तुम्ही देवाचे वचन नीट शिकविता का?
१ येशू ख्रिस्त हा पृथ्वीवर सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ शिक्षक होऊन गेला. आपल्या वक्तव्याद्वारे त्याने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, त्यांच्या भावना उद्दीपित केल्या आणि सत्कृत्ये करण्यास त्यांना प्रेरणा दिली. (मत्त. ७:२८, २९) आपल्या शिकवणुकीचा आधार म्हणून त्याने नेहमी देवाच्या वचनाचा उपयोग केला. (लूक २४:४४, ४५) त्याला जे काही ज्ञात होते व शिकवण्याची जी क्षमता होती त्याचे सर्व श्रेय त्याने यहोवा देवाला दिले. (योहा. ७:१६) देवाचे वचन नीट शिकवून येशूने आपल्या अनुयायांसमोर एक सर्वोत्कृष्ट आदर्श मांडला.—२ तीम. २:१५.
२ देवाचे वचन नीट शिकवून प्रेषित पौलाने देखील एक उल्लेखनीय आदर्श मांडला. इतरांना केवळ शास्त्रवचने वाचून दाखवणे यापेक्षा अधिक काही त्याने केले; त्याने जे वाचले त्यावर स्पष्टीकरण दिले व युक्तिवाद केला; असे करून त्याने देवाच्या वचनातून हे शाबीत केले की येशू हाच ख्रिस्त होता. (प्रे. कृत्ये १७:२-४) त्याचप्रकारे, अपुल्लो हा वक्तृत्वपूर्ण शिष्य “शास्त्रपारंगत” होता व देवाच्या वचनाची जोरदारपणे प्रस्तुती करून त्याने नीट शिकवण्यास शास्त्रवचनांचा उपयोग केला.—प्रे. कृत्ये १८:२४, २८.
३ देवाच्या वचनाचे शिक्षक व्हा: आधुनिक दिवसीय राज्य उद्घोषकांनी बायबलचा संदर्भ घेऊन व त्यातून युक्तिवाद करून प्रामाणिक अंतःकरणांच्या लोकांना शिक्षण दिले आहे व याद्वारे सर्वोत्तम यशप्राप्ती अनुभवली आहे. एका घटनेत एक बांधव, पाळक आणि तीन पॅरिशनर यांच्यासोबत दुर्जन व धार्मिक यांच्या भविष्याबद्दल युक्तिवाद करण्याकरता इतर संबंधित शास्त्रवचनांबरोबरच यहेज्केल १८:४ चाही उपयोग करू शकला. परिणामतः, चर्चचे काही सदस्य अभ्यास करू लागले आणि सरतेशेवटी यांच्यापैकी एकाने सत्य स्वीकारले. दुसरी एक घटना अशी आहे ज्यामध्ये, यहोवाचे साक्षीदार नाताळ व वाढदिवस का साजरे करत नाहीत याचे, एका आस्थेवाईक स्त्रीच्या विरोध करणाऱ्या पतीस स्पष्टीकरण देण्यास एका बहिणीला सांगितले होते. तिने युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकातून शास्त्रवचनीय उत्तरे थेटपणे वाचून दाखवल्यावर त्या गृहस्थाने आपली सहमती दर्शविली. त्याच्या या स्वीकृतीमुळे त्याची पत्नी इतकी प्रभावित झाली होती, की ती त्वरित म्हणाली: “आम्ही तुमच्या सभांना येणार आहोत.” यावर पती राजी झाला!
४ उपलब्ध असलेल्या मदतीचा उपयोग करा: देवाचे सत्यवचन शिकवण्यास मदत व्हावी याकरता आमची राज्य सेवा आणि सेवा सभा कार्यक्रम आपल्याला उत्तम मार्गदर्शन सादर करतात. आपल्या फायद्याकरता प्रकाशित व प्रदर्शित केल्या जाणाऱ्या तसेच ज्या अत्यंत समयोचित व प्रभावी ठरल्या आहेत अशा सुचवलेल्या वैविध्य प्रस्तुतींची अनेक प्रचारकांनी कदर केली आहे. देवाच्या वचनात संबोधित केलेल्या ७० पेक्षा अधिक प्रमुख विषयांवर यथायोग्यपणे प्रतिपादन करता यावे याकरता शास्त्रवचनांतून युक्तिवाद करणे यामध्ये कल्पनांचे जणू एक भांडारच आहे. नवोदितांच्या आकलनाकरता सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान बायबलच्या सर्व मूलभूत शिकवणुकींचा एक संक्षिप्त सारांश पुरवते. ईश्वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक यातील अभ्यास २४ आणि २५ हे दाखवून देतात, की कुशल शिक्षक शास्त्रवचने उचितपणे कशाप्रकारे मांडतात, वाचतात व लागू करतात. सहजासहजी उपलब्ध असलेल्या या सर्व मदतीचा आपण सर्वोत्तम उपयोग करून घ्यावा.
५ आपण देवाचे वचन निटपणे शिकवतो तेव्हा ते, “सजीव, सक्रिय” व आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्या “मनांतील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे” याची प्रतीती आपल्याला होईल. (इब्री. ४:१२) यामुळे आपल्याला लाभणारी यशप्राप्ती, सत्याविषयी अधिक धैर्याने बोलण्याची आपल्याला प्रेरणा देईल!—प्रे. कृत्ये ४:३१.