वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 फेब्रुवारी पृ. २८-३०
  • आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंद म्हणजे काय?
  • अनुकरणीय उदाहरणं
  • आनंदी राहण्याची काही कारणं
  • आणखी आनंद कसा मिळवावा?
  • आनंदी राहण्याचे फायदे
  • उल्लसित अंतःकरणाने यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाची सेवा आनंदाने करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • यहोवाविषयीचा आनंद आपला आश्रयदुर्ग आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 फेब्रुवारी पृ. २८-३०

आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण

  • प्रेम

  • आनंद

  • शांती

  • सहनशीलता

  • दयाळूपणा

  • चांगुलपणा

  • विश्‍वास

  • सौम्यता

  • आत्मसंयम

लोकांना सहसा आनंदी राहायला आवडतं. पण या शेवटच्या काळात सर्वांनाच “अतिशय कठीण” समस्यांचा सामना करावा लागत आहे. (२ तीम. ३:१) काही लोकांना अन्यायाचा सामना करावा लागतो. तसंच, आजारपण किंवा बेरोजगारीमुळे किंवा प्रियजनांच्या मृत्यूमुळेही ते त्यांचा आनंद गमावतात. इतरही काही कारणांमुळे ते चिंतित किंवा दुःखी होतात आणि आपला आनंद हरवून बसतात. देवाचे सेवकही निराश होऊ शकतात आणि आपला आनंद हळूहळू गमावू शकतात. जर तुमच्यासोबतही असं झालं असेल तर तुम्ही तुमचा आनंद पुन्हा कसा मिळवू शकता?

या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे, की खरा आनंद म्हणजे नक्की काय आणि समस्यांचा सामना करत असतानाही काहींनी आपला आनंद कसा टिकवून ठेवला आहे. मग आपण पाहूयात, की आपण आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतो आणि वाढवू शकतो.

आनंद म्हणजे काय?

आनंदी असणं, म्हणजे नेहमी उल्हासित असणं नाही. विचार करा: एक व्यक्‍ती मद्यपान केल्यामुळे कदाचित खूप हसत असेल. पण शुद्धीवर आल्यावर मात्र ती हसत नाही आणि तिच्या समस्या जशाच्या तशाच आहेत हे तिला जाणवतं. तिचा उल्हासितपणा तात्पुरताच असतो. पण, तो खरा आनंद नसतो.—नीति. १४:१३.

याउलट आनंद म्हणजे, आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं किंवा काही चांगलं मिळण्याची अपेक्षा असते तेव्हा जाणवणारी एक तीव्र भावना. तसंच, आनंदी असणं म्हणजे आपली परिस्थिती चांगली असो वा वाईट, नेहमी खूश राहणं. (१ थेस्सलनी. १:६) आपण एखाद्या गोष्टीमुळे कदाचित नाराज असू पण तरीही आनंदी राहू शकतो. उदाहरणार्थ, येशूबद्दल प्रचार केल्यामुळे प्रेषितांना मारहाण करण्यात आली. पण, “आपल्याला येशूच्या नावासाठी अनादर करण्याच्या लायकीचे समजण्यात आले, म्हणून ते आनंद करत न्यायसभेतून बाहेर गेले.” (प्रे. कार्ये ५:४१) आपल्याला मारण्यात आलं म्हणून नाही, तर आपण देवाला विश्‍वासू राहू शकलो, म्हणून त्यांनी आनंद केला.

आनंद हा गुण आपल्यात जन्मतःच नसतो किंवा आपल्यात तो आपोआप येत नाही. असं आपण का म्हणू शकतो? कारण, खरा आनंद देवाच्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक भाग आहे. आणि, देवाचा आत्मा आपल्याला “नवे व्यक्‍तिमत्त्व” धारण करायला मदत करतो, ज्यात आनंद या गुणाचाही समावेश आहे. (इफिस. ४:२४; गलती. ५:२२) जर आपण आनंदी असू तर समस्यांचा सामना करणं आपल्याला सोपं जाईल.

अनुकरणीय उदाहरणं

आज आपल्याला ज्या वाईट गोष्टी पाहाव्या लागतात त्या पाहण्याची यहोवाला इच्छा नाही. तर, त्याला पृथ्वीवर चांगल्या गोष्टी घडताना पाहायचं आहे. पण लोकांना वाईट गोष्टी करताना पाहून तो आपला आनंद गमावत नाही. बायबल म्हणतं: “सामर्थ्य व आनंद त्याच्या स्थानी आहेत.” (१ इति. १६:२७) शिवाय, देवाचे सेवक ज्या चांगल्या गोष्टी करतात त्या पाहूनही तो खूप आनंदित होतो.—नीति. २७:११.

अपेक्षेनुसार गोष्टी घडत नाहीत, तेव्हादेखील आनंदी राहण्याद्वारे आपण यहोवाचं अनुकरण करण्याचा किंवा त्याच्यासारखा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करतो. चिंता करत राहण्याऐवजी, आपल्याजवळ आज ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो आणि भविष्यात मिळणाऱ्‍या चांगल्या गोष्टींची सहनशीलतेने वाट पाहू शकतो.a

बायबलमध्ये अशा अनेक लोकांची उदाहरणं दिली आहेत, ज्यांनी बऱ्‍याच समस्यांचा सामना करताना आपला आनंद टिकवून ठेवला. अब्राहामचा जीव धोक्यात होता आणि इतरांनी त्याला त्रास दिला तरीही त्याने आपला आनंद टिकवून ठेवला. (उत्प. १२:१०-२०; १४:८-१६; १६:४, ५; २०:१-१८; २१:८, ९) तो हे कशामुळे करू शकला? मसीहाच्या राज्याखाली नव्या जगात जगण्याच्या आशेबद्दल विचार करत राहिल्यामुळे. (उत्प. २२:१५-१८; इब्री ११:१०) याबद्दल येशूने म्हटलं: “तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या आशेने खूप आनंदित झाला आणि त्याने तो पाहिला व त्याला आनंद झाला.” (योहा. ८:५६) भविष्यात आपल्याला जो आनंद मिळणार आहे त्याबद्दल सतत विचार करत राहण्याद्वारे आपण अब्राहामचं अनुकरण करतो.—रोम. ८:२१.

पौल आणि सीला यांचादेखील विश्‍वास मजबूत होता आणि त्यामुळेच अनेक समस्यांचा सामना करत असताना ते आपला आनंद टिकवून ठेवू शकले. उदाहरणार्थ, जेव्हा त्यांना बेदम मारून तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा ते “प्रार्थना करत होते व गीत गाऊन देवाची स्तुती करत होते.” (प्रे. कार्ये १६:२३-२५) देवाने भविष्याबद्दल जे वचन दिलं आहे, त्याचा सतत विचार केल्यामुळेच त्यांना आपलं दुःख सहन करणं शक्य झालं. शिवाय येशूचे शिष्य असल्याकारणाने त्यांचा छळ केला जात आहे, हे माहीत असल्यामुळे ते त्यांचा आनंद टिकवून ठेवू शकले. देवाची सेवा केल्यामुळे मिळणाऱ्‍या चांगल्या परिणामांबद्दल सतत विचार करण्याद्वारे आपण पौल आणि सीला यांचं अनुकरण करू शकतो.—फिलिप्पै. १:१२-१४.

आजही आपल्या बंधुभगिनींनी कठीण समस्यांचा सामना करत असताना आपला आनंद टिकवून ठेवला आहे. उदाहरणार्थ, नोव्हेंबर २०१३ मध्ये फिलिपाईन्स इथं हायान नावाचं मोठं वादळ आल्यामुळे हजारपेक्षा जास्त साक्षीदार कुटुंबं बेघर झाली. जॉर्ज नावाच्या एका बांधवाचं टायक्लोबेन या शहरात असलेलं घर पूर्णपणे नष्ट झालं. ते म्हणतात: “जे काही झालं त्यामुळे बांधवांनी आपला आनंद गमावला नाही, आम्ही जो आनंद अनुभवत आहोत त्याचं वर्णन करणं अशक्य आहे.” यहोवाने आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याचा सतत विचार करत राहिल्याने आणि कदर बाळगल्यामुळे, कोणत्याही कठीण प्रसंगात आपण आपला आनंद टिकवून ठेवू शकतो. आपण आनंदी राहावं म्हणून यहोवाने आणखी कोणत्या गोष्टी पुरवल्या आहेत?

आनंदी राहण्याची काही कारणं

यहोवासोबत असलेला नातेसंबंध हे आपल्यासाठी आनंदी राहण्याचं सर्वात मोठं कारण आहे. या विश्‍वाच्या महान राजाला आपण ओळखतो. तो आपला पिता, देव आणि मित्र आहे!—स्तो. ७१:१७, १८.

यहोवाने आपल्याला हे जीवन आणि त्याचा आनंद लुटण्याची क्षमता दिली आहे याबद्दलही आपण त्याचे आभारी आहोत. (उप. ३:१२, १३) त्याने आपल्याला स्वतःकडे आकर्षित केल्यामुळे आपल्यासाठी त्याची काय इच्छा आहे आणि जीवन कसं जगलं पाहिजे हे आपण समजू शकतो. (कलस्सै. १:९, १०) पण याउलट, जीवनाचा उद्देश काय आहे हे अनेकांना माहीत नाही. हा फरक समजवताना पौलने लिहिलं: “‘डोळ्यांनी ज्या पाहिल्या नाहीत व कानांनी ज्या ऐकल्या नाहीत व मानवाने आपल्या मनात ज्यांची कल्पनाही केली नाही, अशा गोष्टी देवाने आपल्यावर प्रेम करणाऱ्‍यांसाठी तयार केल्या आहेत.’ कारण देवाने त्या गोष्टी त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला प्रकट केल्या आहेत.” (१ करिंथ. २:९, १०) यहोवाची इच्छा आणि उद्देश याबद्दल माहीत असल्यामुळे आपण आनंदी आहोत.

यहोवाने आपल्यासाठी आणखीनही काही केलं आहे. आपल्या पापांची क्षमा होईल अशी व्यवस्था त्याने केली आहे. (१ योहा. २:१२) लवकरच येणाऱ्‍या नवीन जगात जीवन जगण्याची आशा त्याने आपल्याला दिली आहे. (रोम. १२:१२) आजही आपण ज्यांच्यासोबत मिळून त्याची उपासना करू शकतो असे अनेक मित्र त्याने आपल्याला दिले आहेत. (स्तो. १३३:१) यहोवा सैतान आणि दुरात्म्यांपासून आपल्याला सुरक्षित ठेवतो. (स्तो. ९१:११) यहोवाने आपल्याला दिलेल्या या सुंदर गोष्टींचा विचार करत राहिल्याने आपण आणखी आनंदी होऊ शकतो.—फिलिप्पै. ४:४.

आणखी आनंद कसा मिळवावा?

आनंदी असलेली एक ख्रिस्ती व्यक्‍ती आणखी आनंदी कशी बनू शकते? येशूने म्हटलं: “माझा आनंद तुमच्यामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत.” (योहा. १५:११) यावरून हे समजतं, की आपण आणखी आनंदी होऊ शकतो. आनंदाची तुलना आपण आगीसोबत करू शकतो. जर आपल्याला मोठी आग पाहिजे असेल, तर त्यात आणखी लाकडं घालावी लागतात. पवित्र आत्मा आपल्याला आणखी आनंद मिळवायला मदत करू शकतो. त्यामुळे जर आपल्याला आणखी आनंद हवा असेल, तर आपण प्रार्थनेत देवाचा आत्मा मागण्याद्वारे तो मिळवू शकतो. पवित्र आत्म्याने प्रेरित असलेल्या बायबलच्या वचनांवर आपण मनन करणं गरजेचं आहे.—स्तो. १:१, २; लूक ११:१३.

आणखी आनंदी होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, यहोवाला आनंद देणाऱ्‍या गोष्टी करत राहण्यात व्यस्त राहणं. (स्तो. ३५:२७; ११२:१) असं आपण का म्हणतो? बायबल म्हणतं: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उप. १२:१३) आपण यहोवाची इच्छा पूर्ण करू, अशी आपली रचना करण्यात आली आहे. त्यामुळे, यहोवाची सेवा करण्याद्वारे आपल्याला जीवनात खरा आनंद मिळू शकतो.b

आनंदी राहण्याचे फायदे

आपला आनंद वाढवल्यामुळे आपल्याला इतरही फायदे होतील. उदाहरणार्थ, आपण समस्येचा सामना करत असतानाही यहोवाची सेवा आनंदाने करत राहतो तेव्हा त्यालाही खूप आनंद होतो. (अनु. १६:१५; १ थेस्सलनी. ५:१६-१८) शिवाय, खरा आनंद मिळवल्यामुळे भौतिक संपत्ती साठवण्याला आपण जीवनात प्रथम स्थान देणार नाही. उलट, देवाच्या राज्यासाठी आणखी मोठे त्याग करायला आपण तयार असू. (मत्त. १३:४४) आणि यहोवाच्या इच्छेनुसार करत राहिल्यामुळे आपल्याला जे चांगले अनुभव मिळतात त्यामुळे आपण आणखी आनंदी होऊ. आणि, आपण स्वतःबद्दल समाधानी असू आणि इतरांनाही आनंदित करू.—प्रे. कार्ये २०:३५; फिलिप्पै. १:३-५.

तसंच, आपण जितकं जास्त आनंदी असू तितकं आपलं आरोग्य चांगलं राहण्याची शक्यता आहे. बायबल म्हणतं: “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.” (नीति. १७:२२) अमेरिकेतल्या नेब्रॅस्का युनिर्वसिटी इथे अभ्यास केलेले एक संशोधक बायबलच्या या विधानाला सहमती दर्शवतात. ते म्हणतात: “जर तुम्ही तुमच्या जीवनात आज आनंदी आणि समाधानी असाल तर भविष्यात तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं.”

त्यामुळे आज जरी आपल्या जीवनात तणाव असेल, तरी पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करण्याद्वारे, देवाच्या वचनाचा अभ्यास आणि त्यावर मनन करण्याद्वारे आपण खरा आनंद मिळवू शकतो. सध्या यहोवा आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी पुरवत आहे त्यावर विचार केल्यामुळे, इतरांच्या विश्‍वासाचे अनुकरण केल्यामुळे आणि देवाच्या इच्छेनुसार वागल्यामुळे आपण आणखी आनंदी होऊ. मग स्तोत्र ६४:१० मध्ये जे सांगितलं आहे ते आपल्याबाबतीत खरं ठरेल. तिथे म्हटलं आहे: “परमेश्‍वराच्या ठायी नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करेल.”

a “आत्म्याचे फळ” यावर आधारित असलेल्या या मालिकेत पुढच्या एका लेखात आपण सहनशीलता या गुणाबद्दल चर्चा करणार आहोत.

b आणखी माहितीसाठी “आनंद वाढवण्याचे इतर मार्ग” ही चौकट पाहा.

आनंद वाढवण्याचे इतर मार्ग

  • तुमचं जीवन साधं ठेवा.—लूक १२:१५.

  • अवाजवी अपेक्षा ठेवू नका.—मीखा ६:८.

  • नोकरी, शाळा, मनोरंजन आणि इतर गोष्टींबद्दल आराखडा बनवताना तुमचं आध्यात्मिक ध्येय गाठणं शक्य होईल याकडे लक्ष द्या.—इफिस. ५:१५, १६.

  • स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल समजूतदारपणा दाखवा.—फिलिप्पै. ४:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा