आपल्या प्रकाशनांना तुम्ही मौल्यवान समजता का?
१ हिरे व इतर रत्न केवळ सुंदरतेमुळेच नव्हे तर ते शोधून काढणे व खणून काढणे खर्चीक असल्यामुळे मौल्यवान आहेत. यहोवा व येशू ख्रिस्ताचे ज्ञान तर त्याहूनही अधिक मोलाचे आहे, व जगात केवळ आपलीच प्रकाशने या आध्यात्मिक धनाची खोलपर्यंत व ईश्वरी बुद्धीसह स्पष्टीकरणे देतात. (रोम. ११:३३; फिलिप्पै. ३:८) आपल्या प्रकाशनांबद्दल आपण खरी कदर कशी दाखवू शकतो?
२ पुष्कळ लोक व कुटुंबे नियमितपणे राज्य सभागृहातील “संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी अनुदान—मत्तय २४:१४” असे लिहिलेल्या पेटीत दान टाकण्यासाठी काही रक्कम बाजूला काढून ठेवतात. काही लोक, प्रकाशने किंवा नियतकालिके घेतात तेव्हा व क्षेत्र सेवेत मिळालेल्या अनुदानासह जगभरातील कार्यासाठी या पेटीत अतिरिक्त अनुदान टाकतात.
३ मौल्यवान प्रकाशनांबद्दल कदर दाखवण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजे, क्षेत्र सेवेत निवडक लोकांनाच साहित्य देणे. आपण, एका लहान बाळाच्या हातात मोलामहागाचा हिरा देणार नाही; कारण त्याला त्याची किंमत नसते. तसेच, ज्या लोकांना आध्यात्मिक गोष्टींबद्दल कदर वाटत नाही त्यांना आपण आपली मौल्यवान प्रकाशने देणार नाही. (पडताळा इब्री लोकांस १२:१६.) आपला वेळ व आपली प्रकाशने देताना आपण समजदारी दाखवू. घरमालक खरोखरच संभाषण करू इच्छितो का? आपण बोलत असताना त्याचे लक्ष असते का, आपण विचारत असलेल्या प्रश्नांची तो उत्तरे देतो का आणि बायबलमधून आपण वचन वाचत असताना तो ते लक्षपूर्वक ऐकतो का? तो आस्था दाखवत असेल तरच आपल्याला त्याला प्रकाशन द्यायला आनंद वाटेल. आपल्या प्रकाशनांतून आपण बायबल अभ्यास घेतो तेव्हा, लोकांना बायबलमध्ये दिलेली शिकवण शिकायला मिळते व यहोवाबरोबर नातेसंबंध जोडण्याचा मार्ग त्यांच्यासमोर खुला होतो. आपल्या प्रकाशनांचा ज्या प्रकारे उपयोग केला जाईल त्यानुसार खरा लाभ मिळवता येईल.
४ राज्य सभागृहातील किंवा घरातील कपाटात प्रकाशने ठेवल्यामुळे त्याचा उद्देश पूर्ण होणार नाही व त्यांची किंमतही केली जात नाही. मासिकांचे जुने अंक, माहितीपत्रके, पुस्तके, व हस्तपत्रिका यांचासुद्धा चांगला उपयोग केला पाहिजे. आपल्याजवळ कोणकोणती प्रकाशने आहेत हे आपण मागे केव्हा पाहिले होते? आपल्याकडे किती प्रकाशने जमली आहेत हे पाहून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल. पण ही प्रकाशने अद्यापही चांगल्या अवस्थेत आहेत का? ती, जुनी झाल्यामुळे पिवळ्या रंगाची, फाटलेली किंवा धुळीने मळकट झाली आहेत का? चांगल्या अवस्थेत असतील तर क्षेत्र सेवेत त्यांचे वितरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खराब झालेली प्रकाशने कदाचित आपण स्वतःकरता ठेवू शकतो किंवा योग्यरितीने त्यांची विल्हेवाट लावू शकतो. बहुतेककरून आपण चालू सादरता वापरत असलो तरी अधूनमधून आपण एक वेगळे प्रकाशन सादर करण्याचा प्रयत्न करू शकतो.
५ वितरणासाठी तुम्हाला नेमकी किती प्रकाशने लागतात या गोष्टीचा नेहमी काळजीपूर्वक विचार करा. योग्य निर्णय आवश्यक आहे. खासकरून पायनियरींग करत असताना प्रकाशनांचा पुरेसा साठा असणे महत्त्वाचे असले तरी, प्रमाणापेक्षा अधिक व्यक्तिगत साठा ठेवण्याची काही गरज नाही, कारण तुम्ही सभागृहातून, सभांच्या आधी व नंतरही हवी तेवढी प्रकाशने घेऊ शकता. महिना चालू होण्याआधीच आवश्यक प्रकाशनांचा साठा ठेवा व तो संपतो तसा आणखी घ्या.
६ देवाच्या वचनातील सत्याबद्दल कृतज्ञता बाळगणाऱ्या लोकांना प्रकाशने दिल्यावर ती मौल्यवान ठरतात. तेव्हा, आपल्याला जे देण्यात आले आहे त्याचा सुज्ञ व योग्य वापर करून आपली प्रकाशने खरोखरच मौल्यवान आहेत हे दाखवून देऊ या.