व्यक्तिगत अभ्यासामुळे आध्यात्मिक प्रगती होते
यहोवा हा प्रगतीशील देव आहे. हे पृथ्वीच्या सृष्टीतून सिद्ध झाले आहे. सृष्टीच्या प्रत्येक टप्प्यात मानवजातीच्या सार्वकालिक अस्तित्वासाठी सुंदर ग्रह तयार होण्यामध्ये प्रगती दिसून आली. मानवाने शुद्ध उपासना करण्याचे सोडून दिल्यावरही, पृथ्वीवर परादीसची सरतेशेवटी पुनर्स्थापना करण्यासाठी यहोवाने प्रेमापोटी एक प्रगतीशील व्यवस्था अंमलात आणली.—उत्प. ३:१५.
२ मूलतः देवाच्या स्वरूपात बनवलेल्या मानवाला प्रगतीशील स्वभाव देण्यात आला आहे. परंतु, आज अनेकांच्या मते प्रगती म्हणजे केवळ भौतिक मालमत्तेत वाढ करणे एवढेच आहे. या काळात, यहोवा आपल्या सेवकांमध्ये अशाप्रकारची प्रगती पाहत आहे का? तुमच्या जीवनात कोणत्या प्रकारची प्रगती अगदीच ठळकपणे दिसून येते?
३ देवाप्रती आणि शेजाऱ्याप्रती प्रेम आध्यात्मिक प्रगतीस प्रवृत्त करते: ख्रिश्चनांनी आपल्या कुटुंबाच्या गरजा यथायोग्यपणे भागवण्याची आवश्यकता ओळखावी पण त्यासोबतच हा त्यांचा सर्वात मुख्य हेतू बनू नये याचीही त्यांनी जाणीव राखावी. तरुण असताना येशूने आध्यात्मिक प्रगतीला आपल्या जीवनातले सर्वात महत्त्वाचे ध्येय मानले होते. (लूक २:५२) नंतर, त्याने मार्क १२:२९-३१ येथे नमूद केलेले शब्द उद्गारले तेव्हा आपल्या आध्यात्मिक प्रगतीमागची प्रेरणा कोणती ते त्याने सांगितले.
४ आपण करत असलेल्या आध्यात्मिक प्रगतीचा जरा विचार करा. आपण प्रथम यहोवा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी शिकू लागलो तेव्हा, त्याच्याबद्दल कदर आणि प्रेमामुळे आपल्या विचारात आणि जीवनशैलीत फेरबदल करण्यास आपण प्रवृत्त झालो. हे प्रेम वाढत गेले आणि त्यामुळे देवाला आपले जीवन समर्पित करण्याची आणि पाण्याच्या बाप्तिस्म्याने जाहीररीत्या चिन्हांकित करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण झाली. यावरून देवाच्या सेवेत प्रगती करण्याच्या आपल्या ठाम निश्चयाचा आणि आपल्या सहबांधवाला प्रेमळ काळजी दाखवण्याचा पुरावा मिळाला. आता ती वेळ सरून गेली आहे, आपल्याला फिलिप्पैकर ३:१६ येथील प्रेरित शब्दांचे महत्त्व विचारात घ्यावे लागतील.
५ आपण घेतलेल्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयासाठी अर्थात देवाला केलेल्या समर्पणासाठी आपल्याला आपल्या जीवनपद्धतीत मोठमोठाले बदल करावे लागले. आपण अगदी स्वेच्छेने ते पाऊल उचलले आणि स्वखुशीने आपले जीवन देवाच्या मार्गांच्या एकवाक्यतेत आणले कारण देवाने आपल्यासाठी दाखवलेल्या प्रेमाच्या अनेक अभिव्यक्तींनी आपण प्रेरित झालो होतो; शिवाय, यामुळेच आपले त्याच्याबद्दलचे प्रेमही वाढले. तेव्हापासून, देवाप्रती आपले प्रेम वाढत गेले आहे का? आपल्या जीवनात ती सर्वात प्रबळ शक्ती ठरली आहे का? की, ‘आपली पहिली प्रीती सोडून दिलेल्या’ इफिसच्या मंडळीतील ख्रिश्चनांप्रमाणे आपण बनलो आहोत?—प्रकटी. २:४, ५.
६ देवाप्रती आपले प्रेम निष्क्रिय किंवा स्थिर नाही तर प्रगतीशील आहे. देवाप्रती आपले प्रेम अगदी टोकाला पोहोंचले आहे आणि आता ते आणखी वाढू शकणार नाही अशा स्थितीला आपण कधीच पोहंचणार नाही. देवाबद्दल आपले ज्ञान गहन होत जाते तसे, त्याच्याप्रती आपले प्रेम वाढत जाते. ते अनाद्यनंत वाढत राहील. पौलाने याचे स्पष्टीकरण रोमकर ११:३३-३६ मध्ये किती उत्तमरीत्या दिले. आपण देखील, “प्रभुचे मन कोणी ओळखिले?” या प्रश्नाची सत्यता नम्रतेने मान्य करतो.
७ त्या शब्दांनी आपल्याला आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विचार करायला आणि यहोवाप्रती आपल्या प्रेमाच्या सखोलतेचे परीक्षण करायला लावले पाहिजे. आपण प्रगती करत आहोत, की जीवनातल्या दबावांमुळे आपल्याला आध्यात्मिक बाबींसाठी कमी वेळ मिळत आहे? ख्रिस्ती मंडळीबाहेरच्या शेजाऱ्यांप्रती, किंवा जवळपासच्या शेजाऱ्यांप्रती अर्थात आपल्या बंधूभगिनींप्रती प्रेम व्यक्त करायला आपल्याला वेळ मिळत नाही का? असे असल्यास, फिलिप्पैकर ३:१६ या आधी उल्लेखिलेल्या शास्त्रवचनाची आपल्याकरता विशेष अर्थसूचकता असेल.
८ देवाप्रती आणि शेजाऱ्याप्रती आपले प्रेम आपल्या आध्यात्मिक प्रगतीला उद्युक्त करू शकते का, हे आपण कसे ठरवू शकतो? आपण जे काही निर्णय घेतो ते देवाबद्दल आणि मानवाबद्दल प्रेम असल्यामुळे घेतो का? २ करिंथकर १३:५ च्या सुसंगतेत आपण याचे परीक्षण कसे करू शकतो? हे मंडळीतील इतरांसोबत तुलना करण्याने होत नाही. देवाप्रती आणि शेजाऱ्याप्रती प्रेम असण्याची बाब वैयक्तिक बाब आहे. आपल्या स्वतःच्या लाक्षणिक अंतःकरणात प्रदर्शित केले जाणारे प्रेम सर्वात महत्त्वाचे आहे. गलतीकर ६:४ मध्ये पौलाने योग्य मनोवृत्ती प्रदर्शित केली. रोमकर १४:१२ मध्ये देखील त्याने याच विचारावर भर दिला.
९ देवाप्रती आपले प्रेम थंडावल्यामुळे आपण धीमे पडलो आहोत असे आपल्याला जाणवते का? आता आपल्याला आध्यात्मिक कार्यहालचालींमध्ये भाग घ्यावेसे वाटत नाही का? काही प्रारंभिक ख्रिश्चनांना अशाच प्रकारे वाटले होते आणि त्यामुळे २ थेस्सलनीकाकर ३:१३ येथील उत्तेजनपर शब्द लिहिण्यास पौल प्रेरित झाला असावा. जग कितीही दबाव आणत असले, तरीही ख्रिश्चनांनी आध्यात्मिक प्रगती जारी ठेवावी हे पौलाला ठाऊक होते. त्याचे शब्द आपण जसे आपल्या जीवनात लागू करतो तसे आपल्याला आध्यात्मिक यश प्राप्त होण्याची खात्री मिळू शकते. फिलिप्पैकर ४:१३ मध्ये त्याने आपल्याला आणखीन प्रोत्साहन दिले.
१० बायबल वाचन आणि व्यक्तिगत अभ्यासाद्वारे आध्यात्मिक सामर्थ्य: यहोवा आपल्या लिखित वचनाद्वारे आपल्याला आध्यात्मिक सामर्थ्य आणि शक्ती देऊ शकतो. (इब्री ४:१२) या जगाकडील कोणत्याही दबावांमुळे मंद पडण्याच्या कोणत्याही प्रवृत्तीला आपण बायबलच्या साहाय्याने कसे उलटवू शकतो? अनेकजण कित्येक दशकांपर्यंत, वर्षानुवर्ष यहोवाच्या विश्वासू सेवेत टिकून राहिले आहेत आणि आता त्यांना आजारपण किंवा वृद्धावस्थेचा सामना करावा लागत आहे. आपण अशा स्थितीत असल्यास, इब्री लोकांस ६:१० च्या शब्दांपासून आपण उत्तेजन मिळवू शकतो. परंतु, आध्यात्मिक कार्यहालचालींमधला मंदपणा वयोमानामुळे किंवा आजारपणामुळे नाही असे आपल्याला समजल्यास काय? देवाचे वचन आपल्याला आध्यात्मिक मदत कशाप्रकारे देऊ शकते?
११ देवाच्या वचनाचे वाचन आणि अभ्यास आपली मदत कशी करू शकतात याच्या दोन मार्गांची आपण संक्षिप्त रूपात चर्चा करू. पहिली गोष्ट म्हणजे, बायबलचे दैनिक वाचन आणि वाचत असलेल्या गोष्टींवर मनन करणे यांमुळे यहोवाच्या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला आणखी खोल समज प्राप्त होते. त्याने आपल्या सर्व व्यवहारांमध्ये आणि तत्त्वांमध्ये जी बुद्धी आणि प्रेम प्रदर्शित केले आहे त्याची कदर करण्यास आपण शिकतो. स्तोत्र ११९:९७ मध्ये स्तोत्रकर्त्याने लिहिल्याप्रमाणे आपल्यालाही वाटते. देवाच्या वचनाबद्दल आपले प्रेम वाढते तसे या वचनाच्या उत्पादकाविषयी आपले प्रेम वाढते. देवाप्रती सखोल प्रेम आपल्या जीवनात शक्तिशाली प्रेरणा बनते. (गीत. ८:६, ७) त्याच्या सेवेत ‘नेटाने यत्न करत’ राहण्यासाठी ते आपल्याला आध्यात्मिक इच्छाशक्ती आणि सामर्थ्य प्रदान करते.—लूक १३:२४.
१२ दुसरी गोष्ट म्हणजे, बायबल हे पवित्र आत्म्याचे उत्पन्न आहे. देवाचे वचन दररोज वाचल्याने पवित्र आत्म्याचा उत्तम स्रोत आपल्याला प्राप्त होतो. विश्वासू सेवकांना, योग्य ते करण्यात कधीच खंड पडू न देण्याचे सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारेच मिळाले. तोच पवित्र आत्मा आज सर्वांकरता उपलब्ध आहे, पण तो प्राप्त करण्यासाठी, राखून ठेवण्यासाठी आणि आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पाडू देण्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतील.
१३ खालील अभिव्यक्तींवरून आपले विचार दिसून येतात का? “मला वाचन मुळीच जमत नाही.” “मला अभ्यास करणं अतिशय कठीण वाटतं.” “मी वाचण्यात आणि अभ्यासात अजिबात चांगला नाही आणि म्हणून मला कंटाळा येतो.” “माझ्या या धकाधकीच्या जीवनात वाचन आणि अभ्यासासाठी वेळ काढणं महाकठीण आहे.” “मी सुरू करतो म्हणा, पण मध्येच काहीतरी येतं आणि मग माझ्या वाचनाचा आणि अभ्यासाचा परिपाठ बाजूलाच राहून जातो.” यांपैकीची एक किंवा त्यापेक्षा अधिक समस्या आपल्याला आहेत का? असल्यास, आपण काय करू शकतो? प्रथम, देवाप्रती आपल्याला अंतःकरणातून कसे वाटते त्याचे परीक्षण करावे लागेल. आपल्याला एखाद्या जिगरी मित्राकडून किंवा जवळच्या नातेवाईकाकडून पत्र मिळाले तर मला वाचायला वेळ नाही असे आपण म्हणतो का किंवा मला वाचायला आवडत नाही म्हणून आपण ते उघडण्याची पर्वाही करत नाही? मुळीच नाही. उलट कधी एकदाचे उघडून वाचावे असे आपल्याला होते. तर मग, बायबलच्या रूपात आपल्याला स्वर्गीय पित्याकडून मिळालेल्या पत्राबद्दल आपल्याला असेच वाटू नये का?
१४ संस्था किंवा बांधव आपल्याकरता बायबल वाचनाचा एखादा कडक आराखडा योजू शकत नाहीत कारण प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या परिस्थिती असतात. बायबल वाचन आणि व्यक्तिगत अभ्यास आपल्या दैनिक परिपाठाचा नियमित भाग बनवण्याकरता देवाबद्दल आपले प्रेम आणि ते प्रेम वाढवण्याची इच्छा आपल्याला प्रवृत्त करील. प्रत्येक कुटुंब प्रमुखाने याला कुटुंबाच्या आध्यात्मिक हितांची काळजी घेण्याचा आणि मुलांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण भाग मानला पाहिजे. पालकांना आपल्या मुलांच्या अंतःकरणांमध्ये दररोज देवाबद्दल प्रेम बिंबवण्याची सूचना देण्यात आली होती. (अनु. ६:४-९) देवाची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बायबल वाचन हा एक उत्तम मार्ग आहे. योग्य ते करण्याचे आपण कधीच सोडून देऊ नये! देवाप्रती आणि ख्रिस्ताप्रती प्रेम आपल्याला दैनिक बायबल वाचन करण्यासाठी उद्युक्त करो! (२ करिंथ. ५:१४) इतरजण, आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे देवाबद्दल असलेल्या प्रेमाचे प्रदर्शन म्हणून पाहतील.—१ तीम. ४:१५.
१५ ज्ञान पुस्तक १५८ पानापासून पुढे दैनिक बायबल वाचनाविषयी पुढीलप्रमाणे सांगते: “जसे आम्हासाठी आरोग्यदायी शारीरिक अन्नाची रुचि स्वतःमध्ये वाढवण्याची गरज असते तसेच देवाच्या वचनाच्या ‘निऱ्या दुधाची इच्छा धरा’ असा आर्जव आपल्याला करण्यात आला आहे. देवाच्या वचनाचे वाचन दररोज करून आध्यात्मिक अन्नाची रुची वाढवा. . . .बायबलमधून जे वाचता त्याचे मनन करा. . . .याचा अर्थ, त्या साहित्यात गढून गेले पाहिजे. . . .जे काही तुम्हाला आधीच माहीत आहे त्याच्याशी सध्याच्या साहित्याचा संबंध स्पष्ट करून तुम्ही ते आध्यात्मिक अन्न पचवू शकता. ती माहिती तुमच्या जीवनावर कशी परिणीत होते त्याचा विचार करा किंवा ती यहोवाचे गुण व त्याच्या व्यवहाराबद्दल काय प्रकटविते त्याचे पुनरावलोकन करा. याप्रकारे, वैयक्तिक अभ्यासाद्वारे यहोवा देत असलेले आध्यात्मिक अन्न तुम्हाला मिळवता येईल. हे तुम्हाला देवाजवळ आणील आणि तुम्हाला दररोजच्या समस्यांची हाताळणी करण्यास मदत देईल.”
१६ म्हणून कधीही व्यक्तिगत अभ्यासाबाबतीत हयगय करू नका; तो आध्यात्मिक प्रगतीकरता आवश्यक आहे आणि आध्यात्मिक प्रगती देवाच्या अद्भुत नवीन जगात बचावून जाण्यासाठी आवश्यक आहे. आपण सर्वजण यहोवा आणि आपल्या शेजाऱ्यावर, प्रगती करण्याची इच्छा निर्माण होईल इतपत प्रेम करत राहू या आणि आपल्या व्यक्तिगत अभ्यासात परिश्रमी असून आपण या प्रगतीप्रत पोहंचू या.—नीति २:१-९.