तुमच्या “शरीरात एक काटा” आहे का?
१ आपण सगळेच, शक्य तितक्या अधिक प्रमाणात प्रचार करण्याची आपली कार्यनियुक्ती पूर्ण करण्याची मनस्वी इच्छा बाळगतो. तथापि, गंभीर शारीरिक दुखणी अथवा अपंगत्वामुळे आपल्या अनेक प्रिय बंधूभगिनींना पूर्णार्थाने सहभाग घेणे कठीण जाते; यास्तव, हवे तितके करण्याची इच्छा असताना देखील त्यांना ते जमत नाही. विशेषतः, इतरांना सेवेत क्रियाशील असल्याचे ते पाहतात तेव्हा त्यांच्यातील निरुत्साहाच्या भावनांचा सामना करणे त्यांना अगदीच कष्टप्रद वाटू शकते.—१ करिंथ. ९:१६.
२ अनुसरण्याजोगे उदाहरण: प्रेषित पौलाला ‘शरीरातील एका काट्याशी’ संघर्ष करावा लागला. पौलाने ज्याचे वर्णन, ठोसे मारणारा “सैतानाचा एक दूत” असे केले तो पीडादायक अडथळा दूर करण्यासाठी त्याने अक्षरशः तीनदा यहोवाकडे विनंती केली. पण तरीही, पौलाने सहन केले आणि आपल्या सेवेत प्रगती केली. त्याने स्वतःची कीव केली नाही किंवा एकसारखी तक्रारही करत बसला नाही. उलट, होता होईल तितके त्याने केले. यशस्वीपणे समस्येचा सामना करण्याचे रहस्य म्हणजे, देवाने त्याला दिलेले पुढील आश्वासन होय: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते.” आहे त्या स्थितीत राहण्याचे तसेच सहन करण्यासाठी यहोवावर व पवित्र आत्म्यावर विसंबून राहण्याचे पौल शिकला, तेव्हा त्याची दुर्बलताच त्याचे बलस्थान ठरली.—२ करिंथ. १२:७-१०.
३ तुम्ही कसे सहन करू शकता: तुम्ही करत असलेल्या देवाच्या सेवेवर मानवी दुर्बलता मर्यादा पाडते का? असल्यास, पौलासारखी मनोवृत्ती बाळगा. तुमचे आजारपण किंवा अपंगत्व यांवर सध्याच्या व्यवस्थीकरणात कोणताही स्थायी तोडगा नसला तरीही तुम्ही यहोवावर पूर्ण भरवसा ठेवू शकता; तुमच्या गरजांची त्याला जाण असल्यामुळे “सामर्थ्याची पराकोटी” तो तुम्हाला पुरवील. (२ करिंथ. ४:७) फटकून राहू नका तर मंडळीत मिळणाऱ्या साह्याचा लाभ उठवा. (नीति. १८:१) घरोघरच्या प्रचार कार्यामध्ये सहभाग घेण्यात तुमची काही अडचण असल्यास अनौपचारिक किंवा टेलिफोन साक्षीकार्य करण्याचे व्यावहारिक मार्ग शोधा.
४ तुम्ही सेवेत जे काही करू शकता त्यावर शरीरातील एखादा काटा मर्यादा पाडत असला तरीही, तुम्ही सेवेत काहीच केले नाही अशी भावना मनात बाळगू नका. पौलाप्रमाणे, तुम्ही देखील तुमच्या बळानुसार व परिस्थितीनुसार, ‘देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने [पूर्णपणे] सांगू’ शकता. (प्रे. कृत्ये २०:२४) तुमची सेवा साध्य करण्याचा यत्न करत असताना हे जाणून घ्या, की तुमच्या सेवेविषयी यहोवा संतुष्ट आहे.—इब्री. ६:१०.