साधं राहणीमान ठेवल्यामुळे मिळालेला आनंद
स्पेनमधील बार्सिलोना इथं राहणाऱ्या डॅनियल आणि मिरीयम यांचा विवाह सप्टेंबर २००० मध्ये झाला. ते एक चांगलं आरामदायी जीवन जगत होते. याबद्दल सांगताना डॅनियल म्हणतो: “आम्ही करत असलेल्या नोकरीमुळे आम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये जेवणं, परदेशात फिरणं आणि महागडे कपडे घालणं शक्य व्हायचं. आम्ही प्रचार कार्यातही नियमितपणे सहभाग घ्यायचो.” पण यानंतर असं काहीतरी घडलं ज्यामुळे हे सर्व काही बदललं.
२००६ मध्ये झालेल्या अधिवेशनातील एका भाषणाने डॅनियलवर मोठी छाप पाडली. त्या भाषणात एक प्रश्न विचारण्यात आला होता: “‘ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे’ त्यांना सर्वकाळच्या जीवनाच्या मार्गावर आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहात का?” (नीति. २४:११) या भाषणात समजावण्यात आलं होतं, की इतरांना बायबलमधील संदेश सांगणं ही आपली एक जबाबदारीच आहे. कारण, लोकांचं जीवन त्यावर अवलंबून आहे. (प्रे. कार्ये २०:२६, २७) अधिवेशनातील आपल्या आठवणींना उजाळा देताना डॅनियल म्हणतो: “मला असं वाटत होतं जणू यहोवा माझ्याशीच बोलत आहे.” या भाषणात याही गोष्टीवर जोर देण्यात आला होता की जेव्हा आपण यहोवाच्या सेवेत अधिकाधिक करतो, तेव्हा आपल्याला जास्त आनंद मिळतो. ही गोष्ट किती खरी आहे, हे डॅनियलला माहीत होतं. कारण त्याच्या पत्नीने, मिरीयमने आधीच पायनियर सेवा सुरू केली होती, आणि ती किती आनंदी आहे हे तो पाहू शकत होता.
या भाषणाने डॅनियलवर इतका मोठा प्रभाव पाडला, की आपल्या जीवनात बदल करण्याची हीच वेळ आहे असं त्याने ठरवलं. तो आता कमी तास काम करू लागला आणि त्याने पायनियर सेवा सुरू केली. जास्त प्रचारकांची गरज असलेल्या ठिकाणी तो आणि त्याची पत्नी गेल्यास किती चांगलं होईल, असा तो विचार करू लागला.
प्रथम काही समस्यांचा सामना—नंतर एक चांगली बातमी
२००७ मधील मे महिन्यात डॅनियल आणि मिरीयमने आपली नोकरी सोडली आणि ते पनामा या देशात पायनियर सेवेसाठी गेले. पनामा या देशाला त्यांनी यापूर्वीही एकदा भेट दिली होती. ते ज्या क्षेत्रात प्रचार कार्यासाठी गेले होते ते क्षेत्र म्हणजे, कॅरेबियन समुद्रातील लहानलहान बेटांचा एक समूह. या बेटांच्या समूहाला बोकास-डेल-तोरो द्वीपसमूह असं म्हटलं जातं. या बेटांवर राहणारे स्थानिक लोक म्हणजे नाबे लोक. या बेटांवर इतरांच्या तुलनेत नाबे लोकांची संख्या अधिक आहे. डॅनियल आणि मिरीयमने विचार केला, की त्यांनी साठवलेल्या पैशांमुळे त्यांना या बेटांवर आठ महिने राहता येऊ शकेल.
या बेटांवर त्यांना बोटीने आणि सायकलनेच प्रवास करावा लागायचा. डॅनियल आणि मिरीयम यांना आजही तो दिवस आठवतो, जेव्हा त्यांना पहिल्यांदाच तिथल्या एका डोंगराच्या चढावर ३० किमी सायकलने प्रवास करावा लागला होता. तिथल्या उष्णतेमुळे आणि डोंगराच्या चढावर सायकल चालवून जाताना फार थकून गेल्यामुळे डॅनियल जवळपास बेशुद्धच पडायला लागला होता. पण त्यानंतर त्यांनी ज्या नाबे कुटुंबांना भेट दिली, त्यांनी त्यांचा चांगला पाहुणचार केला; खासकरून काही काळाने जेव्हा ते तिथल्या स्थानिक भाषेतील काही वाक्य शिकले तेव्हा. लवकरच डॅनियल आणि मिरीयम यांना २३ बायबल अभ्यास मिळाले.
डॅनियल आणि मिरीयमकडे असलेले सर्व पैसे संपले त्यानंतर काय झालं? डॅनियल म्हणतो: “अशा परिस्थितीत आमच्या डोळ्यांत पाणी आलं. आम्ही विचार करू लागलो की आता आम्हाला स्पेनला परत जावं लागणार. आम्ही जे बायबल अभ्यास घेत होतो ते आता आम्हाला थांबवावे लागणार होते. यामुळे आम्हाला अतिशय दुःख होत होतं.” पण याच्या एक महिन्यानंतर त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारी एक बातमी मिळाली. मिरीयम म्हणते: “आम्हाला खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. आता आम्हाला तिथंच राहून सेवा करता येणार होती याचा आम्हाला खूप आनंद होत होता.”
सर्वात मोठा आनंद
संघटनेत झालेल्या काही बदलांमुळे डॅनियल आणि मिरीयम यांना २०१५ मध्ये त्यांची खास पायनियर सेवा सोडावी लागली. मग आता ते काय करणार होते? स्तोत्र ३७:५ मधील अभिवचनावर त्यांनी पूर्ण भरवसा ठेवला. त्यात म्हटलं आहे: “आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल.” खास पायनियर म्हणून करत असलेली सेवा सोडावी लागल्यानंतर त्यांनी आपला खर्च भागवण्यासाठी काम शोधलं. यामुळे त्यांना सामान्य पायनियर या नात्यानं सेवा सुरू ठेवता आली. आज ते पनामातील बॅराग्वास इथल्या मंडळीत सेवा करत आहेत.
आपल्या अनुभवाबद्दल सांगताना डॅनियल म्हणतो: “स्पेन सोडण्याआधी आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही आमचं राहणीमान साधं ठेवू शकू की नाही. पण आज आम्ही साधं जीवन जगत आहोत. आणि जगण्यासाठी ज्या गोष्टींची खरोखर गरज आहे, त्यांची आम्हाला कधीही कमतरता जाणवली नाही.” या जोडप्याला कोणत्या गोष्टीत खरा आनंद मिळतो? याविषयी सांगताना ते म्हणतात: “नम्र लोकांना यहोवाविषयी शिकवताना जो आनंद मिळतो त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही.”