पुनर्भेटी करण्यातील अडचणींवर मात करणे
१ सुवार्तेचे सेवक या नात्याने आपल्याला शिष्य बनवण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (मत्त २८:१९, २०) यासाठी पुनर्भेटी करणे अत्यावश्यक आहे. पण पुनर्भेटी करण्यात कुशलता प्राप्त करण्यासाठी परिश्रम व दृढसंकल्पाची गरज आहे. राज्य आशेविषयी इतरांना सांगता यावे म्हणून कधीकधी आपल्याला आपल्या सोयीकडे दुर्लक्ष करावे लागेल. पण पुनर्भेटींद्वारेच आपल्याला प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांची आध्यात्मिक भूक भागवण्याची संधी मिळते.
२ आस्था दाखवलेल्या सर्वांना पुन्हा भेट द्या: राज्य संदेशाविषयी आस्था दाखवलेल्या सर्व लोकांच्या पुनर्भेटी केल्या जाव्यात; मग त्यांनी आपली प्रकाशने घेतली असोत किंवा नसोत. परंतु, तुम्ही या संदेशाविषयी लोकांची आस्था कशी जागृत करू शकता? सर्वात चांगला मार्ग म्हणजे देवाचे वचन, बायबल याचा उपयोग करणे. येशूने व त्याच्या प्रेषितांनी दाखवून दिले, की सरळ बायबलचा आधार घेऊन चर्चा केल्यास राज्य संदेशाविषयी आस्था वाढवली जाऊ शकते.—मार्क १०:१७-२१; प्रे. कृत्ये २:३७-४१.
३ लोकांची पुन्हा भेट घेताना बायबल अभ्यास सुरू करणे हा आपला उद्देश असला पाहिजे. आपण गृह बायबल अभ्यास कसा चालवतो हे घरमालकाला दाखवू शकतो. सत्य शिकवण्याची प्रांजळ इच्छा असणारा विद्यार्थी सापडावा अशी यहोवाकडे प्रार्थना केल्यास तो तुमच्या प्रार्थनेचे जरूर उत्तर देईल अशी तुम्ही खात्री बाळगू शकता. तेव्हा, पुनर्भेटी करायला निघण्याआधी त्या बायबल अभ्यासांमध्ये बदलाव्यात म्हणून यहोवाला प्रार्थना करा. अर्थात, आपण जेथे जेथे पुनर्भेटी करतो त्या सर्वच ठिकाणी आपल्याला बायबल अभ्यास मिळेल असे नाही. पण, यहोवाने या आस्थेवाईक लोकांच्या मनात सत्य शिकण्याची इच्छा निर्माण करावी अशी आपण प्रार्थनेत त्याच्याकडे विनंती करू शकतो.
४ ट्रॅक्ट्सचा चांगला उपयोग करा: पुनर्भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी ट्रॅक्ट्सचा उपयोग केल्यास चांगले परिणाम होऊ शकतात; खासकरून पहिल्या भेटीत घरमालकाने कोणतेही प्रकाशन स्वीकारलेले नसते तेव्हा. बरेच जण ट्रॅक्टवरील चित्र दाखवून त्यावरच चर्चा सुरू करतात. एका वेळी एकच परिच्छेद वाचा आणि परिच्छेदात एखादा प्रश्न असल्यास थांबा आणि घरमालकाला त्याचे मत विचारा. शास्त्रवचने उघडून वाचा आणि ती विषयाला कशी लागू होतात ते समजावून सांगा. मग अभ्यास सुरू करता येईल अशा एखाद्या प्रकाशनाशी संबंध जोडून पुढे चर्चा करा.
५ पुनर्भेटींतील अडचणींवर मात करणे: बऱ्याच सर्किट ओव्हरसियरच्या रिपोट्र्सनुसार काही प्रचारक घरमालकाला असे सांगतात, “तुम्हाला काही प्रश्न असतील तर शेवटल्या पानावर पत्ता दिलाय, त्यावर तुम्ही पत्र लिहू शकता.” पण आपण वर दिलेल्या सूचना लक्षात ठेवल्या आणि “पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा” या शीर्षकाखाली मार्च १९९७ च्या आमची राज्य सेवा पुरवणीत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचली तर पुनर्भेटी करण्याचे हे कठीण काम देखील आपण अगदी चांगल्याप्रकारे करू शकू.