महान सृष्टीकर्ता आपली काळजी वाहतो!
१ अवज्ञाकारी इस्राएल राष्ट्राला समजावताना यहोवाने त्यांना विचारले: “तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर [“यहोवा,” NW] हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, . . . आहे.” (यश. ४०:२८) आपला महान सृष्टीकर्ता कोण आणि तो किती प्रेमळपणे आपली काळजी वाहतो याबद्दल आपली पूर्ण खात्री पटली आहे. पण, सगळ्यांच्याच बाबतीत तसे नाही; अनेकजण सृष्टीकर्त्याच्या अस्तित्वावर शंका घेतात किंवा त्याच्याविषयी असणाऱ्या त्यांच्या कल्पना बायबलच्या एकमतात नसतात. अशा लोकांना आपण कशी मदत करू शकतो?
२ या लोकांना मदत करण्यासाठीच तुमची काळजी वाहणारा कोणी निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी) हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक विचारशील लोकांना वास्तविक बाबींचा विचार करायला लावते. त्यातील लक्षवेधक मजकूर आणि पटवून देणाऱ्या गोष्टी वाचकाला आकर्षक वाटतील हे नक्की.
३ निर्माणकर्ता पुस्तक आधी स्वतः वाचून काढा: पुस्तकात विशिष्ट विषय कोठे आढळतील हे थोडक्यात लक्षात ठेवा. अध्याय २ ते ५ मध्ये विश्व, सजीव सृष्टी आणि मनुष्य कसे आणि कोठून अस्तित्वात आले याची चर्चा करण्यात आली आहे. मग अध्याय ६ ते ९ मध्ये बायबलचे, त्याच्या लेखकाचे आणि विशेष म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकातील निर्मितीचा अहवाल भरवशालायक आहे का यांचे विश्लेषण केले आहे. मनुष्याला चक्रावून टाकणाऱ्या एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अध्याय १० मध्ये आपल्याला मिळते; तो प्रश्न म्हणजे: “आपला सृष्टीकर्ता जर काळजी वाहणारा आहे, तर मग इतके दुःख का?”
४ घेणाऱ्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करा: लोकांना देवाचे अस्तित्व पटवून देण्याकरता निर्माणकर्ता पुस्तकातील ७८-९ पानांवर युक्तिवाद करण्याचे मुद्दे योग्य क्रमानुसार मांडले आहेत. प्रथम असे विचारा: “आपल्या विश्वाला कुठे तरी सुरवात झाली होती, हे तुम्ही मान्य करता का?” पुष्कळ लोक या प्रश्नाचे होय, असे उत्तर देतात. त्यानंतर असे विचारा: “मग ही सुरवात आपोआपच झाली की त्यामागे एक शक्ती होती?” त्यामागे एक शक्ती होती असेच पुष्कळ लोक मान्य करतात. त्यानंतर तुम्ही शेवटचा प्रश्न विचारू शकता: “मग ही शक्ती कुठे होती; अनादीकाळापासून अस्तित्वात असलेल्या एखाद्या वस्तूत की व्यक्तीत?” अशाप्रकारे संभाषण सुरू केल्यास अनेक लोकांची खात्री पटेल, की यामागे नक्कीच एक सृष्टीकर्ता असला पाहिजे.
५ आज आपल्या काळात निर्माणकर्ता पुस्तकाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे आपल्या नातेवाईकांना, सहकर्मचाऱ्यांना, शाळासोबत्यांना आणि तुमच्या ओळखीच्या इतर लोकांना हे पुस्तक जरूर द्या. सेवेत जाताना हे पुस्तक सोबत ठेवा आणि देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेणारे लोक भेटल्यास त्यांना ते द्या. आपण जितके या पुस्तकाविषयी जाणून घेऊ तितकेच सृष्टीकर्त्यावरील आपले प्रेम वाढेल आणि त्याच्या उच्च दर्जांनुसार जीवन जगत राहण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल.—इफिस. ५:१; प्रकटी. ४:११.