आपण शिक्षक असले पाहिजे, केवळ प्रचारक नव्हे
१ असे निदर्शनास आले आहे की, “आपल्या साक्षीकार्याद्वारे यहोवाच्या साक्षीदारांनी पृथ्वी अक्षरशः व्यापून टाकली आहे.” हे कसे शक्य झाले आहे बरे? मानवी शक्ती किंवा सामर्थ्याद्वारे नव्हे; प्रचार करण्याची व शिक्षण देण्याची आपली कार्यनियुक्ती पूर्ण करण्यासाठी देवाचे सेवक वैविध्यपूर्ण साधनसामग्रींचा उपयोग करतात, तेव्हा त्यांच्यावरील त्याच्या आत्म्याच्या कार्यामुळे हे शक्य झाले आहे.—जख. ४:६; प्रे. कृत्ये १:८.
२ छापील साहित्य, आपले प्रचार कार्य साध्य करण्याचे एक प्रभावकारी माध्यम होय. कित्येक वर्षांपासून, राज्याची सुवार्ता सर्वज्ञात करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी कोट्यवधी पुस्तके, पुस्तिका, माहितीपत्रके, नियतकालिके आणि हस्तपत्रिकांची छपाई केली आहे व त्यांचे वितरणही केले आहे. १९९७ वार्षिक पुस्तकातील अहवाल दाखवून देतात, की साहित्य उत्पादनांनी विक्रमी पातळ्या गाठल्या आहेत. आजपावेतो, नवे जग भाषांतर याच्या नऊ कोटींहून अधिक प्रती छापल्या गेल्या आहेत. संयुक्त संस्थानांत केवळ एका वर्षात, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांची संख्या ७.१ टक्क्यांनी वाढली. जर्मनीमधील नियतकालिक उत्पादन, ३५ टक्क्यांनी वाढले. तेथे उत्पादन केलेली एक तृतीयांश नियतकालिके रशियन क्षेत्रासाठी होती. भारतात १९९७ सेवा वर्षातील पुस्तक वाटप, १९९५ सेवा वर्षातील पुस्तक वाटपांहून १२० टक्के अधिक होते!
३ इतक्या साहित्याची गरज का भासते बरे? जेथे कोठे लोक भेटू शकतील त्यांना साक्ष देण्यासंबंधी आपल्याला दिलेल्या उत्तेजनास विश्वभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्यापैकी अधिकाधिक लोक सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि व्यापारी क्षेत्रात—आपले साक्षीकार्य विस्तारित करत असल्यामुळे थोडीफार आस्था असलेल्या लोकांमध्ये वाटप केल्या जाणाऱ्या साहित्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यांपैकी अधिकतर लोकांना, फारच क्वचित राज्य संदेश ऐकण्याची संधी पूर्वी कधी मिळाली असेल. ही गरज भागवण्यासाठी, तसेच सेवेतील सर्व पैलूंत उपयोगात आणण्यासाठी मंडळ्यांकडे वैविध्यपूर्ण प्रकाशने उपलब्ध असतात.
४ साहित्य वितरण करण्यातील आपला उद्देश काय आहे? केवळ साहित्य सादर करणे एवढाच आपला उद्देश नाही. प्रचार करण्याच्या कार्यनियुक्तीत दोन पैलू अंतर्भूत आहेत—प्रचार करणे आणि शिक्षण देणे. सर्वप्रथम आपल्याला, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचा विशेषाधिकार लाभला आहे; त्याकरवी आपण हे राज्य, मानवजातीसाठी एकमेव उपाय असल्याची जाणीव करून देतो. (मत्त. १०:७; २४:१४) बायबलवर आधारित असलेले आपले साहित्य, राज्याविषयी इतरांमध्ये आस्था चेतविण्याचे आणि ज्ञान देण्याचे, अनेक वर्षांपासून परिणामकारक व प्रभावशाली ठरलेले माध्यम होय.
५ दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला जर शिष्य बनवायचे आहेत तर मग येशूने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत. (मत्त. ११:१; २८:१९, २०) पुन्हा एकदा, विद्यार्थ्याच्या हृदयाप्रत सत्य रुजवून शिष्य बनण्यास त्याची मदत करण्यात साहित्य एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
६ साहित्य स्वीकारणारे लोक कदाचित ‘वचन ऐकणारे’ असतील, पण कोणाचीही मदत मिळविल्याशिवाय, ते कदाचित त्याप्रमाणे चालणारे बनणार नाहीत. (याको. १:२२-२५) फारच कमी लोक असे आहेत जे कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय कधी शिष्य होऊ शकतील. (प्रे. कृत्ये ८:३०, ३१) शास्त्रवचनांत आढळणारे सत्य मनाला पटवून देण्यासाठी त्यांना एका शिक्षकाच्या मदतीची गरज आहे. (प्रे. कृत्ये १७:२, ३) त्यांना समर्पण व बाप्तिस्म्याप्रत पोहंचविणे व इतरांना शिक्षण देण्यात पुरते कार्यक्षम होण्याइतके प्रशिक्षण त्यांना देणे हेच आपले ध्येय आहे.—२ तीम. २:२.
७ अधिक शिक्षकांची सर्वाधिक गरज: आपण प्रचार करतो तेव्हा जाहीरपणे सुवार्ता घोषित करत असतो. तथापि शिकविणे यांत, एखाद्याला प्रगतिशीलपणे मार्गदर्शन करणे सामील आहे. प्रचारामुळे इतरांना राज्याचा संदेश ज्ञात होतो, तर शिक्षण दिल्यामुळे सुवार्तेचा स्वीकार करून ती कार्यात उतरविण्याची मदत वैयक्तिकांना मिळते. (लूक ८:१५) एखादा शिक्षक केवळ उद्घोषणाच करत नाही, तर स्पष्टीकरण देतो, परिणामकारक वादविवाद करून युक्तिवाद करतो, पुरावे सादर करतो आणि पटवूनही देतो.
८ आपल्यापैकी होता होईल तितक्यांनी केवळ प्रचारकच नव्हे तर शिक्षकही बनले पाहिजे. (इब्री. ५:१२अ) साहित्याचे वाटप करणे, आपल्या कार्यातील एक प्रमुख भाग असला तरी आपल्या सेवेच्या दुसऱ्या उद्दिष्टाची साध्यता शेवटी शिक्षक या नात्याने आपण जी भूमिका बजावतो त्यावरच अवलंबून असते. साहित्याचे वाटप करण्यात यशस्वी झाल्यावर आपण संतुष्ट होत असलो तरी आपल्याला सोपविलेली सेवा पूर्ण करण्यासाठी वाटप हेच आपले अंतिम ध्येय असल्याचे आपण समजू नये. (२ तीम. ४:५) साहित्याचे वाटप, इतरांना सत्य शिकविण्यास संधींचे द्वार उघडणारे एक प्रभावशाली माध्यम होय.
९ बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी पुनर्भेटी करा: आपण सर्वांनीच बहुधा असंख्य पुस्तकांचे, माहितीपत्रकांचे आणि नियतकालिकांचे वाटप करून पुनर्भेटींची एक यादीच तयार केली असेल. पुन्हा त्यांची भेट घेऊन आस्था चेतविण्यासाठी आपण एक नियमित वेळ नियोजित केली पाहिजे. पुन्हा भेट घेण्यामागील आपला मुख्य उद्देश आणखीन साहित्याचे वाटप करणे हा नसून आपण आधीच त्यांना जे साहित्य दिले आहे त्याचे वाचन करण्यास व त्यापासून फायदा मिळविण्यास लोकांना उत्तेजन देणे हा आहे. आपली वेळोवेळी भेट घेऊन, अचूक ज्ञान संपादन करण्यास आपल्याला कोणी मदतच केली नसती तर आपण स्वतःहून कितपत आध्यात्मिक प्रगती करू शकलो असतो बरे?—योहान १७:३.
१० देव आपल्याकडून काय अपेक्षितो या माहितीपत्रकातून अथवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्दिष्टाने, दाखविलेल्या सर्व आस्थेचा मागोवा घ्या. ही दोन प्रकाशने, सहजासहजी समजू शकणाऱ्या स्वरूपात राज्याचा संदेश प्रस्तुत करतात. अपेक्षा माहितीपत्रकात, बायबलच्या मूलभूत शिकवणुकी सामावणारा एक व्यापक अभ्यासक्रम समाविष्ट आहे. अधिक तपशिलवारपणे पण तितक्याच सुलभ, सुस्पष्ट आणि संक्षिप्तपणे सत्य शिकविण्यास ज्ञान पुस्तक एखाद्याला समर्थ करते.
११ जून १९९६ ची आमची राज्य सेवा यात स्पष्ट केलेला सुलभ शिक्षण कार्यक्रम, बोध करण्यास शिक्षकाला तसेच ज्ञानार्जन करण्यास विद्यार्थ्यालाही सुकर करतो. प्रभावशाली ठरलेल्या शिक्षण पद्धतींची व तंत्रांची उजळणी करण्यासाठी त्या पुरवणीची एक प्रत नेहमी हाताशी असू द्या. त्यात दिलेल्या काही सूचनांमध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत: विद्यार्थ्यामध्ये खरी वैयक्तिक आस्था कशी घ्यावी, एका सत्रात साहित्याचा किती भाग उरकावा, विषयाशी संबंधित नसणारे प्रश्न कसे हाताळावेत, शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनी अभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी आणि विद्यार्थ्याला यहोवाच्या संघटनेकडे कसे निर्देशित करावे. या सूचनांचे अनुपालन केल्याने नवोदितांसह आपल्यापैकी अधिकांनाही प्रगतिशील अभ्यास संचालित करता येईल.
१२ क्षेत्रातील उत्तम यशाचे अहवाल: शिष्य बनविण्याच्या कार्याला वेग आणण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रक आणि ज्ञान पुस्तक, बहुमूल्य सहायक साधने ठरली आहेत. अपेक्षा माहितीपत्रक मिळाल्यानंतर बोलिव्हियातील एका बांधवाने, एका व्यक्तीसोबत अभ्यास करण्यासाठी लगेच ते उपयोगात आणले. चार महिन्यांनंतर, प्रांतीय अधिवेशनात हा विद्यार्थी बाप्तिस्मा घेणाऱ्या आनंदी उमेदवारांपैकी एक होता!
१३ ज्ञान पुस्तकातील आपला अभ्यास आटोपल्यानंतर यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास अनेक लोक प्रवृत्त झाले आहेत. अंगोलातील एका मंडळीत, ज्ञान पुस्तकातून अभ्यास सुरू केल्याच्या केवळ चार महिन्यांत, प्रचारकांनी संचालित केलेल्या बायबल अभ्यासांची संख्या १९० पासून २६० पर्यंत वाढली आणि सभांची उपस्थिती देखील दुप्पट होऊन ती १८० पासून ३६० इतकी झाली. यानंतर लगेचच, आणखी एक मंडळी स्थापन करावी लागली.
१४ ज्ञान पुस्तकातून आपला पहिला अभ्यास सुरू केल्यानंतर एका बांधवाने म्हटले की, “अभ्यास संचालकानं केवळ प्रश्न विचारले, काही समर्पक शास्त्रवचने वाचली आणि विद्यार्थ्याला समजलं आहे याची खात्री केली,” की मग अभ्यास संचालन करणं अगदीच “सोपं” होऊन जातं. अतिशय कार्यक्षम प्रचारकच केवळ प्रगतिशील बायबल अभ्यास संचालित करू शकतात व आपल्याच्याने ते काही होणार नाही असे पुष्कळदा त्याला वाटत असले तरी त्याला याची जाणीव झाली की, तो ते करू शकत होता कारण त्याने म्हटले: “मला जमलं म्हणजे कुणालाही ते जमेलंच.”
१५ आपल्या सेवेचा एक भाग म्हणून बायबल अभ्यास संचालित केल्याने, शिष्य बनविण्याचे आपले उद्दिष्ट आपण साध्य करतो. सेवेतील या पैलूत सहभागी होण्याइतकी क्षमता ज्यांनी विकसित केली आहे त्यांना ते खरोखरच समाधानकारक आणि समृद्ध प्रतिफळ देणारेही वाटते. आपणही ‘कोणापासून अडथळा न होता, देवाच्या राज्याची घोषणा करत आहोत, आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत आहोत,’ असे आपल्याबद्दल देखील म्हटले जावो—प्रे. कृत्ये २८:३१.