युवकांनो—आपल्या शालेय शिक्षणाचा फायदा घ्या
१ उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर पुन्हा शाळेत गेल्यावर तुम्हाला कसे वाटले? आणखीन एका शालेय वर्षाचा तुम्ही फायदा घेत आहात का? तुमच्या वर्गसोबत्यांना व शिक्षकांना सत्य सांगण्याच्या ज्या संधी तुम्हाला शाळेत लाभतात त्याचा फायदा तुम्ही घ्याल का? आमचा विश्वास आहे, की तुम्ही शालेय शिक्षणापासून सर्वोत्तम लाभ मिळवू इच्छिता.
२ चांगले विद्यार्थी असा: उत्तम तयारी करून शाळेला उपस्थित राहिल्यास व वर्गात लक्ष देऊन ऐकल्यास तुम्हाला स्थायी लाभ मिळू शकतात. दिलेला गृहपाठ मेहनतीने पूर्ण करा; मात्र त्यास आपल्या ईश्वरशासित कार्यहालचालींच्या आड येऊ देऊ नका.—फिलिप्पै. १:१०.
३ शालेय वर्षाच्या सुरवातीलाच यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) हे माहितीपत्रक वाचून काढा. मग तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी तुमच्या प्रत्येक शिक्षकाला याची एक प्रत द्यावी. शिक्षकांना याची जाणीव करून द्या, की त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील. यावरून त्यांना तुमची तत्त्वे व विश्वास अधिक चांगल्याप्रकारे समजतील; शिवाय, शिकलेल्या गोष्टी लागू करण्याचा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा ते तुमच्याशी सहकार्यही करतील. तसेच, मौल्यवान शिक्षण प्राप्त करण्यात ते तुमची मदत करतात तेव्हा तुम्ही आणि तुमचे पालक त्यांच्याशी सहकार्य करू इच्छिता याचीही त्यांना खात्री होईल.
४ चांगले साक्षीदार असा: अनौपचारिक कार्य करण्यासाठी शाळा तुमचे वैयक्तिक क्षेत्र आहे असे का समजू नये बरे? येत्या शालेय वर्षादरम्यान, साक्ष देण्याच्या अनन्यसाधारण संधी तुम्हाला लाभतील. तुमच्यापाशी विलक्षण आध्यात्मिक ज्ञान आहे आणि जेव्हा तुम्ही ते इतरांना देता तेव्हा ‘तुमचे स्वतःचे व तुमचे ऐकणाऱ्यांचेही तारण साधू’ शकता. (१ तीम. ४:१६) आदर्शयुक्त ख्रिस्ती आचरण राखल्याने आणि प्रत्येक उचित प्रसंगी साक्ष दिल्याने तुम्हाला स्वतःला व इतरांनाही लाभ होऊ शकतो.
५ एका अल्पवयीन बांधवाने आपल्या शाळेतील सहविद्यार्थ्यांना अनौपचारिक साक्ष दिली. ज्यांनी प्रतिसाद दिला त्यात एक कॅथलिक, देवावर विश्वास ठेवणाऱ्यांची एके काळी टर उडवणारा नास्तिक आणि सतत धूम्रपान करणारा व बेसुमार दारू पिणारा एक तरुण अशांचा समावेश होता. या तरुण बांधवाने आपल्या एकूण १५ समवयस्कांना समर्पण आणि बाप्तिस्म्याचे पाऊल उचलण्यास मदत केली!
६ यास्तव युवकांनो, शिक्षण घेण्यास आणि साक्षीकार्याचे आपले अनोखे क्षेत्र उरकण्यात स्वतःला झोकून द्या. मग शाळेतून तुम्हाला सर्वाधिक लाभ मिळेल.