येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्यावर कोणता प्रभाव पडतो?
“तो उठला आहे.”—मत्त. २८:६.
१, २. (क) धर्मगुरूंना काय जाणून घ्यायचे होते, आणि पेत्राने त्यांना कसे उत्तर दिले? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) पेत्र त्या वेळी धैर्य का दाखवू शकला?
येशूचा मृत्यू झाला त्याच्या काही दिवसांनंतर प्रेषित पेत्राला विरोधकांच्या एका जमावापुढे उभे करण्यात आले. हे विरोधी मोठमोठ्या पदांवर असलेले, शक्तिशाली यहूदी धर्मगुरू होते. त्यांनीच कट रचून येशूचा मृत्यू घडवून आणला होता. ते पेत्राला जाब विचारण्यासाठी तेथे एकत्र जमले होते. कारण पेत्राने जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला बरे केले होते. त्याने हा चमत्कार कोणाच्या शक्तीने किंवा नावाने केला होता हे त्यांना जाणून घ्यायचे होते. प्रेषित पेत्राने अगदी धैर्याने त्यांना उत्तर दिले: “ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे.”—प्रे. कृत्ये ४:५-१०.
२ काही काळाआधीच पेत्राने लोकांच्या भीतीमुळे येशूला तीन वेळा नाकारले होते. (मार्क १४:६६-७२) तर मग, आता या धर्मगुरूंना उत्तर देण्याचे धैर्य त्याच्यात कोठून आले? देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला मदत केली यात शंकाच नाही. पण, येशूचे पुनरुत्थान झाले आहे याबद्दल पेत्राला जी पक्की खात्री होती त्यामुळेही त्याला धैर्य दाखवण्यास मदत झाली. येशू जिवंत असल्याची या प्रेषिताला इतकी पक्की खात्री का होती? आपणही अशीच खात्री का बाळगू शकतो?
३, ४. (क) प्रेषितांचा जन्म होण्याआधी पुनरुत्थानाच्या कोणत्या घटना घडल्या होत्या? (ख) येशूने कोणाचे पुनरुत्थान केले?
३ मृतांना पुन्हा जिवंत केले जाऊ शकते हे येशूच्या प्रेषितांना माहीत होते. कारण त्यांचा जन्म होण्यापूर्वीही पुनरुत्थानाच्या घटना घडल्या होत्या. देवाने एलीया आणि अलीशा या संदेष्ट्यांना असे चमत्कार करण्याची शक्ती दिली होती हे प्रेषितांना माहीत होते. (१ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७) त्यांना हेसुद्धा ठाऊक होते, की कबरेत टाकण्यात आलेल्या एका मृत माणसाच्या शरीराला अलीशाच्या हाडांचा स्पर्श होताच तो माणूस जिवंत झाला होता. (२ राजे १३:२०, २१) देवाचे वचन सत्य असल्याचा आज आपल्याला ज्या प्रकारे भरवसा आहे त्याच प्रकारे शास्त्रवचनांतील या अहवालांवर सुरुवातीच्या ख्रिश्चनांचा भरवसा होता.
४ येशूने केलेल्या पुनरुत्थानांचे बायबलमधील अहवाल खूप हृदयस्पर्शी आहेत हे तुम्हीही नक्कीच मान्य कराल. येशूने विधवेच्या एकुलत्या एका मुलाला जेव्हा जिवंत केले तेव्हा ती किती थक्क झाली असेल! (लूक ७:११-१५) तसेच, येशूने १२ वर्षांच्या एका मुलीचेही पुनरुत्थान केले होते. दुःखाच्या सागरात बुडालेल्या तिच्या आईवडिलांनी जेव्हा जिवंत झालेल्या आपल्या मुलीला पाहिले असेल तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नसेल! (लूक ८:४९-५६) आणि, जेव्हा जिवंत झालेला लाजर कबरेतून बाहेर आला तेव्हा त्याला पाहणाऱ्या लोकांना किती आश्चर्य वाटले असेल याचीही आपण कल्पना करू शकतो.—योहा. ११:३८-४४.
येशूचे पुनरुत्थान वेगळे का होते?
५. येशूचे पुनरुत्थान त्याच्या आधी झालेल्या पुनरुत्थानांपेक्षा कशा प्रकारे वेगळे होते?
५ प्रेषितांना माहीत होते की येशूचे पुनरुत्थान हे त्याच्या आधी झालेल्या पुनरुत्थानांपेक्षा वेगळे होते. ज्यांचे आधी पुनरुत्थान झाले होते त्यांना हाडामांसाच्या शरीरात जिवंत करण्यात आले आणि कालांतराने ते पुन्हा मरण पावले. पण, येशूला अविनाशी आत्मिक शरीर देऊन जिवंत करण्यात आले. (प्रेषितांची कृत्ये १३:३४ वाचा.a) पेत्राने लिहिले की येशू “देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला.” तसेच, पेत्राने असेही लिहिले की तो “देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.” (१ पेत्र ३:१८-२२) आधीची पुनरुत्थाने आश्चर्यकारक व चमत्कारिक असली, तरी त्यांच्या तुलनेत येशूचे पुनरुत्थान श्रेष्ठ होते.
६. येशूच्या पुनरुत्थानाचा त्याच्या शिष्यांवर कसा परिणाम झाला?
६ येशूच्या पुनरुत्थानाचा त्याच्या शिष्यांवर जबरदस्त प्रभाव पडला. येशू अजूनही मेलेल्या अवस्थेत आहे असे त्याच्या शत्रूंना वाटत होते. पण, हे खरे नव्हते. येशूचे पुनरुत्थान झाले होते. तो शक्तिशाली आत्मिक व्यक्ती म्हणून जिवंत झाला होता आणि आता त्याला इजा पोचवणे कोणत्याही मानवाला शक्य नव्हते. त्याच्या पुनरुत्थानामुळे हे सिद्ध झाले की तो देवाचा पुत्र आहे. यामुळे, शिष्यांचे मनोबल वाढले. त्यांच्या मनातील अतोनात दुःख आता आनंदात बदलले होते. इतकेच नाही तर त्यांच्या मनातील भीतीची जागा आता धैर्याने घेतली होती. खरोखर, यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत येशूच्या पुनरुत्थानाची खूप महत्त्वाची भूमिका होती. तसेच, जगभरात सांगितल्या जात असलेल्या सुवार्तेत येशूच्या पुनरुत्थानाला महत्त्वाचे स्थान होते.
७. येशू आज काय करत आहे, आणि आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
७ यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की येशू हा फक्त इतिहासात होऊन गेलेला एक महापुरुषच नाही; तर, तो आज जिवंत असून अशा एका कामाचे नेतृत्व करत आहे ज्याचा पृथ्वीवरील प्रत्येकाच्या जीवनाशी संबंध आहे. येशू आज देवाच्या स्वर्गातील राज्यात राज्य करत आहे. आणि तो लवकरच सर्व दुष्टता काढून पृथ्वीला नंदनवनात रूपांतरित करेल. या नंदनवनात लोक सदासर्वकाळ जगतील. (लूक २३:४३) पण, जर येशूचे पुनरुत्थान झाले नसते तर यांपैकी कोणतीही गोष्ट घडणे शक्य होते का? मुळीच नाही. येशूचे पुनरुत्थान झाल्यामुळेच, या सर्व गोष्टी पूर्ण होतील असा भरवसा आपण बाळगू शकतो. पण, येशूचे खरोखरच पुनरुत्थान झाले आहे अशी खात्री बाळगण्याची कोणती कारणे आपल्याजवळ आहेत? आणि, येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्याकरता काय अर्थ होतो?
यहोवा पुनरुत्थान करण्याचे त्याचे सामर्थ्य दाखवतो
८, ९. (क) येशूच्या कबरेबाहेर पहारा दिला जावा अशी विनंती यहूदी धर्मगुरुंनी का केली? (ख) स्त्रिया कबरेजवळ आल्या तेव्हा काय घडले?
८ येशूला जिवे मारण्यात आले त्यानंतर मुख्य याजक आणि परूशी पिलाताकडे आले आणि त्याला म्हणाले: “महाराज, तो ठक जिवंत असता तीन दिवसांनंतर मी उठेन असे म्हणाला होता, याची आम्हाला आठवण आहे; म्हणून तिसऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे असे लोकांस सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.” पिलाताने त्यांना सांगितले: “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” तेव्हा, त्यांनी तसेच केले.—मत्त. २७:६२-६६.
९ येशूचे शरीर खडकात खोदलेल्या एका कबरेत ठेवण्यात आले होते आणि कबरेचे तोंड एका मोठ्या धोंडेने बंद करण्यात आले होते. येशूने त्या कबरेत तशाच मृत अवस्थेत राहावे अशी यहूदी धर्मगुरुंची इच्छा होती. पण, यहोवाच्या मनात काही वेगळेच होते. तिसऱ्या दिवशी जेव्हा मग्दालीया मरीया व दुसरी मरीया कबरेजवळ आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की कबरेवरील धोंड बाजूला लोटलेली आहे आणि त्या धोंडेवर एक देवदूत बसलेला आहे. त्या देवदूताने या स्त्रियांना कबरेत पाहण्यास सांगितले. कबर रिकामी होती. देवदूत त्यांना म्हणाला: “तो येथे नाही” कारण “तो उठला आहे.” (मत्त. २८:१-६) येशू जिवंत झाला होता!
१०. पौलाने येशूच्या पुनरुत्थानाच्या कोणत्या पुराव्यांचा उल्लेख केला?
१० येशूचे पुनरुत्थान झाले आहे हे पुढील ४० दिवसांदरम्यान घडलेल्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले. या घटनांविषयी प्रेषित पौलाने करिंथच्या मंडळीला असे लिहिले: “मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले; आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला; त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांतील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत; त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला; आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला.”—१ करिंथ. १५:३-८.
येशूचे पुनरुत्थान झाले अशी खात्री बाळगण्याची कारणे
११. येशूचे पुनरुत्थान “शास्त्राप्रमाणे” झाले असे का म्हणता येईल?
११ येशूचे पुनरुत्थान झाले अशी खात्री बाळगण्याचे पहिले कारण म्हणजे त्याचे पुनरुत्थान “शास्त्राप्रमाणे” झाले. देवाच्या वचनात येशूच्या पुनरुत्थानाबद्दल आधीच सांगण्यात आले होते. उदाहरणार्थ, दाविदाने असे लिहिले की देव आपल्या प्रमुख “भक्तास” किंवा एकनिष्ठ सेवकास कबरेत राहू देणार नाही. (स्तोत्र १६:१० वाचा.) इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राने ही भविष्यवाणी येशूला लागू केली. त्याने म्हटले: “[दाविदाला] पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.”—प्रे. कृत्ये २:२३-२७, ३१.
१२. पुनरुत्थान झाल्यानंतर येशूला कोणीकोणी पाहिले?
१२ येशूचे पुनरुत्थान झाले अशी खात्री बाळगण्याचे दुसरे कारण म्हणजे पुनरुत्थान झाल्यानंतर अनेकांनी त्याला पाहिले. पुनरुत्थान झाल्यानंतर ४० दिवसांदरम्यान येशू अनेक वेळा त्याच्या शिष्यांसमोर प्रकट झाला. त्याच्या कबरेजवळील बागेत, तसेच अम्माऊस या शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर व इतर ठिकाणी येशू त्याच्या शिष्यांना भेटला. (लूक २४:१३-१५) त्या प्रसंगी तो वैयक्तिक रीत्या पेत्राशी व इतरांशी बोलला. तसेच, तो लोकांच्या जमावांशीही बोलला. एकदा तर येशू ५०० पेक्षा जास्त लोकांसमोर प्रकट झाला! येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर त्याला प्रत्यक्ष पाहिलेल्या या सर्व लोकांची साक्ष नक्कीच खोटी असू शकत नाही.
१३. येशू जिवंत झाल्याची खात्री असल्यामुळे शिष्यांनी काय केले?
१३ येशूचे पुनरुत्थान झाले असा भरवसा बाळगण्याचे तिसरे कारण म्हणजे शिष्यांनी त्याबद्दल इतरांना अगदी आवेशाने सांगितले. येशूच्या पुनरुत्थानाबद्दल आवेशाने साक्ष देत असल्यामुळे शिष्यांना छळाचा, अनेक प्रकारच्या दुःखांचा इतकेच नव्हे तर मृत्यूचाही सामना करावा लागला. जर येशूचे खरोखर पुनरुत्थान झाले नसते आणि जर हा सगळा फक्त फसवणुकीचा प्रकार असता, तर पेत्राने त्याविषयी इतरांना सांगून आपला जीव धोक्यात घातला असता का? जे धर्मगुरू येशूचा द्वेष करत होते आणि ज्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट रचला होता त्यांनाच त्याच्या पुनरुत्थानाबद्दल सांगण्याचे धैर्य पेत्राने दाखवले असते का? नक्कीच नाही. येशू जिवंत आहे आणि तो प्रचाराच्या या कार्याचे नेतृत्व करत आहे याची पेत्राला आणि इतर शिष्यांना पक्की खात्री होती. तसेच, येशूच्या अनुयायांना असाही विश्वास होता की जर येशूचे पुनरुत्थान झाले आहे तर आपलेही पुनरुत्थान नक्कीच होईल. उदाहरणार्थ, मृतांना पुन्हा जिवंत केले जाईल असा भरवसा बाळगूनच स्तेफन धैर्याने मृत्यूला सामोरे गेला.—प्रे. कृत्ये ७:५५-६०.
१४. येशू जिवंत आहे असा विश्वास तुम्ही का बाळगता?
१४ येशूच्या पुनरुत्थानाविषयी भरवसा बाळगण्याचे चौथे कारण म्हणजे तो आज राजा आणि ख्रिस्ती मंडळीचे मस्तक या नात्याने कार्य करत असल्याचा पुरावा आपण पाहू शकतो. आज ख्रिस्ती मंडळीत झपाट्याने वाढ होत आहे. येशूचे पुनरुत्थान झाले नसते तर अशी वाढ झाली असती का? खरेतर, त्याचे पुनरुत्थान झाले नसते तर कदाचित त्याच्याविषयी जाणून घेण्याची संधी आपल्याला कधीच मिळाली नसती. पण, येशू जिवंत आहे आणि तो जगभरातील प्रचार कार्याचे नेतृत्व व मार्गदर्शन करत आहे असा विश्वास बाळगण्याची सबळ कारणे आपल्याजवळ आहेत.
येशूच्या पुनरुत्थानाचा आपल्याकरता काय अर्थ होतो?
१५. येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला प्रचार करण्याचे धैर्य का मिळते?
१५ येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला प्रचार करण्याचे धैर्य मिळते. २,००० वर्षांपासून सुवार्तेच्या प्रचाराचे कार्य बंद करण्यासाठी देवाच्या शत्रूंनी अनेक प्रकारची ‘हत्यारे’ वापरली आहेत. धर्मत्यागी शिकवणी, निंदा, जमावाकडून हल्ला, बंदी, छळ आणि मृत्युदंड यांसारख्या वेगवेगळ्या हत्यारांचा त्यांनी वापर केला आहे. पण, सुवार्ता सांगण्याचे व शिष्य बनवण्याचे कार्य बंद करण्यास यांपैकी “कोणतेही हत्यार” यशस्वी ठरले नाही. (यश. ५४:१७) सैतानाच्या इशाऱ्यांवर चालणाऱ्या या शत्रूंना आपण घाबरत नाही. कारण, येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे तो आपल्या पाठीशी आहे आणि आपल्याला मदत करत आहे. (मत्त. २८:२०) तेव्हा, आपण धैर्याने प्रचार कार्य करत राहू. कारण, शत्रूंनी कितीही प्रयत्न केला तरी ते आपले कार्य कधीही बंद करू शकणार नाहीत!
येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला प्रचार करण्याचे धैर्य मिळते (परिच्छेद १५ पाहा)
१६, १७. (क) येशूने जे काही शिकवले ते खरे असल्याचे त्याच्या पुनरुत्थानामुळे कसे सिद्ध होते? (ख) योहान ११:२५ नुसार देवाने येशूला कोणते सामर्थ्य दिले आहे?
१६ येशूच्या पुनरुत्थानामुळे त्याने जे काही शिकवले ते खरे असल्याचे सिद्ध होते. पौलाने लिहिले की जर ख्रिस्ताला पुन्हा जिवंत करण्यात आले नसते तर ख्रिस्ती विश्वास आणि प्रचार कार्य व्यर्थ ठरले असते. बायबलच्या एका विद्वानाने असे लिहिले: “जर ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले नसेल . . . तर ख्रिस्ती धर्म पाळणाऱ्यांची फसवणूक झाली आहे आणि हा धर्म एका मोठ्या लबाडीवर स्थापण्यात आला आहे असे म्हणावे लागेल.” खरोखर, येशूचे पुनरुत्थान झाले नसते तर शुभवर्तमानाच्या पुस्तकांत केवळ दुःखद शेवट असलेली एक कथा सांगितली आहे असे म्हणावे लागले असते; अशी कथा जिच्यात एका भल्या व सुज्ञ माणसाचे शत्रू शेवटी त्याला जिवे मारतात. पण, येशूचे खरोखरच पुनरुत्थान झाले, आणि त्यामुळे त्याने जे काही शिकवले, तसेच भविष्याबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे असल्याचे सिद्ध झाले.—१ करिंथकर १५:१४, १५, २० वाचा.
१७ येशूने म्हटले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल,” म्हणजेच जिवंत होईल. (योहा. ११:२५) येशूचे हे आश्चर्यकारक शब्द नक्कीच पूर्ण होतील. यहोवाने येशूला पुनरुत्थान करण्याचे सामर्थ्य दिले आहे. तो स्वर्गीय आशा असलेल्यांनाच नाही, तर अशा कोट्यवधी लोकांनाही जिवंत करेल जे पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगतील. येशूचे बलिदान आणि त्याचे पुनरुत्थान या गोष्टीची हमी देते की मृत्यू कायमचा नाहीसा केला जाईल. हे जाणून घेतल्यामुळे कोणत्याही परीक्षेला, अगदी मृत्यूलाही धैर्याने सामोरे जाण्याचे बळ तुम्हाला मिळत नाही का?
१८. येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला कोणती खात्री मिळते?
१८ येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला याची खात्री मिळते की पृथ्वीवरील लोकांचा न्याय यहोवाच्या प्रेमळ स्तरांनुसार होईल. प्राचीन अथेन्सच्या लोकांशी बोलताना पौल त्यांना म्हणाला: “[देवाने] असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.” (प्रे. कृत्ये १७:३१) न्यायनिवाडा करण्यासाठी देवाने नेमलेला तो मनुष्य येशू आहे. आणि तो प्रेमळपणे व योग्य रितीने न्याय करेल अशी खात्री आपण बाळगू शकतो.—यशया ११:२-४ वाचा.
१९. येशूच्या पुनरुत्थानावरील विश्वास आपल्याला काय करण्याची प्रेरणा देतो?
१९ येशूच्या पुनरुत्थानावरील विश्वास आपल्याला यहोवाची इच्छा पूर्ण करण्याची प्रेरणा देतो. येशू ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी खंडणी बलिदान दिले नसते आणि त्याचे पुनरुत्थान झाले नसते, तर आपण पाप आणि मृत्यूच्या दास्यात कायम राहिलो असतो. (रोम. ५:१२; ६:२३) येशूचे पुनरुत्थान झाले नसते तर कदाचित आपणही जगातील लोकांप्रमाणे असे म्हटले असते, की “चला, आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.” (१ करिंथ. १५:३२) पण, आपण फक्त जीवनातील सुखसोयींचा उपभोग घेण्याकडे आपले लक्ष केंद्रित करत नाही. तर, प्रत्येक बाबतीत यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारतो आणि पुनरुत्थानाच्या आशेवर पक्का विश्वास बाळगतो.
२०. येशूचे पुनरुत्थान कशा प्रकारे यहोवाच्या अद्भुत गुणांची ग्वाही देते?
२० येशूचे पुनरुत्थान यहोवाच्या अद्भुत गुणांबद्दल आणि “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे,” याबद्दल ग्वाही देते. (इब्री ११:६) यहोवाने येशूचे पुनरुत्थान करून त्याला स्वर्गातील अमर जीवन दिले त्यावरून त्याची अद्भुत शक्ती व बुद्धी दिसून आली. तसेच यावरून हेही दिसून आले की यहोवाजवळ त्याची सर्व अभिवचने पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे. उदाहरणार्थ, यहोवाने सांगितले होते की सबंध विश्वावर राज्य करण्याच्या त्याच्या अधिकाराविषयीचा वादविषय सोडवण्यात एका खास ‘संततीची’ महत्त्वाची भूमिका असेल. या अभिवचनाच्या पूर्णतेसाठी येशूचा मृत्यू होणे आणि त्याला पुन्हा जिवंत केले जाणे गरजेचे होते.—उत्प. ३:१५.
२१. पुनरुत्थानाच्या आशेबद्दल तुमच्या काय भावना आहेत?
२१ यहोवाने आपल्याला पुनरुत्थानाची पक्की आशा दिली आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! शास्त्रवचनांत असे आश्वासन देण्यात आले आहे: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करेल; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” हे सुंदर अभिवचन विश्वासू प्रेषित योहानाला कळवण्यात आले आणि त्याला असेही सांगण्यात आले: “लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.” हे देवप्रेरित प्रकटीकरण योहानाला कोणाकडून मिळाले? हा दुसरा तिसरा कोणी नसून पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त होता!—प्रकटी. १:१; २१:३-५.
a प्रेषितांची कृत्ये १३:३४ (ईझी-टू-रीड व्हर्शन): “देवाने येशूला मरणातून उठवले. येशू पुन्हा कबरेत जाऊन माती बनणार नाही.”