वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 मार्च पृ. ३-७
  • सुज्ञ लोकांची संगत धरल्यामुळे मला खूप मदत झाली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुज्ञ लोकांची संगत धरल्यामुळे मला खूप मदत झाली
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • माझं कुटुंब
  • विभागीय पर्यवेक्षकांमुळे मला मदत झाली
  • बेथेल सेवा
  • सुज्ञ असलेल्या बहिणींकडून मला मदत मिळाली
  • मिशनरी सेवा आणि प्रवासी कार्य
  • ईश्‍वरशासित प्रशाला आणि बेथेल सेवा
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “आम्ही आमचे कर्तव्य केले आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 मार्च पृ. ३-७
विलियम सॅम्यूलसन टाईप राईटर वापरताना

जीवन कथा

सुज्ञ लोकांची संगत धरल्यामुळे मला खूप मदत झाली

विलियम सॅम्यूलसन

बऱ्‍याच वर्षांपूर्वी, अमेरिकेतील ब्रूकिंग्समधली ती सकाळ मला अजूनही चांगली लक्षात आहे. गोठवून टाकणारी थंडी लवकरच सुरू होईल हे मला जाणवत होतं. कारण, त्या सकाळी खूप थंडी होती. मी आणि इतर काही जण एका धान्याच्या कोठारात होतो. ऊब देण्याची कोणतीही व्यवस्था नसलेल्या त्या कोठारात आम्ही थंडीमुळे खूप कुडकुडत होतो. आणि आमच्या जवळच पाण्याने भरलेली एक मोठी टाकीदेखील होती. त्या टाकीतलं पाणीही खूप गार झालं होतं. पण, आम्ही सर्व जण तिथं का होते? ते सांगण्याआधी मी तुम्हाला माझ्या जीवनाबद्दल थोडक्यात सांगतो. म्हणजे आम्ही तिथं कसे पोचलो हे तुम्हाला लक्षात येईल.

माझं कुटुंब

विलियम सॅम्यूलसनचे काका आणि वडील

ॲलफ्रेड काका आणि माझे वडील

माझा जन्म ७ मार्च १९३६ साली झाला. आम्ही चार भावंडं होतं, आणि त्यांपैकी मी सर्वात लहान होतो. आम्ही दक्षिण डकोटाच्या पूर्व भागात राहायचो. आमचं घर एका लहान शेतात होतं. आमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती करणं असला, तरी हे काम आमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं काम नव्हतं. माझ्या आईवडिलांनी १९३४ साली यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला होता. त्यांनी त्यांचं जीवन यहोवाला समर्पित केलं होतं आणि म्हणूनच त्याची इच्छा पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम होतं. दक्षिण डकोटामधील, कॅन्डे या गावात असलेल्या आमच्या लहानशा मंडळीत आधी माझ्या वडिलांनी, क्लॅरेन्स यांनी आणि नंतर ॲलफ्रेड या माझ्या काकांनी कंपनी सर्व्हंट (आता त्यांना वडील वर्गाचे संयोजक असं म्हणतात) या नात्यानं सेवा केली.

कुटुंबातील आम्ही सर्व जण नियमित रीत्या सभांना उपस्थित राहायचो. तसंच, घरोघरी जाऊन बायबलमध्ये भविष्याबद्दल असलेल्या आशेविषयी लोकांना सांगायचो. माझ्या आईवडिलांच्या चांगल्या उदाहरणामुळे आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या प्रशिक्षणामुळे, यहोवावरील आमचं प्रेम वाढलं. माझी बहीण डोरोथी आणि मी वयाच्या सहाव्या वर्षीच राज्य प्रचारक बनलो. १९४३ साली मी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवलं; ही प्रशाला तेव्हा नुकतीच सुरू झाली होती.

विलियम सॅम्यूलसन १९५२ मध्ये

१९५२ मध्ये पायनियर सेवा करताना

अधिवेशनांना आणि संमेलनांना उपस्थित राहणं, ही गोष्ट आमच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक होती. १९४९ साली दक्षिण डकोटामधील, स्यू फॉल्स इथं झालेलं अधिवेशन मला अजूनही चांगलं लक्षात आहे. त्या अधिवेशनात बंधू ग्रॅन्ट सूटर हे एक पाहुणे वक्‍ता म्हणून आले होते. त्यांच्या भाषणाचा विषय होता: “तुम्ही कल्पनाही केली नसेल इतक्या जवळ जगाचा अंत येऊन पोचला आहे.” यहोवाला समर्पित असलेल्या ख्रिश्‍चनांनी देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे, यावर त्यांनी भाषणादरम्यान जोर दिला. त्यानंतर मीसुद्धा यहोवाला माझं जीवन समर्पित केलं. १२ नोव्हेंबर १९४९ साली ब्रूकिंग्समध्ये झालेल्या विभागीय संमेलनात मी बाप्तिस्मा घेतला. आणि याच कारणामुळे मी कडाक्याची थंडी असलेल्या त्या सकाळी धान्याच्या कोठारात पोचलो होतो. कारण, तिथं असलेल्या पाण्याच्या त्या स्टीलच्या टाकीत माझा आणि माझ्यासोबत आणखी तिघांचा बाप्तिस्मा होणार होता.

बाप्तिस्म्यानंतर मी पायनियर सेवा करण्याचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९५२ साली, १५ वर्षांचा असताना मी पायनियर सेवा सुरू केली. बायबलमध्ये सांगितलं आहे, की “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.” (नीति. १३:२०) आणि माझ्या कुटुंबात असे बरेच सुज्ञ लोक होते, ज्यांनी पायनियर सेवा करण्याच्या माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. ६० वर्षांचे असलेले माझे काका जुलियस यांच्यासोबत मी सहसा प्रचारकार्याला जायचो. ते माझ्यापेक्षा वयाने इतके मोठे असले, तरी आम्हाला सोबत मिळून सेवाकार्य करण्यात मजा यायची. त्यांना आयुष्यात बरेच अनुभव आले होते आणि मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. माझ्या बहिणीने, डोरोथीनेही काही काळातच पायनियर सेवा सुरू केली.

विभागीय पर्यवेक्षकांमुळे मला मदत झाली

माझ्या लहानपणी सहसा माझे आईवडील विभागीय पर्यवेक्षकांना आणि त्यांच्या पत्नीला आमच्या घरी राहण्यासाठी बोलवायचे. जस्सी आणि लिन कान्टवेल या जोडप्याने मला खूप मदत केली. त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि ते मला नेहमी प्रोत्साहन देत राहिले. खरंतर त्यांच्याकडून मिळालेलं प्रोत्साहन हेदेखील एक कारण होतं, ज्यामुळे मला पायनियर सेवा सुरू करण्यास मदत झाली होती. जेव्हा ते आमच्या जवळपासच्या मंडळ्यांमध्ये भेट देण्यासाठी यायचे, तेव्हा ते कधीकधी मलाही त्यांच्यासोबत सेवाकार्य करण्यासाठी बोलवायचे. त्यांच्यासोबत वेळ घालवण्यात मला खरंच खूप आनंद मिळायचा. त्यांच्याप्रमाणे मलाही यहोवाच्या सेवेत माझा जास्तीत जास्त वेळ द्यायचा होता.

जस्सी कान्टवेलनंतर आमच्या मंडळीत विभागीय पर्यवेक्षक म्हणून जे आले त्यांचं नाव होतं बड मिलर. जेव्हा ते आणि त्यांची पत्नी जोॲन आमच्या मंडळीला भेट देण्यासाठी आले, तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. त्या वेळी मला ड्राफ्ट बोर्ड समितीपुढे हजर राहायचं होतं. ही समिती लष्करी सेवेतून कोणाला सूट दिली जावी आणि कोणाला नाही हे ठरवायची. त्या समितीने मला असं काम करण्यासाठी सांगितलं जे माझ्या विवेकाला पटत नव्हतं. कारण मला वाटलं की ते सांगत असलेलं काम जर मी केलं तर येशूच्या आज्ञेप्रमाणे मी निष्पक्ष राहू शकणार नाही. पण, मला राज्याची सुवार्ता घोषित करायची होती. (योहा. १५:१९) मी पूर्णवेळ सेवा करत असल्याने मला देवाचा एक सेवक या नात्याने लष्करातून सूट मिळावी अशी विनंती मी त्यांना केली.

बंधू मिलर यांनी मला सांगितलं, की ते या समितीपुढे हजर राहण्यासाठी माझ्यासोबत येतील. त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मला खूप बरं वाटलं. बंधू मिलर हे लाजाळू स्वभावाचे नव्हते आणि त्यांना लोकांची भीतीही वाटायची नाही. तसंच, त्यांना शास्त्रवचनांचीही चांगली माहिती होती. ते माझ्यासोबत असल्यामुळे मला फार धीर मिळाला. १९५४ सालच्या उन्हाळाच्या शेवटी ड्राफ्ट बोर्ड समितीसोबत झालेल्या भेटीचा निकाल मला कळवण्यात आला. समितीने माझी विनंती मान्य केली होती. आता यहोवाची आणखी जास्त प्रमाणावर सेवा करण्यासाठी मी मोकळा होतो.

विलियम सॅम्यूलसन बेथेल फार्मवर एका ट्रक शेजारी

नवीनच बेथेल सेवा सुरू केल्यानंतर वॉचटॉवर फार्मवर

त्यानंतर काही काळातच न्यूयॉर्कच्या स्टॅटन बेटावरील वॉचटॉवर फार्म इथं मला बेथेल सेवेसाठी बोलवण्यात आलं. मी तिथं जवळजवळ तीन वर्षं काम केलं. मला तिथेही खूप चांगले अनुभव आले. कारण, बेथेल सेवेदरम्यान मला अनेक सुज्ञ बंधुभगिनींना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

बेथेल सेवा

विलियम सॅम्यूलसन बंधू फ्रान्झसोबत डब्ल्यू.बी.बी.आर रेडिओ स्टेशनवर

डब्ल्यू.बी.बी.आर रेडिओ स्टेशनवर बंधू फ्रान्झसोबत

स्टॅटन बेटावरील वॉचटॉवर फार्ममध्ये डब्ल्यू.बी.बी.आर हे आपल्या संस्थेचं रेडिओ स्टेशनदेखील होतं. हे रेडिओ स्टेशन यहोवाच्या साक्षीदारांनी १९२४ ते १९५७ या सालादरम्यान चालवलं. वॉचटॉवर फार्मवर बेथेल कुटुंबातल्या फक्‍त १५ ते २० जणांना नेमण्यात यायचं. आमच्यापैकी बहुतेक लोक तरुण होते आणि आम्हाला खूप कमी अनुभव होता. पण, आमच्यापेक्षा वयानं मोठे असलेले बांधव, एल्डन वूडवर्थ हेदेखील आमच्यासोबत काम करायचे. ते अभिषिक्‍तांपैकी एक होते. वयाने मोठे असल्यामुळे ते आम्हाला आमच्या वडिलांसारखेच वाटायचे. त्यांनी आम्हाला बऱ्‍याच गोष्टी शिकवल्या. कधीकधी जेव्हा आम्हा बांधवांमध्ये काही मतभेद व्हायचे, तेव्हा बंधू वूडवर्थ सहसा म्हणायचे: “यहोवा आज मानवांचा वापर करून त्याचं काम पूर्ण करत आहे. आणि मानव अपरिपूर्ण असूनही त्यांच्याद्वारे तो जे साध्य करत आहे, ते खरंच खूप आश्‍चर्य करण्यासारखं आणि विलक्षण आहे.”

हॅरी पिटरसन

हॅरी पिटरसन हे खूप आवेशी प्रचारक होते

बंधू फ्रेडरिक फ्रांझ हेदेखील आमच्यासोबत होते. त्यांनीही आम्हा सर्वांना खूप मदत केली. ते खूप सुज्ञ होते आणि त्यांना बायबलचं चांगलं ज्ञान होतं. ते आम्हा सर्व बांधवांमध्ये व्यक्‍तिगत आस्था दाखवायचे. तसंच, वॉचटॉवर फार्मवर हॅरी पिटरसन हे आमच्यासाठी जेवण बनवायचं काम करायचे. त्यांच्या आडनावाचा वापर करणंच आम्हाला सोपं वाटायचं. कारण त्यांचं पहिलं नाव होतं पापारग्यरोपाऊलोस. बंधू पिटरसनदेखील अभिषिक्‍तांपैकी एक होते आणि त्यांना सेवाकार्य करणं मनापासून आवडायचं. बेथेलमधील आपलं काम तर ते चांगल्या प्रकारे करायचेच, पण त्यांनी सेवाकार्याकडेही कधीच दुर्लक्ष केलं नाही. ते प्रत्येक महिन्याला शेकडो मासिकं लोकांना द्यायचे. बायबलशी चांगल्या प्रकारे परिचित असल्यामुळे, आमच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरंही त्यांनी आम्हाला दिली.

सुज्ञ असलेल्या बहिणींकडून मला मदत मिळाली

फार्मवर आम्ही हिवाळ्यासाठी फळं आणि भाज्या यांपासून जॅम आणि लोणची तयार करून त्यांना डबाबंद बरणीत भरून ठेवायचो. बेथेल कुटुंबासाठी एका वर्षात अशा जवळजवळ ४५,००० बरण्या तयार करण्यात यायच्या. तिथं मी इटा हेथ नावाच्या बहिणीसोबत काम करायचो. जॅम आणि लोणची कशी तयार करावीत याची रेसिपी ती तयार करायची. स्थानिक मंडळीतील बहिणी आमच्यासोबत काम करण्यासाठी यायच्या आणि इटा हेथ त्यांच्या कामाचं नियोजन करण्यासाठी मदत करायची. इटा हेथ हिला जॅम आणि लोणची डबाबंद बरणीत भरण्याच्या प्रक्रियेची चांगली माहिती होती. पण असं असलं तरी, ती नेहमी फार्मच्या कामावर देखरेख करणाऱ्‍या बांधवांना आदर दाखवायची. या सुज्ञ बहिणीने आम्हा सर्वांपुढे खूप चांगलं उदाहरण मांडलं.

ॲन्जेला आणि बहीण इटा हेथ यांच्यासोबत विलियम सॅम्यूलसन

ॲन्जेला आणि बहीण इटा हेथ यांच्यासोबत

फार्मच्या कामात मदत करण्यासाठी ॲन्जेला रोमॅनो ही एक तरुण बहीणदेखील यायची. ती सत्यात आली तेव्हा इटा हेथ हिने तिला खूप मदत केली होती. एप्रिल १९५८ साली मी ॲन्जेलासोबत लग्न केलं. आणि गेल्या ५८ वर्षांपासून आम्ही सोबत मिळून यहोवाची सेवा करण्याचा आनंद अनुभवला आहे. या सर्व काळात यहोवाप्रती असलेल्या तिच्या एकनिष्ठतेमुळे आमचा विवाह आणखी मजबूत झाला आहे. ॲन्जेला खूप सुज्ञ आहे आणि आमच्यावर कोणतीही समस्या आली तरी मी तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो.

मिशनरी सेवा आणि प्रवासी कार्य

१९५७ साली बांधवांनी स्टॅटन बेटावर असलेलं डब्ल्यू.बी.बी.आर हे रेडिओ स्टेशन विकलं. त्यानंतर मी ब्रुकलिन बेथेलमध्ये काही काळासाठी सेवा केली. मग ॲन्जेला आणि माझं लग्न झालं, त्यामुळे मी बेथेलमधून निघालो. तीन वर्षांसाठी आम्ही स्टॅटन बेटावर पायनियर सेवा केली. काही काळासाठी मी रेडिओ स्टेशनच्या नवीन मालकांसाठीही काम केलं. त्या स्टेशनला डब्ल्यू.पी.ओ.डब्ल्यू या नावाने ओळखलं जायचं.

आम्ही आमचं राहणीमान अगदी साधं ठेवलं होतं. कारण, जिथं गरज आहे तिथं जाऊन सेवा करण्याची आमची इच्छा होती. यामुळे, जेव्हा १९६१ साली आम्हाला नेब्रॅस्का इथल्या फॉल्स सिटीमध्ये खास पायनियर म्हणून सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं, तेव्हा आम्ही ते स्वीकारू शकलो. पण, तिथं पोचल्यावर काही काळातच आम्हाला न्यूयॉर्कच्या दक्षिण लॅनसिंगमध्ये होणाऱ्‍या राज्य सेवा प्रशालेसाठी एका महिन्याकरता बोलावण्यात आलं. आम्हाला मिळालेल्या प्रशिक्षणाचा आम्ही आनंद घेतला. प्रशाला झाल्यानंतर आम्ही पुन्हा नेब्रॅस्कामध्ये जाऊ असं आम्हाला वाटलं होतं. पण, जेव्हा आम्हाला आमची नवीन नेमणूक मिळाली तेव्हा आम्हाला आश्‍चर्याचा धक्काच बसला. आम्हाला कंबोडिया इथं मिशनरी म्हणून सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं होतं! कंबोडिया हा आशिया खंडाच्या दक्षिण-पूर्वेकडे असलेला एक सुंदर देश आहे. तिथं आम्ही अशा काही गोष्टी पाहिल्या, ऐकल्या आणि अशा काही गोष्टींची चव घेतली ज्या आमच्यासाठी खूपच नवीन होत्या. तिथं राहून तिथल्या लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याची आमची खरोखर खूप इच्छा होती.

पण, कंबोडियामधील राजकीय परिस्थिती बदलली आणि आम्हाला दक्षिण व्हिएतनाम इथं जावं लागलं. याच्या जवळजवळ दोन वर्षांनंतर मी खूप आजारी पडलो. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आम्हाला पुन्हा अमेरिकेला परत यावं लागलं. मला माझ्या आजारातून बरं होण्यासाठी काही वेळ लागला. आजारातून बरा झाल्यानंतर आम्ही पुन्हा पायनियर सेवा सुरू केली.

ॲन्जेला आणि विलियम सॅम्यूलसन १९७५ मध्ये

१९७५ मध्ये ॲन्जेलासोबत टिव्हीवर मुलाखत देण्याआधी

मार्च १९६५ मध्ये मी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून काम करू लागलो. ३३ वर्षं विभागीय पर्यवेक्षक आणि प्रांतीय पर्यवेक्षक या नात्यानं सेवा करण्याचा आनंद आम्ही घेतला. तसंच, अधिवेशनाची व्यवस्था करण्याच्या कामातही मदत करण्याची संधी आम्हाला मिळाली. मला हे काम खूप आवडायचं. कारण, लहानपणापासूनच अधिवेशन म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाचा काळ असायचा. काही वर्षांसाठी आम्ही न्यूयॉर्क शहरात आणि त्याच्या आसपास असलेल्या मंडळ्यांना भेटी दिल्या. त्यादरम्यान बहुतेक अधिवेशनं यांकी स्टेडियममध्येच भरवण्यात यायची.

ईश्‍वरशासित प्रशाला आणि बेथेल सेवा

मागील वर्षांदरम्यान ॲन्जेला आणि मला अनेक नवीन व कठीण नेमणुका मिळाल्या आहेत. १९९५ साली मला सेवा प्रशिक्षण प्रशाला घेण्यासाठी सांगण्यात आलं. मग तीन वर्षांनी आम्हाला बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी बोलावण्यात आलं. पुन्हा बेथेलमध्ये येऊन मला खूप आनंद झाला होता. कारण, तब्बल ४० वर्षांनंतर मी पुन्हा त्याच ठिकाणी पोचलो होतो, जिथं मी माझी खास पूर्णवेळेची सेवा सुरू केली होती. बेथेलमध्ये मी काही काळासाठी सेवा विभागात काम केलं आणि इतर अनेक प्रशालांमध्ये प्रशिक्षक या नात्यानं शिकवण्याचं काम केलं. मग २००७ साली नियमन मंडळाने ईश्‍वरशासित प्रशाला आयोजित करणारा एक विभाग सुरू केला. हा विभाग बेथेलमध्ये चालवल्या जाणाऱ्‍या प्रशालांची देखरेख करायचा. काही वर्षांसाठी मी या विभागाचा पर्यवेक्षक या नात्यानं काम पाहिलं.

अलीकडच्या वर्षांदरम्यान बेथेलमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्‍या प्रशालांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. २००८ साली मंडळीतील वडिलांसाठी प्रशाला सुरू करण्यात आल्या. त्यानंतरच्या दोन वर्षांत मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या १२,००० पेक्षा जास्त बांधवांना पॅटरसन आणि ब्रुकलिन इथल्या बेथेलमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. ही प्रशाला आता इतर बऱ्‍याच ठिकाणी चालवण्यात येते. २०१० साली सेवा प्रशिक्षण प्रशालेचं नाव बदलण्यात आलं आणि या प्रशालेला ‘अविवाहित बांधवांकरता बायबल प्रशाला’ असं नाव देण्यात आलं. यासोबतच ‘ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला’ ही एक नवीन प्रशालादेखील सुरू करण्यात आली.

सप्टेंबर २०१४ साली या दोन्ही प्रशालांना एकत्र करून ‘सुवार्तिकांसाठी प्रशाला’ सुरू करण्यात आली. आता या प्रशालेत विवाहित जोडपे, अविवाहित बांधव आणि बहिणीदेखील सहभाग घेऊ शकत होते. ही प्रशाला जगभरातील इतरही अनेक देशांमध्ये चालवण्यात येणार होती. जेव्हा बंधुभगिनींना समजलं की त्यांच्या देशातही ही प्रशाला चालवण्यात येईल, तेव्हा तर त्यांना खूपच आनंद झाला होता. आता अनेकांना या प्रशालेमध्ये सहभाग घेण्याची संधी उपलब्ध आहे ही गोष्ट मनाला खूप आनंद देणारी आहे. या प्रशालांना उपस्थित राहण्यासाठी ज्या लोकांनी आपल्या जीवनात फेरबदल केले आहेत, अशा अनेकांना मला भेटण्याची संधी मिळाली. त्यांना भेटून मला खरोखरच खूप आनंद झाला.

धान्याच्या कोठारात असलेल्या त्या थंड पाण्याच्या टाकीत माझा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून आतापर्यंतच्या माझ्या जीवनाचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा एक गोष्ट मला खूप स्पष्टपणे दिसून येते. ती म्हणजे माझ्या जीवनात नेहमी असे सुज्ञ लोक होते, ज्यांनी मला सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी मदत पुरवली. यासाठी मी खरंच यहोवाचे खूप आभार मानतो. त्यांपैकी काही माझ्यापेक्षा लहान होते तर काही माझ्यापेक्षा मोठे. तसंच अनेकांची पार्श्‍वभूमीसुद्धा माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. पण, त्यांच्या मनोवृत्तीवरून आणि कार्यांवरून मी हे पाहू शकलो की त्यांचं यहोवावर मनापासून प्रेम होतं. यहोवाच्या लोकांमध्ये मला असे बरेच सुज्ञ मित्र मिळाले आहेत, ज्यांच्याकडून मी खूप काही शिकू शकलो. यासाठी मी खरंच खूप कृतज्ञ आहे.

विलियम सॅम्यूलसन काही विद्यार्थ्यांना भेटताना

जगभरातून प्रशालेसाठी येणाऱ्‍या बंधुभगिनींना भेटून मला खूप आनंद होतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा