कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या
नव्यानेच पालक बनलेल्यांची आव्हाने
चेतन:a “आमच्या मुलीचं आमच्या घरात आगमन झालं तेव्हा, मनिषाचा आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण पहिल्या काही महिन्यात आमच्या झोपेचं खोबरं झालं. तिला सांभाळण्याविषयी आम्ही काय काय विचार केला होता पण सर्व नाहीसं झालं.”
मनिषा: “आमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर, मला माझं काही करताच येत नव्हतं. सगळं अचानक बदलून गेलं. दुधाची बाटली परत केव्हा भरायची, डायपर केव्हा बदलायचं, ती रडायला लागली की तिला शांत करायचं हे करण्यातच माझा बहुतेक वेळ जाऊ लागला. मी थकून जायचे. कित्येक महिन्यांपर्यंत मला व चेतनला एकमेकांजवळ बसून बोलायला वेळ मिळाला नाही.”
घरात जेव्हा छकुल्याचे आगमन होते तेव्हा घर आनंदाने भरून जाते, याजशी पुष्कळ लोक सहमत होतील. मुले ही देवाकडून मिळालेली “देणगी” आहेत, असे बायबलमध्ये म्हटले आहे. (स्तोत्र १२७:३) पण चेतन व मनीषासारख्या नव्यानेच आईवडील बनलेल्या जोडप्यांना माहीत आहे, की घरात मूल आल्यावर, विवाहात अनपेक्षित मार्गाने बदल होऊ शकतात. जसे की, नव्यानेच आई बनलेल्या स्त्रीचे सर्व लक्ष तिच्या बाळाकडे असते आणि बाळाने थोडी जरी हालचाल केली किंवा आवाज केला की तिला कळवळा येतो आणि ती लगेच त्याच्याकडे धावून जाते. नव्यानेच वडील बनलेल्या पुरुषाला, आपली पत्नी व मूल यांच्यात निर्माण झालेले बंधन पाहून नवल वाटेल; पण त्याला अचानक एकटे पडल्यासारखेही वाटेल.
खरेतर, पहिल्या बाळाचा जन्म झाल्यावर कदाचित पती-पत्नीत थोड्याशा कुरबुरी होण्याच्या शक्यता आहेत. पालकत्वाच्या तणावामुळे, पतीला एकटेपणा जाणवू लागेल, जोडप्यात काही वाद असतील तर ते वर येण्याची शक्यता आहे.
पहिल्या काही महिन्यांपर्यंत नवजात बाळाकडे आई आणि वडील या दोघांनी लक्ष देण्याची गरज असताना, हे नवीन आईवडील घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे त्यांचे जीवन सुरळीत कसे करू शकतात? पती व पत्नी त्यांच्यातील जवळीक कशी टिकवून ठेवू शकतात? बाळाचा सांभाळ करण्याची कोणती योग्य पद्धत आहे याबद्दल त्यांच्यात होणारे वाद ते कसे सोडवू शकतात? आता आपण पालकांसमोर येत असलेल्या आव्हानांची एक एक करून चर्चा करू या आणि बायबलमधील तत्त्वे एखाद्या जोडप्याला या आव्हानांचा सामना करायला कशी मदत करू शकतात त्यांचे आपण परीक्षण करून पाहू या.
आव्हान १: बाळाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही.
बाळ झाल्यावर आईचा सर्व वेळ तिच्या बाळाचे करण्यातच जातो. तिचे सर्व लक्षही बाळाकडेच असते. बाळाची काळजी घेत असताना तिला भावनिक तृप्ती मिळत असावी. परंतु त्याच वेळेस तिच्या नवऱ्याला, दुर्लक्षित झाल्याप्रमाणे वाटेल. ब्राझील येथे राहणारा मॅनवेल म्हणतो: “माझ्या बायकोचं लक्ष, माझ्यावरून आमच्या बाळावर गेलं तेव्हा मला हा बदल स्वीकारायला वेळ लागला. पूर्वी आम्ही दोघंच होतो. अचानक माझी बायको आणि मूल एक झाले आणि मी पडलो एकटा.” हा बदल तुम्ही कसा स्वीकारू शकाल?
▪ उपाय: सहनशील असा. बायबलमध्ये म्हटले आहे: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; . . . स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) बाळाच्या आगमनानंतर, पती पत्नी या सल्ल्याचा अवलंब कसा करू शकतात?
प्रसूतीमुळे एखाद्या स्त्रीवर शारीरिक व मानसिक प्रभाव पडतो, याबद्दलची माहिती पतीने काढून ती समजून घेतली पाहिजे. अशा प्रकारे तो दाखवून देईल, की तो पत्नीवर प्रेम करतो. त्यामुळे मग, आपल्या पत्नीचा मूड अचानक का बदलतो हेही त्याला चांगल्या प्रकारे समजेल. फ्रान्स येथे राहणाऱ्या ॲडमला ११ महिन्यांची मुलगी आहे. तो कबूल करतो: “माझ्या बायकोचा मूड बदलतो तेव्हा मला तिच्याशी कसं वागायचं ते कळत नाही. ती खरंतर माझ्यावर चिडत नसते, तर आमच्या नवीन परिस्थितीमुळं आलेल्या या अनपेक्षित जबाबदाऱ्यांमुळं ती अशी वैतागत आहे, हे मी आठवायचा प्रयत्न करतो.”
तुम्ही तुमच्या बायकोला मदत करायला जाता पण ती त्याचा उलट अर्थ घेते, असे कधी तुमच्या बाबतीत झाले आहे का? होय, तर मग लगेच रागावू नका. (उपदेशक ७:९) त्यापेक्षा, तिच्याशी सहनशीलतेने वागा आणि स्वतःच्या गरजांपेक्षा तिच्या गरजांना प्राधान्य द्या. असे केल्यास तुमचा राग शांत होईल.—नीतिसूत्रे १४:२९.
आणि एक समंजस पत्नी आपल्या पतीला, त्याच्या नवीन भूमिकेबद्दल त्याला उत्तेजन देईल. ती त्यालाही बाळाची काळजी घेऊ देईल, बाळाचे डायपर कसे बदलायचे, किंवा दुधाची बाटली कशी भरायची हे ती त्याला अतिशय सहनशीलतेने समजावून सांगू शकते. सुरुवातीला तो, तिला हवे तसे करणार नाही, तरीपण तिने त्याला समजून घ्यावे.
अनिता नावाच्या एका २६ वर्षीय आईला, ती तिच्या नवऱ्याशी ज्या प्रकारे वागतेय त्यात बदल केला पाहिजे हे जाणवले. “सुरुवातीला मी त्याला बाळाला हात लावू द्यायचे नाही. आणि मी त्याला सांगितलेल्या गोष्टींनुसार जेव्हा तो बाळाची काळजी घ्यायचा प्रयत्न करायचा तेव्हा माझी त्याच्यावर अगदी करडी नजर असायची. तेही मला बदलावं लागलं.”
हे करून पाहा: पत्नींनो, तुमच्या पतीने एखादे काम, तुम्ही जसे करता त्याच्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने केले तर, त्याची टीका करायचा किंवा त्याला ते काम पुन्हा करायला सांगण्याचा मोह आवरा. तो जे काही करतो त्याबद्दल त्याची प्रशंसा करा. यामुळे त्याचा आत्म-विश्वास वाढेल आणि तो तुम्हाला हवी ती मदत द्यायला आनंदाने राजी होईल. पतींनो, बिनमहत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपला जास्त वेळ खर्च करू नका. त्याऐवजी बाळाचा जन्म झाल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांसाठी आपल्या पत्नीला मदत करण्यात जास्त वेळ घालवा.
आव्हान २: पती-पत्नी म्हणून तुमचा नातेसंबंध कमजोर होतो.
रात्रीची सलग झोप मिळत नसली व अनपेक्षित कामांमुळे थकवा आलेला असला तरी अनेक नवीन पालक एकमेकांच्या जवळ राहण्याचा बराच प्रयत्न करतात. दोन लहान मुलांची विव्यन नावाची एक फ्रेंच आई कबूल करते: “सुरुवातीला, आईची जबाबदारी पूर्ण करण्यात मी इतकी गढून गेले होते की मी एक बायको सुद्धा आहे, ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेले होते.”
दुसरीकडे पाहता, गरोदरपणाचा आपल्या पत्नीवर शारीरिक व मानसिक परिणाम झाला आहे, ही गोष्ट एखाद्या पतीला कळणार नाही. बाळाच्या आगमनापूर्वी तुम्ही भावनिकरीत्या आणि लैंगिक संबंधांच्या बाबतीतही एकमेकांच्या अतिशय जवळ असाल. पण बाळ आल्यापासून त्याच्यातच तुमचा भरपूर वेळ आणि शक्ती खर्च होऊ शकते. पण मग, त्यांचे हे असाहाय्य व गोंडस बाळ, त्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवणारे पाचर ठरणार नाही, याची खबरदारी ते कशी घेऊ शकतात?
▪ उपाय: एकमेकांना आपल्या प्रेमाची खात्री द्या. विवाहाचे वर्णन करताना बायबलमध्ये असे म्हटले आहे: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.”b (उत्पत्ति २:२४) यहोवा देवाचा असा उद्देश होता, की मुले कालांतराने आपल्या आईवडिलांना सोडतील. पण, पती व पत्नीतील नातेसंबंध हा एकदेहासारखा आमरण हवा, अशी यहोवा अपेक्षा करतो. (मत्तय १९:३-९) या दृष्टीने मग, एक जोडपे नवीन बाळाचे आगमन झाल्यावर, योग्य गोष्टींना प्राधान्य कसे देऊ शकतात?
आधी उल्लेख करण्यात आलेल्या विव्यनने म्हटले: “उत्पत्ति २:२४ येथील शब्दांवर मी विचार केला आणि तेव्हा मला जाणवलं, की मी माझ्या मुलाबरोबर नव्हे तर माझ्या नवऱ्याबरोबर ‘एकदेह’ झाले होते. यासाठी मला माझा विवाह मजबूत करण्याची गरज वाटली.” तनुश्री नावाच्या एका आईला दोन वर्षांची मुलगी आहे. ती म्हणते: “मी माझ्या नवऱ्यापासून दूर चालले आहे असं थोडं जरी मला जाणवलं तर मी लगेच, दिवसातून थोडा वेळ का होईना, त्याच्याकडे पूर्ण लक्ष देण्याचा प्रयत्न करते.”
पतींनो, तुम्ही तुमचा विवाह मजबूत करण्यासाठी काय करू शकता? तुमचे तिच्यावर प्रेम आहे, हे तिला बोलून दाखवा. तुमचे बोलणे आपल्या कार्यांतून दाखवा. तुमच्या पत्नीच्या मनात, असुरक्षिततेच्या भावना असतील, तर त्या दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. सुलभा नावाची ३० वर्षांची आई म्हणते: “गरोदरपणामुळे पत्नीचं शरीर बदललेलं असलं तरी, नवऱ्याचं तिच्यावर अजूनही प्रेम आहे, त्याला तिची किंमत आहे, याची खात्री पत्नीला हवी असते.” जर्मनीत राहणारा ॲलन दोन मुलांचा बाप आहे. बायकोला भावनिक आधार देण्याची अत्यंत गरज असते, असे त्याला वाटते. तो म्हणतो: “माझ्या बायकोला उदास वाटते तेव्हा मी तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो.”
बाळाचे आगमन झाल्यामुळे, पती-पत्नीतील लैंगिक संबंधांतही खंड पडू शकतो, हे समजण्याजोगे आहे. त्यामुळे पती व पत्नीने यावर एकमेकांच्या गरजांबद्दल बोलले पाहिजे. एखाद्या जोडप्याने त्यांच्यातील लैंगिक संबंधात काही बदल केले तर ते “परस्पर संमतीने” करावेत, असे बायबलमध्ये म्हटलेले आहे. (१ करिंथकर ७:१-५) यासाठी त्या दोघांमध्ये खुले संवाद हवेत. तुम्ही ज्या वातावरणात किंवा संस्कृतीत लहानाचे मोठे झालात त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोबत्याबरोबर लैंगिक गोष्टींबद्दल बोलणे अवघड जाईल. पण पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पेलण्याकरता एखाद्या जोडप्याने असे संवाद करणे अतिशय गरजेचे आहे. सहानुभूतीशील, सहनशील व प्रामाणिक असा. (१ करिंथकर १०:२४) अशा प्रकारे तुमच्या दोघांमध्ये गैरसमज होणार नाहीत आणि एकमेकांवरचे तुमचे प्रेम आणखी गहिरे होईल.—१ पेत्र ३:७, ८.
नवरा-बायको एकमेकांची प्रशंसा करून, आभार व्यक्त करूनही आपले प्रेम वाढवू शकतात. नवीन आई करत असलेले बहुतेक काम दिसणार नाही, हे एक सुज्ञ पती समजून घेईल. विव्यन म्हणते: “दिवसभर मी बाळाचंच करत असते, पण दिवसाच्या शेवटी मला असं वाटतं, की मी काहीच केलं नाही.” कामात व्यस्त असली तरी, एक समंजस पत्नी, आपला पती कुटुंबासाठी जे काही करत आहे त्याला क्षुल्लक लेखणार नाही.—नीतिसूत्रे १७:१७.
हे करून पाहा: मातांनो, तुमचे बाळ झोपते तेव्हा तुम्हीही थोडी झोप काढा. अशा प्रकारे तुमची ‘बॅटरी रिचार्ज’ केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विवाहासाठी बरेच काही करण्यासाठी शक्ती मिळू शकेल. वडिलांनो, शक्य असेल तर तुम्ही रात्री बाळाला दूध देण्यासाठी किंवा बाळाचे डायपर बदलण्यासाठी उठू शकता; म्हणजे तुमच्या बायकोला पुरेशी झोप मिळू शकेल. बायकोसाठी एखाद्या कागदावर छोटीशी नोट लिहून, मोबाईलवर तिच्यासाठी एखादा एसएमएस पाठवून किंवा फोनवर तिच्याशी दोन गोड शब्द बोलून तुम्ही तिला तुमच्या प्रेमाची खात्री देऊ शकता. एकांतात बोलण्यासाठी वेळ काढा. आणि एकत्र बसल्यावर नेहमीच बाळाबद्दल बोलू नका, तर एकमेकांबद्दल बोला. आपल्या सोबत्याबरोबरची मैत्री घट्ट ठेवा. असे केल्यास, पालकत्वामुळे तुमच्यासमोर येणारी आव्हाने तुम्ही झेलू शकाल.
आव्हान ३: बाळाची काळजी कशी घ्यायची यावर तुमचे दुमत होते.
एखाद्या जोडप्याला वाटेल, प्रत्येकाचे संगोपन वेगवेगळ्या प्रकारे झाल्यामुळे, आता त्यांच्या बाळाची काळजी घेताना त्यांच्यात दुमत होत आहे. आसामी आणि कात्सुरो नावाच्या एका जपानी जोडप्यापुढे हेच आव्हान होते. आसामी म्हणते: “मला वाटायचं, की कात्सुरो आमच्या लेकीचा खूपच लाड करतो, पण त्याला वाटायचं, की मी तिच्याशी खूप कडक वागते.” असे एकमेकांच्या विरुद्ध कार्य करण्याचे तुम्ही कसे टाळू शकता?
▪ उपाय: आपल्या सोबत्याशी बोला आणि एकमेकांना पाठिंबा द्या. सुज्ञ राजा शलमोन याने असे लिहिले: “गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणाऱ्यांजवळ ज्ञान असते.” (नीतिसूत्रे १३:१०) मुलांना वाढवण्याबद्दल तुमच्या सोबत्याचे काय विचार आहेत, हे तुम्हाला कितपत माहीत आहेत? बाळाचे संगोपन कसे करायचे हे त्याचा जन्म झाल्यानंतर पाहू, असा जर तुम्ही विचार करत असाल, तर हे आव्हान तुम्ही यशस्वीरीत्या पेलण्याऐवजी तुम्ही एकमेकांबरोबरच भांडत राहाल.
जसे की, “आपण आपल्या बाळाला, खाण्याच्या व झोपायच्या चांगल्या सवयी कशा शिकवू शकतो? रात्रीच्या वेळी बाळ जेव्हा जेव्हा रडेल तेव्हा तेव्हा आपण त्याला उचलून घेणार का? बाळाला शी-सू करायला आपण कसे शिकवणार?” यासारख्या प्रश्नांची कोणती उत्तरे असतील असे तुमच्या दोघांमध्ये ठरले आहे? तुम्ही दोघांनी घेतलेले निर्णय, इतर जोडप्यांपेक्षा वेगळे असतील, हे निश्चित. दोन मुलांचे वडील असलेल्या अभिषेकचे म्हणणे असे आहे: “तुमच्या दोघांचेही एकमत असण्यासाठी तुम्ही दोघांनी यावर बोलले पाहिजे. मगच तुम्ही दोघे मिळून तुमच्या बाळाच्या गरजा पूर्ण करू शकाल.”
हे करून पाहा: तुमच्या पालकांनी तुम्हाला लहानाचे मोठे करताना ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टी आठवा. तुमच्या मुलांना वाढवताना तुम्ही तुमच्या पालकांच्या कोणत्या मनोवृत्तींचे व कृतींचे अनुकरण कराल ते ठरवा. तुम्ही कोणती मनोवृत्ती व कृती टाळू इच्छिता हेही ठरवा. आणि मग विचार केलेल्या गोष्टी एकमेकांना बोलून दाखवा.
बाळाच्या आगमनाने विवाहात चांगल्यासाठीच बदल होतात
सर्कशीत कसरत करून दाखवणाऱ्या जोडीला जसा आपला तोल सांभाळण्याकरता, वेळ आणि सहनशीलतेची गरज असते तसेच नव्याने आईवडील बनलेल्या तुम्हालाही तुमच्या नवीन भूमिका व्यवस्थित सांभाळण्याकरता वेळ आणि सहनशीलतेची गरज आहे. आणि हळूहळू तुमचाही आत्मविश्वास वाढेल.
मुलांचे संगोपन करताना, विवाहाबद्दल असलेल्या तुमच्या वचनबद्धतेची परीक्षा होईल आणि एकमेकांसोबतचा तुमचा नातेसंबंधही कायमचा बदलून जाईल. परंतु याचसोबत तुम्हाला अनेक मौल्यवान गुणही अंगी बाणवण्याची संधी मिळू शकेल. बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याचे तुम्ही जर पालन केले तर किरण नावाच्या एका पित्याला जसा अनुभव आला होता तसा तुम्हालासुद्धा येईल. तो म्हणतो: “मुलांना वाढवल्यामुळे आम्हा दोघा पती-पत्नीवर चांगला प्रभाव पडला आहे. आता आम्ही खूप कमी आत्म-केंद्रित आहोत आणि जास्त प्रेमळ व समंजस झालो आहोत.” आणि पती-पत्नीने विवाहात असे गुण दाखवणे म्हणजे सोन्याहून पिवळे! (w११-E ०५/०१)
[तळटीपा]
a या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.
b उत्पत्ति २:२४ येथे भाषांतरीत करण्यात आलेल्या “जडून” या हिब्रू क्रियापदाचा अर्थ, ‘प्रेम व आपुलकीमुळे एखाद्याला जडून राहणे’ असा होऊ शकतो, असे विद्वानांच्या एका पुस्तकात म्हटले आहे.
स्वतःला विचारा . . .
▪ माझा सोबती कुटुंबासाठी जे काही करत आहे त्याबद्दल गेल्या आठवड्यादरम्यान मी प्रशंसा कशी व्यक्त केली?
▪ आम्ही दोघे नवरा-बायको, एकांतात बसून, बाळाबद्दल नव्हे तर एकमेकांबद्दल केव्हा बोललो होतो?