पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
१ “पाहिजेत १,००० प्रचारक” हे, एप्रिल १८८१ च्या टेहळणी बुरूज अंकातील एका लेखाचे शीर्षक होते. त्यामध्ये, “प्रभूने आपल्या सत्याचे ज्ञान ज्यांना ज्यांना सोपवले होते” अशा सर्व समर्पित स्त्री पुरूषांना, बायबलच्या सत्याचा प्रचार करण्यात होता होईल तितका वेळ खर्च करण्याची विनंती करण्यात आली होती. केवळ प्रभूच्या कार्याकरता जे कोणी आपला अर्धा किंवा त्याहूनही अधिक वेळ देऊ शकत होते त्या सर्वांना कॉलपोर्चर सुवार्तिक—आजच्या पायनियरांचे अग्रदूत, या नात्याने स्वेच्छेने कार्य करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते.
२ १८०० च्या दशकापासून आजपर्यंत समय बदललेला असला तरी, एक वस्तुस्थिती मात्र तशीच राहते—देवाच्या समर्पित सेवकांना होता होईल तितका वेळ सुवार्तेचा प्रचार करण्यामध्ये खर्च करण्याची इच्छा आहे. सहायक पायनियर या नात्याने कार्य केल्याने, मंडळीच्या प्रचारकांना राज्य सेवेत ते जितका जादा वेळ खर्च करतात त्यामध्ये आणखी प्रभावी होण्यासाठी सुधारणा करण्यास त्यांना मदत होते.—कलस्सै. ४:१७; २ तीम. ४:५.
३ सहायक पायनियरींगचा आरंभ झाल्यापासून संपूर्ण जगभरातील हजारो बंधू आणि भगिनींनी त्याचा आनंद लुटला आहे. भारतातील पायनियर सेवेच्या या पैलूबद्दलचा आवेश इतक्या पर्यंत वाढला, की एप्रिल १९९४ च्या काळात त्या देशात केवळ १४,००० प्रचारक असतानाही जवळजवळ २,००० सहायक पायनियरांचा उच्चांक गाठण्यात आला! त्या वेळेला भारतात त्या महिन्यात बरेच कार्य झाले, सेवेच्या केवळ एका पैलूद्वारे नवीन उच्चांक गाठले गेले, यामध्ये सेवेतील ३,३३,४८९ तासांचा उच्चांक व ७१,९९८ पुस्तिका व ३,२३५ वर्गण्यांच्या वाटपाचा उच्चांक यांचाही समावेश होतो. तेव्हापासून दोन वर्षांमध्ये या तीन उच्चांकांमध्ये जास्त प्रगती झाली नाही. आता देशामध्ये १७,००० प्रचारक असल्यामुळे एप्रिल १९९४ च्या उत्तम सेवेला मागे टाकण्याची—इतकेच नव्हे तर दुप्पट होण्याची शक्यता आहे.
४ मार्च, एप्रिल व मे या एक अथवा अधिक महिन्यांमध्ये सहायक पायनियरींगचे ध्येय ठेवण्याचे आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो. मार्च का बरे? कारण या वर्षी ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी रविवारी मार्च २३ रोजी येतो. आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याने स्थापिलेल्या राज्य प्रचार कार्यात आवेशाने भाग घेण्यासारखा दुसरा कोणताही उत्तम मार्ग नाही की ज्याद्वारे आपण स्मारकाच्या आधीच्या आठवड्यांत कार्य करू शकतो. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात साक्ष देताना, आपण अनेक आस्थेवाईक लोकांना आपल्यासोबत ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मरणोत्सव साजरा करण्याचे आमंत्रण देऊ शकतो. मार्च महिना आणखी एक प्रकारे खास महिना असेल कारण तेव्हा आपण कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे नवीन पुस्तक पहिल्यांदा सादर करणार आहोत. शिवाय मार्च महिन्यात, पाच शनिवार आणि पाच रविवार आहेत ज्यामुळे त्या सप्ताहांतादरम्यान क्षेत्र सेवेत जोरदार कार्य करता येईल. अर्थात, एप्रिल आणि मे महिन्यात सेवेतील निरंतर आवेशी परिश्रमामुळे आस्थेवाईक लोकांकडे पुन्हा जाऊन देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाचा उपयोग करून नवीन गृह बायबल अभ्यास चालू करण्यास वाव मिळेल. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकाच्या चालू समयोचित अंकांचा वापर करून आपण आपले क्षेत्र, खासकरून सप्ताहांती पूर्णपणे उरकून घेऊ.
५ सहायक पायनियरींगसाठी कोण पात्र आहेत?: आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित नामक पुस्तक पृष्ठ ११४ वर असे स्पष्टीकरण देते: “तुम्ही बाप्तिस्मा झालेले आहात, चांगल्या नैतिक भूमिकेत आहात, तर क्षेत्रकार्यात ६० तासांचे ध्येय पूर्ण करण्याची व्यवस्था करू शकता आणि एक किंवा अधिक महिने सहायक पायनियर म्हणून सेवा करू शकता; सेवेच्या या विशेषाधिकाराकरता मंडळीच्या वडिलांना तुमच्या अर्जाचा विचार करायला आवडेल.” या विशेषाधिकाराचा आनंद लुटण्यासाठी एप्रिल दरम्यान, कदाचित मार्च व मे महिन्यातही तुम्ही काही व्यवस्था आखू शकता का? सर्व तीन महिन्यांमध्ये नाही तर निदान एप्रिल महिन्यात सहायक पायनियरींग करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे उत्तेजन आम्ही तुम्हाला देत आहोत.
६ वडील वर्गाच्या सकारात्मक मनोवृत्तीने व बाकीच्या प्रचारकांच्या मनःपूर्वक पाठिंब्याने, ४,००० सहायक पायनियरच्या हाकेच्या प्रतिसादाला जोरदारपणे यशस्वी करावे. प्रत्येक मंडळी एप्रिलदरम्यान निदान २५ ते ३० टक्के प्रचारकांना सहायक पायनियरींगसाठी नाव दाखल करण्याचे ध्येय ठेवू शकते; काही मंडळ्यांमध्ये कदाचित या सुहक्कात जादा टक्के लोक सहभाग घेऊ शकतील. वडील आणि सेवा सेवक प्रथम आपले नाव नोंदवून चांगले उदाहरण मांडू शकतात. (इब्री. १३:७) सर्व कुटुंब प्रमुखांना, एप्रिल अथवा येणाऱ्या अधिक महिन्यांदरम्यान सहायक पायनियरींगमध्ये आपल्या घराण्यातील किती सदस्य भाग घेऊ शकतील ते निश्चितपणे ठरवण्याचे उत्तेजन दिले जाते.—स्तोत्र १४८:१२, १३; पडताळा प्रे. कृत्ये २१:८, ९.
७ माझ्या पूर्ण वेळेच्या नोकरीमुळे, शाळेमुळे, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अथवा इतर शास्त्रवचनीय कर्तव्यांमुळे मी सहायक पायनियरींग करू शकणार नाही असा लागलीच निष्कर्ष काढू नका. काहींना जमणार नाही; तरीसुद्धा, चांगले व्यवस्थापन व यहोवाच्या आशीर्वादाने ते यशस्वी होऊ शकतात. (स्तोत्र ३७:५; नीती. १६:३) पायनियर सेवेत भाग घेण्याच्या इच्छेला तुमच्या परिस्थितीवर ताबा मिळवू द्या; तुमच्या परिस्थितीला पायनियरींग करण्याच्या तुमच्या इच्छेवर ताबा मिळवू देऊ नका. (नीती. १३:१९अ) यास्तव, यहोवावरील व सहमानवांवरील अतूट प्रीतीमुळे अनेक जण त्यांच्या साप्ताहिक जीवन कार्यात फेरफार करू शकले आहेत जेणेकरून ते कधीतरी एका महिन्यासाठी आपली सेवा वाढवू शकतात. (लूक १०:२७, २८) राज्य सेवेत जोरदार यत्न करणाऱ्यांसाठी पुष्कळ आशीर्वाद राखून ठेवले आहेत.—१ तीम. ४:१०.
८ सहायक पायनियरींगमुळे काय साध्य होते: सहायक पायनियरींगसाठी देवाचे हजारो सेवक जो मनःपूर्वक प्रयत्न करतात त्याचा परिणाम, यहोवाची मोठ्या आवाजाने स्तुती होते. हे राज्य उद्घोषक पुष्कळ लोकांना सुवार्तेचा प्रचार करण्याकरता झटत असतात तेव्हा ते व्यक्तिगतरीत्या यहोवाजवळ येतात कारण ते त्याचा आत्मा आणि आशीर्वाद मिळण्याकरता त्याच्यावर जास्त अवलंबून राहण्यास शिकतात.
९ आपल्यामध्ये सक्रिय, सहायक, नियमित व खास पायनियर असल्यामुळे मंडळीत जोमाचा नवीन आत्मा निर्माण होतो. ते क्षेत्रांतील आपले अनुभव सांगत असताना त्यांच्या उत्साहाची लागण दुसऱ्यांनाही होते. यामुळे इतर जण सेवेच्या सर्वात महत्त्वपूर्ण कार्यात विस्तारीत भाग घेण्यासाठी आपल्या प्राथमिकतांचा व संभाव्यतांचा पुन्हा अंदाज करण्यास प्रवृत्त होतात. वयाच्या ७० व्या वर्षी बाप्तिस्मा घेतलेल्या एका भगिनीने लगेचच निरंतर सहायक पायनियरींगला सुरवात केली. काही वर्षांनंतर जेव्हा तिला विचारण्यात आले, की तिच्या ह्या वयात ती प्रत्येक महिन्यात सहायक पायनियर म्हणून अजूनही का झटत होती तेव्हा ती म्हणाली, की तिची सुरवातीची ७० वर्षे उगाच वाया गेली होती असे तिला वाटत असल्यामुळे तिला तिचे उरलेले जीवन वाया घालवायचे नव्हते!
१० सहायक पायनियरींगमध्ये भाग घेणारा प्रत्येक जण सेवेमध्ये सुधारित कौशल्य विकसित करतो. एका तरुण साक्षीदाराने कबूल केले: ‘लहान असताना मी माझ्या पालकांसोबत प्रचार कार्यात जाई. क्षेत्र सेवा म्हणजे मला मजा वाटायची. परंतु, कालांतराने शाळेमध्ये मी इतर विद्यार्थ्यांमध्ये उठून दिसू लागलो. सहविद्यार्थ्यांसोबत सत्याविषयी बोलण्यास मला लाज वाटू लागली. घरोघरी प्रचार करताना, शाळेतील माझ्या ओळखीचं कोणी भेटतं की काय अशी मला भीती वाटायची. मला वाटतं माझी समस्या मनुष्याची भीती होती. [नीती. २९:२५] शाळेतून बाहेर पडल्यावर, तात्पुरत्या काळासाठी पायनियरींग करण्याचे मी ठरवले. परिणाम, प्रचारकार्य मला पूर्वीपेक्षा अधिक अपीलकारक वाटू लागले. आता ती मला मजा वाटत नव्हती किंवा ओझ्याप्रमाणेही वाटत नव्हते. माझ्या बायबल विद्यार्थ्यांना सत्यात प्रगती करताना पाहून मला मनापासून समाधान मिळाले व यहोवा माझ्या परिश्रमांमागे होता याचा पुरावा मिळाला.’ हा तरुण पुढे नियमित पायनियर झाला.
११ व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, मंडळीतील अनेक जण सहायक पायनियर म्हणून कार्य करतात तेव्हा क्षेत्र पूर्णपणे उरकले जाते. क्षेत्रांच्या नेमणुकीचे काम हाताळणारा बांधव, क्वचित कार्य केल्या जाणाऱ्या क्षेत्रांना उरकण्यास सहायक पायनियरांचे साहाय्य मागू शकतो. दुपारचा डबा सोबत घेऊन, पूर्ण दिवस सेवा केल्यामुळे क्षेत्राच्या लांब कोपऱ्यातही कार्य करणे शक्य होते.
१२ वडिलांनी पूर्वतयारी करावी: पुढील तीन महिन्यांदरम्यान, आठवड्याच्या विविध समयी, यामध्ये दुपार टळल्यावर आणि सायंकाळी देखील विविध प्रकारच्या साक्षी कार्याच्या व्यवस्था केल्या जाव्यात जेणेकरून पुष्कळ प्रचारक भाग घेऊ शकतात. घरोघरच्या नियमित कार्याव्यतिरिक्त मार्ग साक्षीकार्य, व्यापारी क्षेत्र, घरी नसलेल्यांना भेटी देणे या समयांचा देखील साक्षीकार्यात समावेश करा. अशा प्रकारची पूर्व तयारी केल्यामुळे, वडीलजन, पायनियरांकरता असलेल्या सर्वात व्यावहारिक व सोयीस्कर वेळी मंडळीसोबत सेवेत भाग घेण्यासाठी पायनियरींग करणाऱ्यांना मदत करत असतात. संपूर्ण मंडळीला क्षेत्र सेवेच्या सर्व व्यवस्थांची माहिती असली पाहिजे. सेवेच्या सभांना हाताळणे व्यवस्थित असले पाहिजे. याशिवाय, पुरेसे क्षेत्र उपलब्ध असले पाहिजे व भरपूर नियतकालिके आणि इतर साहित्यांची लागलीच मागणी केली पाहिजे.
१३ तुमचे व्यक्तिगत सेवा वेळापत्रक तयार करा: सुरवातीला सहायक पायनियरींगची भीती असलेला एक बांधव म्हणाला: “मला जसे वाटत होते त्यापेक्षा ते किती सोपे होते. त्यासाठी फक्त चांगले वेळापत्रक पाहिजे.” या पुरवणीच्या मागील पानावर तुमच्याकरता व्यावहारिक ठरू शकणारे सहायक पायनियरींगचे नमुना वेळापत्रक दिसते का? सहायक पायनियरींगसाठी दर आठवडी सेवेमध्ये १५ तास आवश्यक आहेत.
१४ सहायक पायनियरींग करण्यासाठी गृहिणी आणि सेकंड शीफ्ट कामगार बहुतेक वेळा सकाळी क्षेत्र सेवेत जाण्याचे ठरवू शकतात. शाळकरी मुले आणि थर्डशीफ्ट कामगार दुपार टळल्यावर प्रचार कार्यात भाग घेऊ शकतात. पूर्ण वेळेसाठी नोकरी करणाऱ्यांना, आठवड्यातून एक दिवस सुटी घेऊन किंवा पूर्ण सप्ताहांत सायंकाळच्या साक्षीकार्यासह सेवेत खर्च करणे शक्य वाटले आहे. केवळ सप्ताहांती क्षेत्र सेवेत भाग घेऊ शकणारे अनेक जण पाच सप्ताह अंत असलेले महिने निवडतात. या वर्षातील मार्च, ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे महिने असे आहेत. पृष्ठ ६ वरील रिकामे वेळापत्रक मार्गदर्शक म्हणून वापरून तुमच्या व्यक्तिगत परिस्थितीसाठी व्यावहारिक व्यक्तिगत सेवा वेळापत्रक काय असेल त्याचा काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करा.
१५ सहायक पायनियरींग करण्याच्या तरतूदीचा एक फायदा आहे लवचिकपणा. तुम्ही पायनियरींग करणार ते महिने निवडा व तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. तुम्हाला निरंतर सहायक पायनियरींग करण्यास आवडते पण करता येत नाही तर, संपूर्ण वर्षादरम्यान एक महिना सोडून दुसऱ्या महिन्यात पायनियरींग करण्याचा तुमच्या मनात विचार आला का? दुसऱ्या बाजूला पाहता, काहींना दीर्घ काळासाठी निरंतर सहायक पायनियरींग जमले आहे.
१६ पूर्ण वेळ पायनियरींगसाठी पूर्वतयारी: पायनियर आत्मा असलेल्या अनेकांना नियमित पायनियर म्हणून कार्य करावयास आवडेल, पण त्यांच्याकडे तेवढा वेळ, त्यांची परिस्थिती किंवा ताकद आहे की नाही याचा ते विचार करतात. आता नियमित पायनियरींग करणाऱ्या बहुतेकांनी, सहायक पायनियरींगचा उपयोग पूर्ण वेळ कार्याची पूर्वतयारी म्हणून केला यात काही शंका नाही. एखाद्याने सहायक पायनियर वेळापत्रकात प्रत्येक दिवशी आणखी एक तास किंवा प्रत्येक आठवडी एक संपूर्ण दिवस वाढवला तर नियमित पायनियर वेळापत्रक पूर्ण करणे शक्य आहे. तुम्हाला ते शक्य आहे की नाही हे पाहायचे आहे तर सहायक पायनियरींगच्या एक अथवा अनेक महिन्यांदरम्यान सेवेत ९० तास भरण्याचा प्रयत्न करायला काही हरकत आहे का? त्यासोबतच, तुम्ही पुनर्भेटी व बायबल अभ्यास वाढवत राहाल ज्यामुळे तुम्हाला वैविध्यपूर्ण व समतोल पायनियर सेवेचा आनंद लुटता येईल.
१७ एका बहिणीने सहा वर्षांसाठी लागोपाठ सहायक पायनियरींग केले. त्या सर्व वेळी तिचे नियमित पायनियर सेवेचे ध्येय होते. हा हेतू मनात ठेवून, तिने चार वेगवेगळ्या नोकऱ्या पाहिल्या अशी आशा बाळगून, की यामुळे तिला ९० तासांची अपेक्षा साधता येईल. हे शक्य आहे की नाही त्याचा तर्क करण्यासाठी तिने प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन वेळापत्रक बनवले. पण, त्यांचे परीक्षण केल्यावर तिला दिसून आले की पूर्ण वेळेच्या सेवेपर्यंत ती पोहंचू शकत नव्हती. तरीही ती यहोवाकडे मार्गदर्शन विचारत राहिली. मग एकदा, सेवा सभेची तयारी करत असताना तिने ऑक्टोबर १९९१ आमची राज्य सेवा यातील एक लेख वाचला ज्यात म्हटले होते: “कार्याच्या तासांची जी गरज आहे तिजवर अनावश्यक भर देण्याऐवजी, एकत्रीकरणाच्या कामात सहभागी होण्याची ही वाढती संधी आहे यावर आम्ही आपले लक्ष का केंद्रित करू नये? (योहान ४:३५, ३६)” ती म्हणते: “मी पाच ते सहा वेळा हे वाक्य वाचले आणि हे यहोवाचेच उत्तर असल्याची मला खात्री पटली. अगदी त्याच क्षणी मी नियमित पायनियर सेवेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.” तिच्या अर्धवेळ नोकरीचे वेळापत्रक इतके काही खास नव्हते तरी तिने नियमित पायनियरचा अर्ज भरला. एक आठवड्यानंतर तिचे वेळापत्रक बदलले व तिच्यासाठी योग्य असलेले नोकरीचे तास तिला देण्यात आले. तिने शेवटी म्हटले, “ही यहोवाचीच कमाल आहे असे तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही यहोवाकडे मार्गदर्शन विचारता आणि तुम्हाला ते मिळते तेव्हा ते नापसंत न करता स्वीकारा.” नियमित पायनियर व्हायची तुमची मनापासून इच्छा आहे तर, मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांसाठी सहायक पायनियरींग केल्यानंतर तुम्हाला कदाचित खात्री पटेल की तुम्ही देखील पूर्ण वेळेच्या सेवेत यशस्वी होऊ शकता.
१८ कार्याच्या या खास भरभराटीच्या काळादरम्यान यहोवाचे लोक तारणाची सुवार्ता प्रसिद्ध करताना यहोवा त्यांच्या आवेशाबद्दल आशीर्वाद देईल व त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देईल याची आपल्याला खात्री आहे. (यश. ५२:७; रोम. १०:१५) एप्रिल, आणि कदाचित मार्च व मे महिन्यात, भाग घेण्याद्वारे तुम्ही ४,००० सहायक पायनियर हवेत, या हाकेस उत्तर द्याल का?
[३ पानांवरील चौकट]
सहायक पायनियर म्हणून कशाप्रकारे यशस्वी होता येते
■ तुम्ही यशस्वी व्हाल अशी खात्री बाळगा
■ तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद पाठवण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा
■ तुमच्यासोबत पायनियर म्हणून कार्य करण्याकरता दुसऱ्या प्रचारकाला बोलवा
■ व्यावहारिक सेवा वेळापत्रक बनवा
■ नियतकालिकांच्या भरपूर साठ्याची ऑर्डर द्या
■ सेवेसाठी असलेल्या मंडळीच्या व्यवस्थेला सहकार्य द्या
■ अनौपचारिक साक्ष देण्याकरता संधी शोधा