टेहळणी बुरूज आणि सावध राहा! तुम्ही वाचता का?
१ आफ्रिकेतील एका मिशनरी दांपत्याने आपल्या मासिकांविषयी असे म्हटले: “टेहळणी बुरूज, आम्हाला या मिशनरी क्षेत्रात आमचा आध्यात्मिक उत्साह कायम ठेवण्यास मदत करते. प्रत्येक अंकापासून आम्हाला उत्तेजन आणि धैर्य मिळतं.” आपल्या मासिकांबद्दल तुम्हाला देखील अशीच कृतज्ञता वाटते का? कधी पुढचा अंक वाचायला मिळेल, अशी तुम्हाला उत्सुकता वाटते का?
२ मासिकांतील लेख आपण केवळ काही मिनिटांत वाचून काढतो पण हेच लेख तयार करण्यासाठी बराच वेळ लागलेला असतो. हे माहीत असताना तुम्ही मासिकांतील लेख केवळ वरवर वाचून, फक्त चित्रे पाहून किंवा लक्ष वेधून घेणारा एखादाच लेख वाचून मासिक बाजूला ठेवाल का? एवढ्यावरच समाधान मानणे शहाणपणाचे ठरणार नाही. आपण मासिकांच्या प्रत्येक अंकातील प्रत्येक लेख वाचून त्याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. टेहळणी बुरूज हे समयोचित आध्यात्मिक अन्न पुरवणारे आपले प्रमुख मासिक आहे. सावध राहा! यात मात्र आपल्याला निरनिराळ्या विषयांवर मनोरंजक व माहितीपर लेख वाचायला मिळतात. या मासिकांतून आपण जे काही शिकतो त्यामुळे आपण आध्यात्मिकरित्या तर बळकट होतोच शिवाय, आणखीन चांगल्या प्रकारे सेवा करायलाही आपल्याला मदत होते. आपण स्वतः जर अगदी न चुकता ही मासिके वाचत असू तर आपल्याला आपोआपच ती इतरांनाही द्यावीशी वाटतील.
३ वाचनाच्या सवयी कशा सुधाराल: वेळच्या वेळी मासिके वाचण्याच्या बाबतीत तुम्ही आणखीन सुधारणा करू शकता का? अनेकांना उपयुक्त वाटलेल्या दोन गोष्टी पुढे सुचवलेल्या आहेत. (१) नियमितपणे वाचन करण्यासाठी वेळ ठरवून घ्या. वाचन करण्यासाठी दररोज केवळ १० ते १५ मिनिटे काढली तरी आठवड्याभरात तुमचे इतके वाचन होईल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. (२) तुम्ही जे काही वाचले आहे त्याची नोंद ठेवा. उदाहरणार्थ, प्रत्येक लेख वाचून झाला की त्याच्यावर तुम्ही खूण करून ठेवू शकता. नाहीतर काही लेख किंवा एखाद्या वेळी सबंध मासिकच वाचण्याचे तुम्ही विसरून जाल. म्हणून, वाचनासाठी तुम्हाला सोयीस्कर असणारी निश्चित वेळ ठरवून घेणे आणि मग न चुकता ठरवलेल्या वेळी वाचन करणे महत्त्वाचे आहे.—पडताळा फिलिप्पैकर ३:१६.
४ या बदलत्या काळात, ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ लोकांच्या खऱ्या गरजा काय आहेत हे सुज्ञपणे ओळखून त्यांना सहायक ठरतील असे लेख प्रकाशित करत आहे. (मत्त. २४:४५) या मासिकांनी खरोखर आपले जीवनच बदलून टाकले आहे. आपण ईश्वरशासित प्रकाशने किती चांगल्या प्रकारे, किती नियमितपणे वाचतो यावरच आपली आध्यात्मिक प्रगती बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. हरएक मासिकाचे वाचन करण्याकरता वेळ काढणाऱ्यांना अतिशय उत्तम आध्यात्मिक आशीर्वाद मिळेल.