बायबल अभ्यासात —पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्यवब
१ सत्यामुळे आपले जीवन अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण बनते; पण, यहोवाची उपासना करण्यात आपण आपोआपच यशस्वी होत नाही. आध्यात्मिकरित्या भक्कम कुटुंब उभारण्यासाठी वेळेची आणि प्रयासाची गरज असते. आणि असे करण्यासाठी कौटुंबिक सदस्यांनी एकत्र मिळून कार्य करणे अत्यंत जरूरीचे आहे. अभ्यासाच्या उत्तम सवयी लावून घेण्यासाठी कुटुंबातील सर्वजण कसे सहकार्य करू शकतात यावरच तीन भागांच्या लेखमालेतील या पहिल्या लेखाचा रोख आहे.
२ दररोज बायबल वाचणे: नीतिसूत्रे २४:५ म्हणते की, “ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करितो.” देवाच्या वचनाचे नियमित वाचन केल्यामुळे ज्ञान वाढते आणि आपल्या आध्यात्मिकतेवर सैतान हल्ला करतो तेव्हा, त्याचा प्रतिकार करण्यासाठी लागणारे आंतरिक बळही आपल्याला याच ज्ञानातून मिळते. (स्तोत्र १:१, २) कुटुंब मिळून तुम्ही बायबलचे वाचन करता का? ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा यात प्रत्येक आठवड्याकरता “पूरक बायबल-वाचन आराखडा” दिलेला आहे. त्यानुसार बायबल वाचन करण्यासाठी एखाद्या कुटुंबाला दररोज मोजून दहा मिनिटे लागतील. बायबलचे वाचन करण्यासाठी आणि त्यासोबतच दररोज शास्त्रवचनांचे परीक्षण करणे यातून दिवसाच्या वचनाची चर्चा करण्यासाठी एक सोईस्कर वेळ निवडा जसे की सकाळी नाश्ता करताना, रात्रीचे जेवण झाल्यानंतर किंवा झोपण्याआधी. यास तुमच्या कुटुंबाच्या नित्याक्रमाचा एक भाग बनवा.
३ दर आठवडी एकत्र अभ्यास करणे: प्रत्येक आठवडी, कौटुंबिक बायबल अभ्यासाला इतर कोणत्याही कामापेक्षा जास्त महत्त्व दिले जावे. कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने अभ्यासात उत्साहाने सहभाग घेऊन त्यास पाठबळ दिले पाहिजे. कोणत्या साहित्याचा अभ्यास करावा तसेच अभ्यासासाठी एक विशिष्ट दिवस, ठराविक वेळ आणि अभ्यासाचा कालावधी या सगळ्या गोष्टी ठरवताना कुटुंब प्रमुखाने कुटुंबाच्या गरजा काय त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. आठवड्याच्या आराखड्यात कौटुंबिक बायबल अभ्यासाला सगळ्यात पहिले स्थान द्या. किरकोळ गोष्टींना त्याच्या आड येऊ देऊ नका.—फिलिप्पै. १:१०, ११.
४ एका कुटुंबात नेमका कौटुंबिक अभ्यास सुरू असताना वडिलांसाठी बिझनेसच्या संबंधाने वारंवार फोन कॉल्स यायचे; उपाय म्हणून ते अभ्यासाच्या वेळी फोन डिसकनेक्ट करून ठेवायचे. गिऱ्हाईक घरी आले तर त्यांनाही ते बसवायचे किंवा अभ्यास संपेपर्यंत थांबून राहायला सांगायचे. कोणत्याही गोष्टीला आपल्या कौटुंबिक अभ्यासाच्या आड न येऊ देण्याचा पक्का निर्धार त्यांनी केला होता. याचा त्याच्या मुलांवर चांगला प्रभाव पडला आणि बिझनेसमध्ये त्यांना फायदा होत गेला.
५ होय, आध्यात्मिक कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी सर्वच कौटुंबिक सदस्ये सहकार्य करतात ही किती आनंदाची गोष्ट असते! आपल्या कौटुंबिक बायबल अभ्यासात पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आपल्याला नक्कीच यहोवाचे आशीर्वाद मिळतील.—स्तोत्र १:३.