वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 जानेवारी पृ. १७-२१
  • नम्र असणं गरजेचं का आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नम्र असणं गरजेचं का आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नम्र असणं गरजेचं का आहे?
  • नम्रतेमध्ये काय गोवलेलं आहे?
  • देवाच्या व्यवस्थेतील तुमचं स्थान
  • नम्रता दाखवणं म्हणजे नेमकं काय?
  • “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • शांतिमय संबंधांना पोषक असणारा गुण—विनयशीलता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • नम्र राहा आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 जानेवारी पृ. १७-२१
शमुवेल शौल राजाला त्याची चूक लक्षात आणून देत आहे

नम्र असणं गरजेचं का आहे?

“नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते.”—नीति. ११:२.

गीत क्रमांक: ३८, ११

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

  • नम्रपणा गरजेचा का आहे?

  • नम्र असण्यात काय गोवलेलं आहे?

  • यहोवाच्या सेवेत आपण समाधानी कसं राहू शकतो?

१, २. एके काळी नम्र असलेल्या व्यक्‍तीचा यहोवाने नंतर त्याग का केला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवाने जेव्हा शौलाला राजा बनण्यासाठी निवडलं, तेव्हा तो एक नम्र व्यक्‍ती होता. (१ शमु. ९:१, २, २१; १०:२०-२४) पण, राजा बनल्यानंतर मात्र तो गर्विष्ठ झाला. एका प्रसंगी हजारो पलिष्टी लोक इस्राएलसोबत युद्ध करण्यासाठी जमा झाले. शमुवेल संदेष्ट्याने शौलाला सांगितलं होतं, की तो येईल आणि यहोवापुढे बलिदान अर्पण करेल. पण, शमुवेलाला पोहचायला उशीर झाला. त्यामुळे इस्राएली लोक घाबरले आणि त्यांच्यापैकी अनेक जण शौलाला सोडून गेले. शौलदेखील अधीर झाला आणि शमुवेलाची वाट पाहण्याऐवजी त्याने स्वतःच बलिदान अर्पण केलं. असं करण्याचा शौलाला कोणताही अधिकार नव्हता, त्यामुळे यहोवा त्याच्यावर नाराज झाला.—१ शमु. १३:५-९.

२ शौलाने यहोवाची आज्ञा मोडली होती. त्यामुळे शमुवेल जेव्हा तिथं पोहचला तेव्हा त्याने त्याला त्याची चूक दाखवून दिली. पण, आपण काही चुकीचं केलं आहे असं मानण्यास शौल मुळीच तयार झाला नाही. याउलट, तो कारणं शोधू लागला आणि आपल्या कृतीसाठी त्याने इतरांनाही दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. (१ शमु. १३:१०-१४) तेव्हापासून शौल अधिकच गर्विष्ठ बनत गेला आणि त्याने बरीच चुकीची कार्यं केली. त्यामुळे यहोवाने राजा म्हणून त्याला नाकारलं. (१ शमु. १५:२२, २३) शौलाच्या जीवनाची सुरवात चांगली झाली होती, पण त्याचा अंत मात्र खूप वाईट झाला.—१ शमु. ३१:१-६.

३. (क) नम्र असण्याबाबतीत लोकांचा दृष्टिकोन कसा आहे? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

३ आज जगातील बऱ्‍याच लोकांना असं वाटतं की, जीवनात यश मिळवायचं असेल तर नम्र राहून चालणार नाही. इतरांपेक्षा आपण चांगले आहोत हे दाखवण्यासाठी ते स्वतःची बढाई मारतात. उदाहरणार्थ, एक प्रसिद्ध नट आणि राजकारणी असं म्हणतो: “विनयशीलतेचा आणि माझा दूरवर कोणताही संबंध नाही, आणि मला वाटतं तो कधीही असणार नाही.” जगातील लोकांचा असा दृष्टिकोन असला, तरी ख्रिस्ती या नात्यानं आपण नम्र असणं गरजेचं आहे. पण हे गरजेचं का आहे? आणि नम्रता दाखवण्यात काय गोवलेलं आहे? या प्रश्‍नांची उत्तरं आपण या लेखात पाहणार आहोत. आणि कठीण परिस्थितींतही आपण नम्रता कशी दाखवू शकतो, हे आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

नम्र असणं गरजेचं का आहे?

४. धिटाईने किंवा गर्विष्ठपणाने केलेली पातकं म्हणजे काय?

४ गर्विष्ठपणा हा नम्रतेपेक्षा अगदी वेगळा कसा आहे, हे बायबल आपल्याला दाखवून देतं. (नीतिसूत्रे ११:२ वाचा.) दाविदाने यहोवाजवळ अशी विनंती केली की, “धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर.” (स्तो. १९:१३) पण, धिटाईने किंवा गर्विष्ठपणाने केलेली पातकं म्हणजे काय? यात अशी काही गोष्ट किंवा कार्य करणं समाविष्ट आहे जे करण्याचा आपल्याला अधिकार नाही; विशेषतः अधीर होऊन किंवा गर्वामुळे केलेलं कार्य. अपरिपूर्ण असल्याकारणाने आपण सर्वांनीच कधी ना कधी गर्विष्ठपणे काही गोष्टी नक्कीच केल्या असतील. पण, शौलाच्या उदाहरणावरून आपण शिकतो की, जर अधीर होऊन किंवा गर्विष्ठपणे कार्य करत राहण्याची आपल्याला सवयच लागली, तर यहोवा नाराज होईल. स्तोत्र ११९:२१ यात म्हटलं आहे की, यहोवा गर्विष्ठांना धमकावतो. तो असं का करतो?

५. गर्विष्ठपणे केलेलं कार्य एक गंभीर चूक आहे असं का म्हणता येईल?

५ सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गर्विष्ठपणे एखादी गोष्ट करतो, तेव्हा आपण आपला देव आणि शासक यहोवा याचा अनादर करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, जे करण्याचा आपल्याला अधिकार नाही ते जर आपण केलं, तर इतरांसोबत आपले मतभेद आणि भांडणं होऊ शकतात. (नीति. १३:१०) आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण केलेली चूक जेव्हा इतरांच्या लक्षात येईल, तेव्हा गर्विष्ठपणे केलेल्या कार्याची कदाचित आपल्यालाच लाज वाटेल. (लूक १४:८, ९) आपण नम्र असावं अशी अपेक्षा यहोवा का करतो हे या कारणांवरून स्पष्टपणे दिसून येतं.

नम्रतेमध्ये काय गोवलेलं आहे?

६, ७. नम्र असलेली ख्रिस्ती व्यक्‍ती कशी व्यवहार करते?

६ नम्र असलेली ख्रिस्ती व्यक्‍ती इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानते; तिच्यामध्ये गर्व नसतो. (फिलिप्पै. २:३) ती स्वतःच्या मर्यादांची जाणीव ठेवते, आणि नम्रपणे स्वतःच्या चुकादेखील स्वीकारते. इतर जण जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपले विचार आणि मत व्यक्‍त करतात, तेव्हा ती त्यांचं ऐकून घेते आणि त्यापासून शिकते. नम्र असलेली ख्रिस्ती व्यक्‍ती यहोवाचं मन आनंदित करते.

७ बायबल आपल्याला सांगतं की, नम्र असलेली व्यक्‍ती स्वतःच्या मर्यादा ओळखते. कोणत्या गोष्टी आपण करू शकतो आणि कोणत्या गोष्टी करण्याची आपल्यामध्ये क्षमता नाही किंवा आपल्याला अधिकार नाही, हे ती चांगल्या प्रकारे ओळखते. यामुळे तिला इतरांना आदर देण्यासाठी आणि त्यांच्याशी दयाळूपणे व्यवहार करण्यासाठी मदत होते.

८. नम्र राहण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची वृत्ती टाळली पाहिजे?

८ पण कधीकधी अजाणतेत आपण गर्विष्ठपणे विचार करू लागण्याचा धोका आहे. हे कसं घडू शकतं? कदाचित मंडळीत आपण एखादी जबाबदारी हाताळत असू किंवा एखाद्या जबाबदार बांधवासोबत आपली जवळची मैत्री असेल. अशा वेळी कदाचित आपण स्वतःला इतरांपेक्षा जास्त महत्त्व देऊ लागू. (रोम. १२:१६) किंवा आपण इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करू. (१ तीम. २:९, १०) किंवा मग इतरांनी काय करावं आणि काय करू नये हे कदाचित आपण त्यांना सांगायला लागू.—१ करिंथ. ४:६.

९. अशा कोणत्या काही गोष्टी आहेत ज्यांमुळे काही जण गर्विष्ठपणे वागले? उदाहरण द्या.

९ जर आपण आपल्या चुकीच्या इच्छांवर ताबा मिळवला नाही, तर आपण गर्विष्ठपणे वागायला लागू शकतो. प्रशंसा मिळवण्यासाठी, इतरांचा हेवा वाटत असल्यामुळे किंवा राग आवरता आला नाही म्हणून अनेकांनी गर्विष्ठपणे कार्यं केली आहेत. बायबल काळातील काही जणांच्या उदाहरणांकडे लक्ष द्या. अबशालोम, उज्जीया, आणि नबुखदनेस्सर ही त्यांपैकी काही उदाहरणं आहेत. त्यांनी स्वतःला नम्र करावं अशी ताकीद यहोवाने त्यांना दिली होती.—२ शमु. १५:१-६; १८:९-१७; २ इति. २६:१६-२१; दानी. ५:१८-२१.

१०. इतरांच्या हेतूंवर आपण शंका का घेऊ नये? उदाहरण देऊन सांगा.

१० लोक कधीकधी नम्रपणे वागत नाहीत याची इतरही काही कारणं असू शकतात. अबीमलेख आणि पेत्र यांच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. (उत्प. २०:२-७; मत्त. २६:३१-३५) ते गर्विष्ठ होते का? की काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे त्यांनी कार्य केलं? किंवा मग विचार न करता त्यांनी कार्य केलं? इतरांच्या मनात काय आहे हे समजण्याची क्षमता आपल्यात नाही. त्यामुळे आपण कधीही इतरांच्या हेतूंवर शंका घेण्याचा प्रयत्न करू नये.—याकोब ४:१२ वाचा.

देवाच्या व्यवस्थेतील तुमचं स्थान

११. आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

११ देवाच्या व्यवस्थेत आपली काय भूमिका आहे हे एक नम्र व्यक्‍ती चांगल्या रीतीने ओळखते. यहोवा हा व्यवस्थेचा देव आहे आणि त्याच्या व्यवस्थेत प्रत्येक व्यक्‍तीला स्थान आहे. मंडळीत प्रत्येक व्यक्‍तीची एक महत्त्वाची भूमिका आहे. यहोवाने आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या देणग्या, कौशल्यं आणि क्षमता दिल्या आहेत. आपण जर नम्र असलो, तर या देणग्यांचा यहोवाच्या इच्छेनुसार वापर करू. (रोम. १२:४-८) यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो की या देणग्यांचा वापर आपण त्याच्या नावाचा आदर करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी करावा.—१ पेत्र ४:१० वाचा.

येशू निर्मितीमध्ये मदत करताना, मानव म्हणून त्याचा जन्म झाला तेव्हा, शिष्यांना शिकवताना, त्याचा मृत्यू झाला तेव्हा, राजा या नात्याने राज्य करताना

नवीन नेमणूक मिळण्याच्या बाबतीत आपण येशूच्या उदाहरणावरून काय शिकू शकतो? (परिच्छेद १२-१४ पाहा)

१२, १३. यहोवाच्या सेवेत जेव्हा आपल्याला काही बदल अनुभवावे लागतात तेव्हा आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१२ पण, यहोवाच्या सेवेत आपण जी भूमिका निभावतो ती काही काळाने बदलू शकते. येशूच्या उदाहरणाचाच विचार करा. त्यानेही अनेक बदल अनुभवले. सर्वात आधी तो एकटाच आपल्या पित्यासोबत होता. (नीति. ८:२२) नंतर, त्याने देवदूतांची, विश्‍वाची आणि मानवांची निर्मिती करण्यासाठी यहोवाला मदत केली. (कलस्सै. १:१६) मग, त्याला पृथ्वीवर पाठवण्यात आलं. तो एक लहान मूल म्हणून जन्माला आला आणि नंतर एक प्रौढ व्यक्‍ती बनला. (फिलिप्पै. २:७) त्याच्या मृत्यूनंतर तो पुन्हा स्वर्गात गेला. आणि १९१४ मध्ये देवाच्या राज्याचा राजा बनला. (इब्री २:९) तसंच, भविष्यात हजार वर्षं राज्य केल्यानंतर तो त्याचं राज्य पुन्हा यहोवाला सोपवून देईल. मग “देव सर्वांना सर्वकाही” होईल.—१ करिंथ. १५:२८.

१३ आपल्यालाही कदाचित जीवनात बरेच बदल अनुभवावे लागू शकतात. कधीकधी आपल्या स्वतःच्या निर्णयांमुळे आपल्या जबाबदाऱ्‍या बदलू शकतात. उदाहरणार्थ, कदाचित तुम्ही अविवाहित असाल, पण आता तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल. किंवा मग तुम्हाला मुलं झाली असतील. पण नंतर, पूर्णवेळेची सेवा करता यावी म्हणून जीवनात काही बदल करण्याचा निर्णय कदाचित तुम्ही घ्याल. काही वेळा आपल्या परिस्थितीमुळे आपल्या जबाबदाऱ्‍या बदलू शकतात. त्यामुळे आपल्याला यहोवाची जास्त प्रमाणावर सेवा करणं कधी शक्य होतं तर कधी नाही. पण आपण तरुण असो अथवा वृद्ध, आपलं आरोग्य चांगलं असो अथवा खराब आपण यहोवाची उत्तम रीत्या सेवा कशी करू शकतो हे तो जाणतो. आणि आपल्याला जितकं करणं शक्य आहे त्यापेक्षा जास्त करण्याची अपेक्षा तो आपल्याकडून करत नाही. यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो ती पाहून त्याला खरोखर आनंद होतो.—इब्री ६:१०.

१४. नम्र वृत्तीमुळे एका व्यक्‍तीला कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि समाधानी राहण्यास कशी मदत होते?

१४ यहोवाने दिलेल्या प्रत्येक नेमणुकीत येशू आनंदी होता आणि आपणही त्याच्याप्रमाणे प्रत्येक नेमणुकीत आनंद मिळवू शकतो. (नीति. ८:३०, ३१) एक नम्र व्यक्‍ती मिळालेल्या नेमणुकीत आणि जबाबदारीत समाधानी असते. इतर जण काय करत आहेत त्यावर ती आपलं लक्ष केंद्रित करत नाही. याउलट, देवाच्या संघटनेत तिची जी भूमिका आहे त्यावर ती आपलं लक्ष केंद्रित करते. तिला मिळालेली जबाबदारी ही यहोवाकडून आहे हे ती लक्षात ठेवते. नम्र व्यक्‍ती दुसऱ्‍यांचा आदर करते आणि त्यांना मदत करण्यास नेहमी तयार असते. त्यांना मिळालेली नेमणूकही यहोवाकडूनच आहे हे ती नेहमी लक्षात ठेवते.—रोम. १२:१०.

नम्रता दाखवणं म्हणजे नेमकं काय?

१५. नम्रतेच्या बाबतीत गिदोनाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

१५ नम्रता दाखवण्याच्या बाबतीत गिदोनाचं खूप चांगलं उदाहरण आहे. मिद्यानी लोकांपासून इस्राएली लोकांचा बचाव करण्याची जबाबदारी जेव्हा यहोवाने त्याला दिली तेव्हा तो म्हणाला: “माझे कूळ मनश्‍शे वंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलाच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.” (शास्ते ६:१५) पण, गिदोनाने यहोवावर भरवसा ठेवला आणि ही जबाबदारी स्वीकारली. यहोवाची त्याच्याकडून काय अपेक्षा आहे हे गिदोनाने चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मार्गदर्शनासाठी त्याच्याकडे प्रार्थना केली. (शास्ते ६:३६-४०) गिदोन हा धाडसी होता. पण त्यासोबतच तो हुशार आणि समजूतदार देखील होता. (शास्ते ६:११, २७) जेव्हा लोकांनी त्याला सांगितलं की त्याने त्यांच्यावर राज्य करावं तेव्हा तो तयार झाला नाही. यहोवाने त्याला दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यावर तो पुन्हा त्याच्या घरी परतला.—शास्ते ८:२२, २३, २९.

१६, १७. एक नम्र बांधव आध्यात्मिक रीत्या प्रगती कशी करू शकतो?

१६ आज जर एखाद्या बांधवाने नवीन नेमणूक स्वीकारली किंवा मंडळीत अधिक प्रमाणात सेवा करण्याची इच्छा बाळगली, तर तो गर्विष्ठ आहे असा त्याचा अर्थ होतो का? नक्कीच नाही. बायबल आपल्याला सांगतं की, आपल्या बांधवांची अधिक सेवा करण्याची इच्छा बाळगणं आणि त्यासाठी आध्यात्मिक प्रगती करणं हे यहोवाच्या सेवकांसाठी चांगलं आहे. (१ तीम. ४:१३-१५) पण याचा अर्थ असा आहे का, की आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एखाद्याला नवीन नेमणूक मिळणं हे गरजेचं आहे? नाही. आपण सर्व जण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा करत राहू शकतो. तसंच यहोवाने आपल्या प्रत्येकाला जी कौशल्यं आणि क्षमता दिल्या आहेत, त्यांचा वापर आपण त्याच्या सेवेमध्ये आणि इतरांच्या मदतीसाठी अधिक चांगल्या रितीने करण्याचा प्रयत्न करू शकतो.

१७ पण एखादी नेमणूक स्वीकारण्याआधी, एक बांधव हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की त्याच्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा केली जाईल. तो यहोवाकडे प्रार्थना करेल आणि हेदेखील तपासून पाहील की त्या अपेक्षा तो पूर्ण करू शकतो किंवा नाही. नेमणूक स्वीकारल्यानंतर इतरही दुसऱ्‍या महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ उरेल का, याचाही तो चांगला विचार करेल. जर या नवीन नेमणुकीमुळे इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ उरत नसेल, तर सध्या तो हाताळत असलेल्या जबाबदाऱ्‍यांपैकी काही जबाबदाऱ्‍या इतरांवर सोपवू शकतो का याचाही विचार तो करेल. या सर्व गोष्टींवर चांगला विचार केल्यानंतर नम्र असलेल्या बांधवाला कदाचित हे जाणवेल की, नवीन नेमणुकीद्वारे केल्या जाणाऱ्‍या अपेक्षा आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी तो एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे नेमणूक न स्वीकारण्याचा निर्णय कदाचित तो घेईल. आपणही जर नम्र असू आणि स्वतःच्या मर्यादा व क्षमता चांगल्या प्रकारे ओळखत असू, तर कदाचित आपणही नवीन नेमणूक न स्वीकारण्याचा निर्णय घेऊ.

१८. (क) जेव्हा एखादी नवीन नेमणूक मिळते तेव्हा नम्र असलेली व्यक्‍ती काय करते? (ख) रोमकर १२:३ आपल्याला नम्र राहण्यास कशी मदत करतं?

१८ आपण यहोवासोबत राहून “नम्रभावाने” चालावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (मीखा ६:८) त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादी नवीन नेमणूक दिली जाते, तेव्हा गिदोनाप्रमाणे आपणही यहोवाकडे मार्गदर्शन आणि मदत मागितली पाहिजे. यहोवा देव आपल्याला त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे देत असलेल्या मार्गदर्शनावर आपण मनन केलं पाहिजे. आपण ही गोष्टी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या स्वतःच्या क्षमतांमुळे नाही, तर यहोवाच्या नम्रतेमुळे आणि आपल्याला मदत करण्याच्या त्याच्या इच्छेमुळे आपल्याला “थोरवी प्राप्त” होते. (स्तो. १८:३५) एक नम्र व्यक्‍ती कधीही “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक” समजत नाही.—रोमकर १२:३ वाचा.

१९. नम्र असणं का गरजेचं आहे?

१९ यहोवा हा निर्माणकर्ता आणि सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे सर्व गौरव त्याला दिला पाहिजे, या गोष्टीची जाणीव एक नम्र व्यक्‍ती नेहमी ठेवते. (प्रकटी. ४:११) जर आपल्यात नम्रता असेल तर यहोवाच्या सेवेमध्ये आपण जे काही करत आहोत त्यात आपण आनंदी राहू. आपल्या बंधुभगिनींच्या विचारांचा आणि त्यांच्या भावनांचा आपण आदर करू. याचा परिणाम म्हणजे बंधुभगिनींमध्ये ऐक्य निर्माण होईल. कोणतीही गोष्ट करण्याआधी एक नम्र व्यक्‍ती चांगला विचार करते. त्यामुळे गंभीर चुका होण्यापासून ती बचावते. तसंच, जे नम्र आहेत त्यांना यहोवा मौल्यवान लेखतो. या सर्व कारणांमुळे देवाच्या लोकांसाठी नम्रता हा गुण फार महत्त्वाचा आहे. पुढील लेखात आपण पाहू की, एखाद्या परिस्थितीत नम्रता दाखवणं कठीण असतानाही आपण नम्रता कशी दाखवू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा