वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९४ पृ. ३
  • विचलित न होता यहोवाची सेवा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विचलित न होता यहोवाची सेवा करा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचं लक्ष भरकटू देऊ नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • विचलित न होता यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • आपण जागृत राहात अर्थात विकर्षणे टाळत आहोत काय?
    आमची राज्य सेवा—१९९५
  • “तुम्हीहि सिद्ध असा”
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ४/९४ पृ. ३

विचलित न होता यहोवाची सेवा करा

१ “ज्या लोकांचा देव परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे ते धन्य!” (स्तोत्र. १४४:१५) राजा दाविदाचे हे शब्द, या दुष्ट दिवसातही खरे आहेत का? (इफि. ५:१६) होय! ख्रिश्‍चनांना अजूनही यहोवाची सेवा करण्यात आनंद प्राप्त होत आहे. सर्व गोष्टी आमच्यासाठी नेहमीच सहज नसतात. सैतानामुळे आमच्यापुढे या ‘कठीण दिवसात’ बऱ्‍याच समस्या येतात तरी आम्ही विषण्ण झालेलो नाही. (२ तीम. ३:१, २) खराब होत चाललेल्या परिस्थिती आम्हाला पुढे अधिक पुरावा देतात की, देवाच्या राज्याला, या ऱ्‍हास होत चाललेल्या जुन्या जगाचा नाश करण्याची आणि त्या जागी एक स्वच्छ नवीन जग आणण्याची वेळ जवळ आली आहे. (२ पेत्र ३:१३) या जगाचा अंधकार, आमच्या आनंदी आशेच्या ज्योतीला मालवत नाही किंवा बुजवून टाकत नाही. त्याउलट, आमची राज्य आशा पूर्वीपेक्षा अधिक प्रखरतेने चकाकत आहे. या अंधकारमय जगात यहोवाची सेवा ज्योतीसारखी करत राहण्यात तुम्हाला आनंद वाटत नाही का?—फिलिप्पै. २:१५.

२ आम्ही यहोवाची सेवा कशाप्रकारे करीत आहोत याकडे व्यक्‍तिगतपणे आम्ही सतत लक्ष दिले पाहिजे. का बरे? कारण सैतान हा फार मोठा मन विचलित करणारा आहे. एक शब्दकोश “विचलित करणे” याची व्याख्या, “दुसरीकडे वळवणे,” “दुसऱ्‍या वस्तुकडे किंवा एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांमध्ये (एखाद्याचे लक्ष) खेचणे किंवा आकर्षित करणे,” व “विरोधात्मक भावना किंवा हेतूंनी गोंधळवून टाकणे किंवा उत्तेजित करणे,” अशी करतो. सैतानाला या पृथ्वीवर टाकण्यात आल्यामुळे तो मानवजातीला ‘ठकविण्यात’ यशस्वी झाला आहे. तो, आमच्या दिवसातील खऱ्‍या वादविषयांपासून मनुष्याचे मन वळवण्यासाठी पुष्कळ साधनांचा उपयोग करीत आहे. (प्रकटी. १२:९) यहोवाच्या साक्षीदारांनी गेल्या शंभर वर्षांपासून राज्याचा प्रचार करण्यात स्वतःला उपयोगात आणले आहे. परंतु, देवाच्या नावाच्या पवित्रीकरणाच्या आणि देव राज्याद्वारे त्याच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनाच्या सर्वात महत्त्वपूर्ण विषयांबद्दल किती लोक गुणग्राहकता बाळगतात? तुलनात्मकरित्या पाहता फारच कमी. (१ योहान ५:१९) या पृथ्वीवर सैतान लाखो लोकांना विचलित करू शकतो. तेव्हा, आम्ही यहोवाची सेवा सोडून द्यावी म्हणून तो आम्हाला देखील विचलित करू शकतो किंवा आमचे लक्ष वेधून घेऊ शकतो. हा धोका कायमस्वरूपी आहे. दुःखाची गोष्ट अशी की, सैतानाच्या विचलित करणाऱ्‍या गोष्टींनी आमचे काही बांधव गोंधळून गेले आहेत. त्यांनी स्वतःचे लक्ष वेगवेगळ्या दिशांमध्ये आकर्षित होऊ दिले. आज सर्व प्रकारच्या विचलित करणाऱ्‍या गोष्टी आहेत. त्यातील काहींचा विचार करा.

३ आर्थिक समस्या आणि भौतिक गोष्टींचा लोभ: पृथ्वीवरील पुष्कळ देशांमध्ये, बेरोजगारी आणि उच्च दर्जाच्या राहणीमानामुळे चिंता उत्पन्‍न झाल्या आहेत. हे खरे की, स्वतःकरता आणि आमच्या कुटुंबाकरता आम्ही अन्‍न, वस्त्र आणि निवारा पुरवला पाहिजे. परंतु, जीवनाच्या गरजांबद्दल आम्ही स्वतःला अधिक चिंताग्रस्त होऊ दिले तर, या गोष्टींचे आमच्या विचारावर वर्चस्व राहील. राज्याच्या गोष्टीला आमचा पाठिंबा देण्याऐवजी, आमचा शारीरिक बचाव ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट होऊ शकते. प्रेषित पौलाने या बाबतीत आम्हाला इब्रीयांस १३:५, ६ मध्ये सल्ला दिला. येशू ख्रिस्त आम्हाला अशी खात्री देतो की, प्रथम राज्य गरजेसाठी झटणाऱ्‍या लोकांना चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. यहोवा, आम्हाला खरोखरीच आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टी पुरवतो. (मत्त. ६:२५-३४) जगभरातील पायनियर व इतर पूर्ण-वेळेचे सेवक ही खात्री करून देऊ शकतात की हे खरे आहे.

४ सैतानाचे जग, भौतिक गोष्टींच्या लोभास पाठबळ देते. लाखोंच्या जीवनात अधिक मालमत्ता मिळवणे किंवा त्यांचे रक्षण करणे ही प्रेरक शक्‍ती आहे. येशूच्या दिवसात अशाचप्रकारच्या विचलित करणाऱ्‍या गोष्टी होत्या. एका श्रीमंत तरुण अधिपतीने, सार्वकालिक जीवन मिळवण्यास काय करावे याबद्दल येशूला विचारले. येशूने उत्तर दिले: “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्‌य्रांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” (मत्त. १९:१६-२३) असे दिसते की, देवाची सेवा पूर्ण मनाने करण्यापासून या तरुण पुरुषाच्या पुष्कळ भौतिक मालमत्तेने त्याला विचलित केले. त्याचे हृदय त्याच्या धनसंपत्तीवर लागले होते. येशूला हे माहीत होते की, या तरुण पुरुषाने स्वतःला या विचलित करणाऱ्‍या गोष्टींपासून मुक्‍त केले तर, त्याला लाभ होईल. यांच्यामुळे देवाची सेवा संपूर्ण रितीने करण्यामध्ये त्याला अडथळा झाला. तुमच्या बाबतीत काय? तुम्हाला सवय झालेल्या त्या जीवन शैलीला टिकवून ठेवण्यासाठी, ऐहिक कामात अधिक तास खर्च करत असलेले तुम्ही स्वतःला पाहता का? यामुळे यहोवाला देण्यात येणाऱ्‍या तुमच्या सेवेवर काही परिणाम झाला आहे का? तुमच्या भौतिक गोष्टी राज्य आस्थेला दाटून टाकत आहेत का? (मत्त. ६:२४) आध्यात्मिक आस्थेला अधिक वेळ देण्यासाठी तुम्ही तुमचे जीवन साधे बनवू शकता का?

५ दररोजच्या जीवनातील सर्वसाधारण गोष्टी: आम्ही सावध नसलो तर, जीवनाच्या सर्वसाधारण गोष्टीत आम्ही खूपच दंग होऊ शकतो. यामुळे आपण आध्यात्मिक ध्येयांकडे दुर्लक्ष करू. नोहाच्या दिवसातील लोकांची आठवण करा. ते सामाजिक गोष्टी, खाणे, पिणे, लग्न करणे, आपल्या मुलांची लग्ने करून देणे यात इतके व्यापलेले होते की, येऊन ठेपलेल्या जलप्रलयाच्या नोहाच्या ईशारेवजा संदेशाची त्यांनी दखल घेतली नाही. त्यांना त्याची जाणीव होण्यापूर्वीच, प्रलय आला व त्या सर्वांना वाहून नेले. विचलित करणाऱ्‍या गोष्टी त्यांच्याकरता विनाशी ठरल्या. येशूने म्हटले: “तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल.” (मत्त. २४:३७-३९) खरे म्हणजे, आज देखील पुष्कळ लोक त्यांच्या जीवनात इतके गुरफटलेले आहेत की, आम्ही आणलेल्या संदेशाकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ नसतो. थक्क करील इतक्या प्रमाणात ते आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत.

६ तुमच्या जीवनात सामाजिक कार्यहालचालींची इतकी दाटी होत आहे का की, जेणेकरून आध्यात्मिक बाबींवरील तुमचे लक्ष कमी कमी होत चालले आहे? एके प्रसंगी, मार्था व मरियेच्या घरात येशूला पाहुणा या नात्याने आमंत्रण मिळाले होते. मरिया, त्याला काय म्हणायचे होते ते लक्ष देऊन ऐकत होती. दुसऱ्‍या बाजूला पाहता, मार्थेला “फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली.” चांगली आदरातिथ्य करणारी होण्याबद्दल मार्थेला अधिक चिंता होती. येशूचे ऐकण्यासाठी वेळ काढून घेण्याच्या गरजेबद्दल गुणग्राहकता दाखवण्यात ती अपयशी ठरली. त्याने प्रेमळ रितीने मार्थेला हे दाखवून दिले की, मोठ्या काळजीने तयार केलेल्या तरतूदींची गरज नव्हती. आध्यात्मिक बाबींकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला त्या सल्ल्याचा अवलंब करण्याची गरज आहे का? (लूक १०:३८-४२) आम्ही स्वतःकडे लक्ष द्यावे असा ईशारा देखील येशूने दिला की जेणेकरून, आम्ही फाजीलपणे खाणार किंवा पिणार नाही व आपली समजबुद्धी मंद करणार नाही. मानवी इतिहासाच्या या कठीण काळी, आम्हाला पूर्णपणे दक्ष राहण्याची गरज आहे.—लूक २१:३४-३६.

७ सुखविलासाचा पाठलाग: राज्याच्या विषयापासून आपले लक्ष वळवण्यासाठी सुखविलासाचा पाठलाग, या विचलित करणाऱ्‍या सर्वात मोठ्या गोष्टीला सैतान वापरत आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील लाखोंनी देवाच्या जागी सुखविलासांना ठेवले आहे. देव वचनात गंभीर आवड घेण्याऐवजी त्यांना इतर गोष्टींकडे मन वळवले जाण्यास आवडते. (२ तीम. ३:४) अर्थात, हितकारक मनोरंजन आणि करमणूक यामध्ये काही चुकीचे नाही. परंतु दूरदर्शन, चित्रपट, व्हिडिओ, खेळ, जगीक वाचन किंवा काही छंद अशा गोष्टींमध्ये प्रत्येक आठवडी खूपच जास्त वेळ घालवण्यामुळे विश्‍वासघातकी हृदय निर्माण होण्यास अनुमती मिळेल. ते आम्हाला यहोवापासून दूर खेचून नेईल. (यिर्म. १७:९; इब्री. ३:१२) ते कसे होऊ शकते? ख्रिस्ती सभांमध्ये तुम्हाला आढळेल की, तुमचे मन दुसरीकडेच भरकटत जाते. तुम्हाला असे देखील वाटेल की, सभा लवकर संपावी की जेणेकरून, तुम्ही पुन्हा सुखविलासाचा पाठलाग करण्याकडे वळू शकता. लवकरच तुम्हाला असे आढळून येईल की, सभांना उपस्थित राहण्याऐवजी किंवा क्षेत्र सेवेत सहभाग घेण्याऐवजी तुम्ही घरी राहण्यासाठी काही कारणे शोधता. या गोष्टी तुमचे जीवन विचलित करणाऱ्‍या अशा बनल्या आहेत का, ते स्पष्टपणे ओळखण्याची आताच वेळ आहे. (लूक ८:१४) मनोरंजनात वाया घालवलेले बहुमूल्य तास आध्यात्मिक वाढीसाठी उत्तमरितीने वापरण्यात येऊ शकत नाहीत का?

८ वेळ घेणारे दुसरे विषय: आधुनिक सामाजात सर्वसामान्य समस्यांना सोडवण्याच्या प्रयत्नात काहीजण गुंतलेले आहेत. ख्रिश्‍चनांना, सामाजिक विषयांवरील जगाच्या अंतहीन वादविवादांमध्ये किंवा अन्याय काढून टाकण्याच्या त्याच्या व्यर्थ झटापटींमध्ये गुंतले न जाण्याची आवश्‍यकता आहे. (योहान १७:१६) या सर्व गोष्टी, पवित्र शास्त्राच्या सल्ल्यापासून आणि देवाचे राज्य हा एकच दीर्घ-कालीन उपाय आहे, या मूलभूत वास्तविकतेपासून लक्ष वळवण्याच्या सैतानाच्या हेतूचा एक भाग आहेत. आम्हाला कोणतेही व्यक्‍तिगत नुकसान किंवा अन्याय सहन करावा लागला असला तरी, आम्ही कोण आहोत—यहोवाचे साक्षीदार आहोत—ते विसरून जाऊ असे खुनशी किंवा भावनिकपणे इतके बेचैन होऊ नये. त्याहून अधिक म्हणजे, यहोवाला दोषी ठरवण्यात आले आहे. आम्ही त्याच्याच नावाचे पवित्रीकरण केले पाहिजे.—यश. ४३:१०-१२; मत्त. ६:९.

९ सर्वांना एक चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास आवडते परंतु, पुरवलेल्या अंतहीन उपचारांकडे आणि उपायांकडे अधिक लक्ष दिल्यामुळे एखाद्याचे मन आरोग्याच्या बाबतीत व्यापले जाईल. पुष्कळ जण विविध आहार, उपचार आणि शारीरिक व भावनिक समस्यांच्या उपचारांबद्दल सल्ले देतात. त्यातील पुष्कळ सल्ले एकमेकांच्या विरोधात असतात. जोपर्यंत पवित्र शास्त्राच्या विरोधात जात नाही तोपर्यंत एखादी व्यक्‍ती आरोग्याच्या बाबतीत जे काही करील तो एक व्यक्‍तिगत निर्णय असतो. मानवजातीच्या रोगांवर देवाचे राज्य हाच खरा उपाय आहे असा संपूर्ण भरवसा आपण नेहमी ठेवू या.—यश. ३३:२४; प्रकटी. २१:३, ४.

१० खंबीर व भक्कम व्हा: अंत जवळ येत असता, यहोवाला देत असलेल्या सेवेपासून तुम्हाला विचलित करण्यासाठी सैतान त्याचे प्रयत्न वाढवील. “त्याच्याविरुद्ध विश्‍वासात दृढ असे उभे राहा.” (१ पेत्र ५:९) ते कसे? तुम्ही देवाच्या विचारांनी स्वतःला पुष्ट केले पाहिजे. (मत्त. ४:४) देव वचनावर शांतपणे मनन करण्यास व विचार करण्यास लागणारा वेळ तुमच्यापासून किंवा तुमच्या कुटुंबापासून लुबाडण्यास, जगाच्या कोणत्याही विचलित करणाऱ्‍या गोष्टींना अनुमती देऊ नका. कुटुंबाच्या जेवणाच्या वेळी, एकत्र मिळून उभारणीकारक अनुभव व इतर आध्यात्मिक बाबींची चर्चा करा. वैयक्‍तिक अभ्यास व सभांच्या तयारीच्या दृढ आराखड्याला चिटकून राहा.

११ चिंतेमुळे तुमचे मन अस्वस्थ होण्याची भीती असते त्यावेळी, प्रार्थनेद्वारे यहोवावर तुमचा भार टाका. तो तुमची काळजी करतो याची खात्री असू द्या. (१ पेत्र ५:७) देवाने दिलेल्या शांतीला तुमची अंतःकरणे व तुमचे विचार राखू द्या. (फिलि. ४:६, ७) विचलित करणाऱ्‍या गोष्टींमुळे तुमच्या आध्यात्मिक नजरेला अंधूक होऊ देऊ नका. येशूने केले त्याप्रमाणे, यहोवाला सतत तुमच्या समोर राहू द्या. (प्रे. कृत्ये २:२५) तुमची दृष्टी तुमच्या ध्येयावर थेट केंद्रित ठेवा. त्याबद्दल नीतीसूत्रे ४:२५-२७ आम्हाला उत्तेजन देते: “तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्‍चित असोत. तू डावीउजवीकडे वळू नको.”

१२ सर्व सभांना विश्‍वासूपणे उपस्थित राहा. देव वचनातील सूचनेकडे लक्ष द्याल अशाप्रकारे तुम्ही स्वतःस शिस्त लावा. (इब्री. २:१; १०:२४, २५) हे ऱ्‍हास होत चाललेले जग सादर करीत असलेल्या सुखविलासांना प्राप्त करण्याऐवजी, एक फलदायी सेवा टिकवून ठेवण्याचे ध्येय ठेवा. यामुळेच चिरकालिक आनंद व समाधान मिळते. (१ थेस्स. २:१९, २०) शेवटी, तुमच्या पवित्र सेवेपासून तुम्हाला विचलित करण्यास कशालाही किंवा कोणालाही वाव देऊ नका. “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.”—१ करिं. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा