दररोज यहोवाविषयी बोला
१ आपल्या जिव्हाळ्याच्या विषयांवर भरभरून बोलण्यात लोकांना एक आगळाच आनंद मिळतो, कारण अंतःकरणात जे भरले असते तेच मुखावाटे निघते. (लूक ६:४५ब) पण आपला जिव्हाळ्याचा विषय कोणता आहे बरे? स्तोत्रकर्त्याने लिहिले: “माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.” (स्तोत्र ३५:२८) त्याला यहोवाविषयी गाढ प्रशंसा होती आणि त्याच्याविषयी बोलणे व प्रत्येक प्रसंगी त्याची स्तुती करणे हा एक बहुमूल्य विशेषाधिकार असल्याचे त्याने मानले. यहोवासोबत एक घनिष्ठ संबंध असल्यामुळे हर्षित होण्याजोगी अनेकविध कारणे स्तोत्रकर्त्याकडे होती. (स्तोत्र ३५:९) आपल्याला त्याच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण कसे करता येईल बरे?
२ तुमच्या घरात यहोवाविषयी बोला: तुमच्या कौटुंबिक वर्तुळात यहोवाचा विषय, दैनंदिन संभाषणाचा विषय बनला पाहिजे. यहोवाविषयी अतूट प्रेम असलेले पालक आपल्या सर्व कार्यहालचालींत स्वाभाविकपणे त्याच्याविषयी बोलतील. (अनु. ६:५-७) ते असे करतात तेव्हा मुलांच्याही लक्षात येईल, की त्यांचे माता-पिता विश्वासानुसार जीवन जगतात आणि देवाचे नियमशास्त्र त्यांना प्राणप्रिय आहे. आणि मग मुले देखील कौटुंबिक बायबल अभ्यासाकडे, आपल्या पालकांच्या सुभक्तीची एक खरी अभिव्यक्ती म्हणूनच पाहतील.—२ पेत्र ३:११.
३ आपल्या बांधवांसोबत यहोवाविषयी बोला: आपल्या साप्ताहिक ईश्वरशासित नित्यक्रमादरम्यान, आध्यात्मिक अन्नाने आपल्या मनाचे आणि अंतःकरणाचे पोषण करण्याच्या बहुविध संधी उपलब्ध असतात. ज्यांच्याविषयी बोलता येईल अशा चांगल्या गोष्टींची आपल्याकडे कधीच कमतरता नसते. (लूक ६:४५अ) तुमच्या व्यक्तिगत अभ्यासात अथवा साप्ताहिक बायबल वाचनात तुम्हाला विशेषपणे आवडलेला आणि तुम्ही टिपलेला एखादा मुद्दा आहे का? तो तुमच्या बांधवांना सांगा आणि असे केल्याने यहोवावरील त्यांचे प्रेम वृद्धिंगत करण्यास हातभार लावा.—स्तोत्र ३५:१८; इब्री. १०:२४.
४ इतरांसोबत यहोवाविषयी बोला: कार्यस्थळी, शाळेत आणि सत्य न मानणाऱ्या कौटुंबिक सदस्यांसोबतच्या आपल्या दररोजच्या व्यवहारांत—हे सुस्पष्टपणे दिसून आले पाहिजे, की यहोवाविषयी साक्ष देणे हाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. जगाच्या उद्धट व असभ्य बोलीने कलंकित होण्याऐवजी, आपल्या बोलीने देवाला गौरविले पाहिजे. त्याने आपल्याला आज्ञापिलेल्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी दररोज, हर प्रसंगी इतरांसोबत बोला.—प्रे. कृत्ये ५:४२; कलस्सै. ४:६.
५ यहोवाचे खरे उपासक या नात्याने आपला अप्रतिम देव, यहोवा याच्याविषयी बोलण्याच्या संधींचा दररोज उपयोग करण्यास आपण जागृत राहू.—स्तोत्र १०६:४७.