मंडळीच्या सभांमध्ये—पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य
१ सर्वच ख्रिस्ती कुटुंबांनी, मंडळीच्या सभांमध्ये एकत्र होण्याच्या आज्ञेचे पालन करण्यास हवे. (इब्री १०:२४, २५) उत्तम सहकार्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला सभांची तयारी करता येईल, सभांना उपस्थित राहता येईल आणि सभांमध्ये सहभागही घेता येईल. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती एकसारखीच नसली तरीही प्रत्येक ख्रिस्ती पती, पत्नी किंवा विवाह जोडीदाराशिवाय कुटुंब चालवणारे देखील आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत आपल्या कुटुंबात सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी काही गोष्टी करू शकतात; मग कुटुंबात कोणत्याही वयाची, कितीही मुले असली तरीही असे करणे त्यांना शक्य आहे.—नीति. १:८.
२ तयारी करण्यासाठी वेळ काढा: मंडळीच्या सभांसाठी प्रत्येकाला योग्य तयारी करता यावी म्हणून कुटुंबातले सर्वच सदस्य सहकार्य करतात. पुष्कळ कुटुंबे आठवड्याचा टेहळणी बुरूज अभ्यास एकत्र मिळून करतात तर इतर काही कुटुंबे मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची तयारी करतात किंवा एकत्र मिळून साप्ताहाचे बायबल वाचन करतात. हेतू हा, की सभांना उपस्थित राहण्याआधी मुख्य मुद्दे लक्षात घेणे. यामुळे, सभांमध्ये जे काही शिकवले जाते त्याचा सगळ्यांनाच अधिक लाभ होईल आणि संधी मिळेल तसा सहभाग घेण्यास प्रत्येकजण तयार असेल.—१ तीम. ४:१५.
३ सहभाग घेण्याचे ठरवा: कुटुंबातील प्रत्येकानेच सभांमध्ये उत्तरे देऊन आपली आशा जाहीरपणे व्यक्त करण्याचा मनोदय करण्यास हवा. (इब्री १०:२३) तुमच्या कुटुंबातल्या एखाद्याला मदतीची किंवा उत्तेजनाची गरज आहे का? ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या सभांमधील कार्यनियुक्त्या तयार करण्यासाठी कोणाला काही मदत हवी आहे का? आपला पती आपल्या भाषणाबद्दल उत्सुकता दाखवून एखादे उचित उदाहरण किंवा व्यावहारिक मांडणी सुचवतो तेव्हा पत्नीला त्याचा आनंदच होतो. आपल्या लहान मुलांना नेमून दिलेले भाग आपणच त्यांना तयार करून द्यावेत असे आईवडिलांनी समजू नये. नाहीतर मुले कधीच स्वतःहून काही करण्यास शिकणार नाहीत. पण, आईवडील आपल्या लहान मुलांना मदत करू शकतात आणि ते मोठ्याने आपल्या भाषणाचा सराव करतात तेव्हा ते ऐकू शकतात.—इफिस. ६:४.
४ उपस्थित राहण्याची योजना आखा: सभांसाठी तयार होणे, नियोजित वेळी सभांना निघणे या सर्व गोष्टी अगदी लहान वयापासूनच मुलांना शिकवल्या जाव्यात. उशीर होऊ नये म्हणून घरातली कामे उरकण्यासाठी कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी हातभार लावावा.—कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकातील पृष्ठ ११२ वर आणि तरुणांचे प्रश्न पुस्तकातील पृष्ठ ३१६-१७ वर दिलेल्या मार्गदर्शनपर सूचना पाहा.
५ प्राचीन काळातील यहोशवाने म्हटले होते: “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.” याप्रमाणेच पालक, मुले अशा सर्वांनीच यहोशवाच्या या शब्दांवर मनन करून मंडळीच्या सभांमध्ये पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्प करावा.—यहो. २४:१५.