विचलित न होता यहोवाची सेवा करा
“मरीया . . . त्याचे [येशूचे] भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली.”—लूक १०:३९, ४०.
१, २. येशूला मार्थेविषयी इतकी आपुलकी का होती, पण तीदेखील एक अपरिपूर्ण व्यक्ती होती हे कशावरून दिसून येतं?
लाजरची बहीण मार्था हिचा विचार केल्यास, ती कशा प्रकारची व्यक्ती होती असं तुम्हाला वाटतं? बायबल सांगतं, की येशूसोबत तिची घनिष्ठ मैत्री होती. त्याला ती अतिशय प्रिय होती आणि तिच्याविषयी त्याच्या मनात खूप आदर होता. पण फक्त मार्थाच नाही, तर तिची बहीण मरीयादेखील येशूच्या खूप जवळची व्यक्ती होती. शिवाय येशूचं आपल्या आईवरही खूप प्रेम होतं. (योहा. ११:५; १९:२५-२७) पण, येशूला मार्थेविषयी इतकी आपुलकी का होती?
२ कारण, मार्था दयाळू, उदार आणि खूप कष्टाळू होती. पण, त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तिचा विश्वास खूप भक्कम होता. येशूनं शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा भरवसा होता आणि तोच मसीहा आहे याविषयी तिला जराही शंका नव्हती. (योहा. ११:२१-२७) पण, मार्थादेखील आपल्यासारखीच एक अपरिपूर्ण व्यक्ती होती. उदाहरणार्थ, एकदा जेव्हा येशू तिच्या घरी आला, तेव्हा ती आपल्या बहिणीवर रागावली आणि येशूला तिच्याविषयी तक्रार करू लागली. येशूनं तिच्या बहिणीला समजावून सांगावं अशी तिची इच्छा होती. म्हणून ती त्याला म्हणाली: “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करावयास तिला सांगा.” (लूक १०:३८-४२ वाचा.) मार्थेनं अशी तक्रार का केली आणि येशूनं तिला जे उत्तर दिलं त्यावरून आपण काय शिकू शकतो?
मार्थेचं लक्ष विचलित झालं
३, ४. मरीयेच्या कोणत्या गोष्टीची येशूनं प्रशंसा केली, आणि मार्थेला काय शिकायला मिळालं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
३ मार्था आणि मरीयेनं आपल्याला घरी बोलवलं आहे, याचा येशूला खूप आनंद झाला होता. आणि या संधीचा उपयोग करून तो त्यांना बरीच मौल्यवान सत्यं शिकवणार होता. उत्तम शिक्षकाकडून जे काही शिकता येईल ते सर्व शिकून घेण्याची मरीयेची इच्छा होती. म्हणून, ती लगेच त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याचं बोलणं ऐकत राहिली. मार्थासुद्धा आपलं काम सोडून येशूचं ऐकण्यासाठी येऊ शकली असती. तिनं जर असं केलं असतं, तर येशूनं तिचीही प्रशंसा केली असती.
४ पण, मार्थेचं मात्र येशूच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती येशूसाठी जेवण तयार करण्यातच व्यस्त होती. त्याच्या पाहुणचारात कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये याचीच तिला जास्त काळजी होती. पण, मरीया तिची मदत करत नसल्यामुळे ती रागावली आणि येशूला तक्रार करू लागली. येशूला माहीत होतं की मार्था गरजेपेक्षा जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून तो तिला प्रेमानं म्हणाला, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस.” शिवाय, येशूनं तिला या गोष्टी करत बसण्यापेक्षा अगदी साधं जेवण केलं असतं तरी चाललं असतं असं सांगितलं. पण, मरीयेची मात्र त्यानं प्रशंसा केली. कारण त्याच्या बोलण्याकडे तिचं लक्ष होतं. तो म्हणाला: “मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे.” येशूनं जे म्हटलं ते योग्यच होतं. कारण, त्या दिवशी जेवणात काय होतं हे मरीया नंतर विसरूनही गेली असेल. पण, येशूनं शिकवलेल्या गोष्टी आणि त्यानं कशा प्रकारे तिची प्रशंसा केली हे मात्र तिच्या कायमचं लक्षात राहिलं असेल. याच्या ६० पेक्षा जास्त वर्षांनंतर प्रेषित योहानानं लिहिलं: “मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती.” (योहा. ११:५) यावरून कळतं की मार्थेनं नंतर येशूच्या प्रेमळ सल्ल्याचं पालन केलं असेल आणि संपूर्ण आयुष्य यहोवाची विश्वासूपणे सेवा केली असेल.
५. यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित करणं आज आपल्यासाठी इतकं कठीण का आहे, आणि आपण कोणत्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत?
५ आज आपल्या काळात, बायबलच्या काळापेक्षाही कितीतरी जास्त गोष्टी आहेत, ज्यांमुळे यहोवाच्या सेवेपासून आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. १५ सप्टेंबर १९५८ सालच्या टेहळणी बुरूजमध्ये बांधवांना अशी ताकीद देण्यात आली होती, की तंत्रज्ञानाला यहोवाच्या सेवेच्या आड येऊ देऊ नका. त्या काळातही दररोज काही ना काही नवीन गोष्टी बाजारात यायच्या. आकर्षक मासिकं, रेडिओ, चित्रपट, आणि टिव्ही या गोष्टी त्या काळी खूप लोकप्रिय झाल्या होत्या. टेहळणी बुरूजमध्ये असंही सांगण्यात आलं होतं की जसजसा शेवट जवळ येईल, तसतशा यहोवाच्या सेवेपासून “विचलित करणाऱ्या गोष्टी आणखी वाढत जातील.” पूर्वी कधी नव्हे इतक्या गोष्टी आज आपल्या काळात उपलब्ध आहेत, ज्यांमुळे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. तर मग, मरीयेप्रमाणे आपल्यालाही यहोवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कशामुळे मदत होईल?
जगाचा पूर्णपणे उपयोग करण्याचं टाळा
६. यहोवाच्या लोकांनी तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे उपयोग केला आहे?
६ यहोवाच्या लोकांनी सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी जगातील तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. उदाहरणार्थ, पहिल्या महायुद्धादरम्यान आणि त्याआधी त्यांनी “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा चित्रपट दाखवला होता. त्यासाठी, आवाज आणि संगीतासोबत काचेच्या रंगीत स्लाईड्सचा आणि छोट्या-छोट्या चलचित्रांचा उपयोग करण्यात आला होता. यामुळे, अनेक देशांतील लाखो लोकांपर्यंत त्यांनी सुवार्ता पोचवली. येशू ख्रिस्त पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा जो शांतीचा काळ असेल, त्याविषयी या चित्रपटाच्या शेवटच्या भागात स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर, यहोवाच्या लोकांनी रेडिओचा उपयोग करून जगभरातील लाखो लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोचवला. आजदेखील आपण कंप्युटर आणि इंटरनेटचा उपयोग करून, अगदी दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या लोकांपर्यंतसुद्धा राज्याचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न करतो.
कोणत्याही गोष्टीला यहोवाच्या सेवेतून तुमचं लक्ष विचलित करू देऊ नका (परिच्छेद ७ पाहा)
७. (क) जगाचा पूर्णपणे उपयोग करणं धोक्याचं का आहे? (ख) आपण कोणत्या बाबतीत सावध असलं पाहिजे? (तळटीप पाहा.)
७ आपण जगाचा पूर्णपणे उपयोग करू नये अशी ताकीद बायबल आपल्याला देते. जग ज्या गोष्टींना बढावा देत आहे, त्यांत गरजेपेक्षा जास्त वेळ वाया घालवण्याचाही समावेश होतो. (१ करिंथकर ७:२९-३१ वाचा.) यांपैकी काही गोष्टी वाईट नाहीत, पण त्यात आपला पुष्कळ वेळ वाया जाऊ शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखादा छंद जोपासण्याची, पुस्तकं वाचण्याची, टीव्ही पाहण्याची, वेगवेगळी ठिकाणं फिरण्याची, खरेदी करण्याची, नवनवीन उपकरणांविषयी किंवा इतर ऐशआरामाच्या गोष्टींविषयी माहिती काढण्याची आवड असेल. तसंच, अनेकांना ऑनलाईन चॅट करायला, मेसेजेस आणि ई-मेल पाठवायला, बातम्या आणि खेळ जगतातील चालू घडामोडी जाणून घ्यायला आवडतं. पण, काही जणांना नंतर या गोष्टींचं जणू व्यसनच लागतं.a (उप. ३:१, ६) आपण जर अशा गरज नसलेल्या गोष्टींमागे आपला वेळ घालवला, तर यहोवाच्या सेवेपासून आपलं लक्ष विचलित होऊ शकतं.—इफिसकर ५:१५-१७ वाचा.
८. जगातील गोष्टींवर प्रेम करणं धोकादायक आहे असं का म्हणता येईल?
८ सैतान यहोवाच्या सेवेपासून आपलं लक्ष विचलित करून, आपल्याला या जगातील गोष्टींकडे आकर्षित करण्याचा होताहोईल तितका प्रयत्न करतो. सैतानानं पहिल्या शतकातही असं केलं होतं. आणि आजही तो असं करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करत आहे. (२ तीम. ४:१०) त्यामुळे, जगातील गोष्टींविषयी आपला दृष्टिकोन कसा आहे हे आपण नेहमी तपासून पाहण्याची गरज आहे. आणि त्यानुसार योग्य तो बदल करण्यासही आपण तयार असलं पाहिजे. जगातील गोष्टींवर प्रेम करणं चुकीचं आहे असं बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं. त्याऐवजी, आपण यहोवावरील आपलं प्रेम आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण असं केलं तर यहोवाची आज्ञा पाळणं आणि त्याच्या आणखी जवळ जाणं आपल्याला सोपं जाईल.—१ योहा. २:१५-१७.
महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा
९. येशूनं आपल्या शिष्यांना कशावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, आणि येशूचं याबाबतीत उत्तम उदाहरण आहे असं का म्हणता येईल?
९ येशूनं मार्थेला पुष्कळ गोष्टींविषयी चिंता करत बसण्यापेक्षा आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेमळपणे सांगितलं. हीच गोष्ट त्यानं आपल्या शिष्यांनाही सांगितली. आपलं लक्ष यहोवाच्या सेवेवर केंद्रित करण्याचं प्रोत्साहन त्यानं आपल्या शिष्यांना दिलं. (मत्तय ६:२२, ३३ वाचा.) स्वतः येशूचंच खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याच्याजवळ पुष्कळ गोष्टी नव्हत्या. त्याला तर स्वतःचं घर किंवा स्वतःच्या मालकीची जमीनही नव्हती.—लूक ९:५८; १९:३३-३५.
१०. येशूनं आपल्यापुढे कोणतं चांगलं उदाहरण मांडलं आहे?
१० येशूनं कोणत्याही गोष्टीमुळे प्रचारकार्यावरील आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. उदाहरणार्थ, कफर्णहूममध्ये प्रचार करून झाल्यावर तिथल्या लोकांनी त्याला आणखी काही दिवस थांबण्याचा आग्रह केला. पण, त्यानं आपल्या कार्यावरून आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. तो त्यांना म्हणाला: “मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.” (लूक ४:४२-४४) सुवार्ता घोषित करण्यासाठी आणि जास्तीतजास्त लोकांना शिकवण्यासाठी येशूनं खूप लांबलांबच्या ठिकाणी पायी प्रवास केला. तो परिपूर्ण असला तरी देवाच्या सेवेत तो जे काही कष्ट घेत होता त्यामुळे तो इतका थकून जायचा, की त्यालाही विश्रांतीची गरज पडायची.—लूक ८:२३; योहा. ४:६.
११. आपल्या वैयक्तिक समस्येबद्दल एका मनुष्यानं येशूला विचारलं तेव्हा येशूनं काय केलं, आणि येशूनं आपल्या शिष्यांना कोणता धडा शिकवला?
११ नंतर, जेव्हा येशू आपल्या शिष्यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवत होता, तेव्हा एक मनुष्य मध्येच येऊन त्याला म्हणाला: “गुरुजी, मला माझा वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” येशूनं या मनुष्याच्या व्यक्तिगत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आणि आपल्या शिष्यांना शिकवण्यापासून तो विचलितही झाला नाही. उलट, या संधीचा उपयोग करून त्यानं आपल्या शिष्यांना सांगितलं की जर त्यांनी पुष्कळ गोष्टी मिळवण्याकडे लक्ष केंद्रित केलं, तर यहोवाची सेवा करण्यापासून ते विचलित होऊ शकतात. शिष्यांसाठी हा एक महत्त्वाचा धडा होता.—लूक १२:१३-१५.
१२, १३. (क) जेरुसलेममध्ये आलेल्या ग्रीक लोकांना येशूच्या कोणत्या कार्याचं आश्चर्य वाटलं? (ख) ग्रीक लोकांना येशूला भेटण्याची इच्छा आहे असं जेव्हा फिलिप्पानं सांगितलं तेव्हा येशूची काय प्रतिक्रिया होती?
१२ येशूच्या मानवी जीवनातील शेवटले काही दिवस त्याच्यासाठी खूप तणावपूर्ण होते. (मत्त. २६:३८; योहा. १२:२७) आपल्याला अतिशय कठीण छळाला आणि मृत्यूला तोंड द्यावं लागणार आहे, हे त्याला माहीत होतं. तसंच, मृत्यूआधी आपल्याला आणखी काही कामं करायची आहेत याचीही त्याला जाणीव होती. उदाहरणार्थ, रविवारी निसान ९ रोजी तो जेरुसलेममध्ये एका गाढवावर बसून आला. आणि भविष्यवाणीनुसार लोकसमुदायानं त्याचं राजा या नात्यानं स्वागत केलं. (लूक १९:३८) शिवाय, त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो मंदिरात गेला आणि लोकांना लुबाडणाऱ्या लोभी व्यापाऱ्यांना त्यानं अगदी धैर्यानं हाकलून लावलं.—लूक १९:४५, ४६.
१३ वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यहुदी लोकांसोबत इतर काही ग्रीक लोकदेखील जेरुसलेमला आले होते. येशूनं जे केले ते पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी येशूला भेटण्याची इच्छा असल्याचं प्रेषित फिलिप्पला सांगितलं. पण, आपल्या शत्रूंविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात येशू नव्हता. तर आपलं जीवन बलिदान म्हणून देण्याच्या यहोवाच्या इच्छेवर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे त्यानं आपल्या शिष्यांना याची आठवण करून दिली, की लवकरच त्याचा मृत्यू होईल आणि जे त्याचं अनुकरण करू इच्छितात त्यांनीही आपल्या जीवनाचं बलिदान देण्यास तयार असलं पाहिजे. त्यानं म्हटलं: “जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल.” येशूनं असंही अभिवचन दिलं की जे त्याचं अनुकरण करतील त्यांचा मान राखून पिता त्यांना सार्वकालिक जीवन देईल. हाच प्रोत्साहनदायक संदेश नंतर फिलिप्प त्या ग्रीक लोकांना देऊ शकणार होता.—योहा. १२:२०-२६.
१४. येशूचं प्रचारकार्यावर लक्ष केंद्रित असलं, तरी त्यानं आणखी कायकाय केलं?
१४ पृथ्वीवर असताना सुवार्तेची घोषणा करणं हे येशूचं मुख्य काम होतं. त्यानं आपलं जीवन याच कार्यावर केंद्रित केलं होतं. पण, तरी तो सतत याच गोष्टीचा विचार करत नव्हता. उदाहरणार्थ, बायबल सांगतं की तो एका लग्नसमारंभाला गेला आणि तिथं त्यानं पाण्याचं द्राक्षारसात रूपांतर केलं. (योहा. २:२, ६-१०) तसंच, तो आपल्या मित्रांसोबत आणि सुवार्तेला चांगला प्रतिसाद देणाऱ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घ्यायचा. (लूक ५:२९; योहा. १२:२) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, येशूनं प्रार्थना करण्यासाठी, मनन करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी नेहमी वेळ काढला.—मत्त. १४:२३; मार्क १:३५; ६:३१, ३२.
विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी टाळा
१५. ख्रिश्चनांनी काय करण्याची गरज आहे असं पौलानं सांगितलं, आणि त्यानं स्वतः याबाबतीत एक चांगलं उदाहरण कसं मांडलं आहे?
१५ प्रेषित पौलानं ख्रिश्चनांची तुलना लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावणाऱ्या धावपटूशी केली. धावणाऱ्या व्यक्तीला आपली धाव पूर्ण करताना त्याचा वेग कमी करेल किंवा अडखळण ठरेल अशी प्रत्येक गोष्ट टाळण्याची गरज असते. (इब्री लोकांस १२:१ वाचा.) पौल स्वतः अशा धावपटूसारखा होता. तो यहुदी धर्मपुढारी होऊन श्रीमंती आणि प्रसिद्धी मिळवू शकला असता. पण, त्यानं या सर्व गोष्टींचा त्याग केला. उलट, “जे श्रेष्ठ” आहे ते त्यानं निवडलं आणि त्याकडेच आपलं लक्ष केंद्रित केलं. प्रचारकार्य करण्यासाठी त्यानं खूप मेहनत घेतली. त्यानं सिरिया, आशिया मायनर, मासेदोनिया, यहुदा आणि इतरही अनेक ठिकाणी प्रवास करून प्रचार केला. स्वर्गातील सार्वकालिक जीवनाच्या बक्षीसावर पौलानं लक्ष केंद्रित केलं. तो म्हणतो: “मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, . . . बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो.” (फिलिप्पै. १:१०; ३:८, १३, १४) पौल अविवाहित होता आणि त्यामुळे त्याला “प्रभूची सेवा एकाग्रतेने” करता आली.—१ करिंथ. ७:३२-३५.
१६, १७. आपण पौलाच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? मार्क आणि क्लाराचं याबाबतीत कसं उदाहरण आहे?
१६ यहोवाची जास्तीतजास्त सेवा करण्यासाठी अनेकांनी पौलाप्रमाणे अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे. (मत्त. १९:११, १२) विवाहित व्यक्तीच्या तुलनेत अविवाहित व्यक्तीवर सहसा कुटुंबाच्या कमी जबाबदाऱ्या असतात. पण, आपण विवाहित असो किंवा अविवाहित, यहोवाची सेवा करण्यापासून विचलित करणारे “सर्व भार” आपण टाकून देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला स्वतःच्या सवयींमध्ये काही बदल करावे लागू शकतात. यामुळे, इतर गोष्टींत आपला वेळ वाया जाणार नाही आणि यहोवाची सेवा जास्त प्रमाणात करणं आपल्याला शक्य होईल.
१७ मार्क आणि क्लाराचंच उदाहरण घ्या. ते दोघंही वेल्समध्ये लहानाचे मोठे झाले आणि शाळा संपल्यावर त्या दोघांनीही पायनियरिंग सुरू केली. नंतर त्यांचं लग्न झालं आणि ते पायनियरिंग करत राहिले. पण त्या दोघांना यहोवाच्या सेवेत आणखी जास्त करण्याची इच्छा होती. मार्क सांगतो, “आम्ही आमची जीवनशैली आणखी साधी केली. आमचं तीन बेडरूमचं घर आम्ही विकलं. तसंच, आमची अर्धवेळेची नोकरीही आम्ही सोडली आणि आंतरराष्ट्रीय बांधकाम कार्यात आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करू लागलो.” मागील २० वर्षांत त्यांनी आफ्रिकेच्या बऱ्याच भागांत जाऊन राज्य सभागृहांच्या बांधकामात सहभाग घेतला आहे. काही वेळा तर त्यांच्याकडे खूप कमी पैसे उरायचे. पण यहोवानं त्यांची नेहमी काळजी घेतली. क्लारा म्हणते: “प्रत्येक दिवस यहोवाच्या सेवेत घालवल्यामुळे आम्हाला खूप समाधान मिळतं. आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आम्ही बरेच मित्र बनवले आहेत आणि कधीही कशाची कमी आम्हाला भासली नाही. यहोवाची पूर्णवेळ सेवा केल्यामुळे जो आनंद आम्हाला मिळाला त्याच्या तुलनेत आम्ही केलेले त्याग काहीच नाहीत.” अनेक पूर्णवेळेच्या सेवकांच्याही अशाच भावना आहेत.b
१८. आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१८ यहोवाच्या सेवेत तुम्ही आणखी जास्त आवेशानं काम करू शकता असं तुम्हाला वाटतं का? काही गोष्टी यहोवाच्या सेवेतून तुमचं लक्ष विचलित करत आहेत का? असं असेल तर तुम्हाला काय करता येईल? तुम्ही तुमच्या बायबल वाचनाच्या आणि अभ्यासाच्या पद्धतीत काही फेरबदल करू शकता. हे कसं करता येईल याविषयी पुढील लेखात सांगण्यात आलं आहे.
a “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो” हा लेख पाहा.
b टेहळणी बुरूज १५ मार्च २०१५ मधील “आम्ही अधिक चांगल्या क्षेत्रात करियर केलं” या लेखात डेविड आणि ग्वेन कार्टराईट यांची जीवन कथा वाचा. आध्यात्मिक गोष्टींना जीवनात प्रथम स्थानी ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाचा त्यांना कसा फायदा झाला याविषयी वाचा.