“तुमचे मोल अधिक आहे.”—मत्तय १०:३१
देव तुमच्यावर प्रेमळपणे लक्ष देतो
आपल्या निर्मितीवरून आपण काय शिकतो?
बाळाच्या जन्माची पहिली ६० मिनिटं खूप महत्त्वाची असतात. असं का म्हणता येईल? कारण जेव्हा आई या महत्त्वपूर्ण तासात आपल्या बाळाला जवळ घेते तेव्हा बाळाची वाढ आणि त्याचा विकास चांगल्या प्रकारे होतो.a
बाळाचा जन्म झाल्यावर आईला प्रेमळपणे त्याला जवळ घेण्याची इच्छा का होते? प्रोफेसर जेनेट क्रेनशॉ एका प्रकाशनात म्हणतात, की बाळाचा जन्म झाल्यावर जेव्हा त्याची आई “त्याला स्पर्श करते, न्याहाळते आणि दूध पाजते तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सीटोसीन नावाचं हार्मोन वाढतं व मातृत्वाची भावना उत्तेजित होते.” त्या वेळी आणखीन एका हार्मोनमुळे “आईला आपल्या बाळाकडे लक्ष द्यायला मदत होते” आणि ती आपल्या बाळाशी संवाद साधू शकते. हे इतकं विशेष का आहे?
आई आणि बाळामधलं जवळचं नातं आपल्या प्रेमळ सृष्टिकर्त्याने, यहोवा देवाने जोडलं आहे.b दावीद राजाने म्हटलं की देवानेच त्याला “उदरातून बाहेर” आणलं आणि त्याला आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित वाटावं अशी भावना त्याच्या मनात रुजवली. त्याने प्रार्थना केली: “मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपवलेले आहे, मातेच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहेस.”—स्तोत्र २२:९, १०.
विचार करा: आईने आपल्या तान्ह्या बाळाला प्रेमाने न्याहाळावं आणि त्याच्या गरजा पूर्ण कराव्यात यासाठी देवाने जर अशी जटील रचना केली आहे, तर “आपण देवाची मुलं असल्यामुळे” तो आपल्यात वैयक्तिक आस्था घेणार नाही का?—प्रेषितांची कार्ये १७:२९.
देव आपल्याकडे दुर्लक्ष करत नाही याबद्दल बायबल काय शिकवतं?
आपल्या निर्माणकर्त्याला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या येशू ख्रिस्ताने म्हटलं: “एका पैशाला दोन चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, यांपैकी एकही तुमच्या पित्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही. खरंतर, तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत. म्हणून, भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे.”—मत्तय १०:२९-३१.
असे फार कमी लोक आहेत जे प्रत्येक लहान पक्ष्याला पाहतात आणि त्यातलं एखादं खाली पडलं तर क्वचितच ते कोणाच्या लक्षात येतं. पण स्वर्गात राहणारा आपला पिता प्रत्येक पक्ष्याला पाहतो! त्याच्या नजरेत मानव पुष्कळ पक्ष्यांपेक्षाही मौल्यवान आहेत. त्यामुळे देव तुमच्याकडे लक्ष देत नाही असा विचार करू नका. या उलट, त्याला तुमच्यात वैयक्तिक आस्था आहे!
देवाला आपली काळजी आहे आणि तो आपल्याकडे प्रेमळपणे लक्ष देतो
ही वचनं आपल्याला आश्वासन देतात
“परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.”—नीतिसूत्रे १५:३.
“परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.”—स्तोत्र ३४:१५.
“मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत.”—स्तोत्र ३१:७.
“यहोवाचं माझ्यावर प्रेम नाही असं मला वाटायचं”
देवाला आपली काळजी आहे आणि त्याचं आपल्यावर लक्ष आहे हे समजल्यामुळे आपल्याला काही फरक पडेल का? हो नक्कीच. ब्रिटनमध्ये राहणारी हॅनाc हिनेही ते अनुभवलं. ती म्हणते:
“अनेकदा मला वाटायचं की यहोवाचं माझ्यावर प्रेम नाही आणि तो माझ्या प्रार्थना ऐकत नाही. मी विचार करायचे, माझ्यात विश्वासाची कमी असल्यामुळे असं होत असावं. मला वाटायचं, मी इतकी महत्त्वपूर्ण नाही म्हणून मला शिक्षा मिळतेय आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. देवाला माझी पर्वा नाही असं मला वाटायचं.”
पण आज हॅनाच्या मनात अशा शंका येत नाहीत. तिचे विचार कशामुळे बदलले? ती म्हणते: “हा बदल हळूहळू झाला. मला आठवतंय, खूप वर्षांपूर्वी एकदा येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल बायबल आधारित भाषण देण्यात आलं होतं. आणि या भाषणाचा माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. यहोवाचं माझ्यावर प्रेम आहे याची मला शाश्वती मिळाली. तसंच, माझ्या प्रार्थनांचं जेव्हा मला उत्तर मिळायचं तेव्हा बऱ्याचदा माझ्या डोळ्यांत अश्रू यायचे. कारण त्या वेळी मला याची जाणीव व्हायची की यहोवाचं खरंच माझ्यावर प्रेम आहे. बायबल वाचन आणि ख्रिस्ती सभांमुळेही मला यहोवाबद्दल, त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि आपल्याविषयी त्याला काय वाटतं याबद्दल जाणून घ्यायला मदत झाली. आता मी स्पष्टपणे पाहू शकते की देवाचं आपल्या सर्वांवर प्रेम आहे आणि तो सर्वांच्या पाठीशी आहे. प्रत्येकाकडे व्यक्तिशः लक्ष देण्याची त्याची इच्छा आहे.”
हॅनाचे शब्द प्रोत्साहन देणारे आहेत. पण देव तुमच्या भावना जाणतो आणि त्या समजून घेतो याची तुम्ही खातरी कशी करू शकता? पुढच्या लेखात आपल्याला याचं उत्तर मिळेल.
a काही मातांना पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा प्रसूतीनंतर नैराश्य आल्यामुळे आपल्या बाळाला जवळ घेणं कठीण जात असावं. पण त्यासाठी त्यांनी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ संघटनेच्या एका अहवालानुसार प्रसूतीनंतर येणारं नैराश्य हे “सहसा आईने काही केल्यामुळे किंवा काही न केल्यामुळे येत नाही. . . . तर शारीरिक आणि मानसिक गोष्टींमुळे येतं.” या विषयावर अधिक माहितीसाठी अवेक! ८ जून २००३ मध्ये प्रकाशित झालेला “अंडरस्टॅन्डींग पोस्टपार्टम डिप्रेशन” हा लेख पाहा.
b बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा आहे.—स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.
c लेखांमध्ये काही नावं बदलण्यात आली आहेत.