पायनियरींग—वेळेचा सदुपयोग!
१ “पायनियर सेवेत चिकाटी राखणे” या विषयावर विभागीय संमेलनात पायनियरींग करणाऱ्या एका वडिलांचे भाषण ऐकताना एका बहिणीने विचार केला: ‘मला आधीच इतकं काम आहे! तेव्हा, पायनियरींग सुरू करणं खरोखरच योग्य असेल का?’ भाषण ऐकणाऱ्या आणखीन एका तरुण बांधवाला प्रश्न पडला की, ‘या बांधवांना पायनियरींग कसं जमतं? मी तर त्यांच्यासारखा वडीलही नाही; पण, तरीही मला मुळीच वेळ मिळत नाही!’
२ पायनियरींग करण्याचे लाभ काय यावर चर्चा करताना वडिलांनी त्याच विभागातील अनेक पायनियरांची मुलाखत घेतली; पायनियरींग करण्यासाठी या बंधूभगिनींनी कोणकोणत्या तडजोडी केल्या होत्या आणि यहोवाने कशाप्रकारे त्यांचे प्रयत्न समृद्धपणे आशीर्वादित केले याविषयी ते बोलले. या पायनियरांपैकी एक अपंग होता, दुसरीचा विवाहसोबती सत्यात नव्हता तर तिसऱ्याने जगिक करिअर सोडून दिले होते पण तरी देखील त्याला जी काही मिळकत मिळत होती त्यात त्याचे भागत होते. यहोवाच्या साह्याने या पायनियरांना यश कसे मिळत होते हे पाहून सुरवातीला उल्लेखलेला बांधव आणि बहीण पुन्हा एकदा विचार करू लागले, आपल्या परिस्थितीचे परीक्षण करू लागले. आता खासकरून पायनियरांच्या तासांच्या मागणीत कपात झाल्यामुळे सुवार्तेच्या अनेकानेक प्रचारकांना आपले तास भरून काढणे सहजसुलभ झाले आहे; त्यामुळे आम्ही तुम्हालाही पुन्हा एकदा विचार करण्याचे, आपल्या परिस्थितीचे परीक्षण करण्याचे आमंत्रण देत आहोत.
३ आपल्याला माहीत आहे, की यहोवा हा सृष्टिकर्ता आणि विश्वाचा सार्वभौम सत्ताधारी असून आपला जीवनदाता आहे. (दानी. ४:१७; प्रे. कृत्ये १७:२८) शिवाय, आज यहोवा केवळ एकाच संघटनेचा उपयोग करत आहे याविषयी आपल्याला शंका नाही. या संघटनेसह निष्ठेने सेवा करण्याचा अर्थात अंत येण्यापूर्वी राज्याविषयीची साक्ष देण्यात “विश्वासू व बुद्धिमान दासाला” पाठबळ देण्याचा एक विशेषाधिकार आपल्याला लाभला आहे. (मत्त. २४:४५; २५:४०; १ पेत्र २:९) आपण ‘शेवटल्या काळाच्या’ अगदी शेवटल्या भागात जगत असल्यामुळे प्रचार करण्याचा समय आता संपत आला आहे याची जाणीव आपल्याला होते. (२ तीम. ३:१) दरम्यानच्या काळात, आपल्याला भौतिकरित्या आपल्या कुटुंबियांची तरतूद करायची आहे. (१ तीम. ५:८) पूर्वी एखाद्याला मिळणाऱ्या मिळकतीत त्याचे सहज भागायचे, पण हल्ली तसे नाही. कदाचित पूर्वीसारखी आपली तब्येतही ठणठणीत राहिलेली नसेल. शिवाय, आपल्याला आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो हेसुद्धा खरे आहे. (उप. ३:१२, १३) त्यामुळे पायनियरींग करणे खरोखरच शहाणपणाचे आहे का असा प्रश्न कदाचित आपल्याला पडू शकतो.
४ आपल्याला पायनियरींग जमेल की नाही हे ज्याने त्याने व्यक्तिगत परिस्थितींचे काळजीपूर्वक परीक्षण करून ठरवण्यास हवे. (रोम. १४:१२; गलती. ६:५) पायनियरींग करण्याच्या आमंत्रणास प्रचारकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे हे पाहून उत्तेजन मिळते. या शेवटल्या काळात असंख्य दबाव आणि समस्या असतानासुद्धा १९९९ चे वार्षिकपुस्तक (इंग्रजी) यात प्रकाशित केलेला सेवा अहवाल दाखवून देतो, की जगभरात यहोवाचे जवळजवळ ७,००,००० लोक मेहनतीने पायनियर सेवा करत आहेत. बिकट आर्थिक परिस्थिती असो, वाहतुकीची गैरसोय असो, आरोग्य समस्या असो किंवा इतर अडीअडचणी आणि संकटप्रसंग असोत, चांगले ते करण्यात हे बंधूभगिनी थकत नाहीत हे वाखाणण्याजोगे आहे. (गलती. ६:९) यहोवाची प्रतिती पाहण्याच्या निमंत्रणाला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. (मला. ३:१०) पायनियरींग करणे म्हणजे आपल्या मर्यादित वेळेचा, साधनांचा सदुपयोग असून पायनियर सेवा हाती घेण्यासाठी तसेच त्यात टिकून राहण्यासाठी आवश्यक तडजोडी केल्याबद्दल यहोवाने खरोखरी आपल्याला आशीर्वादित केले आहे असे त्यांना वाटते.
५ पायनियरांना आशीर्वाद मिळतात: कॅमेरूनमध्ये राहणाऱ्या एका बहिणीला एक लहान मुलगी आहे; ती म्हणते: “माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हापासून मी तिला सेवेत घेऊन जाते. ती चालायला शिकण्याआधीच मी तिला एका कापडाने पाठीवर बांधून सेवेत घेऊन जायचे. एकदा सकाळच्या वेळी सेवा करत असताना मी रस्त्यावरील एका लहानशा दुकानापाशी थांबले होते; माझ्या मुलीनं माझ्या बॅगेतली बरीच नियतकालिकं घेतली आणि बाजूच्या एक दुकानाकडे ती लुटुलुटु चालत गेली. तिला धड बोलताही येत नव्हतं पण एका स्त्रीचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि या लहान मुलीनं तिला एक नियतकालिक दाखवलं. इतकं लहान मूल या कार्यात भाग घेत आहे हे पाहून ती स्त्री अवाकच राहिली. तिनं लगेच मासिक घेतलं आणि एक गृह बायबल अभ्यासही स्वीकारला!”
६ अधिकाधिक लोकांना सहायक पायनियरींग करण्याचे आमंत्रण दिले गेले तेव्हा झँबियात पूर्ण-वेळची प्रापंचिक नोकरी करणाऱ्या एका कुटुंबप्रमुखाने वेळात वेळ काढून सहायक पायनियरींग करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस्ती मंडळीत ते एक वडील देखील आहेत. मंडळीसमोर आणि आपल्या कुटुंबासमोर त्यांना एक उदाहरण मांडायचे होते. काही वेळा ते रस्त्याच्या कडेला आपली कार लावून कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही कॅसेट लावायचे आणि ती कॅसेट ऐकण्यासाठी ते येणाऱ्या-जाणाऱ्यांना बोलवायचे. अशाप्रकारे त्यांना १६ कौटुंबिक सौख्यानंद पुस्तके आणि १३ ज्ञान पुस्तके देता आली शिवाय दोन बायबल अभ्यासही त्यांना मिळाले.
७. या शेजारच्या देशातील अर्थात झिंबाब्बेतील बांधवांमध्येही एक उत्तम पायनियर आत्मा दिसून आला. एप्रिल १९९८ मध्ये ११७ प्रचारकांच्या एक मंडळीने ७० सहायक आणि ९ नियमित पायनियर असल्याचा अहवाल दिला. ९४ प्रचारकांच्या आणखीन एका मंडळीने ५८ सहायक पायनियर असल्याचा अहवाल दिला. आणि १२६ प्रचारकांच्या दुसऱ्या एका मंडळीने असा अहवाल दिला, की त्यांच्या मंडळीत ५८ लोकांनी ४ नियमित पायनियरांसोबत सहायक पायनियरींग करण्याचे ठरवले होते. अशाप्रकारे झिंबाब्वेमध्ये मागील सेवा वर्ष एक उल्लेखनीय वर्ष ठरले. तिथले बांधव कौटुंबिक जबाबदाऱ्या, मंडळीच्या कार्यहालचाली आणि शाखा बांधकाम यांमध्ये अतिशय व्यस्त असले तरीही सेवेत सहभाग घेऊन आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याकडे त्यांनी खास लक्ष दिले.
८ पायनियरींग सुरू करणे आणि त्यात चिकाटी राखणे हे स्वबळावर शक्य नाही हे पायनियरांना पूर्णपणे ठाऊक असते. आपण जे काही करत आहोत ते केवळ ‘देवाने दिलेल्या शक्तीमुळे’ शक्य होते असे ते कबूल करतात. (१ पेत्र ४:११) त्यांच्या विश्वासामुळेच सेवा करत राहणे त्यांना शक्य होते. स्वतःच्या सुखसोयींकडे न पाहता पायनियर कार्यात चिकाटी राखण्यासाठी आपल्याला कदाचित ‘मोठे कष्टही करावे’ लागतील हे त्यांना ठाऊक असते पण यामुळे पुढे त्यांना विपुल आशीर्वाद मिळतात.—१ थेस्सलनी. २:२.
९ पौलाचे उदाहरण अनुकरण करण्याजोगे: पौलाने आपल्या सेवेत साध्य केलेल्या गोष्टी तसेच त्याने कित्येकांना दिलेले उत्तम साह्य यांबद्दलचा अहवाल आपल्याला आज बायबलमध्ये आढळतो. पण पौलाने जितके कष्ट केले तितके कोणीही केले नसतील. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आणि मंडळ्यांना मजबूत करण्यासाठी त्याने छळाचा आणि इतर संकटप्रसंगांचा सामना केला. याशिवाय, त्याला एका भयंकर स्वरूपाची व्याधीही होती. (२ करिंथ. ११:२१-२९; १२:७-१०) परंतु, वेळेचा सदुपयोग करण्याचा संकल्प त्याने केला होता. तो जे काही साध्य करत होता ते यहोवाच्या साह्याने करत होता हे त्याने मान्य केले. (फिलिप्पै. ४:१३) पौलाने ज्यांना मदत केली त्यांच्यापैकी कोणीही असे म्हणू शकत नव्हते, की यहोवाच्या सेवेसाठी पौलाने दिलेला वेळ आणि घेतलेले श्रम व्यर्थ होते किंवा त्यांचा दुसऱ्या कोणत्या कामात सदुपयोग झाला असता. इतकेच नव्हे तर, पौलाने आपल्या वेळेचा जो सदुपयोग केला त्याचा आजही आपल्याला फायदा होत आहे! या शेवटल्या काळात आपल्या प्राथमिकता ठरवण्यास तसेच सत्याला जडून राहण्यास मदत करणाऱ्या त्याच्या ईश्वरप्रेरित सल्ल्याकरता आपण किती कृतज्ञ आहोत!
१० सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पूर्वी कधी नव्हता इतका आज “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.” (१ करिंथ. ७:२९; मत्त. २४:१४) यास्तव, आपण स्वतःला हा प्रश्न विचारणे उचित आहे, की ‘उद्या जर अचानक माझा मृत्यू झाला तर मी माझ्या वेळेचा सदुपयोग केला आहे असे यहोवाला म्हणू शकेन का?’ (याको. ४:१४) यहोवाचे साक्षीदार या नात्याने तुम्हाला तुमच्या वेळेचा सदुपयोग करण्याची इच्छा आहे हे आताच आपल्या प्रार्थनेत तुम्ही यहोवाला सांगू शकता. (स्तोत्र ९०:१२) एक साधेसुधे जीवन व्यतीत करता यावे म्हणून यहोवाकडे मदत मागा. पायनियरींग जमणार नाही हे तुम्ही आधीच ठरवून टाकले असले तरी आता पायनियरींग जमण्यासारखे आहे असे तुम्हाला वाटते का?
११ आपल्या परिस्थितींचा पुरेपूर फायदा घ्या: अनेकांना नियमित पायनियर म्हणून सेवा करण्याची इच्छा असूनही आपल्या परिस्थितींमुळे ७० तास भरणे शक्य नसते हे समजण्याजोगे आहे. तरीही असे अनेक प्रचारक आहेत जे शक्य तितक्या अधिक वेळा किंवा नियमितपणे सहायक पायनियरींग करण्यासाठी महिन्याचे ५० तास भरून काढण्यासाठी तजवीज करतात. तुमच्या सध्याच्या परिस्थितींमुळे तुम्हाला सहायक किंवा नियमित पायनियरींग करणे शक्य नसल्यास हवालदिल होऊ नका. तुमच्या परिस्थितींत काही बदल व्हावा यासाठी सतत प्रार्थना करत राहा. दरम्यान, बदल होणे मुळीच शक्य नसले तरीही यहोवाच्या सेवेत तुम्ही तुमच्या परीने होईल तितके जिवेभावे करता यामुळे यहोवा प्रसन्न होतो यात संतुष्टी माना. (मत्त. १३:२३) तुम्ही त्याचा पक्ष घेऊन खंबीरपणे उभे आहात आणि प्रत्येक महिन्यात साक्ष देण्याची एकही संधी न सोडता विश्वासू प्रचारक होण्यासाठी शिकस्तीचा प्रयत्न करत आहात हे त्याच्या नजरेतून सुटत नाही. कदाचित साक्ष देण्यात अधिकाधिक कुशल होऊन, सुवार्तेचे प्रचारक आणि शिक्षक या नात्याने तरबेज होऊन तुम्ही प्रगती करू शकता.—१ तीम. ४:१६.
१२ यहोवाचा “महान व भयंकर दिवस” इतका जवळ असल्यामुळे आपल्याला नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आपण उरलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यास हवा. (योए. २:३१) सैतानाला माहीत आहे, की आता त्याचे दिवस भरले आहेत; आणि म्हणूनच आपल्या जीवनात असंख्य समस्यांची भर पाडण्यासाठी आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्टींवरून आपले लक्ष विचलित करण्यासाठी तो वाटेल ते करण्याचा आधीपेक्षा आता जास्त प्रयत्न करत आहे. (फिलिप्पै. १:१०; प्रकटी. १२:१२) देवाला तुमच्यामध्ये आस्था आहे या गोष्टीला कधीच कमी लेखू नका. तुमचे जीवन साधेसुधे ठेवण्यासाठी तसेच सेवेत अधिक योगदान करता यावे म्हणून यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. (स्तोत्र १४५:१६) आनंदाची गोष्ट अशी, की आपल्या परिस्थितींचा पुनर्विचार केल्यामुळे आपल्यालाही सहायक किंवा नियमित पायनियरींग करणे शक्य आहे असे अनेकांना आढळत आहे. खरेच, अशाप्रकारे वेळेचा सदुपयोग केल्यामुळे पायनियरांना अतीव समाधान लाभते. तुम्हीही त्यांच्यात सामील व्हाल का?