पायनियरांसाठी आवश्यक असणाऱ्या तासांत बदल
१ आपल्या मंडळीतल्या कष्टाळू सहायक आणि नियमित पायनियरांची प्रशंसा करावीशी आपल्या सर्वांनाच वाटते. पुरेसे क्षेत्र नाही किंवा नियमितपणे ज्या क्षेत्रात पुन्हापुन्हा कार्य केले जाते अशा ठिकाणीही पायनियरांनी आवेशीपणे राज्य सेवा करून सर्वांपुढे एक उत्तम आदर्श ठेवला आहे. या पायनियरांना पाहून, सत्याबद्दल ‘योग्य मनोवृत्ती’ असणाऱ्यांना शोधून काढण्याच्या कार्यात सदैव मग्न राहण्याचे सर्वांना प्रोत्साहन मिळाले आहे.—प्रे. कृत्ये १३:४८.
२ अलीकडे पायनियरांसमोर उद्भवणाऱ्या समस्या वाढत गेल्याचे संस्थेला दिसून आले आहे; खासकरून पूर्णवेळेच्या सेवेत टिकून राहता यावे म्हणून आपल्या गरजा भागवण्यासाठी अर्धवेळेच्या नोकऱ्या मिळणे अतिशय कठीण होऊन बसले आहे. कितीतरी देशांत सध्याची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे, इतर बांधवांना मनापासून इच्छा असून देखील पायनियर सेवा सुरू करणे फारच कठीण वाटते. मागच्या काही महिन्यांत या आणि इतर बाबींचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.
३ वरती उल्लेख केलेल्या या सर्व गोष्टी लक्षात घेऊन संस्थेने नियमित आणि सहायक पायनियरांना आवश्यक असणारे तास कमी केले आहेत. जानेवारी १९९९ पासून, नियमित पायनियरांना दर महिन्यात ७० तास, म्हणजे वर्षभरात एकूण ८४० तास करावे लागतील. सहायक पायनियरांना ५० तास करावे लागतील. खास पायनियर आणि मिशनरी यांच्याकरता आवश्यक असणाऱ्या तासांत बदल करण्यात आलेला नाही कारण त्यांच्या अत्यावश्यक भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना संस्थेकडून मदत दिली जाते. त्यामुळे ते आपल्या प्रचार कार्याकडे आणि शिष्य बनवण्याच्या कार्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकतात.
४ हा बदल केल्यामुळे जास्तीत जास्त पायनियरांना आपल्या खास बहुमानाच्या सेवेत टिकून राहायला मदत मिळेल अशी आशा आहे. शिवाय, पूर्वीपेक्षा बऱ्याच जास्त प्रचारकांना नियमित आणि सहायक पायनियरिंग सुरू करणे सुलभ होईल अशी आम्ही आशा करतो. यामुळे मंडळीतल्या सर्वांना केवढा मोठा आशीर्वाद मिळेल!