवर किंवा वाटेत भेटणाऱ्या लोकांना आपण सर्वजण पत्रिका देऊ शकतो; यात लहान मुले देखील सहभाग घेऊ शकतात. तसेच, आस्था दाखवणाऱ्या लोकांना नियतकालिके, माहितीपत्रके किंवा इतर प्रकाशने देण्याची संधीही तुम्हाला मिळेल. आपल्या नेहमीच्या प्रचार कार्यात सहसा न भेटणाऱ्या लोकांना अनौपचारिक साक्ष देण्यास तयार असा.
अधिवेशनादरम्यान
१० अधिवेशनाच्या स्थळी, सभागृहाचे दरवाजे उघडले जातात तेव्हा तुम्ही केवळ तुमच्या कुटुंबियांसाठी किंवा जवळच्या व्यक्तींसाठीच जागा राखून ठेवू शकता. वयस्कर बंधुभगिनींसाठी सोयीस्कर ठिकाणी राखीव जागा असतील. तसेच, अपंगांसाठी आणि व्हिलचेअरचा उपयोग करणाऱ्यांसाठी विशिष्ट जागा राखून ठेवली जाईल. ज्यांना हवामानसंबंधित आजार आहेत किंवा ॲलर्जी आहे अशांसाठी अधिवेशनात खास खोल्या राखणे शक्य नाही. दररोज, अधिवेशन संपल्यानंतर आपल्या जागेवरून उठण्यापूर्वी तुमचे सर्व सामानसुमान आहे की नाही याची खात्री करा.
११ या प्रांतीय अधिवेशनांना मोठ्या संख्येने उपस्थित राहता यावे म्हणून आपल्याला स्थानिक कायदेकानुनांचे, अग्नी-प्रतिबंधक सूचनांचे आणि सुरक्षेसंबंधित इतर गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. यास्तव, पॅसेजमध्ये आणि सभागृहातून बाहेर पडण्याच्या मार्गांत कोणतेही अडथळे नसावेत. अचानक धोक्याचा प्रसंग उद्भवल्यास सभागृहातून ताबडतोब बाहेर पडता आले पाहिजे.
१२ या प्रांतीय अधिवेशनात तुम्ही बाप्तिस्मा घेणार आहात का? शनिवार सकाळच्या कार्यक्रमात बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांसाठी राखीव जागा असतील आणि याची माहिती परिचर तुम्हाला देतील. शक्य असल्यास, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच त्या ठिकाणी बसून घ्या. सोबत तुमचे बायबल, गीत पुस्तक, टॉवेल आणि सभ्य पेहराव आणा. अशा आदरणीय प्रसंगासाठी घोषवाक्ये असलेले टी-शट्र्स किंवा असला कोणताही पेहराव उचित नाही. हे सर्व मुद्दे, बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसोबत आपली सेवा या पुस्तकातील प्रश्नांची उजळणी करताना प्रत्येकाला समजले आहेत याची खात्री वडिलांनी करावी. बाप्तिस्मा हा आपण व्यक्तिगतपणे यहोवा देवाला केलेल्या समर्पणाचे प्रतीक असल्यामुळे बाप्तिस्मा घेताना उमेदवारांनी एकमेकांचे हात धरणे उचित ठरणार नाही.
१३ अधिवेशनांमध्ये तुम्ही कॅमेरा, व्हिडिओ-रेकॉर्डर आणि ऑडिओकॅसेट रेकॉर्डरचा उपयोग करू शकता. पण, लोकांचे येणे-जाणे मुश्कील होईल, इतरांना कार्यक्रम व्यवस्थित पाहता येणार नाही किंवा चाललेल्या कार्यक्रमावरून लोकांचे लक्ष विचलित होईल अशा तऱ्हेने या उपकरणांचा वापर करू नये. दुसरे म्हणजे, ही उपकरणे सभागृहातील कोणत्याही इलेक्ट्रिकल किंवा साऊन्ड सिस्टमला जोडली जाऊ नयेत.
१४ अलीकडे, बरेच लोक सेल्युलर फोनचा आणि पेजरचा उपयोग करत आहेत; तेव्हा, या उपकरणांमुळे, चाललेल्या कार्यक्रमावरून तुमचे आणि तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांचे लक्ष विचलित होत नाही याकडे लक्ष द्या. सभागृहात बसलेले असताना या उपकरणांच्या रिंगचा किंवा बीपचा आवाज येणारा नाही याची दक्षता बाळगा. काही कारणास्तव कार्यक्रम चालू असताना सेल्युलर फोनचा उपयोग करावा लागलाच तर सभागृहाच्या बाहेर जाऊन त्याचा उपयोग करावा.
१५ वेळेच्या बचतीसाठी आणि सुलभतेसाठी अधिवेशनात दुपारच्या जेवणाची प्रत्येकाने आपापली व्यवस्था करावी अशी संस्था शिफारस करते. अनेक बांधवांनी या सल्ल्याचे अनुकरण केले आहे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत ते निवान्त जेवण करू शकतात. बऱ्याच लोकांनी असेही म्हटले आहे, की जेवणाच्या सुट्टीत थोडीफार विश्रांती घेण्यासाठी आणि बंधुभगिनींसोबत अधिक वेळ सहवास करण्यासाठी या वेळेचा त्यांना फायदा झाला आहे. पण, यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ आधीच विकत घेऊन सीटच्या खाली सहज मावतील अशा छोट्या डब्यांमध्ये आणण्याची गरज आहे. उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी या सूचनेचे पालन करावे अशी आमची विनंती आहे. असे ऐकण्यात आले आहे, की कार्यक्रम चालू असताना सभागृहात बसण्याऐवजी अनेकजण सभागृहाच्या आवारातील किंवा बाहेरच्या फूड स्टॉल्सवर जातात. यामुळे श्रोत्यांचे लक्ष तर विचलित होतेच होते पण त्याशिवाय व्यासपीठावर जे काही सादर केले जाते त्याबद्दल लोकांना आदर नसल्याचेही दिसून येते. अर्थात, फूड स्टॉल्सवरून खाण्यापिण्याचे पदार्थ विकत घेण्यात काही हरकत नाही; पण, हे मधल्या सुट्टीत केल्यास सगळ्यात उत्तम राहील. हे देखील लक्षात ठेवणे जरूरीचे आहे, की फूड स्टॉल्सवरील गर्दी पाहून बाहेरचे लोक कदाचित भुरटे चोर देखील आकर्षित होऊ शकतात. म्हणूनच, अधिवेशनाच्या सर्व दिवशी प्रत्येकाने आपापल्या खाण्यापिण्याची सोय करावी असे सांगितले जाते. हीच गोष्ट, तुमच्यासोबत अधिवेशनाला येणाऱ्या आस्थेवाईक लोकांनाही लागू होते. अधिवेशनात काचेच्या वस्तू किंवा मादक पेये आणण्यास मनाई आहे.
१६ अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाची साफसफाई करण्यासाठी तुम्ही स्वेच्छेने पुढे येऊ शकता का? किंवा अधिवेशनातील इतर कोणत्या विभागात काम करण्याची तुमची इच्छा आहे का? तसे असल्यास, कृपया अधिवेशनातील स्वयंसेवक सेवा विभागाकडे आपले नाव द्या. सोळा वर्षांखालची मुले देखील आपल्या पालकांसोबत किंवा इतर कोणत्याही जबाबदार प्रौढ व्यक्तीसोबत काम करण्यास येऊ शकतात. अर्थात प्रत्येक जण, कुठे काही कचरा पडलेला दिसल्यास तो कचरा पेटीत टाकून स्वच्छता राखण्यात हातभार लावू शकतो.
१७ उचित वेशभूषा आणि केशभूषा यावर आपल्याला निरनिराळ्या माध्यमांतून उत्तम मार्गदर्शन मिळाले आहे. उदाहरणार्थ, आमची राज्य सेवा पुरवणींतून आपल्याला या विषयावर मार्गदर्शन देण्यात आले आहे; तसेच, संस्थेच्या प्रकाशनांमध्येही याबद्दलची उदाहरणे आणि चित्रे दिलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यावर यहोवाचे विचार काय आहेत हे सांगणारे बायबल आपल्यापाशी आहे. (रोम. १२:२; १ तीम. २:९, १०) आपण कोण आहोत आणि आपण कशासाठी त्या ठिकाणी एकत्र झालो आहोत याची स्थानिक लोकांना कल्पना असते. तेव्हा, आपली वेशभूषा आणि केशभूषा हीच एक प्रभावी साक्ष ठरते. याबाबतीत अधिकांश यहोवाच्या साक्षीदारांनी उत्तम आदर्श ठेवला आहे. पण तरी, अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या काही लोकांच्या वेशभूषेवर आणि केशभूषेवर जगीक लोकांचा प्रभाव पडल्याचे लक्षात येते. असभ्य पेहराव, आध्यात्मिक व्यक्ती असल्याचा एखाद्याचा दावा खोडून काढू शकतो. खरे तर सभ्य, स्वच्छ, नीटनेटके स्वरूपच सर्वात अपीलकारक असते. यास्तव, आपले कौटुंबिक सदस्य कोणते कपडे घालणार आहेत यात कुटुंब प्रमुखाने जातीने लक्ष घालावे. ही बाब, केवळ अधिवेशनातच नव्हे तर इतर ठिकाणी असतानाही लागू होते. कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर देखील आपले लेपल बॅजेस लावून ठेवल्यास लोक आपला संबंध यहोवाशी आणि त्याच्या शुद्ध लोकांशी जोडतील.—पडताळा मार्क ८:३८.
१८ सुज्ञ शलमोन राजाने ईश्वरी प्रेरणेने लिहिले की, “बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते” आणि “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीति. २२:१५; २९:१५) कार्यक्रमादरम्यान पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण न ठेवल्यामुळे कार्यक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना लक्ष एकाग्र करणे कठीण गेले आहे. गेल्या वर्षी झालेल्या अधिवेशनात, कार्यक्रम चालू असताना काही लहान मुले इकडे-तिकडे पळत असल्याचे आढळून आले. त्याचवेळी काही तरुण लोक सभागृहाच्या बाहेर आणि प्रसाधन गृहांच्या आसपास फिरत असल्याचे दिसून आले. यावरून, खास मुलांना आणि तरुण लोकांना लक्षात ठेवून तयार केलेल्या आध्यात्मिक कार्यक्रमाचा फायदा ते घेत नव्हते हे उघड आहे. आपल्या मुलांच्या वर्तनासाठी पालक यहोवासमोर जबाबदार असल्यामुळे आपली मुले आपल्याजवळ बसल्यावरच ती चांगली वागतील आणि यहोवाच्या शिक्षणाचा फायदा घेतील याबद्दल पालक विश्वस्त राहू शकतात. अधिवेशनात लक्ष विचलित करणाऱ्या कोणाशीही प्रत्यक्ष बोलून परिचर त्यांना असे करण्यास मनाई करतील आणि चाललेल्या कार्यक्रमाकडे लक्ष देण्यास प्रेमळ शब्दात सांगतील.
१९ आपण बाहेरच्या लोकांनाही अधिवेशनांना आमंत्रित करत असल्यामुळे मुलांविषयी आणि आपल्या सामानाविषयी दक्षता बाळगणे सुज्ञतेचे आहे. मुले ही यहोवाकडील अमूल्य देण आहेत. पण, इतरांवर हल्ला करण्याची सैतानी प्रवृत्ती जगात आहे हे देखील आपण जाणतो. तेव्हा, आपली मुले कुठे आहेत याकडे सतत लक्ष द्या. शिवाय, कॅमेरा, पर्स आणि इतर मौल्यवान वस्तू जागेवर नव्हे तर नेहमी तुमच्यापाशी असाव्यात. तुमची वाहने लॉक केलेली आहेत याची खात्री करा; आणि तुमचे सर्व सामान डिक्कीत ठेवा किंवा आपल्यासोबत घ्या. यामुळे, चोरीच्या उद्देशाने तुमच्या वाहनाची मोडतोड करण्याचा मोह कोणाला होणार नाही.
२० हॉटेलमधील रूम बुकिंगसंबंधी तुम्हाला काही अडचण असल्यास स्थानिक रुमिंग डिपार्टमेंट तुमची मदत करण्यास इच्छुक असेल. राहण्याच्या बाबतीत काही समस्या असल्यास कृपया अधिवेशनात असतानाच रुमिंग डिपार्टमेंटला कळवा. अधिवेशनाचा पूर्ण फायदा घेता यावा म्हणून बांधव याबाबतीत तुमची मदत करण्यास सदा तयार असतील. रुमिंगसंबंधी आणखीन काही गोष्टी कृपया लक्षात घ्या:
▪ अधिवेशनाच्या वेळी अनेक यहोवाचे साक्षीदार, हॉटेल्समध्ये राहत असल्यामुळे धूम्रपानास मनाई असणाऱ्या खोलीची मागणी तुम्ही केलेली असली तरी प्रत्येकालाच अशी खोली मिळणे शक्य नाही. गेल्या वर्षी झालेल्या अधिवेशनाच्या वेळी आपले काही बांधव अधिक सुविधांसाठी हॉटेलच्या व्यवस्थापन पाहणाऱ्या लोकांशी वादविवाद घालत असल्याचे समजले आहे.
▪ तुम्ही राहता त्या हॉटेलचा चेक-इन, चेक-आउट टाईम काय आहे हे माहीत करून घ्या. आधीच विनंती केल्यास तुम्हाला लवकरचा चेक-इन टाईम देण्यास आणि उशिराचा चेक-आउट टाईम देण्यास हॉटेल्स तयार असतील.
▪ हल्ली रोखरक्कम जवळ बाळगणे अधिकाधिक असुरक्षित होत आहे. तेव्हा, हॉटेलचा किंवा इतर कोणता खर्च रूमच्या बिलवरच लावणे आणि हॉटेल सोडताना हे बिल एकदम भरणे फायदेकारक ठरेल.
▪ हॉटेल्समध्ये असलेल्या टीव्हीवर आणि व्हिडिओवर सहसा अनुचित कार्यक्रम दाखवणारे चॅनल्स असतात. विनंती केल्यास, जोपर्यंत तुम्ही तेथे राहता तोपर्यंत बहुतेक हॉटेल्स तुमच्या रूममधील टीव्ही, व्हिडिओवरचे विशिष्ट चॅनल्स बंद करून ठेवू शकतील. टीव्हीवरील कोणकोणते कार्यक्रम तुमची मुले पाहतात यात घरी असताना तुम्ही जितके जातीने लक्ष घालता तितकेच हॉटेल्समध्ये राहत असताना देखील घाला.
२१ अधिवेशन कार्यक्रमादरम्यान बरेच बंधुभगिनी टिप्पणी घेत असल्याचे पाहून उत्तेजन मिळते. संक्षिप्त नोंदी घेतल्यास कार्यक्रमावर लक्ष देण्यास आणि मुख्य मुद्दे पुन्हा लक्षात आणण्यास मदत होते. तुम्ही घेतलेल्या नोंदींची आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत नंतर उजळणी केल्याने अधिवेशनाच्या ठळक मुद्द्यांवर मनन करण्यास तुम्हाला मदत होईल आणि यामुळे हे मुद्दे कायम तुमच्या मनावर ठसतील.
२२ राज्य हितांना बढावा देण्यासाठी यहोवाच्या लोकांनी नेहमीच सढळ हाताने अनुदान केले आहे. (निर्ग. ३६:५-७; २ इति. ३१:१०; रोम. १५:२६, २७) जगव्याप्त कार्यासाठी तुम्ही स्वेच्छेने देत असलेल्या अनुदानांचा उपयोग अधिवेशने भरविली जातात त्या सभागृहांचे भाडे भरण्यासाठी केला जातो. तुम्ही चेक्सच्या स्वरूपात अनुदान करत असल्यास कृपया हे चेक्स “वॉचटावर संस्था” या नावावर द्या. आणि हे अनुदान संस्थेच्या कॉर्पसप्रती आहे हे सांगणारे एक पत्रही त्यासोबत जोडा.
२३ आमोस ३:७ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाने म्हटले की तो “आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” “रहस्ये प्रकट करणारा” या नात्याने यहोवाने तंतोतंत पूर्ण झालेल्या शेकडो भविष्यवाण्या बायबलमध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत. (दानी. २:२८, ४७) याशिवाय, आणखीन महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या पूर्ण व्हायच्या आहेत. १९९९-२००० चे “देवाचे भविष्यसूचक वचन” ही प्रांतीय अधिवेशने देवाच्या अभिवचनांवरील आपला विश्वास आणखीन मजबूत करतील. तेव्हा, यहोवाचे वचन तुम्हाला काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका. अधिवेशनात तुम्ही जे काही पाहाल, ऐकाल ते आपल्या सेवेत, मंडळीत आणि वैयक्तिक जीवनात लागू करा. तिन्ही दिवसांच्या या पौष्टिक, आध्यात्मिक मिष्टान्नाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही ज्या काही योजना करत आहात त्यांवर यहोवाचा भरपूर आशीर्वाद असो अशी आमची प्रार्थना आहे!
[३ पानांवरील संक्षिप्त आशय]
तिन्ही दिवस, अर्थात शुक्रवार, शनिवार, आणि रविवार, संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची योजना करा!