पुढाकार घेणारे पर्यवेक्षक—मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक
१ आवश्यक पात्रता असणारे वडील किंवा सेवा सेवक यांच्यासाठी पुस्तक अभ्यास संचालक म्हणून सेवा करणे हा एक बहुमान आहे. आपापल्या गटातल्या लोकांची आध्यात्मिक दृष्टीने देखभाल करणे हे मोठ्या जबाबदारीचे काम आहे. त्यांचे हे काम तीन स्वरूपांचे असते.
२ कौशल्याने शिकवणे: गटातल्या लोकांना अभ्यासाचा विषय नीट समजावा म्हणून पुस्तक अभ्यास संचालकाला दर आठवडी अगदी चांगली तयारी करावी लागते. सर्वांना अभ्यासाच्या विषयाचे महत्त्व आणि मोल नीट समजावे हाच त्याचा प्रयत्न असतो. स्वतःच जास्त बोलत बसण्याऐवजी तो श्रोत्यांकडून मुख्य मुद्दे काढून घेण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच अतिरिक्त मुद्देसूद प्रश्न उभे करतो. अभ्यास कंटाळवाणा न होऊ देता, सर्वांना त्यातून बोध करण्याचे आणि चर्चेत प्रत्येकाला सामील करण्याचे आव्हान त्याच्यापुढे असते. त्याचा अंतिम उद्देश हाच असतो, की सर्वांना आध्यात्मिक उभारी मिळावी, त्या विषयाचा दररोजच्या जीवनात कसा उपयोग करता येईल हे त्यांच्या मनात स्पष्ट व्हावे आणि शिकलेल्या गोष्टी केवळ डोक्यातच शिरू नयेत तर त्यांच्या अगदी मनापर्यंत पोचाव्यात.—१ थेस्सलनी. २:१३.
३ मेंढपाळाच्या भूमिकेतून साहाय्य करणे: पुस्तक अभ्यास संचालक हा “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा” असतो. (यश. ३२:२) आपल्या गटातल्या प्रत्येकाबद्दल त्याला मनापासून कळकळ वाटते; कोणी निराश झाला असेल तर त्याला आवश्यक असणारी आध्यात्मिक मदत देण्यासाठी तो जातीने लक्ष देतो.—यहे. ३४:१५, १६; १ थेस्सलनी. २:७, ८.
४ प्रचारकार्यात उत्साहपूर्ण सहभाग घेणे: गटातल्या प्रत्येकाला क्षेत्र सेवेत नियमित सहभाग घेता यावा अशारितीने सोयीस्कर योजना आखण्याची पुस्तक अभ्यास संचालक काळजी घेतो. तो स्वतः प्रचार कार्यात पुढाकार घेतो; कारण प्रचार कार्यातल्या त्याच्या नियमितपणाचे, आवेशाचे, उत्साहाचे, गटातले लोकही अनुकरण करतील याची त्याला जाणीव असते. (कलस्सै. ४:१७; २ थेस्सलनी. ३:९) वेळोवेळी, गटातल्या प्रत्येकासोबत प्रचार कार्य करण्याचा तो प्रयत्न करतो. प्रचार करण्यात आणि अभ्यास चालवण्यात आपली कुशलता वाढवायची असेल तर यासाठी पुस्तक अभ्यास संचालक आपल्याला साहाय्य करू शकतो.—१ तीम. ४:१६; २ तीम. ४:५.
५ आपल्याला आध्यात्मिक साहाय्य आणि प्रेमळ पाठिंबा द्यायला सदैव तयार असणारे हे बांधव म्हणजे खरोखर आपल्याला लाभलेल्या मनुष्यरूपी देणग्या आहेत. (१ थेस्सलनी. ५:१४) पुस्तक अभ्यासात नियमित सहभाग घेऊन, तसेच प्रचार कार्यातही नियमित सहभागी होऊन आपण यहोवा देवाने आपल्यासाठी केलेल्या अपूर्व तरतुदींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो.—इब्री १०:२५.