वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९८ पृ. ३-४
  • यहोवाची सेवा जीवनात केंद्रस्थानी ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची सेवा जीवनात केंद्रस्थानी ठेवा
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • व्यावहारिक कौटुंबिक आराखडा तयार करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?
    आमची राज्य सेवा—१९९८
  • कुटुंबांनो, देवाच्या मंडळीचा भाग या नात्याने यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • बायबल अभ्यासात —पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्यवब
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km १२/९८ पृ. ३-४

यहोवाची सेवा जीवनात केंद्रस्थानी ठेवा

१ येशूने आपल्या ऐकणाऱ्‍यांची तुलना बांधकाम करणाऱ्‍या दोन प्रकारच्या लोकांशी केली. एकाने ख्रिस्ताला आज्ञाधारक राहून जणू खडकावर आपले जीवनरूपी घर बांधले आणि त्यामुळे तो विरोध आणि संकटाच्या तुफानांचा प्रतिरोध करू शकला. दुसऱ्‍याने स्वार्थापोटी आज्ञाधारक राहून जणू वाळुवर आपले जीवनरूपी घर बांधले आणि संकट आले तेव्हा तो तग धरू शकला नाही. (मत्त. ७:२४-२७) या व्यवस्थीकरणाच्या अंतसमयात आपण जगत असताना विपत्तीच्या बऱ्‍याच वादळांचा सामना आपल्याला करावा लागतो. क्षितीजावर मोठ्या संकटाचे काळे ढग भराभर जमू लागले आहेत. शाबूत विश्‍वासासह आपण या अंतातून टिकून राहू का? (मत्त. २४:३, १३, २१) आपण आपले जीवन सध्या कशावर उभारत आहोत यावर हे बहुतांशी निर्भर करते. म्हणून स्वतःला हा प्रश्‍न विचारणे अत्यंत निकडीचे आहे की, ‘देवाची आज्ञाधारकपणे सेवा करण्याला केंद्रस्थानी ठेवून त्या भोवती माझ्या ख्रिस्ती जीवनाची भक्कम उभारणी करत आहे का?’

२ आपल्या जीवनात यहोवाची सेवा केंद्रस्थानी ठेवण्याचा काय अर्थ होतो? त्याचा अर्थ यहोवाला सर्वात प्रथम स्थान देणे होय. राज्य, आपल्या आस्थेचा मुख्य विषय असणे देखील त्यात सामील होते. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सर्व कार्यहालचालींमध्ये देवाला अधीन असण्याची गरज आहे. व्यक्‍तिगत, कौटुंबिक आणि मंडळीच्या बायबल अभ्यासात तसेच क्षेत्र सेवेत पूर्ण मनाने भाग घेऊन या गोष्टींना प्राधान्य देण्याची आवश्‍यकता आहे. (उप. १२:१३; मत्त. ६:३३) देवाला अशातऱ्‍हेने आज्ञाधारक राहिल्याने, आपला विश्‍वास खडकासारखा मजबूत होईल जो विपत्तीच्या कोणत्याही वादळात ढळणार नाही.

३ येशूप्रमाणे लाखो लोकांना आपले जीवन आणि भवितव्याच्या आशा देवाच्या सेवेवर केंद्रीत करत असल्याचे पाहणे अत्यंत सुखदायक आहे. (योहा. ४:३४) ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा त्यांचा ठरलेला नित्यक्रम असतो आणि परिणामस्वरूप त्यांना समृद्ध आशीर्वाद प्राप्त होतात. एका स्त्रीने आणि तिच्या पतीने आपल्या दोन मुलांसमोर यहोवाची सेवा करण्याचे ध्येय राखून त्यांचे पालनपोषण यशस्वीपणे कसे केले याविषयी ती म्हणते: “सत्याने आम्ही आमचं सगळं जीवन व्यापून टाकलं—अधिवेशनांना न चुकता जाणं, सभांची तयारी करणं, सभांना जाणं, क्षेत्र सेवेला नियमितपणे जाणं.” तिचे पती म्हणाले: “सत्य आमच्या जीवनाचा एक भाग नाही तर सत्य हेच आमचं जीवन आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यानंतर येतात.” तुमच्या कुटुंबातही तुम्ही यहोवाच्या सेवेला असेच प्राधान्य दिले आहे का?

४ सुसाध्य साप्ताहिक आराखडा बनवा: आठवड्याला पाच सभांची व्यवस्था करून यहोवाची संघटना आपल्याला एक उत्तम आध्यात्मिक नित्यक्रम ठेवायला मदत करते. यहोवाच्या उपासनेला केंद्रस्थानी ठेवणारे ख्रिश्‍चन या सर्व महत्त्वपूर्ण सभांना उपस्थित राहता यावे म्हणून आपल्या कुटुंबातल्या त्याचप्रमाणे इतर कामांची व्यवस्था करतात. कमी महत्त्व असलेल्या गोष्टींमुळे ते सभांना नियमितपणे जाण्याचे कधीच थांबवत नाहीत.—फिलिप्पै. १:१०; इब्री १०:२५.

५ दररोज ठरलेल्या वेळी भोजन घेणे जसे महत्त्वाचे असते त्याचप्रमाणे व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक अभ्यास व सभांची तयारी यांच्यासाठी ठराविक आराखडा करणे देखील महत्त्वाचे आहे. (मत्त. ४:४) व्यक्‍तिगत अभ्यासासाठी तुम्ही दररोज निदान १५ ते २० मिनिटे काढू शकता का? पण अभ्यासासाठी ठरवलेली वेळ हळूहळू दुसऱ्‍या गोष्टींनी व्यापून जाऊ नये हे मात्र महत्त्वाचे आहे. अशी चांगली सवय लावून घ्या. त्यासाठी कदाचित तुम्हाला नेहमीपेक्षा सकाळी जरा लवकर उठावे लागेल. बेथेल कुटुंबाचे जगभरातले १७,००० सदस्य सकाळी दैनिक वचनाची चर्चा करण्यासाठी लवकर उठतात. अर्थात, दुसऱ्‍या दिवशी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपण्याचीही गरज असते ज्यामुळे दुसऱ्‍या दिवशी तुम्ही ताजेतवाने असाल.

६ तुम्ही कुटुंबाचे मस्तक असल्यास, कुटुंबाच्या ईश्‍वरशासित कार्यहालचालींचा आराखडा ठरवण्यात आणि योजना करण्यात पुढाकार घ्या. काही घरांमध्ये संध्याकाळचे जेवण आटोपल्यावर सगळे निवान्त असताना बायबलचे, इयरबुकचे किंवा इतर कोणत्याही प्रकाशनाचे वाचन केले जाते. मोठेपणी आपली मुले आध्यात्मिकतेत मजबूत ख्रिश्‍चन बनल्याचे ज्या पालकांनी पाहिले आहे त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांच्या घरात आठवड्यातून एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन आध्यात्मिकरित्या उभारणीकारक वेळ घालवण्याची रीत होती. असेच एक पिता म्हणाले: “आमच्या घरी ३० वर्षांपासून बुधवारी रात्री नियमितपणे जो अभ्यास व्हायचा त्यामुळे आमच्या मुलांची आध्यात्मिक वाढ व्हायला जास्त मदत मिळाली असं मला वाटतं.” त्यांच्या तिन्ही मुलांचा बाप्तिस्मा फार लहान असतानाच झाला आणि नंतर ते तिघेही पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरले. कुटुंबाच्या अभ्यासाव्यतिरिक्‍त, क्षेत्र सेवेत संदेश कसा सादर करणार याचा किंवा मिटींग्समधल्या भागांचा सराव करता येतो किंवा इतर हितकारक गोष्टी करता येतात.

७ तुमच्या साप्ताहिक आराखड्यात तुम्ही राज्यप्रचारासाठी ‘वेळ बाजूला काढून ठेवला’ आहे का? (कलस्सै. ४:५, NW) आपल्यातील अनेकांचे जीवन दगदगीचे असते; कुटुंबाच्या आणि मंडळीच्या जबाबदाऱ्‍या असतात. दर आठवडी आपण प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कार्यात भाग घेण्यासाठी निश्‍चित योजना केल्या नाहीत, तर दुसऱ्‍या कामांमुळे या महत्त्वाच्या कामासाठी वेळ राहणारच नाही. एका मोठ्या रँचच्या मालकाने म्हटले: “१९४४ सालात मला उमगलं की, जोपर्यंत मी एक विशिष्ट दिवस नेमत नाही तोपर्यंत मला सेवेत जायला मिळणार नाही. तेव्हापासून आतापर्यंत मी सेवेत जायला अजूनही आठवड्यातून एक दिवस सुटी घेतो.” एका ख्रिस्ती वडिलांना असे आढळून आले आहे की, साक्षकार्याचा ठराविक आराखडा असल्यामुळे त्यांना दर महिन्याला सेवा कार्यात सरासरी १५ तास घालवता येतात. शनिवारी त्यांचे काही काम निघालेच तर सकाळची सेवा झाल्यानंतर ते त्यांचे काम उरकतात. तुम्ही आणि तुमचे कुटुंब, आठवड्यातून कमीत कमी एकदा क्षेत्र सेवेत जाण्याचे ठरवून तुमच्या आध्यात्मिक जीवनपद्धतीचा तो एक भाग बनवू शकता का?—फिलिप्पै. ३:१६.

८ आपल्या जीवनपद्धतीचे परीक्षण करा: यहोवाची सेवा आपल्या जीवनात केंद्रस्थानी ठेवताना अनेक अडथळे येतात. अचानक घडणाऱ्‍या घटनांमुळे अभ्यास, सभा आणि सेवेच्या नीट योजलेल्या आराखड्याचा खोळंबा होऊ शकतो. आपला शत्रू, सैतान ‘आपल्याला अडवण्याचा’ आणि आपल्या योजना निष्फळ ठरवण्याचा होता होईल तितका प्रयत्न करील. (१ थेस्सलनी. २:१८; इफिस. ६:१२, १३) या अडथळ्यांनी निरुत्साहित होऊन माघार घेऊ नका. ठरलेल्या ईश्‍वरशासित कार्यहालचाली पार पाडण्यासाठी फेरबदल करायची गरज असेल तर अवश्‍य करा. खरोखरच फायदेकारक असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी दृढनिश्‍चय आणि चिकाटी आवश्‍यक असते.

९ जगिक प्रभाव आणि आपल्या अपरिपूर्ण शरीराच्या प्रतिकूल प्रभावांमुळे आपल्या जीवनात गैर-आध्यात्मिक कार्यहालचालींचा शिरकाव आपण होऊ देऊ नये ज्यात विनाकारण पुष्कळ वेळ वाया जातो. त्यासाठी असे प्रश्‍न विचारून आत्मपरीक्षण करणे आवश्‍यक आहे: ‘माझे जीवन असंतुलित किंवा विचलित झाले आहे का? या जगातल्या नाशवंत गोष्टींना मी केंद्रस्थानी ठेवू लागलो आहे का? (१ योहा. २:१५-१७) आध्यात्मिक कार्यहालचालींमध्ये घालवत असलेल्या वेळेच्या तुलनेत स्वतःच्या कामांसाठी, पर्यटनासाठी, खेळासाठी किंवा इतर मनोरंजनाच्या प्रकारात—त्याचप्रमाणे टीव्ही पाहण्यात, इंटरनेट चाळण्यात—मी किती वेळ घालवतो?’

१० नको त्या कार्यहालचालींनी जीवन गजबजून गेले आहे असे तुमच्या लक्षात आल्यास, काय करता येईल? बांधवांनी “परिपूर्ण व्हावे” किंवा त्यांना “सरळ मार्गात आणले जावे” अशी पौलाने प्रार्थना केली त्याप्रमाणे यहोवाची सेवा पुन्हा एकदा केंद्रस्थानी ठेवण्यासाठी त्याला मदतीची विनंती का करू नये बरे? (२ करिंथ. १३:९, ११, तळटीप [NW]) तेव्हा तुम्ही केलेल्या दृढनिश्‍चयाबद्दल करारी असा आणि आवश्‍यक ते बदल करा. (१ करिंथ. ९:२६, २७) यहोवाची आज्ञाधारकपणे सेवा करताना उजव्या किंवा डाव्या बाजूला वळू नये म्हणून यहोवा तुम्हाला मदत करील.—पडताळा यशया ३०:२०, २१.

११ देवाच्या आनंदी सेवेत मग्न राहा: पुष्कळसे लोक सुख मिळवण्यासाठी वाटेल ते करतात पण म्हातारपण येते तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, त्यांनी प्राप्त केलेल्या भौतिक वस्तूंमुळे त्यांना कायमचा आनंद मिळालेला नाही. सर्वकाही “वायफळ उद्योग” असल्याचे त्यांच्या लक्षात येते. (उप. २:११) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आपण यहोवाला केंद्रस्थानी ठेवतो, अर्थात ‘आपल्यापुढे परमेश्‍वराला नित्य ठेवतो’ तेव्हा भरपूर समाधान मिळते. (स्तोत्र १६:८, ११) याचे कारण असे की, यहोवामुळेच आज आपण अस्तित्वात आहोत. (प्रकटी. ४:११) त्या महान उद्देशकर्त्याविना आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. यहोवाची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातली प्रत्येक हालचाल सार्थ आणि उद्देशपूर्ण असते; तिचा कायमस्वरूपी, होय, अनंतकालिक फायदा आपल्याला आणि इतरांनाही होतो.

१२ आहे तितके पुरे अशी मनोवृत्ती ठेवून सैतानाच्या जगाच्या नजीक येणाऱ्‍या अंताच्या निकडीची जाणीव हरवून बसू नये हे महत्त्वाचे आहे. भवितव्याविषयी आपला काय दृष्टिकोन आहे त्याने आपले दैनंदिन जीवन प्रभावित होते. जागतिक प्रलय येईल यावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍या नोहाच्या दिवसातील लोकांनी खाणे, पिणे, लग्न करणे वगैरे गोष्टींना दररोजच्या जीवनात प्राधान्य दिले आणि प्रलयात सर्वजण वाहून जाईपर्यंत त्यांनी ‘सुधी घेतली नाही.’ (मत्त. २४:३७-३९) आज, या जगावर आपले जीवन केंद्रीत करणारे लोक, मानवजातीने कधीही अनुभवले नाही अशा महान विनाशात अर्थात ‘प्रभुच्या दिवसात’ भवितव्याविषयीच्या आशांचा चुराडा होत असताना पाहतील.—२ पेत्र ३:१०-१२.

१३ म्हणून, जिवंत देव, यहोवा आणि त्याची इच्छा करण्याला जीवनात केंद्रस्थानी ठेवत राहा. या जीवनात अशी एकही गुंतवणूक नाही जिला यहोवासारख्या भरवशालायक व्यक्‍तीचा पाठिंबा मिळेल. तो खोटे बोलत नाही—त्याची वचने तो पूर्ण करीलच. (तीत १:२) तो मरत नाही—त्याच्याजवळ साठवलेले काहीएक गमावणार नाही. (हब. १:१२; २ तीम. १:१२) आपण सध्या उभारत असलेले आज्ञाधारकतेचे आणि विश्‍वासाचे हे जीवन, आपल्या आनंदी देवाच्या हर्षदायक सेवेत अनंतकाळ टिकणाऱ्‍या जीवनाची केवळ सुरवात आहे!—१ तीम. १:११; ६:१९.

[Blurb on page 3]

“सत्य आमच्या जीवनाचा एक भाग नाही तर सत्य हेच आमचं जीवन आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यानंतर येतात.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा