जगभर ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मरणोत्सव
१ आजपर्यंत यहोवाने अनेक वरदानांचा जणू आपल्यावर वर्षावच केला आहे. त्याच्या सर्व चांगुलपणाचे आणि अपात्री कृपेचे वर्णन स्पष्टपणे ‘अवर्णनीय दान’ असे केले आहे. होय, ‘देवाची अपात्री कृपा’ इतकी अद्भुत आहे की तिचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडतात.—२ करिंथ. ९:१४, १५.
२ सगळ्यात श्रेष्ठ वरदान: मानवजातीचा खंडणीदाता या नात्याने येशू ख्रिस्त सगळ्यात श्रेष्ठ वरदान आहे असे म्हटले जाऊ शकते; याचे कारण सबंध जगातील मानवजातीवर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी यहोवाने आपला एकुलता एक, प्रिय पुत्र दिला. (योहा. ३:१६) त्यामुळे, देवाकडून मिळालेल्या या अपात्री वरदानाचे सबंध जगभरात स्मरण झालेच पाहिजे. पण केव्हा आणि कसे? गुरुवार, एप्रिल १, १९९९ रोजी सायंकाळी, जगभरातील सर्व खरे ख्रिस्ती एका सर्वश्रेष्ठ बलिदानाच्या स्मरणार्थ प्रभुच्या सांज भोजनाचा विधी पार पाडतील.—१ करिंथ. ११:२०, २३-२६.
३ “आपण पापी असतानाच” ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला; याकरता आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच्या मृत्यूच्या स्मारकविधीस स्वतः उपस्थित राहून तसेच इतरांनाही या अतिमहत्त्वपूर्ण प्रसंगासाठी आमंत्रित करून व्यक्तिगतपणे कृतज्ञता दाखवू शकतो.—रोम. ५:८.
४ सर्वात महत्त्वपूर्ण घटना: ख्रिस्ताच्या मृत्यूचा हा विधी म्हणजे विशेषतः, ख्रिस्ताने निष्कलंक राहून देवाच्या सार्वभौमत्त्वाचे कसे समर्थन केले याची एक आठवण आहे. शिवाय, येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवल्याने आपणही यहोवासमोर निष्कलंक राहून तारणाची खात्री बाळगू शकतो याची देखील या प्रसंगी आपल्याला आठवण करून दिली जाते. (प्रे. कृत्ये ४:१२) शंकाच नाही, वर्षभरातील ही सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना आहे!
५ आपल्यासोबत प्रभुच्या सांज भोजनाचा विधी पार पाडण्यासाठी इतरांना आमंत्रित करून आपले आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम आहे हे प्रदर्शित करत असतो. खंडणीचे मोल किती श्रेष्ठ आहे हे शिकून घेणाऱ्या लाखो लोकांना खंडणीचे लाभ आजही उपलब्ध आहेत. (फिलिप्पै. ३:८) आणि ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाची अढळ आशा मिळू शकते.—योहा. १७:३.
६ स्मारकविधीच्या काळात देवाच्या अपार, अपात्र कृपेबद्दल कृतज्ञता दाखवण्याच्या अनेक खास संधी आपल्याला असतात. म्हणूनच देव राज्याच्या सुवार्तेचा आवेशाने प्रचार करण्याचा यापेक्षा उत्तम समय नाही. यहोवाने दिलेल्या या मोफत, अवर्णनीय दानावर प्रार्थनापूर्वक मनन करून यंदाच्या प्रभुच्या सांज भोजन विधीस उपस्थित राहण्याकरता योजना करणाऱ्या सर्व लोकांना भवितव्यात मोठे आशीर्वाद मिळतील!