वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ६/१ पृ. २४-२७
  • यहोवाचे सामर्थ्य मानवी कमतरतांमुळे प्रकट होते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे सामर्थ्य मानवी कमतरतांमुळे प्रकट होते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परीक्षांना तोंड देणे
  • कमतरतांना तोंड देणे
  • प्रचार करण्यासाठी सामर्थ्य
  • ‘शरीरातील काट्याला’ तोंड देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • तुमच्या “शरीरात एक काटा” आहे का?
    आमची राज्य सेवा—१९९८
  • पौलच्या शरीरातला एक काटा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • अशक्‍त असूनही सशक्‍त
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ६/१ पृ. २४-२७

यहोवाचे सामर्थ्य मानवी कमतरतांमुळे प्रकट होते

“मी फारच आनंदी आणि उत्साही पुर्ण वेळेची सेविका असल्याचं लोकांना वाटायचं. इतरांना कोणतीही समस्या असली तरी मदतीकरता मी त्यांच्या पाठीशी नेहमी उभी असायचे. परंतु, त्याचवेळी मी आतल्याआत मरत असल्याचं मला वाटत होतं. अस्वस्थ विचारांचा आणि मनोव्यथांचा माझ्यावर अनिष्ट परिणाम होत होता. लोकांपासून दुरावत असल्यासारखं वाटत होतं. घराच्या बाहेर निघण्याचं मनच होत नव्हतं. मला मरण तरी का येत नाही, असं मी यहोवाला कित्येक महिने विचारत होते.”—व्हॅनेसा

वर उल्लेख केल्याप्रमाणे यहोवाचे सेवक या ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांमध्ये’ जीवन कंठत असल्यामुळे कित्येक वेळा त्यांच्यावर याचा परिणाम होईल हे स्वाभाविक देखील आहे. (२ तीमथ्य ३:१) यामुळे कदाचित काही जण अगदी उद्विग्न देखील होतील. (फिलिप्पैकर २:२५-२७) अशाच प्रकारची परिस्थिती दीर्घकाळापर्यंत राहिल्यास निराशेमुळे आपल्या सामर्थ्याचा ऱ्‍हास सुद्धा होऊ शकतो कारण “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ती अल्प होय” असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे २४:१०) होय, आपण निराश असतो तेव्हा आपल्याला सामर्थ्याची आवश्‍यकता असते—आणि प्रेषित पौलाने तर ‘पराकोटीच्या सामर्थ्याचा’ उल्लेख केला होता.—२ करिंथकर ४:७.

यहोवा देव अमर्याद सामर्थ्याचा स्रोत आहे. आपण जेव्हा त्याच्या सृष्टीचे परीक्षण करतो तेव्हा आपल्याला याची प्रचिती येते. (रोमकर १:२०) उदाहरणार्थ, सूर्याचा विचार करा. पृथ्वी सूर्यापासून जवळजवळ २,४०० महापद्‌म अश्‍वशक्‍ती नियमितपणे प्राप्त करते. तरीही ही संख्या सूर्य जेवढी ऊर्जा निर्माण करतो तिच्या दोन अब्जांच्या निव्वळ एका भागाला सूचित करते. महाकाय ताऱ्‍यांशी तुलना करता सूर्य अगदी लहानगा वाटतो. मृग नक्षत्रपुंजातील राजन्य हा तारा अशांपैकीच एक आहे ज्याचे वस्तूमान सूर्यापेक्षा ५० पटीने जास्त आहे आणि तो सूर्यापेक्षा १,५०,००० पटीने जास्त ऊर्जा बाहेर टाकतो!

अशा प्रकारच्या आकाशातील विद्युतगृहांचा निर्माणकर्ता नक्कीच “महासमर्थ” असला पाहिजे. (यशया ४०:२६; स्तोत्र ८:३, ४) खरोखरच, यशया संदेष्ट्याने लिहिले, की यहोवा “थकतभागत” नाही. मानवी कमतरतांमुळे आपण थकून जात आहोत असे ज्यांना वाटते त्या सर्वांना शक्‍ती देण्यासाठी यहोवा नेहमी तयार असतो. (यशया ४०:२८, २९) तो हे कसे करतो हे ख्रिस्ती प्रेषित पौलाच्या अनुभवावरून दिसते.

परीक्षांना तोंड देणे

आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या एका अडसराविषयी पौलाने करिंथकरांना सांगितले. त्याने त्यास ‘शरीरातील काटा’ असे संबोधले. (२ करिंथकर १२:७) हा “काटा” म्हणजे त्याची आरोग्य समस्या कदाचित त्याचा दृष्टिदोष राहिला असावा. (गलतीकर ४:१५; ६:११) किंवा पौल कदाचित खोट्या प्रेषितांचा आणि इतर शांतिभंजकांचा उल्लेख करत असावा ज्यांनी त्याला त्याच्या प्रेषित्वासाठी आणि कार्यासाठी आव्हान उभे केले होते. (२ करिंथकर ११:५, ६, १२-१५; गलतीकर १:६-९; ५:१२) कारण कोणतेही असले तरी या ‘शरीरातील काट्यामुळे’ पौल फार निराश झाला होता आणि तो काटा काढून टाकण्यात यावा म्हणून त्याने वारंवार प्रार्थना देखील केली होती.—२ करिंथकर १२:८.

परंतु, यहोवाने पौलाची ही विनंती मान्य केली नाही. उलटपक्षी त्याने पौलाला असे म्हटले: “माझी कृपा तुला पुरे आहे.” (२ करिंथकर १२:९) असे म्हणण्यामागे यहोवाचा कोणता अर्थ होता? ख्रिश्‍चनांचा छळ करणाऱ्‍या पौलाच्या इतिहासाचा आपण विचार करतो तेव्हा केवळ अपात्री कृपेमुळेच त्याला देवासोबत नातेसंबंध ठेवता आला होता—आणि त्यामुळेच तो प्रेषित या नात्याने सेवा करू शकला!a (पडताळा जखऱ्‍या २:८; प्रकटीकरण १६:५, ६.) यहोवा, पौलाला कदाचित हे सांगू पाहत होता, की शिष्यत्वाचा विशेषाधिकार त्याच्यासाठी “पुरे” होता. अपात्री कृपेमुळे एखाद्याच्या जीवनातील व्यक्‍तिगत समस्यांचे निवारण होणार नव्हते. खरे तर, आणखी विशेषाधिकार मिळाल्यामुळे काही संकटे देखील येतील. (२ करिंथकर ११:२४-२७; २ तीमथ्य ३:१२) हरएक प्रसंगी पौलाला आपल्या ‘शरीरातील काटा’ सहन करावा लागणार होता.

परंतु, यहोवाने पौलाला कोणत्याही प्रकारे निर्दयीपणे त्यागले नव्हते. उलटपक्षी त्याने त्याला म्हटले: “अशक्‍तपणातच [माझी] शक्‍ति पूर्णतेस येते.” (२ करिंथकर १२:९) होय, पौलाला आपल्या परिस्थितीला तोंड देता यावे म्हणून यहोवा त्याला प्रेमळपणे मदत करणार होता. अशा प्रकारे, पौलाच्या ‘शरीरातील काटा’ वस्तुपाठ बनला होता. आपल्या स्वतःवर विसंबून राहण्याऐवजी यहोवावर अवलंबून राहण्याचे या वस्तुपाठाने त्याला शिकवले. निश्‍चितपणे पौल हा धडा चांगल्याप्रकारे शिकला होता कारण काही वर्षांनंतरच त्याने फिलिप्पैकरांना असे लिहिले: “ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:११, १३.

तुमच्याबद्दल काय? तुम्हीही कदाचित आजारपण किंवा अगदी चिंताग्रस्त करून सोडणारी तुमच्या जीवनातील एखादी परिस्थिती—‘शरीरातील एखादा काटा’ सहन करत आहात का? असे असल्यास निराश होऊ नका. कदाचित यहोवा तुमचा अडसर चमत्कारिकपणे दूर करणारही नाही; पण तुमच्या जीवनात राज्य आस्थांना प्रथम स्थान देत असताना परिस्थितीला तोंड देता यावे म्हणून तो तुम्हाला सुज्ञान आणि सहनशक्‍ती देईल.—मत्तय ६:३३.

आजारपण आणि वार्धक्यामुळे तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे ख्रिस्ती कार्य पूर्ण करता येत नसल्यास हताश होऊ नका. तुमच्या परीक्षेने यहोवाची सेवा मर्यादित केली आहे, असा विचार करण्याऐवजी यहोवावर विसंबून राहण्याची आणखी एक संधी यामुळे मिळाली आहे, या दृष्टीने तुमच्या परीक्षेकडे पाहा. हे देखील लक्षात असू द्या, की एखाद्या ख्रिश्‍चनाच्या मोलाचे मोजमाप त्याच्या सेवाकार्याच्या तासांवरून नव्हे, तर त्याच्या विश्‍वासाद्वारे आणि गाढ प्रीतीद्वारे केले जाते. (पडताळा मार्क १२:४१-४४.) पूर्ण जिवाने यहोवावर प्रेम करणे म्हणजे तुमच्या पूर्ण क्षमतेनिशी यहोवाची सेवा करणे—इतर कोणाच्या क्षमतेने नव्हे.—मत्तय २२:३७; गलतीकर ६:४, ५.

तुमच्या ‘शरीरातील काट्यामध्ये’ प्रिय जनाच्या मृत्यूसारख्या जीवनातील निराशाजनक परिस्थितीचा समावेश होत असल्यास बायबलचा उपदेश अनुसरा: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल, नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) सिल्विया नामक ख्रिस्ती स्त्रीने असेच केले. विवाहानंतर ५० वर्षांनी तिच्या पतीचा मृत्यू झाला तसेच तिच्या कुटुंबातील इतर नऊ सदस्य देखील मरण पावले—त्यांमध्ये तिची दोन लहान नातवंडे देखील होती आणि हे सर्व झाले ते अगदी कमी कालावधीत. सिल्विया म्हणते: “यहोवाने मला मदत केली नसती, तर माझ्या शोकावर मला मात करताच आली नसती. परंतु प्रार्थनेमुळे मला सांत्वन मिळाले. मी वास्तविकरीत्या यहोवासोबत निरंतर संभाषण करते. तो मला सहन करण्यासाठी सामर्थ्य देतो हे मला माहीत आहे.”

“सर्व सांत्वनदाता देव” शोक करणाऱ्‍यांना सहन करण्याची शक्‍ती देतो हे जाणल्याने किती धीर मिळतो! (२ करिंथकर १:३; १ थेस्सलनीकाकर ४:१३) या गोष्टीची कदर बाळगल्यामुळे पौलाने अखेरीस काय म्हटले हे आपण समजू शकतो. त्याने लिहिले: “ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्‍यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.”—२ करिंथकर १२:१०.

कमतरतांना तोंड देणे

आपल्या सर्वांना आपल्या पहिल्या पालकांकडून अपरिपूर्णतेचा वारसा मिळाला आहे. (रोमकर ५:१२) परिणामी, आपला संघर्ष पतित शरीराच्या इच्छांच्या विरोधात आहे. ‘जुन्या मनुष्यत्वच्या’ प्रवृत्तींची आपल्यांवर, आपण विचारही केला नव्हता इतकी मजबूत पकड असल्याचे आपल्याला दिसून येते तेव्हा आपण किती नाउमेद होऊ शकतो! (इफिसकर ४:२२-२४) अनेकदा आपल्याला प्रेषित पौलाप्रमाणे वाटू शकते, त्याने लिहिले: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमांबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.”—रोमकर ७:२२, २३.

अशावेळी देखील आपण यहोवाच्या सामर्थ्याचा फायदा घेऊ शकतो. व्यक्‍तिगत कमतरतांशी संघर्ष करत असताना यहोवाला प्रार्थना करण्याचे कधीही सोडू नका; त्याच त्या समस्येविषयी तुम्ही कित्येक वेळा प्रार्थना केलेली असली तरी प्रामाणिकपणे क्षमा मागत राहा. आपल्या अपात्री कृपेमुळे “अंतःकरणे तोलून” पाहणारा यहोवा तुमच्या प्रामाणिकपणाची सखोलता पाहू शकतो आणि तो तुम्हाला शुद्ध विवेक देखील प्रदान करील. (नीतिसूत्रे २१:२) यहोवा आपल्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने शारीरिक कमतरतांच्या विरोधातील संघर्ष पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देऊ शकतो.—लूक ११:१३.

इतरांच्या अपरिपूर्णतांना तोंड देताना देखील आपल्याला यहोवाच्या सामर्थ्याची आवश्‍यकता असते. उदाहरणार्थ, एखादा सहख्रिस्ती “तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण” करील. (नीतिसूत्रे १२:१८) एखाद्याची चूक असल्याचे आपल्याला माहीत आहे आणि तरी तो इसम अशा प्रकारचे भाष्य करतो तेव्हा त्याचे शब्द आपल्या मनाला फार लागतील. आपण अगदी अस्वस्थ होऊन जाऊ. काहींनी तर अशाप्रकारच्या कारणांमुळे यहोवाला सोडून देण्याचाही निर्णय घेतला आहे—असे करण्याद्वारे त्यांनी घोडचूक केली आहे!

तथापि, संतुलित मनोवृत्ती इतरांच्या कमतरतांकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्यासाठी मदत करील. अपरिपूर्ण मानवांकडून आपण परिपूर्णतेची अपेक्षा करू शकत नाही. सुज्ञ मनुष्य शलमोन आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतो: “पाप करीत नाही असा कोणीच नाही.” (१ राजे ८:४६) ऑर्थर नामक एका अभिषिक्‍त ख्रिश्‍चनाने यहोवाची सुमारे सत्तर वर्षे विश्‍वासूपणे सेवा केली त्यांनी असे निरीक्षण केले: “सहसेवकांच्या कमतरतांमुळे देवाप्रती आपली सचोटी सिद्ध करण्यासाठी आपल्याला संधी मिळते; आपल्या ख्रिस्ती स्वभावाची पारख होते. लोक जे काही म्हणतात किंवा जे काही करतात त्यामुळे जर आपण यहोवाची सेवा करण्यात व्यत्यय आणू दिला तर आपण मनुष्यांची सेवा करतो. खेरीज, आपल्या बांधवांचे देखील यहोवावर प्रेम आहे. आपण त्यांच्यातील केवळ चांगल्याच गोष्टी पाहिल्यास ते इतके वाईट नसल्याचे आपल्याला दिसून येईल.”

प्रचार करण्यासाठी सामर्थ्य

स्वर्गारोहण होण्यापूर्वी येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रेषितांची कृत्ये १:८.

येशूच्या शब्दांच्या सत्यतेत यहोवाच्या साक्षीदारांमार्फत संपूर्ण जगातील २३३ देशांत हे कार्य पार पाडले जात आहे. यहोवाचे ज्ञान इतरांना समजावून सांगण्यासाठी त्यांना मदत करण्यात ते दर वर्षी सामुदायिकरीत्या एक अब्जापेक्षा अधिक तास खर्च करतात. हे काम पार पाडणे नेहमीच सोपे नसते. काही देशांत राज्य प्रचार कार्यावर बंदी किंवा मनाई आहे. हे कार्य कोण करत आहे, याचा देखील विचार करा—पतित, अपरिपूर्ण मानव आणि प्रत्येकाला मग तो पुरुष असो अथवा स्त्री आपआपल्या समस्या आणि चिंता ह्‍या आहेतच. तरीही हे कार्य पुढे जात आहे आणि याचा परिणाम म्हणून मागील तीन वर्षांत दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी यहोवाला समर्पण केले आहे आणि त्याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला आहे. (मत्तय २८:१८-२०) खरोखर, हे कार्य केवळ यहोवाच्या सामर्थ्यानेच पार पाडले जात आहे. जखऱ्‍या संदेष्ट्याद्वारे यहोवाने असे म्हटले: “बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धि होईल.”—जखऱ्‍या ४:६.

तुम्ही सुवार्तेचे प्रचारक असल्यास, त्या महान साध्यतेत तुमचा देखील वाटा आहे मग तो कितीही लहान असला तरी हरकत नाही. तुम्हाला हा “काटा” सहन करायचा आहे तरी देखील तुम्ही या गोष्टीची खात्री बाळगू शकता, की यहोवा ‘तुमचे कार्य आणि त्याच्याप्रती दाखवलेली तुमची प्रीती’ विसरणार नाही. (इब्री लोकांस ६:१०) त्यामुळे मदतीसाठी नेहमी महासामर्थ्याच्या स्रोतावर विसंबून राहा. हे लक्षात ठेवा, की केवळ यहोवाच्याच सामर्थ्याने आपण तग धरू शकतो; त्याची शक्‍ती आपल्या कमतरतांमध्ये पूर्ण होते.

[तळटीपा]

a अर्थातच, आपण ‘सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत,’ यावरून देवाच्या दयेची प्रचिती येते जेणेकरून कोणत्याही मनुष्याला देवाशी संपर्क साधता येऊ शकतो.—रोमकर ३:२३.

[२६ पानांवरील चित्र]

प्रचार कार्य निव्वळ यहोवाच्या सामर्थ्याद्वारे पार पाडले जाते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा