आपल्याला एक आदेश दिला आहे
१ येशूने आपल्या अनुयायांना, ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करण्याची’ आज्ञा दिली. (मत्त. २८:१९) जगभरात २३२ राष्ट्रांतील व द्वीप गटांतील पन्नास लाखांपेक्षा अधिक यहोवा देवाचे स्तुतीकर्ते येशूच्या आज्ञेच्या पूर्णतेची जिवंत साक्ष देतात. पण आपल्या स्वतःबद्दल काय? प्रचार करण्याच्या आदेशाची आपण गांभिर्याने दखल घेतो का?
२ एक नैतिक बांधीलकी: आदेश हा “विहित कार्ये पार पाडण्याची एक आज्ञा आहे.” आपल्याला येशूकडून, प्रचार करण्याचा हुकूम मिळाला आहे. (प्रे. कृत्ये १०:४२) प्रेषित पौलाने हे जाणले, की सुवार्ता घोषित करणे ही त्याच्याकरता एक गरज अथवा एक नैतिक बांधीलकी होती. (१ करिंथ. ९:१६) उदाहरणार्थ: अशी कल्पना करा, की बुडत असलेल्या एका गलबतावरील नाविकगणाचे तुम्ही कर्मचारी आहात. उतारुंना इशारा देण्यास व प्राणरक्षी नौकेकडे धाव घेण्यास त्यांना निर्देशित करण्याचा हुकूम कप्तान तुम्हाला देतो. तुम्ही ह्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःचाच जीव वाचवण्याच्या प्रयत्नांत असाल का? निश्चितच नाही. इतरजण तुमच्यावर विसंबून आहेत. त्यांचे जीव धोक्यात आहेत. त्यांना मदत करण्याचा आदेश कार्यान्वित करण्यास तुम्ही नैतिकरित्या बांधील आहात.
३ आपल्यालाही एक इशारा देण्याचा ईश्वरी आदेश दिला गेला आहे. लवकरच यहोवा या संपूर्ण दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करील. लाखो लोकांच्या जीवनाची शाश्वती नाही. दुसऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे डोळेझाक करून केवळ स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न करणे आपल्याकरता सार्थ ठरेल का? कदापि नाही. इतरांचे प्राण वाचवण्याकरता मदत करण्यास आपण नैतिकरित्या बांधील आहोत.—१ तीम. ४:१६.
४ अनुसरण्याजोगी विश्वासार्ह उदाहरणे: विश्वासहीन इस्राएलांना इशारेवजा संदेश सांगण्याची आपल्यावर एक जबाबदारी असल्याचे संदेष्टा यहेज्केलने जाणले. ही नेमणूक पार पाडण्यास तो अपेशी ठरल्यास त्यामुळे निष्पन्न होणाऱ्या परिणामांबद्दल यहोवाने त्याला जोरदारपणे असा इशारा दिला: “‘तू खात्रीने मरशील,’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यास बजाविले नाही, . . . . तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.” (यहे. ३:१८) प्रखर विरोध असताही यहेज्केलने कर्तव्यनिष्ठपणे आपली नेमणूक पार पाडली. यास्तव, यहोवाच्या न्यायदंडांची अंमलबजावणी झाली तेव्हा तो हर्ष करू शकला.
५ अनेक शतकांनंतर, प्रेषित पौलाने प्रचार करण्याच्या आपल्या जबाबदारीविषयी लिहिले. त्याने घोषित केले: “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे; कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यास मी कसूर केली नाही.” पौलाने जाहीररित्या व घरोघरी प्रचार केला कारण, असे करण्यास त्याने जर पीछेहाट केली असती तर तो देवासमोर रक्तदोषी ठरला असता हे त्याने जाणले.—प्रे. कृत्ये २०:२०, २६, २७.
६ आपल्याकडे यहेज्केलसारखा आवेश आहे का? प्रचार करण्यास पौलाप्रमाणे आपण उद्दीपित होतो का? आपल्याला दिलेला आदेश त्यांना दिलेल्या आदेशासमानच आहे. इतरजण उदास, बेपर्वा किंवा विरोधी असताही त्यांना स्नेह दाखवण्यात आपली जबाबदारी आपण सातत्याने पूर्णत्वास न्यावी. आणखी हजारो लोक अजूनही राज्य संदेशाला प्रतिसाद देऊन असे घोषित करू शकतात: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जख. ८:२३) देव व सहमानव यांच्याप्रति असणाऱ्या आपल्या प्रीतीने हार न मानण्याची आपल्याला प्रेरणा द्यावी. आपल्याला प्रचार करण्याचा एक आदेश दिला आहे!