वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ६/१५ पृ. ७-११
  • यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्याकडे कोणीही निःसंकोचपणे यावे असे यहोवाला वाटते
  • एक अतिशय अनमोल गुण
  • आपल्या बंधुभगिनींशी बोलण्यासाठी वेळ काढा
  • यहोवा निःपक्षपाती आहे
  • आपण यहोवाचे अनुकरण करू शकतो
  • आपल्या निःपक्षपाती देवाचे तुम्ही अनुकरण करीत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • भेदभाव न करण्याच्या बाबतीत यहोवाचं अनुकरण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवासारखं नम्र व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाप्रमाणे निःपक्षपाती असा
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ६/१५ पृ. ७-११
[७ पानांवरील चित्र]

यहोवाच्या गुणांची मनापासून कदर करा

“देवाची प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.”—इफिस. ५:१.

तुमचे उत्तर काय आहे?

  • यहोवाच्या गुणांबद्दल आपण आपली कदर आणखी कशी वाढवू शकतो?

  • आपण सहसा कोणत्या व्यक्‍तीकडे अगदी निःसंकोचपणे जाऊ शकतो?

  • आपण यहोवाप्रमाणे निःपक्षपातीपणे कसे वागू शकतो?

१. (क) एक ख्रिस्ती व्यक्‍ती यहोवाच्या कोणत्या गुणांविषयी विचार करू शकते? (ख) देवाच्या गुणांचे परीक्षण केल्याने आपल्याला कशा प्रकारे फायदा होईल?

तुम्ही जेव्हा यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाचा विचार करता, तेव्हा त्याचे कोणते गुण तुमच्या मनात येतात? आपल्यापैकी अनेक जणांच्या मनात कदाचित प्रेम, न्याय, बुद्धी आणि शक्‍ती हे गुण येतील. पण, यहोवा इतकेच गुण प्रदर्शित करत नाही, तर आपल्याला प्रिय वाटतील असे अनेक गुण तो प्रदर्शित करतो. खरे पाहता, यहोवाच्या ४० पेक्षा जास्त गुणांची एक सूची बनवता येईल. यांपैकी प्रत्येक गुणाची चर्चा आपल्या प्रकाशनांमध्ये करण्यात आली आहे. जरा विचार करा, आपल्या वैयक्‍तिक अभ्यासाद्वारे किंवा कौटुंबिक अभ्यासाद्वारे यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी आपण आणखी कितीतरी अद्‌भुत गोष्टी शिकू शकतो! अशा अभ्यासामुळे आपल्याला कशा प्रकारे फायदा होईल? यामुळे आपल्या स्वर्गीय पित्याबद्दलची आपली कदर आणखी वाढेल. यहोवाबद्दल आपली कदर जितकी जास्त वाढेल, तितकीच जास्त त्याच्याजवळ जाण्याची आणि त्याचे अनुकरण करण्याची आपली इच्छा दृढ होईल.—यहो. २३:८; स्तो. ७३:२८.

२. (क) आपण यहोवाच्या गुणांबद्दल आपली कदर आणखी कशी वाढवू शकतो हे उदाहरणाच्या साहाय्याने सांगा. (ख) या आणि पुढील लेखांत आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२ पण, एखाद्या गोष्टीची “कदर करणे” याचा नेमका काय अर्थ होतो? “कदर करणे” याचा अर्थ एखाद्या गोष्टीची उचित किंमत जाणून घेणे असा होतो; आणि याच अर्थाने या लेखात आपण या शब्दांचा वापर करणार आहोत. एखाद्या गोष्टीबद्दलची आपली कदर हळूहळू वाढत जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नवीन खाद्यपदार्थाबद्दलची आपली कदर कशी वाढते ते विचारात घ्या. प्रथम आपण त्याचा सुवास घेतो, मग तो चाखून पाहतो आणि त्याची चव आवडली तर तो पदार्थ आपण स्वतः बनवतो. अशा प्रकारे त्या नवीन खाद्यपदार्थाबद्दलची आपली कदर हळूहळू वाढते. त्याच प्रकारे, आपण जेव्हा यहोवाच्या एखाद्या गुणाची ओळख करून घेतो, त्या गुणावर मनन करतो आणि आपल्या स्वतःच्या जीवनात तो गुण दाखवतो तेव्हा यहोवाच्या त्या गुणाबद्दलची आपली कदर आणखी वाढते. (इफिस. ५:१) आपण सहसा देवाच्या चार प्रमुख गुणांविषयी विचार करतो. पण, या लेखाचा आणि पुढील दोन लेखांचा उद्देश, त्याच्या इतर गुणांचा विचार करणे हा आहे. यामुळे त्या गुणांबद्दलची आपली कदर आणखी वाढेल. त्या प्रत्येक गुणाच्या बाबतीत आपण पुढील प्रश्‍नांचा विचार करणार आहोत: त्या गुणाचा अर्थ काय आहे? यहोवा तो गुण कशा प्रकारे दाखवतो? आणि हा विशिष्ट गुण दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो?

आपल्याकडे कोणीही निःसंकोचपणे यावे असे यहोवाला वाटते

३, ४. (क) आपण सहसा कोणत्या व्यक्‍तीकडे अगदी निःसंकोचपणे जाऊ शकतो? (ख) आपल्याकडे कोणीही निःसंकोचपणे यावे असे यहोवाला वाटते हे तो कसे दाखवतो?

३ आपण सहसा कोणत्या व्यक्‍तीकडे अगदी निःसंकोचपणे जाऊ शकतो? तुम्ही कदाचित म्हणाल, ‘जी व्यक्‍ती प्रेमळ असते, आपल्याला वेळ द्यायला तयार असते आणि जिच्याशी आपण मनमोकळेपणे बोलू शकतो.’ एखाद्या व्यक्‍तीकडे आपण निःसंकोचपणे जाऊ शकतो की नाही हे सहसा तिच्या बोलण्यावरून आणि देहबोलीवरून आपल्याला समजते.

४ आपल्याकडे कोणीही निःसंकोचपणे यावे असे यहोवाला वाटते हे तो कसे दाखवतो? यहोवा या अफाट विश्‍वाचा शक्‍तिशाली निर्माणकर्ता असूनही तो आपल्याला हे आश्‍वासन देतो की तो आपल्या प्रार्थना ऐकण्यास आणि त्यांची उत्तरे देण्यास तयार व उत्सुक आहे. (स्तोत्र १४५:१८; यशया ३०:१९ वाचा.) आपण देवासोबत कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी आणि कितीही वेळ बोलू शकतो. तो कधीच आपल्याला तुच्छ लेखणार नाही या जाणिवेने आपण त्याच्याजवळ निःसंकोचपणे जाऊ शकतो. (स्तो. ६५:२; याको. १:५) मानवांनी देवाच्या जवळ यावे अशी त्याची इच्छा आहे हे दाखवण्यासाठी बायबलमध्ये त्याचे वर्णन आपल्याला समजेल अशा शब्दांत करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिले, की “परमेश्‍वराचे नेत्र” आपल्याकडे असतात आणि त्याचा “उजवा हात” आपल्याला सांभाळून धरतो. (स्तो. ३४:१५; ६३:८) यशया संदेष्ट्याने यहोवाची तुलना एका मेंढपाळाशी केली. त्याने म्हटले: “तो . . . कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील.” (यश. ४०:११) जरा विचार करा! ज्याप्रमाणे एक लहान कोकरू प्रेमळ मेंढपाळाच्या उराशी बिलगून राहते, त्याचप्रमाणे आपण यहोवाच्या अगदी जवळ राहावे अशी त्याची इच्छा आहे. अशा प्रेमळ पित्याकडे कोणीही निःसंकोचपणे जाऊ शकतो. या बाबतीत आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो?

एक अतिशय अनमोल गुण

५. वडिलांमध्ये कोणता गुण असणे विशेष महत्त्वाचे आहे व का?

५ काही वर्षांपूर्वी, वेगवेगळ्या देशांतील आवेशी साक्षीदारांना असे विचारण्यात आले होते, “वडिलांमधला कोणता गुण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो?” बहुतेकांनी म्हटले: “आम्ही कोणताही संकोच न बाळगता त्यांच्याशी बोलू शकतो ही गोष्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडते.” अर्थात, आपल्यापैकी प्रत्येकानेच हा गुण विकसित केला पाहिजे. पण, ख्रिस्ती वडिलांमध्ये हा गुण असणे विशेष महत्त्वाचे आहे. (यश. ३२:१, २) याचे एक कारण एका बहिणीने काय म्हटले त्यावरून दिसून येते. तिने म्हटले: “आपण जर एका वडिलाकडे निःसंकोचपणे जाऊ शकलो तरच त्यांच्या इतर चांगल्या गुणांचा आपल्याला फायदा होईल.” तिचे म्हणणे किती खरे आहे, नाही का? पण, इतरांनी निःसंकोचपणे आपल्याकडे यावे असे वाटत असल्यास काय करणे गरजेचे आहे?

६. इतरांनी निःसंकोचपणे आपल्याकडे यावे असे वडिलांना वाटत असल्यास त्यांनी काय केले पाहिजे?

६ इतरांनी निःसंकोचपणे आपल्याकडे यावे असे वाटत असल्यास, त्यांच्याबद्दल मनस्वी आस्था दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या वडिलाला इतरांबद्दल कळकळ असेल आणि त्यांना मदत करायला ते नेहमी तयार असतील, तर त्यांचा हा स्वभाव बंधुभगिनींच्या, इतकेच काय तर लहान मुलांच्याही लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. (मार्क १०:१३-१६) बारा वर्षांचा कार्लोस म्हणतो: “माझ्या मंडळीतल्या वडिलांची एक गोष्ट मला खूप आवडते. ते नेहमी आनंदी असतात आणि प्रेमळपणे इतरांना मदत करतात.” अर्थात, माझ्याकडे कोणीही अगदी निःसंकोचपणे येऊन बोलू शकतो असे फक्‍त म्हणणे पुरेसे नाही; तर वडिलांनी आपल्या वागण्यातूनही ते दाखवले पाहिजे. (१ योहा. ३:१८) वडील हे कसे करू शकतात?

७. अधिवेशनाचे बॅज कार्ड लावल्यामुळे सहसा संभाषणाला चालना का मिळते, आणि त्यापासून आपण काय शिकू शकतो?

७ या उदाहरणाचा विचार करा. काही काळाआधी, एक बांधव परदेशात झालेल्या एका अधिवेशनाला उपस्थित राहून विमानाने घरी परतत होता. त्या वेळी त्याने अधिवेशनाचे बॅज कार्ड लावले होते. विमानातील परिचारकाने बॅज कार्डवरील “देवाचे राज्य येवो!” हे शब्द पाहिले, तेव्हा त्याने म्हटले, “खरंच देवाच्या राज्याची आपल्याला खूप गरज आहे. आपण बोलूयात त्यावर.” नंतर, त्या दोघांनी त्याविषयी चर्चा केली आणि त्या परिचारकाने आपली नियतकालिके आनंदाने स्वीकारली. आपल्यापैकी अनेकांना असेच अनुभव आले आहेत. जरा विचार करा, अधिवेशनाच्या बॅज कार्डमुळे सहसा संभाषणाला चालना का मिळते? कारण, एका अर्थी ते लोकांना म्हणत असते: “तुम्ही निःसंकोचपणे माझ्याकडे येऊन बोलू शकता.” आपले बॅज कार्ड हे एक दृश्‍य चिन्ह असून ते लोकांना हे सांगत असते की आपण आपल्या ख्रिस्ती विश्‍वासांविषयी इतरांना सांगण्यास उत्सुक आहोत. त्याचप्रमाणे, ख्रिस्ती वडीलही दृश्‍य चिन्हांतून अर्थात आपल्या वागण्यातून बंधुभगिनींना हे सूचित करतात की, “तुम्ही निःसंकोचपणे माझ्याजवळ येऊन बोलू शकता.” पण, वडील हे कसे सूचित करू शकतात?

८. वडिलांना इतरांबद्दल मनस्वी आस्था आहे हे ते कसे दाखवतात, आणि याचा मंडळीवर कोणता प्रभाव पडतो?

८ वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे रीतिरिवाज असतात. पण, आपण जेव्हा आपल्या बंधुभगिनींना पाहून स्मितहास्य करतो, त्यांना प्रेमाने भेटतो आणि मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपल्याला त्यांच्याबद्दल मनस्वी आस्था आहे हे आपण दाखवत असतो. पण, असे करण्यात पुढाकार कोणी घेतला पाहिजे? या बाबतीत येशूने मांडलेल्या उदाहरणाकडे लक्ष द्या. मत्तय सांगतो, की एकदा येशू त्याच्या शिष्यांना भेटला तेव्हा, तो त्यांच्या “जवळ येऊन त्यांच्याशी” बोलला. (मत्त. २८:१८) त्याचप्रमाणे, आज ख्रिस्ती वडीलही स्वतःहून आपल्या बंधुभगिनींकडे जाऊन त्यांच्याशी बोलतात. याचा मंडळीवर कोणता प्रभाव पडू शकतो? ८८ वर्षांच्या एका पायनियर बहिणीने असे म्हटले: “मी राज्य सभागृहात जाताच मंडळीतले वडील आनंदानं माझं स्वागत करतात आणि प्रोत्साहनदायक शब्द बोलतात; त्यामुळंच ते मला खूप प्रिय वाटतात.” आणखी एका विश्‍वासू बहिणीने म्हटले: “ही लहान गोष्ट वाटू शकते; पण वडील स्मितहास्य करून राज्य सभागृहात माझं स्वागत करतात तेव्हा मला खूप बरं वाटतं.”

आपल्या बंधुभगिनींशी बोलण्यासाठी वेळ काढा

९, १०. (क) यहोवाने कोणते उत्तम उदाहरण मांडले आहे? (ख) वडील इतरांसाठी वेळ कसा देऊ शकतात?

९ आपण जर इतरांना वेळच दिला नाही, तर आपल्याजवळ कोणी येणारच नाही. इतरांना वेळ देण्याच्या बाबतीत यहोवाचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे. “तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कृत्ये १७:२७) मंडळीचे वडीलसुद्धा सभांच्या आधी आणि नंतर लहानमोठ्या सर्व बंधुभगिनींशी संवाद साधण्यासाठी वेळ काढू शकतात. एका पायनियर बंधूने असे म्हटले: “एखादे वडील माझी आवर्जून विचारपूस करतात आणि माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतात तेव्हा खूप बरं वाटतं.” जवळजवळ ५० वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलेल्या एका बहिणीने म्हटले: “वडील सभेनंतर थोडा वेळ काढून माझ्याशी बोलतात तेव्हा त्यांच्या नजरेत मला खूप मोल आहे असं मला जाणवतं.”

१० हे खरे आहे, की ख्रिस्ती मेंढपाळांना इतर जबाबदाऱ्‍याही पूर्ण कराव्या लागतात. पण, सभेत मेंढरांकडे लक्ष देणे हे त्यांचे सर्वात मुख्य ध्येय असले पाहिजे.

यहोवा निःपक्षपाती आहे

११, १२. (क) निःपक्षपाती असण्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत? (ख) निःपक्षपातीपणा दाखवण्यात यहोवाने आपल्याकरता कोणते उदाहरण मांडले?

११ निःपक्षपातीपणा हा यहोवाचा आणखी एक उत्कृष्ट गुण आहे. निःपक्षपाती असणे याचा काय अर्थ होतो? यात न्याय्य असणे, भेदभाव न करणे किंवा कोणाचाही पक्ष न घेणे या गोष्टींचा समावेश होतो. निःपक्षपाती असण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते: मनोवृत्ती आणि कृती. या दोन्ही गोष्टींची गरज का आहे? कारण एखाद्या व्यक्‍तीचा दृष्टिकोन निःपक्षपाती असेल, तरच ती सर्वांशी निःपक्षपातीपणे वागेल. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, “पक्षपाती नाही” असे भाषांतरित शब्दांचा अर्थ “तोंड पाहून माणसांशी न वागणे” असा होतो. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५) तेव्हा, निःपक्षपाती असलेला कोणीही एखाद्याच्या स्वरूपाकडे किंवा परिस्थितीकडे पाहत नाही, तर तो किंवा ती खऱ्‍या अर्थाने कशा प्रकारची व्यक्‍ती आहे याकडे पाहतो.

१२ निःपक्षपाती असण्याच्या बाबतीत यहोवाचे उदाहरण सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या वचनात म्हटले आहे, की तो “पक्षपाती नाही” आणि “तो कोणाचा पक्षपात करत नाही.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; अनुवाद १०:१७ वाचा.) मोशेच्या दिवसांत उद्‌भवलेल्या एका परिस्थितीवरून हे दिसून येते.

[१० पानांवरील चित्र]

सलाफहादाच्या मुलींनी देवाच्या निःपक्षपातीपणाची कदर केली (परिच्छेद १३, १४ पाहा)

१३, १४. (क) सलाफहादाच्या पाच मुलींसमोर कोणता पेच निर्माण झाला? (ख) यहोवाने निःपक्षपातीपणा कसा दाखवला?

१३ इस्राएल लोक प्रतिज्ञा केलेल्या देशात प्रवेश करण्याच्या आधी, पाच अविवाहित सख्या बहिणींपुढे एक पेच निर्माण झाला. कोणता पेच? इतर इस्राएली कुटुंबांप्रमाणेच आपल्या वडिलाला नेमून दिलेला जमिनीचा वाटा आपल्याही कुटुंबाला मिळणार हे त्या बहिणींना माहीत होते. (गण. २६:५२-५५) पण, मनश्‍शेच्या वंशातील त्यांचा वडील सलाफहाद तर मरण पावला होता. परंपरेनुसार, जमिनीचा वाटा मिळण्याचा हक्क सलाफहादाच्या पुत्रांना होता, पण त्याला केवळ मुलीच होत्या. (गण. २६:३३) सलाफहादाच्या कुटुंबात एकही मुलगा नसल्यामुळे, त्या कुटुंबाच्या वाट्याची जमीन नातेवाइकांना दिली जाणार होती का? आणि त्या मुलींना काहीच मिळणार नव्हते का?

१४ त्या पाच बहिणींनी मोशेजवळ जाऊन त्याला असे विचारले: “[आमच्या बापाला] मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे?” त्यांनी मोशेला विनंती केली: “आम्हालाही आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.” त्यावर, ‘नियम म्हणजे नियम’ असे म्हणून मोशेने अडेल भूमिका घेतली का? नाही. “मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्‍वरापुढे मांडले.” (गण. २७:२-५) यहोवाने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्याने मोशेला म्हटले: “सलाफहादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे; त्यांच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर तू त्यांना अवश्‍य वतनभाग द्यावा; त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर.” यहोवा तेवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने, याविषयी मोशेच्या द्वारे एक नियम बनवला. त्याने म्हटले: “कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे.” (गण. २७:६-८; यहो. १७:१-६) तेव्हापासून, अशा प्रकारच्या समस्येला तोंड देणाऱ्‍या प्रत्येक इस्राएली स्त्रीचे संरक्षण होणार होते.

१५. (क) यहोवा आपल्या लोकांशी, खासकरून लाचार असलेल्या लोकांशी कशा प्रकारे वागतो? (ख) यहोवा निःपक्षपाती आहे हे बायबलमधील आणखी कोणत्या वृत्तान्तांवरून दिसून येते?

१५ यहोवाचा निर्णय किती प्रेमळ व निःपक्ष होता! चांगल्या स्थितीत असलेल्या इतर इस्राएल लोकांशी यहोवा जितक्या आदराने वागला तितक्याच आदराने तो या लाचार स्त्रियांशीही वागला. (स्तो. ६८:५) यहोवा आपल्या सर्व सेवकांशी निःपक्षपातीपणे वागतो या दिलासादायक सत्यावर प्रकाश टाकणारा बायबलमधील हा केवळ एक वृत्तान्त आहे.—१ शमु. १६:१-१३; प्रे. कृत्ये १०:३०-३५, ४४-४८.

आपण यहोवाचे अनुकरण करू शकतो

१६. आपण निःपक्षपातीपणा कसा विकसित करू शकतो व तो कसा टिकवून ठेवू शकतो?

१६ निःपक्षपाती असण्याच्या बाबतीत आपण यहोवाचे अनुकरण कसे करू शकतो? आठवणीत असू द्या, निःपक्षपाती असण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे. आपण जर स्वभावाने निःपक्षपाती असलो, तरच आपण सर्वांशी निःपक्षपातीपणे वागू. आपण निःपक्षपाती आहोत असे स्वतःबद्दल आपल्याला कदाचित वाटत असेल. पण, तुम्ही याच्याशी सहमत व्हाल की स्वतःच्या भावनांचे प्रामाणिकपणे परीक्षण करणे नेहमीच सोपे नसते. तर मग, इतरांच्या नजरेत आपण निःपक्षपाती आहोत का हे जाणून घेण्यासाठी आपण काय करू शकतो? येशूबद्दल लोक काय म्हणतात हे त्याला जाणून घ्यायचे होते, तेव्हा त्याने आपल्या भरवशालायक मित्रांना असे विचारले: “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?” (मत्त. १६:१३, १४) या बाबतीत तुम्ही येशूचे अनुकरण का करू नये? इतरांच्या दृष्टीत तुम्ही निःपक्षपाती आहात की नाही हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू शकेल अशा एखाद्या भरवशाच्या मित्राला तुम्ही विचारू शकता. तुमच्या मनात अजूनही काही प्रमाणात वांशिक, सामाजिक किंवा आर्थिक भेदभाव असल्याचे तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला सांगते तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे? आपल्या भावनांविषयी यहोवाला कळकळीने प्रार्थना करा; तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीत फेरबदल करता यावा म्हणून त्याला विनंती करा, जेणेकरून तुम्हाला यहोवाप्रमाणे निःपक्षपातीपणे वागता येईल.—मत्त. ७:७; कलस्सै. ३:१०, ११.

१७. आपण कोणकोणत्या मार्गांनी इतरांशी निःपक्षपातीपणे वागू शकतो?

१७ मंडळीतील सर्व बंधुभगिनींशी आदराने आणि प्रेमाने वागण्याद्वारे आपण दाखवून देतो की यहोवाप्रमाणे निःपक्षपातीपणे वागण्याची आपली इच्छा आहे. उदाहरणार्थ, आपण सर्वच पार्श्‍वभूमीच्या बंधुभगिनींना पाहुणचार दाखवू इच्छितो. मग ते गरीब असोत, अनाथ असोत किंवा विधवा असोत. (गलतीकर २:१०; याकोब १:२७ वाचा.) शिवाय, आपण सर्वच प्रकारच्या लोकांना, अगदी विदेश्‍यांनासुद्धा निःपक्षपातीपणे देवाच्या राज्याचा प्रचार करतो. जवळजवळ ६०० भाषांमध्ये आपली प्रकाशने उपलब्ध आहेत हे जाणून आपल्याला खूप आनंद होतो. निःपक्षपातीपणाचा किती ढळढळीत पुरावा!

१८. यहोवा निःपक्षपाती आहे आणि तो आपल्याला निःसंकोचपणे त्याच्याकडे येऊ देतो याबद्दल तुम्हाला कदर वाटते हे तुम्ही कसे दाखवू शकता?

१८ यहोवा निःपक्षपाती आहे आणि तो आपल्याला निःसंकोचपणे त्याच्याकडे येऊ देतो यावर आपण मनन करतो तेव्हा त्याच्याविषयी आपली कदर आणखी वाढते. परिणामस्वरूप, यहोवाच्या गुणांचे अनुकरण करण्याची आणि बंधुभगिनींसोबत व्यवहार करताना व इतरांना प्रचार करताना हे गुण दाखवण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल.

[८ पानांवरील चित्र]

“जे कोणी त्याचा धावा करतात, . . . त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे.”—स्तो. १४५:१८ (परिच्छेद ९ पाहा)

“तुमचा देव परमेश्‍वर . . . कोणाचा पक्षपात करत नाही.”—अनु. १०:१७ (परिच्छेद १७ पाहा)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा