त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले फिलिपीन्झमध्ये
सुमारे दहा वर्षांआधी, तिशीत असलेले ग्रेगोरीयो आणि मारील्यू हे जोडपे मनिला येथे पायनियर सेवा करण्यासोबत पूर्णवेळेची नोकरीसुद्धा करायचे. असे करणे जरी कठीण असले तरीसुद्धा ते या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे करत होते. पण एके दिवशी मारील्यू जी एका बँकेत काम करायची, तिला मॅनेजरच्या पदावर नेमण्यात आले. ती म्हणते: “आमच्या नोकऱ्या चांगल्या असल्यामुळं आम्ही अगदी आरामदायक जीवन जगत होतो.” खरेतर या जोडप्याची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली होती की त्यांनी मनिलाच्या पूर्वेकडे १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मोक्याच्या ठिकाणी त्यांच्या मनासारखे घर बांधण्याचा विचार केला. त्यांनी एका बिल्डरशी घर बांधण्याचा करार केला आणि बांधकामाचे पैसे दहा वर्षांच्या आत मासिक हप्त्यांत भरण्याची व्यवस्था केली.
“यहोवाला दिलेलं वचन मी पूर्ण करत नाहीय असं मला वाटू लागलं”
मारील्यू सांगते: “नव्या कामामुळं माझा इतका वेळ आणि इतकी शक्ती खर्च व्हायची की हळूहळू ख्रिस्ती कार्यातील माझा आवेश कमी होऊ लागला. यहोवाला दिलेलं वचन मी पूर्ण करत नाहीय असं मला वाटू लागलं.” ती पुढे म्हणते: “यहोवाची सेवा करण्यासाठी मी जो वेळ राखून ठेवला होता तो मी आता त्याला देऊ शकत नव्हते.” त्यांच्या अशा परिस्थितीबद्दल त्यांना खूप वाईट वाटले आणि एके दिवशी ते दोघे, आपले जीवन कोणत्या दिशेने धाव घेत आहे याविषयी बोलण्यास एकत्र बसले. ग्रेगोरीयो म्हणतो: “आम्हाला बदल करायचा होता पण नेमकं काय बदलायचं हेच कळत नव्हतं. विशेषतः आम्हाला मुलं नसल्यामुळं, यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे कशी करता येईल याविषयी आम्ही चर्चा केली. आणि मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना केली.”
त्या काळात, त्यांना राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यावर आधारित असलेली बरीच भाषणे ऐकायला मिळाली. ग्रेगोरीयो म्हणतो: “ही भाषणं जणू आमच्या प्रार्थनांची उत्तरं होती.” योग्य निर्णय घेण्याचे धैर्य मिळावे म्हणून या दोघांनी अधिक विश्वासासाठी प्रार्थना केली. पण त्यांच्यासमोर एक मोठी समस्या होती, ती म्हणजे त्यांचे सुरू असलेले घराचे बांधकाम. आतापर्यंत त्यांचे तीन वर्षांचे हफ्ते भरून झाले होते. आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मारील्यू म्हणते: “आम्ही जर बांधकाम थांबवले तर आतापर्यंत भरलेले सर्व पैसे बुडणार होते; आणि ती रक्कम काही थोडी-थोडकी नव्हती. पण, यहोवाच्या इच्छेला महत्त्व द्यावे की आपल्या इच्छेला, ही निवड आमच्यासमोर होती.” प्रेषित पौलाने म्हटले होते की “मी सर्व गोष्टींना मुकलो.” ही गोष्ट ध्यानात ठेवून त्यांनी घराचे बांधकाम थांबवले, नोकऱ्या सोडल्या, मालकीच्या बऱ्याच गोष्टी विकल्या आणि मनिलाच्या दक्षिणेकडे ४८० किलोमीटरवर असलेल्या पालावान बेटावरील एका लहानशा गावात राहायला गेले.—फिलिप्पै. ३:८.
ते “रहस्य” शिकले
तिथे राहायला जाण्याआधी ग्रेगोरीयो आणि मारील्यू यांनी साधे जीवन जगण्याची तयारी केली होती, पण आपले नवे जीवन किती साधे असणार हे त्यांना तिथे पोहचल्यानंतरच पूर्णपणे उमगले. मारील्यू म्हणते: “आम्हाला धक्काच बसला कारण इथं ना वीज होती ना कोणत्या सुखसोयीच्या गोष्टी. आधी भात शिजवायला इलेक्ट्रिक कुकरचं फक्त बटन दाबावं लागायचं, पण आता लाकडं तोडून चुलीवर स्वयंपाक करावा लागणार होता. मॉलमध्ये फिरणं, बाहेरचं खाणं आणि शहरातल्या इतर सोयीसवलतींची मला खूप आठवण यायची.” पण हे दोघे स्वतःला सतत याची आठवण करून द्यायचे की ते तिथे राहायला का गेलेत आणि यामुळे लवकरच ते तिथे रुळले. मारील्यू सांगते: “आता मी निसर्गाचा आनंद घेते. रात्री लुकलुकणारे तारे पाहणंदेखील मला खूप आवडतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना प्रचार करतो तेव्हा त्यांचे आनंदी चेहरे पाहून खूप बरं वाटतं. इथं सेवा केल्यामुळं आम्ही जीवनात समाधानी राहण्याचं ‘रहस्य’ शिकलो आहोत.”—फिलिप्पै. ४:१२.
“बऱ्याच नवीन लोकांना मंडळीचे सदस्य होताना पाहून जो आनंद होतो त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. आता आमच्या जीवनाला खरा अर्थ लाभला आहे.”—ग्रेगोरीयो आणि मारील्यू
ग्रेगोरीयो सांगतो: “आम्ही आलो तेव्हा इथं फक्त चार यहोवाचे साक्षीदार होते. दर आठवडी मी जाहीर भाषण देण्यास सुरुवात केली आणि राज्य गीतांच्या गायनाच्या वेळी गिटार वाजवू लागलो तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला.” एका वर्षाच्या आत एक लहानसा गट कशा प्रकारे २४ प्रचारकांची एक आवेशी मंडळी बनली हे पाहण्याची संधी या जोडप्याला मिळाली. ग्रेगोरीयो पुढे म्हणतो: “मंडळी आम्हाला जे प्रेम दाखवते ते आमच्या हृदयाला भिडतं.” या दूरच्या भागात सहापेक्षा जास्त वर्षे सेवा केल्यानंतर ते दोघे म्हणतात: “बऱ्याच नवीन लोकांना मंडळीचे सदस्य होताना पाहून जो आनंद होतो त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. आता आमच्या जीवनाला खरा अर्थ लाभला आहे.”
“यहोवा किती चांगला आहे हे मी अनुभवलं आहे!”
फिलिपीन्झमधील जवळजवळ ३,००० बंधुभगिनी राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करत आहेत. त्यांच्यापैकी ५०० अविवाहित बहिणी आहेत. उदाहरणार्थ, कॅरनचा विचार करा.
कॅरन
कॅरनचे वय पंचवीसच्या आसपास आहे. ती कागायनमधील बगाओ नावाच्या शहरात लहानाची मोठी झाली. किशोरवयात असताना ती नेहमी सेवा वाढवण्याबाबत विचार करायची. ती सांगते: “वेळ कमी उरला आहे आणि सर्व प्रकारच्या लोकांना राज्याचा संदेश सांगणं गरजेचं आहे ही गोष्ट माहीत असल्यामुळं, प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची माझी इच्छा होती.” तिच्या कुटुंबातील काही सदस्य तिला दूरच्या भागात जाऊन प्रचार करण्याऐवजी उच्च शिक्षण घेण्याची गळ घालत होते. पण, मार्गदर्शनासाठी कॅरनने यहोवाला प्रार्थना केली. तसेच, जे दूरच्या भागात जाऊन सेवा करत होते अशा बंधुभगिनींसोबत ती बोलली. वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या घरापासून ६४ किलोमीटर दूर असलेल्या एका दुर्गम भागात ती सेवा करण्यास गेली.
कॅरन ज्या लहानशा मंडळीला साहाय्य करण्यास गेली ती मंडळी पॅसिफिक किनाऱ्यावरील एका डोंगराळ भागात प्रचार करते. कॅरन म्हणते: “बगाओपासून या नव्या मंडळीत जाण्यासाठी आम्हाला कितीतरी वेळा डोंगरं चढावी उतरावी लागली आणि ३० पेक्षा जास्त वेळा नद्या ओलांडाव्या लागल्या. अशा रीतीने आम्ही तीन दिवस पायी प्रवास केला.” ती पुढे म्हणते: “काही बायबल विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यासाठी मला सहा तास पायी प्रवास करावा लागतो. मग त्या रात्री मी विद्यार्थ्याच्या घरी राहते व दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या घरी जाण्यासाठी सहा तास चालते.” इतकी मेहनत घेऊन काही फायदा होतो का? कॅरन कबूल करते: “केव्हाकेव्हा माझे पाय खूप दुखतात,” पण पुढे आनंदाने ती म्हणते, “मी जवळजवळ १८ बायबल अभ्यास चालवले आहेत. यहोवा किती चांगला आहे हे मी अनुभवलं आहे!”—स्तो. ३४:८.
“मी यहोवावर विसंबून राहायला शिकलेय”
सुखी
अमेरिकेतील चाळिशीत असलेल्या सुखी नावाच्या एका अविवाहित बहिणीला फिलिपीन्झला जाऊन सेवा करण्याचे प्रोत्साहन कोणत्या गोष्टीमुळे मिळाले? २०११ मध्ये झालेल्या विभागीय संमेलनाला ती उपस्थित राहिली ज्यात एका विवाहित जोडप्याची मुलाखत घेण्यात आली होती. या जोडप्याने, त्यांच्या मालकीच्या बऱ्याच वस्तू विकून ते कशा प्रकारे मेक्सिकोमध्ये सेवा करण्यासाठी गेले त्याविषयी सांगितले. सुखी म्हणते: “त्या मुलाखतीमुळं मी अशा ध्येयांबद्दल विचार करण्यास प्रवृत्त झाले ज्यांबद्दल मी केव्हाही विचार केला नव्हता.” सुखी भारतीय वंशाची आहे. फिलिपीन्झमध्ये राहणाऱ्या पंजाबी लोकांना प्रचार करण्याची गरज आहे हे कळल्यानंतर तिने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तिला काही समस्यांचा सामना करावा लागला का?
सुखी म्हणते: “कोणत्या गोष्टी ठेवाव्यात व कोणत्या विकाव्यात हे ठरवणं, मी विचार केला त्यापेक्षा जास्त कठीण होतं. शिवाय १३ वर्षं स्वतःच्या आरामदायक घरात राहिल्यानंतर आता मी माझ्या कुटुंबासोबत राहू लागले. ही तात्पुरत्या काळासाठी केलेली व्यवस्था असली, तरी अडचणीची होती. बदल करणं बिलकूल सोपं नव्हतं, पण साधं जीवन जगण्यासाठी स्वतःला तयार करण्याचा हा एक चांगला मार्ग होता.” फिलिपीन्झला राहायला गेल्यानंतर तिला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? “सर्वात मोठ्या समस्या म्हणजे मला किड्या-मुंग्यांची खूप भीती वाटायची आणि स्वतःच्या घराची आठवण यायची. आता मी यहोवावर पूर्वीपेक्षा जास्त विसंबून राहायला शिकलेय.” याचा काही फायदा झाला का? ती आनंदाने म्हणते: “यहोवा म्हणतो की तुमच्यावर ‘आशीर्वाद . . . वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पाहा.’ जेव्हा एखादी घरमालकीण ‘मला आणखी प्रश्न आहेत, तुम्ही पुन्हा केव्हा याल?’ असं मला विचारते तेव्हा वरील वचनातील शब्द किती खरे आहेत याचा मला अनुभव येतो. आध्यात्मिक अन्नासाठी भुकेल्या लोकांना मदत करता येत असल्यामुळं मला खूप आनंद होतो आणि समाधानी वाटतं.” (मला. ३:१०) ती पुढे म्हणते: “दुसऱ्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा निर्णय घेणं खरंच खूप कठीण होतं. पण तो निर्णय घेतल्यानंतर यहोवानं कशा प्रकारे सर्व गोष्टींची काळजी घेतली हे पाहून मी भारावून जाते.”
“भीतीवर मी मात करू शकलो”
चाळिशीच्या आसपास असलेला विवाहित बंधू सीमे याने एक चांगली नोकरी शोधण्याच्या इच्छेने फिलिपीन्झ सोडले आणि मध्य पूर्वेतील देशात राहण्यास गेला. तिथे राहत असताना सीमेला एका विभागीय पर्यवेक्षकाकडून आणि नियमन मंडळातील एका बांधवाने दिलेल्या भाषणातून, यहोवाला जीवनात प्राधान्य देण्याचे प्रोत्साहन मिळाले. सीमे म्हणतो: “पण नोकरी सोडावी लागेल याचा विचार केल्यानं मला भीती वाटायची.” असे असले तरीसुद्धा त्याने नोकरी सोडली आणि तो फिलिपीन्झला परतला. आज, सीमे आणि त्याची पत्नी हायडी फिलिपीन्झच्या दक्षिण भागात असलेल्या डावाऊ डेल स्यूर या राज्यात सेवा करत आहेत. या मोठ्या क्षेत्रात राज्य प्रचारकांची खूप गरज आहे. सीमे म्हणतो: “नोकरी गमावण्याच्या भीतीवर मी मात करू शकलो आणि यहोवाला प्राधान्य देण्यास शिकलो याबद्दल मला खरंच खूप चांगलं वाटतं. आपल्याजवळचं सर्वात उत्तम ते यहोवाला दिल्यानं जे समाधान मिळतं त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही.”
सीमे आणि हायडी
“खूप समाधानी वाटतं”
तिशीत असलेले पायनियर जोडपे रामीलो आणि जूलिएट यांना जेव्हा कळले की त्यांच्या घरापासून फक्त ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मंडळीला मदतीची गरज आहे तेव्हा त्यांनी स्वतःहून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक आठवडी मग वातावरण चांगले असो वा नसो, रामीलो आणि जूलिएट सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि प्रचार कार्यात भाग घेण्यासाठी त्यांच्या बाईकवरून पुष्कळ फेऱ्या मारतात. खडबडीत रस्त्यांवरून आणि झुलत्या पुलांवरून प्रवास करणं जरी कठीण असलं, तरी त्यांची सेवा वाढवल्याबद्दल त्यांना फार आनंद होतो. रामीलो म्हणतो: “मी आणि माझी पत्नी ११ बायबल अभ्यास चालवतो! जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी पुष्कळ त्याग करावे लागतात पण त्यामुळं खूप समाधानी वाटतं.”—१ करिंथ. १५:५८.
जूलिएट आणि रामीलो
तुमच्या देशात किंवा विदेशात राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याविषयी तुम्हाला आणखी जाणून घ्यायला आवडेल का? तसे असल्यास, तुमच्या विभागीय पर्यवेक्षकासोबत बोला आणि ऑगस्ट २०११ ची आमची राज्य सेवा यातील “तुम्ही ‘मासेदोनियात जाऊ’ शकाल का?” हा लेख वाचा.