आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो
“देवासमागमे राहून नम्रभावाने” चाला.—मीखा ६:८.
१-३. यहूदामधील संदेष्टा काय करण्यास चुकला, आणि त्याचे काय परिणाम झाले? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
इस्राएलचा राजा यराबाम याने बेथेल शहरात खोट्या उपासनेसाठी एक वेदी उभारली होती. या धर्मत्यागी राजाला न्यायदंडाचा संदेश देण्यासाठी यहोवाने मग यहूदामधील एका संदेष्ट्याला पाठवलं. या नम्र संदेष्ट्याने यहोवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि तो संदेश राजापर्यंत पोचवला. तो संदेश ऐकल्यानंतर राजा त्याच्यावर संतापून उठला. पण, यहोवाने राजाच्या हातून त्याला वाचवलं.—१ राजे १३:१-१०.
२ मग घरी परत जात असताना बेथेलच्या जवळपास राहणारा एक वृद्ध मनुष्य या संदेष्ट्याला भेटला. या मनुष्याने आसा दावा केला की तोही त्याच्याप्रमाणेच यहोवाचा एक संदेष्टा आहे. त्याने खोटं बोलून या तरुण संदेष्ट्याला भुलवलं आणि यहोवाने दिलेली आज्ञा मोडण्यास भाग पाडलं. यहोवाने यहूदातील या संदेष्ट्याला सांगितलं होतं, की “तू या ठिकाणी [इस्राएलात] अन्नपाणी सेवन करू नको आणि ज्या वाटेने जाशील त्या वाटेने परत येऊ नको.” पण, संदेष्ट्याने ही आज्ञा मोडली. त्यामुळे यहोवाचा राग त्याच्यावर भडकला. तो संदेष्टा जेव्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाला, तेव्हा वाटेत एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून त्याला मारून टाकलं.—१ राजे १३:११-२४.
३ संदेष्ट्याने यहोवाऐवजी त्या वृद्ध मनुष्याचं का ऐकलं, हे आपल्याला माहीत नाही. पण, तो यहोवाबरोबर “नम्रभावाने” चालत राहिला नाही, ही गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसून येते. (मीखा ६:८ वाचा.) बायबलमध्ये ‘यहोवासोबत चालणे’ असं जे म्हटलं आहे त्याचा अर्थ यहोवावर भरवसा ठेवणे, मार्गदर्शनासाठी त्याच्यावर अवलंबून राहणे आणि त्याच्या आज्ञेचं पालन करणे असा होतो. नम्र असलेल्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असते, की तिने सतत यहोवाला प्रार्थना करत राहण्याची गरज आहे. यहूदामधील त्या संदेष्ट्याने नम्रता दाखवली असती, तर निर्देशनात काही फेरबदल झाला आहे किंवा नाही याची खात्री त्याने यहोवाकडून करून घेतली असती. जीवनात आपल्यालाही कधीकधी काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतात, आणि आपण नेमकं काय आणि कसं करावं अशी यहोवाची अपेक्षा आहे हे कदाचित आपल्याला स्पष्टपणे कळत नाही. पण आपण जर नम्र असलो, तर आपल्या हातून गंभीर चुका होऊ नयेत म्हणून आपण नेहमी यहोवाकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना करू.
४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
४ मागील लेखात आपण पाहिलं की नम्रता दाखवणं म्हणजे नेमकं काय, आणि आजही नम्रता दाखवणं इतकं महत्त्वाचं का आहे. या लेखात आपण पुढील दोन प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: कोणत्या परिस्थितीत आपल्या नम्रतेची परीक्षा होऊ शकते? आणि, आपल्याला आणखी जास्त नम्र वृत्ती धारण करण्यास कशी मदत होईल? सर्वात आधी आपण अशा तीन परिस्थितींवर चर्चा करू, ज्यांत आपल्या नम्रतेची परीक्षा होऊ शकते.—नीति. ११:२.
आपल्या परिस्थितीत बदल होतो तेव्हा
५, ६. बर्जिल्ल्य नम्र होता हे कशावरून दिसून येतं?
५ जेव्हा आपली परिस्थिती किंवा नेमणूक बदलते, तेव्हा आपण जशी प्रतिक्रिया दाखवतो त्यावरून आपण खरंच नम्र आहोत की नाही हे दिसून येतं. याबाबतीत राजा दाविदाच्या एका विश्वासू मित्राचं, बर्जिल्ल्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. जेव्हा बर्जिल्ल्य ८० वर्षांचा होता तेव्हा दाविदाने त्याला आपल्यासोबत राजदरबारात राहावं असं आर्जवलं. हा एक खूप मोठा सन्मान होता. पण तरी बर्जिल्ल्याने ही नेमणूक स्वीकारली नाही. त्याने म्हटलं की ही संधी किम्हाम, जो कदाचित त्याचा मुलगा असावा, त्याला दिली तर बरं राहील.—२ शमु. १९:३१-३७.
६ बर्जिल्ल्याने दाविदाचं आमंत्रण का स्वीकारलं नाही? तो जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत होता का? की, राजदरबाराच्या कामांपासून दूर राहून सोपं आणि सुरळीत जीवन जगण्याची त्याची इच्छा होती? खरंतर, बर्जिल्ल्य नम्र असल्यामुळे त्याने हे आमंत्रण स्वीकारलं नाही. त्याने स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेतली. (गलतीकर ६:४, ५ वाचा.) बर्जिल्ल्याप्रमाणेच आपणही नम्र असण्याची गरज आहे. आपल्याला काय हवं आहे याकडे लक्ष देण्याऐवजी किंवा इतरांसोबत स्वतःची तुलना करण्याऐवजी, यहोवाच्या सेवेत आपण आपलं सर्वोत्तम दिलं पाहिजे. आपल्याकडे एखादी खास नेमणूक असण्यापेक्षा किंवा आपण नावाजलेले असण्यापेक्षा, यहोवाची मनापासून सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? (गलती. ५:२६) आपण जर नम्र असलो तर यहोवाच्या नावाचा गौरव करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी आपल्या बांधवांसोबत मिळून आपण काम करू.—१ करिंथ. १०:३१.
७, ८. स्वतःवर निर्भर राहण्याचं टाळण्यासाठी नम्रपणामुळे आपल्याला कशी मदत होते?
७ आपल्यावर जर जास्त जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या किंवा अधिकार देण्यात आला, तर नम्रता दाखवणं कदाचित कठीण जाऊ शकतं. नहेम्याच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. नहेम्याने जेव्हा ऐकलं की यरुशलेममधील लोक समस्येत आहेत, तेव्हा त्याने मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली. (नहे. १:४, ११) यहोवाने नहेम्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. अर्तहशश्त राजाने नहेम्याला प्रांताधिपती बनवलं. नहेम्या शक्तिशाली आणि श्रीमंत होता. पण तो स्वतःवर निर्भर राहिला नाही. मार्गदर्शनासाठी तो नेहमी यहोवावर अवलंबून राहिला आणि त्याने नियमित रीत्या नियमशास्त्राचं वाचन केलं. (नहे. ८:१, ८, ९) नहेम्याला अनेक लोकांवर अधिकार होता. पण, त्याने त्याच्या अधिकाराचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाय, तो इतरांसोबत कठोरतेनंदेखील वागला नाही.—नहे. ५:१४-१९.
८ नहेम्याप्रमाणेच आपणही नम्र असण्याची गरज आहे. खासकरून, जेव्हा आपल्यावर जास्त जबाबदाऱ्या सोपवण्यात येतात किंवा आपली नेमणूक बदलते तेव्हा. आपण स्वतःच्या अनुभवावर किंवा क्षमतांवर अवलंबून राहू नये. एक व्यक्ती कशा प्रकारे स्वतःवर अवलंबून राहण्यास सुरवात करू शकते? काही उदाहरणं घ्या. मंडळीत काही निर्णय घेण्याआधी किंवा एखाद्या विषयावर चर्चा सुरू करण्याआधी मंडळीतील वडील कदाचित प्रार्थना करणार नाहीत. किंवा मग एखादा बांधव किंवा बहीण आधी निर्णय घेईल, आणि मग नंतर त्या निर्णयावर यहोवाने आशीर्वाद द्यावा म्हणून प्रार्थना करेल. पण, एक नम्र व्यक्ती कधीही स्वतःवर निर्भर राहत नाही; मग ती असं एखादं काम करत असली जे तिने पूर्वी अनेक वेळा केलं असलं तरीही. ती ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवते की तिच्या क्षमतांची तुलना यहोवाच्या क्षमतांशी कधीही करता येणार नाही. (नीतिसूत्रे ३:५, ६ वाचा.) आज जगातील बहुतेक लोक स्वार्थी आहेत आणि त्यांना नेहमी इतरांपेक्षा पुढे जाण्याची इच्छा असते. पण, यहोवाचे सेवक या नात्यानं आपण तसे नाहीत. जबाबदारीमुळे आपण कुटुंबात किंवा मंडळीत इतरांपेक्षा वरचढ बनतो, असं आपण समजत नाही. याउलट, आपण आपल्या बंधुभगिनींसोबत मिळून काम करतो.—१ तीमथ्य ३:१५.
आपली निंदा किंवा प्रशंसा केली जाते तेव्हा
९, १०. आपली निंदा केली जाते तेव्हा नम्रपणामुळे आपल्याला कशी मदत होते?
९ जेव्हा एखादी व्यक्ती आपली निंदा करते किंवा आपली काहीही चूक नसताना आपली थट्टा केली जाते, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटू शकतं. हन्नासोबत असंच घडलं. हन्नाच्या पतीचं तिच्यावर खूप प्रेम होतं. पण तरी हन्ना दुःखी होती. कारण, तिला मुलं हवी होती, पण तिला एकही मूल होत नव्हतं. इतकंच नाही तर, पनिन्ना तिची नेहमी थट्टा करायची आणि तिला घालूनपाडून बोलायची. एक दिवस जेव्हा हन्ना खूप दुःखी होती तेव्हा ती प्रार्थना करण्यासाठी निवासमंडपात गेली. प्रार्थना करत असताना मुख्य याजक एलीने तिला पाहिलं आणि ती नशेत आहे असा आरोप तिच्यावर लावला. या चुकीच्या आरोपामुळे हन्ना त्याच्यावर रागावू शकली असती. पण, असं न करता तिने अगदी आदरपूर्वक एलीला उत्तर दिलं. हन्नाने जी प्रार्थना केली त्यावरून यहोवावरील तिचा विश्वास आणि त्याच्यावर असलेलं तिचं प्रेम दिसून येतं.—१ शमु. १:५-७, १२-१६; २:१-१०.
१० नम्रपणामुळे “बऱ्याने वाइटाला” जिंकण्यासही मदत होते. (रोम. १२:२१) सैतानाचं जग फार दुष्टतेनं भरलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपल्यासोबत कोणी अन्यायीपणे वागतं, तेव्हा त्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटण्याची गरज नाही. हे खरं आहे की त्यामुळे आपल्याला राग येऊ शकतो. पण आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. (स्तो. ३७:१) जेव्हा बंधुभगिनींसोबत आपले काही मतभेद होतात, तेव्हा आपल्याला कदाचित जास्त वाईट वाटू शकतं. पण, अशा वेळी आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. बायबल म्हणतं: “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही.” याउलट, त्याने “यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले.” (१ पेत्र २:२३) येशू नम्र होता आणि अन्यायाची परतफेड करणं हे यहोवाच्या हातात आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. (रोम. १२:१९) आपल्यालाही नम्र असण्याची गरज आहे, आणि “वाइटाबद्दल वाईट” अशी परतफेड करण्याची आपल्यापैकी कोणाचीही इच्छा नाही.—१ पेत्र ३:८, ९.
११, १२. (क) जेव्हा आपली जास्त प्रशंसा केली जाते किंवा मान दिला जातो, तेव्हा आपण नम्र असल्याचं कसं दाखवू शकतो? (ख) आपल्या पेहरावावरून आणि वागण्यावरून आपण नम्र असल्याचं कसं दाखवून देऊ शकतो?
११ आपली खूप जास्त प्रशंसा केली जाते किंवा मान दिला जातो, तेव्हाही आपल्या नम्रतेची परीक्षा होऊ शकते. एस्तेरला देखील खूप प्रशंसा आणि मान मिळाला होता. संपूर्ण पर्शियामध्ये असलेल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी ती एक होती. तिला आणि तिच्यासोबत इतरही अनेक तरुण स्त्रियांना एक पूर्ण वर्ष खास सौंदर्य उपचार देण्यात आले होते. राजा त्यांच्यापैकी एकीला आपली राणी होण्याकरता पसंत करणार होता आणि त्यासाठी त्यांच्यात जणू एक स्पर्धाच चालली होती. राजाने शेवटी एस्तेरला आपली राणी होण्याकरता निवडलं. पण, तिला मिळालेल्या या सन्मानामुळे ती बदलली नाही. ती गर्विष्ठ बनली नाही किंवा ती फक्त स्वतःचाच विचार करू लागली नाही. ती पुढेही नम्र राहिली आणि इतरांशी वागताना तिने नेहमी दयाळूपणा आणि आदर दाखवला.—एस्ते. २:९, १२, १५, १७.
आपल्या पेहरावावरून आपण यहोवाचा आणि इतरांचा आदर करतो हे दिसून येतं का, की आपल्यात नम्रता नाही हे दिसून येतं? (परिच्छेद १२ पाहा)
१२ आपण जर नम्र असलो तर आपल्या पेहरावावरून आणि वागणुकीवरून आपण स्वतःचा आणि इतरांचा आदर करतो हे दिसून येईल. स्वतःची बढाई मारण्याऐवजी किंवा लोकांवर आपली छाप पाडण्याऐवजी, आपण “सौम्य व शांत आत्मा” बाळगण्याचा प्रयत्न करू. (१ पेत्र ३:३, ४ वाचा; यिर्म. ९:२३, २४) आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं हे आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसून येतं. उदाहरणार्थ, आपण जे काम करतो, ज्या गोष्टींची आपल्याला माहिती आहे त्यामुळे, किंवा काही लोकांशी आपली ओळख आहे त्यामुळे आपण विशेष आहोत, असा विचार करण्यास आपण कदाचित इतरांना भाग पडण्याचा प्रयत्न करू शकतो. किंवा मग इतरांनी जरी आपल्याला मदत केली असली तरी एखादी महत्त्वाची गोष्ट आपण स्वतःच्या बळावर केली आहे असं दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. पण, येशूचा विचार करा. आपण किती हुशार आहोत हे तो लोकांना दाखवू शकला असता आणि त्यांच्यावर आपली छाप पाडू शकला असता. पण, असं करण्याऐवजी त्याने नेहमी शास्त्रवचनांचा उल्लेख केला. लोकांनी आपली स्तुती करावी अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती. उलट, सर्व स्तुती आणि गौरव यहोवाला मिळावा अशी त्याची इच्छा होती.—योहा. ८:२८.
निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा
१३, १४. नम्रपणामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास कशी मदत होऊ शकते?
१३ जेव्हा आपण काही निर्णय घेतो, किंवा इतरांनी घेतलेल्या निर्णयांचा आपल्यावर परिणाम होणार असतो, तेव्हाही आपण नम्रपणा दाखवणं गरजेचं आहे. एका उदाहरणावर लक्ष द्या. पौल कैसरीयात होता. पण, त्याला यरुशलेममध्ये जाऊन यहोवाने त्याच्यावर सोपवलेलं काम पूर्ण करायची इच्छा होती. पण, संदेष्टा अगब याने पौलाला सांगितलं की जर तो यरुशलेममध्ये गेला तर त्याला बंदी बनवण्यात येईल. कदाचित त्याला जिवेही मारलं जाऊ शकतं. त्यामुळे बांधवांनी पौलाला तिथं न जाण्याची विनंती केली. पण, तरीसुद्धा यरुशलेमला जाण्याचा आपला निर्णय पौलाने बदलला नाही. या निर्णयावरून पौलाला स्वतःवरच जास्त भरवसा होता असं दिसून येतं का? नाही. पौल नम्र होता आणि त्याचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. पौलाप्रमाणेच ते बांधवदेखील नम्र होते आणि त्यामुळेच त्यांनी पौलाच्या निर्णयाला कबूल केलं आणि त्याला जाऊ दिलं.—प्रे. कृत्ये २१:१०-१४.
१४ नम्रपणामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत होते; मग एखाद्या निर्णयाचे परिणाम जाणून घेणं, किंवा निर्णयाचे चांगले परिणाम घडवून आणणं आपल्या हातात नसतं अशा वेळीही. उदाहरणार्थ, तुम्ही पूर्णवेळेची सेवा सुरू करण्याच्या विचारात असाल. पण अशा वेळी कदाचित तुमच्या मनात काही प्रश्न येतील: समजा पुढे जाऊन मी आजारी पडलो, किंवा माझे आईवडील आजारी पडले आणि त्यांना मदतीची गरज पडली तर काय? किंवा मग वृद्ध झाल्यावर मी माझ्या आर्थिक आणि इतर गरजा कशा भागवणार? या प्रश्नांवर कितीही विचार केला आणि यासाठी कितीही प्रार्थना केली, तरी त्यांची उत्तरं आपल्याला पूर्णपणे मिळणं शक्य नाही. (उप. ८:१६, १७) पण, जेव्हा आपण यहोवावर भरवसा ठेवतो तेव्हा आपल्याला आपल्या मर्यादा ओळखण्यास आणि त्यांचा स्वीकार करण्यास मदत होते. आपल्यात नम्रता असेल तर आपण वस्तुस्थितीचा विचार करू, इतरांकडे सल्ला मागू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शनासाठी प्रार्थना करू. तसंच, यहोवाच्या पवित्र आत्म्याद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं आपण पालन करू. (उपदेशक ११:४-६ वाचा.) असं केल्यामुळे यहोवा आपल्या निर्णयांवर आशीर्वाद देईल, किंवा आपल्याला आपल्या योजनांमध्ये योग्य ते बदल करण्यास मदत करेल.—नीति. १६:३, ९.
आणखी जास्त नम्र वृत्ती धारण करण्यास आपल्याला कशी मदत होईल?
१५. यहोवा देवाच्या व्यक्तिमत्वावर मनन केल्याने आपल्याला नम्र राहण्यास कशी मदत होते?
१५ नम्रतेचा गुण आणखी जास्त प्रमाणावर विकसित करण्यासाठी आपल्याला मदत होईल अशा चार मार्गांवर आता आपण चर्चा करू. सर्वात पहिला मार्ग म्हणजे, आपण यहोवा देवाबद्दल अर्थात तो कशा प्रकारची व्यक्ती आहे यावर मनन करण्याची गरज आहे. आपण जेव्हा आपली तुलना यहोवाशी करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की त्याच्यासमोर आपण किती लहान आहोत आणि आपल्याला किती कमी ज्ञान आहे. (यश. ८:१३) तसंच, आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण सर्वशक्तिमान देवासोबत चालत आहोत एखाद्या मानवासोबत किंवा स्वर्गदूतासोबत नाही. या गोष्टींवर मनन केल्याने आपल्याला नम्र बनण्यास आणि “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन” होण्यास मदत मिळेल.—१ पेत्र ५:६.
१६. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावर मनन केल्यास आपल्याला नम्र राहण्यास कशी मदत होते?
१६ दुसरा मार्ग म्हणजे, यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे या गोष्टीवर आपण मनन केलं पाहिजे. यामुळेही आपल्याला जास्त प्रमाणावर नम्र वृत्ती विकसित करण्यास मदत होईल. पौलाने मंडळीची तुलना मानवी शरीराशी केली. यहोवाने शरीराची निर्मिती अशा प्रकारे केली आहे, की त्यातील प्रत्येक भाग महत्त्वपूर्ण ठरेल. (१ करिंथ. १२:२३) त्याच प्रकारे आपल्यापैकी प्रत्येक जण यहोवासाठी मौल्यवान आहे. यहोवा आपली तुलना इतरांसोबत कधीही करत नाही. तसंच, आपल्या हातून जेव्हा चूक घडते तेव्हाही तो आपल्यावर प्रेम करण्याचं थांबवत नाही. आणि यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे ही जाणीव असल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटतं.
१७. इतरांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित केल्यास आपल्याला कशी मदत होते?
१७ तिसरी गोष्ट म्हणजे इतरांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करणं. इतरांचं लक्ष नेहमी स्वतःकडे वेधण्याऐवजी किंवा काय केलं पाहिजे हे त्यांना सांगण्याऐवजी, आपण त्यांच्याकडे सल्ला मागू आणि ते जे सुचवतात त्यानुसार करण्याचा प्रयत्न करू. (नीति. १३:१०) जेव्हा आपल्या एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला काही खास नेमणूक मिळते, तेव्हा त्यासाठी आपण आनंद व्यक्त करू. तसंच, यहोवाने आपल्या सर्वांना त्याची सेवा करण्याची जी संधी दिली आहे त्यासाठी आपण नेहमी त्याचे आभार मानू.—१ पेत्र ५:९.
१८. आपल्या विवेकाला प्रशिक्षित केल्यास आपल्याला आणखी जास्त प्रमाणावर नम्रता विकसित करण्यास कशी मदत होते?
१८ चौथी गोष्ट म्हणजे, बायबल तत्त्वांच्या आधारावर आपल्या विवेकाला प्रशिक्षित केल्यासही आपल्याला जास्त प्रमाणावर नम्रता विकसित करण्यास मदत होते. या तत्त्वांमुळे यहोवाची विचारसरणी समजून घ्यायला आपल्याला मदत होते. जेव्हा आपण यहोवाच्या दृष्टिकोनाने विचार करतो, तेव्हा त्याचं मन आनंदित होईल असे निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते. आपण जेव्हा अभ्यास करतो, प्रार्थना करतो आणि शिकलेल्या गोष्टींना आपल्या जीवनात लागू करतो तेव्हा आपला विवेक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होतो. (१ तीम. १:५) तसंच, आपण स्वतःला नाही तर इतरांना महत्त्व देण्याचं शिकतो. आपण जर या गोष्टी करत असलो, तर आपलं प्रशिक्षण पूर्ण करण्याचं अभिवचन यहोवा आपल्याला देतो. यात अधिक प्रमाणात नम्रता विकसित करण्यास आपल्याला मदत पुरवणंही समाविष्ट आहे.—१ पेत्र ५:१०.
१९. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला नेहमी नम्र राहण्यास मदत होईल?
१९ लेखाच्या सुरवातीला यहूदामधील ज्या संदेष्ट्याबद्दल आपण चर्चा केली, तो संदेष्टा तुम्हाला आठवतो का? तो नम्रता दाखवण्यास चुकला आणि त्यामुळे त्याने यहोवासोबत असलेली त्याची मैत्रीच नाही तर आपला जीवही गमावला. पण, यहोवाच्या इतर विश्वासू सेवकांनी नम्रता दाखवण्याच्या बाबतीत मांडलेल्या उत्तम उदाहरणावरून ही गोष्ट सिद्ध होते, की कठीण परिस्थितीतही आपण नम्रता दाखवू शकतो. यहोवाच्या सेवेत आपण जितकी जास्त वर्षं घालवतो, तितक्याच जास्त प्रमाणावर नम्र राहून त्याच्यावर निर्भर राहण्याचं शिकणं आपल्यासाठी गरजेचं आहे. (नीति. ८:१३) आपली परिस्थिती कशीही असली तरी आपण यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहू शकतो. आपल्याला मिळालेला हा सर्वात मोठा सन्मान आहे. त्यामुळे, नम्र राहून यहोवासोबत चालत राहण्यासाठी आपण सर्व जण आपल्या परीने पुरेपूर मेहनत घेत राहू या.