आपल्या संग्रहातून
ते “कधी नव्हे इतक्या आवेशानं आणि प्रेमानं भारावून गेले”
सन १९२२ मधली ही घटना. सप्टेंबर महिन्यातल्या त्या शुक्रवारी अगदी सकाळीच तापमान वाढू लागलं होतं. ८,००० लोकांच्या गर्दीने संपूर्ण सभागृह अगदी गजबजून गेलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी घोषणा केली, की या महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान कोणीही उठून बाहेर जाऊ शकत असला, तरी त्याला पुन्हा सभागृहात येण्याची परवानगी मिळणार नाही.
सुरुवातीच्या ‘स्तुती सेवेत’ काही गीतं गायिल्यानंतर, जोसफ एफ. रदरफर्ड भाषण देण्यासाठी व्यासपीठावर आले. श्रोत्यांमधील बहुतेक जण श्वास रोखून बसले होते. काही जण उकाडा सहन होत नसल्यामुळे इकडे-तिकडे फिरत होते. म्हणून, बंधू रदरफर्ड यांनी त्यांना खाली बसून कार्यक्रम ऐकण्याची नम्रपणे विनंती केली. भाषण सुरू होण्याआधी, वक्ता उभा होता तिथून थोडं वर व्यवस्थित गुंडाळलेलं एक मोठं कापड लटकवलेलं होतं. ते कोणाला दिसलं असेल का?
बंधू रदरफर्ड यांच्या भाषणाचा विषय होता, “स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.” देवाच्या येणाऱ्या राज्याची प्राचीन काळातील संदेष्ट्यांनी किती धैर्याने घोषणा केली, यावर ते जवळजवळ दीड तास बोलले. त्यांच्या दमदार आवाजाने संपूर्ण सभागृह दणाणून गेलं होतं. मग, भाषणाचा कळस गाठत त्यांनी श्रोत्यांना विचारलं, “वैभवशाली राजा राज्य करू लागला आहे, यावर तुमचा विश्वास आहे का?” त्यांच्या या प्रश्नाला श्रोत्यांनी अगदी जोरदार आवाजात “हो!” असं उत्तर दिलं.
यावर, “अहो सर्वसमर्थ देवाच्या पुत्रांनो, क्षेत्रात परत चला!” अशी जणू गर्जनाच बंधू रदरफर्ड यांनी केली. पुढे ते म्हणाले: “पाहा, राजा राज्य करत आहे! तुम्ही त्याचे जाहीर प्रतिनिधी आहात. तेव्हा, घोषणा करा! घोषणा करा! घोषणा करा!”
नेमकं त्याच क्षणी, वर गुंडाळून ठेवलेलं कापड अलगदपणे उलगडत खाली आलं. त्यावर, “राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करा.” असं लिहिलेलं होतं.
त्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत, रे बॉप नावाचे एक बांधव म्हणतात: “श्रोत्यांमध्ये विलक्षण उत्साह संचारला होता.” ॲना गार्डनर नावाची बहीण म्हणते: “टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सभागृहच जणू हादरून गेलं होतं.” फ्रेड ट्वारोश नावाचे आणखी एक बांधव म्हणतात: “त्या क्षणी, सगळे श्रोते एकाच वेळी उठून उभे राहिले होते.” तर, इवान्जेलोस स्कूफस हे बांधव म्हणतात, “असं वाटलं, जणू एका मोठ्या शक्तीनेच आम्हाला आमच्या जागेवरून उठवून उभं केलं; आम्ही उभे राहिलो आणि आमचे डोळे अश्रूंनी भरून आले.”
त्या अधिवेशनात उपस्थित असलेले अनेक जण आधीपासूनच राज्याचा संदेश घोषित करत होते. पण, आता आणखी जोमाने हे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली होती. एथेल बेनेकोफ नावाच्या एका बहिणीने म्हटल्याप्रमाणे, बंधू रदरफर्ड यांचं भाषण ऐकल्यानंतर बायबल विद्यार्थी, “कधी नव्हे इतक्या आवेशानं आणि प्रेमानं भारावून गेले होते.” त्या वेळी १८ वर्षं वय असलेल्या ओडेसा टक नावाच्या बहिणीने, “कोण जाईल?” या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निश्चय केला. ती म्हणते: “कुठे जायचं, काय करायचं, कसं करायचं यातलं काहीएक मला माहीत नव्हतं; पण, एक मात्र पक्कं माहीत होतं. ते म्हणजे, मलाही यशया संदेष्ट्यासारखंच, ‘हा मी आहे, मला पाठव,’ असं म्हणायचं होतं.” (यश. ६:८) राल्फ लेफ्लर नावाचे एक बांधव म्हणतात: “आज संपूर्ण जगभरात राज्याच्या घोषणेची जी मोहीम चालली आहे त्याची खरी सुरुवात, त्या सुप्रसिद्ध दिवसापासूनच झाली.”
खरंच, १९२२ साली सीडर पॉईंट, ओहायो इथे झालेलं हे अधिवेशन, आपल्या ईश्वरशासित इतिहासातला एक मैलाचा दगड ठरला, याचं आपल्याला आश्चर्य वाटायला नको. बंधू जॉर्ज गँगस यांनी म्हटलं: “त्या अधिवेशनानंतर, प्रत्येक अधिवेशनाला उपस्थित राहायचंच असं मी ठरवलं.” आणि खरोखर, बंधू जॉर्ज यांना जितकं आठवतं त्यावरून दिसून येते, की त्यांनी त्यानंतर एकही अधिवेशन चुकवलं नाही. जुलिया विलकॉक्स नावाची बहीण म्हणते: “ज्या-ज्या वेळी आपल्या प्रकाशनांत, सीडर पॉईंट १९२२ चा उल्लेख केला जातो त्या-त्या वेळी माझं मन किती रोमांचित होतं, याचं मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. मी यहोवाला नेहमी हेच म्हणते, ‘यहोवा, तू मला तिथं उपस्थित राहण्याची जी संधी दिलीस त्याबद्दल मी तुझी खूप-खूप आभारी आहे.’”
अशाच प्रकारे, मन रोमांचित करणाऱ्या आणि आवेशानं भारावून टाकणाऱ्या, तसंच आपला महान देव आणि त्याचा नियुक्त राजा यांच्याबद्दल मनात आणखी प्रेम उत्पन्न करणाऱ्या एखाद्या अधिवेशनाच्या सुंदर आठवणी आपल्याजवळही नक्कीच असतील. अशा सुंदर आठवणींना उजाळा देताना, ‘यहोवा, तू मला तिथं उपस्थित राहण्याची जी संधी दिलीस त्याबद्दल तुझे खूप-खूप आभार.’ असं म्हणायला आपणही प्रवृत्त होत नाही का?