तुमच्या क्षेत्रातील कार्य पूर्णपणे उरका
१ निवासी परिसरांत आपल्याला काही वेळा एखादे लहानसे धंद्याचे ठिकाण आढळते, उदाहरणार्थ, एखादे किराणा दुकान, उपहारगृह किंवा किरकोळ विक्रीचे दुकान. सदर क्षेत्रासहित या व्यापारी आस्थापना देखील उरकावयाच्या असल्यास तुम्ही घरी भेटी देता त्याप्रमाणे यांनाही भेटी द्याव्या.
२ तुम्ही एखादी साधी, संक्षिप्त प्रस्तुती उपयोगात आणू शकता, कदाचित असे म्हणून: “माझ्याजवळ असं काहीतरी आहे जे तुम्हाला दाखवायला मला आवडेल.” दुकानदाराला त्यावेळेस सवड नाही असे दिसल्यास, तुम्ही केवळ एखादी हस्तपत्रिका सादर करून असे म्हणू शकता: “तुम्ही इतके कामात गुंतलेले नसाल तेव्हा नंतर कधीतरी मी येईन. या हस्तपत्रिकेबद्दल तुमचं मत जाणून घेण्यास मला आवडेल.”
३ हे काम करण्याविषयी भीती बाळगण्याची काहीही गरज नाही. एका प्रचारकाने असे सांगितले: “या कार्याला प्रतिकूल प्रतिसाद मिळेल अशी माझी अपेक्षा होती. पण राज्य संदेशाला अगदी उलट प्रतिक्रिया मिळाली तेव्हा मला आश्चर्यच झालं. लोक खरोखर विनम्र व मैत्रिपूर्ण होते व जवळजवळ नेहमीच नियतकालिकं स्वीकारायचे.”
४ स्थावर-संपत्तीच्या कंपनीत काम करणाऱ्या एका स्त्रीने साक्षीदारांना तिच्या कार्यालयात आमंत्रित केले. तिने नियतकालिके स्वीकारली व बायबल अभ्यास घेण्याविषयी आस्था व्यक्त केली. तिला ज्ञान पुस्तक दाखवण्यात आले व तेथल्या तेथे म्हणजे तिच्या कार्यालयातच, अभ्यासही सुरू करण्यात आला!
५ तुमच्या क्षेत्रातील कार्य पूर्णपणे उरकण्याच्या नेमणुकीत जवळपासच्या परिसरात व्यवसाय करणाऱ्यांना भेटी देणे देखील समाविष्ट आहे. (प्रे. कृत्ये १०:४२) तुम्ही खासगी निवासस्थानांना भेटी देता त्याप्रमाणे अशा ठिकाणीही भेट देण्याचे ठरवा. यामुळे तुमचे क्षेत्र अधिक उत्तमरित्या उरकले तर जाईलच पण त्यासोबत कदाचित तुम्हाला काही आनंददायक अनुभवांचे प्रतिफळ देखील लाभेल!