जीवन कथा
आर्क्टिक प्रदेशात पाच दशकांची पूर्णवेळेची सेवा
पूर्णवेळेच्या सेवेत असलेल्या आमच्या एका मैत्रिणीला एकदा आम्ही म्हटलं, “तुझ्यासाठी पायनियर सेवा करणं सोपं आहे. तुझे आईबाबा दोघंही सत्यात आहेत आणि ते तुला आर्थिक हातभार लावू शकतात.” तिनं उत्तर दिलं, “पण आपल्या सर्वांचा स्वर्गीय पिता तर एकच आहे ना!” तिच्या या उत्तरावरून आम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला: आपला स्वर्गीय पिता त्याच्या सेवकांची काळजी घेतो आणि त्यांना बळ देतो. आमच्या स्वतःच्या जीवनातून आम्हाला ही गोष्ट खरी असल्याची खातरी पटली आहे.
आमचा जन्म फिनलंडच्या उत्तर ऑस्ट्रोबॉथनिया प्रदेशात, एका शेतकरी कुटुंबात झाला. आम्ही एकूण दहा भावंडं. लहानपणी आमच्या जीवनावर दुसऱ्या महायुद्धाचा बराच प्रभाव पडला. युद्ध जिथं लढलं जात होतं तिथपासून शेकडो मैलांच्या अंतरावर आम्ही राहत होतो, तरीपण त्या भयानक युद्धाच्या आठवणी आमच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. आउलू आणि कालाजोकी या जवळच्याच शहरांवर बॉम्बहल्ले झाले तेव्हा रात्रीच्या आकाशात एक तांबडा प्रकाश पसरलेला आम्ही पाहिला होता. लढाऊ विमानं आकाशात दिसताच आईबाबा आम्हा मुलांना लपून बसायला सांगायचे. त्यामुळं, जेव्हा आमचा सर्वात मोठा भाऊ टाऊनो यानं पृथ्वीवर नंदनवन येईल आणि कोणताच अन्याय राहणार नाही असं आम्हाला सांगितलं तेव्हा हा संदेश आम्हाला मनापासून आवडला.
टाऊनो १४ वर्षांचा असताना, बायबल विद्यार्थ्यांच्या साहित्यातून त्याला बायबलमधली सत्यं समजली होती. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा बायबलमधून शिकलेल्या गोष्टींमुळं सैन्यात भरती होणं त्याच्या विवेकाला पटेना. सैन्यात भरती होण्यास नकार दिल्यामुळं त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तिथं त्याला खूप अमानुष वागणूक देण्यात आली. पण, यामुळं यहोवाची सेवा करण्याचा त्याचा निर्धार पूर्वीपेक्षा आणखीनच दृढ झाला आणि तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो अधिक आवेशानं सेवाकार्य करू लागला. आमच्या भावाच्या चांगल्या उदाहरणामुळं आम्हाला साक्षीदारांच्या सभांना जाण्याची प्रेरणा मिळाली, ज्या त्या वेळी शेजारच्या खेड्यात भरवल्या जायच्या. आम्ही अधिवेशनांनाही जायचो. पण, तिथं जाण्याकरता पुरेसे पैसे जमवण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत करावी लागायची. आम्ही शेजारपाजारच्या लोकांचे कपडे शिवून द्यायचो, कांद्यांची लागवड करायचो आणि बेरी फळं गोळा करायचो. मळ्यावर बरीच कामं करावी लागत असल्यामुळं सहसा आम्हा सर्वांना सोबत मिळून अधिवेशनांना जाणं शक्य नसायचं. त्यामुळं आम्ही आळीपाळीनं अधिवेशनांना जायचो.
डावीकडून: माटी (वडील), टाऊनो, सायमी, मारिया एमिलिया (आई), वाईनो (बाळ), आयली आणि आनिकी १९३५ साली
यहोवा आणि त्याचे उद्देश यांबद्दलचं सत्य जसजसं समजू लागलं तसतसं आमचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणखी वाढलं आणि आम्ही आपलं जीवन त्याला समर्पित करायचं ठरवलं. १९४७ साली आम्हा दोघींचा (आनिकी १५ वर्षांची, तर आयली १७ वर्षांची असताना) बाप्तिस्मा झाला. त्याच वर्षी आमची बहीण सायमी हिचाही बाप्तिस्मा झाला. लिनिया नावाच्या आमच्या एका बहिणीचं आधीच लग्न झालं होतं. आम्ही तिच्यासोबतही बायबलचा अभ्यास केला आणि ती व तिचं कुटुंबदेखील यहोवाचे साक्षीदार बनले. बाप्तिस्मा झाल्यानंतर आम्ही पायनियर बनण्याचं ध्येय ठेवलं आणि अधूनमधून सुटीतले (सहायक) पायनियर म्हणून सेवा करू लागलो.
पूर्णवेळेच्या सेवेत पदार्पण
डावीकडून: ईव्हा कालियो, सायमी माटीला-सूरजाला, आयली, आनिकी, व सारा नोपोनेन १९४९ साली
१९५५ साली आम्ही आणखीन उत्तरेकडे असलेल्या केमी या शहरात राहायला गेलो. आम्ही दोघीही तेव्हा पूर्णवेळेची नोकरी करत असलो, तरी पायनियर होण्याची इच्छा अजूनही आमच्या मनात होती. पण पायनियर सेवा करताना उदरनिर्वाह कसा चालवायचा याचीच आम्हाला भीती होती. सुरुवातीला आम्ही विचार केला की आधी काही पैसा साठवावा आणि मग पायनियर सेवेला सुरुवात करावी. त्याच दरम्यान, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या पायनियर बहिणीसोबत आमचं संभाषण झालं. तिनं आम्हाला हे समजून घ्यायला मदत केली, की यहोवाची पूर्णवेळ सेवा करणं हे फक्त आपल्याजवळ असलेल्या साधनांवर किंवा आपल्या कुटुंबाच्या आर्थिक साहाय्यावर अवलंबून नसतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण आपल्या स्वर्गीय पित्यावर विसंबून राहिलं पाहिजे.
१९५२ साली कुओपियो इथं अधिवेशनाला जाताना. डावीकडून: आनिकी, आयली, ईव्हा कॅलियो
त्या वेळी आमच्याजवळ दोन महिने पुरतील इतके पैसे होते. त्यामुळं, १९५७ च्या मे महिन्यात आम्ही आर्क्टिक ध्रृववृत्ताच्या वरती असलेल्या लॅपलँडमधील पेल्लो नावाच्या शहरात दोन महिने पायनियर सेवा करण्यासाठी भीतभीतच अर्ज भरले. दोन महिने पूर्ण झाल्यावर आमच्याजवळचे सगळे पैसे अजूनही आमच्याजवळ होते. त्यामुळं आम्ही आणखी दोन महिने पायनियर सेवा करण्यासाठी अर्ज भरले. पुन्हा दोन महिने पूर्ण झाल्यावर पैसे अजूनही उरले होते. आता मात्र आमची खातरी पटली, की यहोवा आमची काळजी घेईल. आज ५० वर्षं पायनियर सेवा केल्यानंतर अजूनही आमचे पैसे आमच्याजवळ उरले आहेत! मागं वळून पाहताना आम्हाला असं वाटतं जणू यहोवा आमचे हात धरून आम्हाला म्हणतोय: ‘भिऊ नका, मी तुम्हाला साहाय्य करेन.’—यश. ४१:१३.
आज ५० वर्षं पायनियर सेवा केल्यानंतर अजूनही आमचे पैसे आमच्याजवळ उरले आहेत!
काइसू रेको आणि आयली क्षेत्र सेवेत
१९५८ मध्ये आमच्या विभागीय पर्यवेक्षकांनी आम्हाला लॅपलँडच्या सोडानक्युएले शहरात जाऊन खास पायनियर सेवा करण्याचा सल्ला दिला. त्या वेळी त्या भागात एकच साक्षीदार, एक बहीण होती. तिला सत्य कसं शिकायला मिळालं याचा किस्सा ऐकण्यासारखा आहे. तिचा मुलगा एकदा आपल्या वर्गासोबत फिनलंडची राजधानी, हेलसिंकी इथं सहलीला गेला होता. विद्यार्थी शहरातून फेरफटका मारत असताना तिचा मुलगा रांगेत सर्वात शेवटी चालत होता. एका वयस्क बहिणीनं त्या मुलाला, टेहळणी बुरूज नियतकालिकाची एक प्रत दिली आणि घरी गेल्यावर आईला दे असं सांगितलं. मुलानं तिच्या सांगण्यानुसार केलं आणि नियतकालिक वाचल्यावर त्याच्या आईला, आपल्याला सत्य सापडलं आहे अशी लगेच खातरी झाली.
आम्ही एका लाकडं कापण्याच्या कारखान्याच्या वरती एक खोली भाड्यानं घेतली. तिथं आम्ही सभा चालवू लागलो. सुरुवातीला फक्त आम्ही दोघी, ती बहीण व तिची मुलगी इतकेच जण सभेला उपस्थित असायचो आणि सभेसाठी असलेल्या साहित्याचा सोबत मिळून अभ्यास करायचो. काही काळानं, साक्षीदारांसोबत पूर्वी बायबल अभ्यास केलेला एक मनुष्य या कारखान्यात काम करायला आला. तो व त्याचं कुटुंब सभांना येऊ लागलं. कालांतरानं तो व त्याची पत्नी, दोघांचा बाप्तिस्मा झाला. त्यानंतर हा बांधव आमच्या सभांमध्ये नेतृत्व घेऊ लागला. शिवाय, कारखान्यात काम करणारी आणखी काही माणसं सभांना येऊ लागली आणि त्यांनीही सत्याचा स्वीकार केला. दोन वर्षांनी आमचा गट इतका मोठा बनला होता की त्याचं मंडळीत रूपांतर करण्यात आलं.
आमच्यासमोर आलेल्या अडचणी
प्रचार कार्य करताना आमच्यासमोर असलेली एक अडचण म्हणजे क्षेत्रात बऱ्याच दूरदूरपर्यंत आम्हाला प्रवास करावा लागे. उन्हाळ्यात आम्ही पायी, सायकलीनं आणि कधीकधी तर बोटीनं क्षेत्रात जायचो. सायकलींमुळं आमची खूपच सोय झाली. अधिवेशनांना जाताना आणि शेकडो मैल अंतरावर राहणाऱ्या आमच्या आईबाबांना भेटायला जातानाही आम्ही सायकलींवरूनच जायचो. हिवाळ्यात आम्ही पहाटेची बस धरून एका खेड्यात जायचो आणि मग पायी एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जायचो. एका खेड्यात कार्य संपल्यावर आम्ही दुसऱ्या खेड्यापर्यंत पायीच जायचो. कधीकधी बऱ्याच खोलपर्यंत बर्फ जमलेला असे आणि रस्त्यांवरून नेहमीच बर्फ काढलेला नसे. त्यामुळं रस्त्यांवरून घोडागाड्या गेल्यामुळं बर्फातून जी वाट तयार झालेली असे, तिच्यावरून आम्ही चालायचो. काही वेळा तर पुन्हा बर्फ पडल्यामुळं ही वाटही झाकली जायची आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला बर्फ इतका मऊ व ओला असायचा की भरभर चालणं अशक्य व्हायचं.
हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत सेवाकार्य करताना
गारठवून टाकणारी थंडी आणि बर्फाळ हवामान यांमुळं उबदार कपडे घालणं भाग होतं. आम्ही लोकरीचे स्टॉकिंग्स (कंबरेपर्यंतचे लोकरीचे मोजे) आणि पायमोज्यांचे दोन किंवा तीन जोड, तसंच गुडघ्यांपर्यंत असलेले बूट घालायचो. तरीसुद्धा, बरेचदा आमच्या बुटांत बर्फ साचायचा. एखाद्या घराच्या पायऱ्यांपर्यंत पोचल्यावर आम्ही बूट काढून त्यांतला बर्फ झटकून टाकायचो. तसंच, बर्फातून चालताना आमच्या लांब कोट्सच्या कडा भिजून जायच्या. मग तापमान आणखी घसरलं की त्या कडा अक्षरशः गोठायच्या आणि धातूच्या पत्र्यासारख्या कडक व्हायच्या. एकदा ११ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी चालून एका घरी आम्ही गेलो, तेव्हा त्या घराची मालकीण आम्हाला म्हणाली, “तुम्हाला खरोखरच देवावर पूर्ण विश्वास असेल, त्याशिवाय तुम्ही अशा थंडीत बाहेर पडण्याचं धाडस केलं नसतं.”
क्षेत्रात बऱ्याच दूरपर्यंत जावं लागत असल्यामुळं कधीकधी आम्ही गावातल्या लोकांच्या घरीच मुक्काम करायचो. उशीर होऊ लागला की आम्ही लोकांना मुक्कामासाठी विचारपूस करायला लागायचो. लोकांची घरं साधीच होती पण मनानं ते अतिशय प्रेमळ व अगत्यशील होते. त्यामुळं, ते आम्हाला फक्त मुक्कामाला जागाच नव्हे तर जेवणही द्यायचे. सहसा, रेनडिअर, मूस या प्राण्यांच्या किंवा अस्वलाच्या कातडीवर आमचा बिछाना असे. क्वचित एखाद्या वेळी आम्हाला थोडी चैन अनुभवायला मिळायची. उदाहरणार्थ, एका घरमालकिणीनं आम्हाला तिच्या मोठ्या घराच्या वरच्या माळ्यावर नेलं जिथं पाहुण्यांसाठी असलेल्या खोलीत, सुंदर जाळीकाम केलेल्या पांढऱ्याशुभ्र चादरी अंथरलेला बिछाना होता. बऱ्याचदा आम्ही रात्री उशिरापर्यंत घरमालकांशी बायबलवर चर्चा करायचो. एकदा ज्यांच्या घरी आम्ही मुक्काम केला होता ते जोडपं खोलीच्या एका बाजूला तर आम्ही दुसऱ्या बाजूला झोपलो. रात्रीच्या अंधारात त्यांच्यासोबत बायबलवर चर्चा करता करता इतका उशीर झाला की पहाट केव्हा उजाडली हेही कळलं नाही. तो मनुष्य व त्याची बायको आळीपाळीनं आम्हाला एकापाठोपाठ एक प्रश्न विचारत होते.
समाधानदायक सेवा
लॅपलँड हा तसा ओसाड पण अतिशय सुंदर प्रदेश आहे आणि त्याचं सौंदर्य ऋतूप्रमाणे बदलतं. पण आम्हाला तर यहोवाबद्दल शिकू इच्छिणारे तिथले लोकच सर्वात सुंदर वाटायचे. ज्या प्रामाणिक मनाच्या लोकांना साक्ष देण्याची आम्हाला संधी मिळाली त्यांत झाडं तोडण्यासाठी लॅपलँडला येऊन राहणारी माणसं होती. कधीकधी आम्ही दोघी बहिणी एखाद्या घरात प्रवेश करायचो तेव्हा तिथं दहा-बारा माणसं असायची. पण ही धिप्पाड माणसं बायबलचा संदेश ऐकून घ्यायची आणि आम्ही दिलेलं साहित्य आनंदानं स्वीकारायची.
आम्हाला कित्येकदा अतिशय रोमांचक अनुभव आले. एकदा, बस स्थानकावरील घड्याळ पाच मिनिटं पुढं असल्यामुळं आमची बस चुकली. आम्ही दुसऱ्या बसनं एका वेगळ्या खेड्यात जायचं ठरवलं. त्या क्षेत्रात आम्ही पूर्वी कधीही कार्य केलं नव्हतं. पहिल्याच घरी आम्हाला एक तरुणी भेटली, जी आम्हाला म्हणाली, “या, मी तुमचीच वाट पाहत होते.” खरंतर आम्ही तिच्या बहिणीसोबत बायबल अभ्यास करत होतो. आम्ही नेमकं त्याच दिवशी तिच्या घरी यावं असा निरोप तिनं आपल्या बहिणीकडून आम्हाला पाठवला होता. पण, आम्हाला तो निरोप मिळालाच नव्हता. आम्ही तिच्यासोबत आणि शेजारच्या घरात राहणाऱ्या तिच्या नातेवाइकांसोबत बायबल अभ्यास सुरू केला. काही काळानं आम्ही त्या सर्वांचा अभ्यास एकाच वेळी घेऊ लागलो. या अभ्यासाला जवळजवळ १२ लोक उपस्थित राहायचे. आजपर्यंत या कुटुंबातून कितीतरी जण यहोवाचे साक्षीदार बनले आहेत.
१९६५ मध्ये आम्हाला आर्क्टिक ध्रुववृत्ताच्या खाली असलेल्या कुसामो इथं नेमण्यात आलं. सध्या आम्ही याच मंडळीत आहोत. त्या वेळी या मंडळीत फार थोडे प्रचारक होते. सुरुवातीला इथल्या क्षेत्रात प्रचार कार्य करणं आम्हाला थोडं कठीण वाटलं. लोक अतिशय कट्टर होते आणि आमच्याविषयी त्यांना बरेच गैरसमज होते. पण त्याच वेळी असेही लोक होते ज्यांना बायबलबद्दल आदर होता आणि यामुळं त्यांच्यासोबत संभाषण सुरू करणं सोपं जायचं. हळूहळू आम्ही लोकांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ दोन वर्षांनंतर बायबल अभ्यास सुरू करणं आम्हाला सोपं जाऊ लागलं.
अजूनही सेवेत उत्साही
आम्ही ज्यांच्यासोबत अभ्यास केला त्यांपैकी काही जण
आता आमच्याजवळ पूर्ण दिवस क्षेत्र सेवा करण्याइतकी शक्ती राहिलेली नाही, तरी आम्ही जवळजवळ दररोजच सेवेला जातो. आमचं क्षेत्र बरंच मोठं आहे. पण, आमच्या भाच्याच्या प्रोत्साहनामुळं आयलीनं ड्रायव्हिंग शिकून घेतलं आणि १९८७ साली वयाच्या ५६ व्या वर्षी तिला ड्रायव्हिंग लायसन्सही मिळालं. त्यामुळं आता आम्हाला क्षेत्र सेवेला जाणं सोपं झालं आहे. शिवाय, नवं राज्य सभागृह बांधण्यात आलं तेव्हा त्यालाच जोडलेल्या घरात आम्ही राहायला गेलो आणि यामुळं सभांना जाणं आम्हाला खूप सोयीचं झालं.
राज्याच्या कार्यात झालेली वाढ पाहून आम्हाला खूप आनंद होतो. उत्तर फिनलंडमध्ये आम्ही आमच्या पूर्णवेळेच्या सेवेला सुरुवात केली, तेव्हा फार थोडे प्रचारक त्या अतिशय मोठ्या क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेले होते. पण आता कित्येक मंडळ्यांचा बनून एक विभाग तिथं तयार झाला आहे. कित्येकदा संमेलनांत आणि अधिवेशनांत असं घडलं आहे, की कोणीतरी आमच्याजवळ येऊन आम्ही त्याला ओळखलं का असं विचारतो. त्याच्या लहानपणी आम्ही त्याच्या घरात बायबल अभ्यास चालवलेला असतो. सत्याच्या बीजाला कित्येक वर्षांनंतर, कधीकधी तर कित्येक दशकांनंतरही फळ आल्याचं आम्ही पाहिलं आहे!—१ करिंथ. ३:६.
पाऊस पडत असला तरी आम्हाला सेवेला जायला आवडतं
२००८ साली आम्ही खास पायनियर सेवेची ५० वर्षं पूर्ण केली. आम्ही एकमेकींना प्रोत्साहन देऊन, यहोवाच्या या अनमोल सेवेत टिकून राहण्यासाठी मदत करू शकलो याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो. आमचं जीवन अगदी साधंसुधं होतं पण आम्हाला कधीही कशाचीच उणीव भासली नाही. (स्तो. २३:१) सुरुवातीला आम्ही पूर्णवेळेची सेवा सुरू करायला उगीचंच मागंपुढं पाहत होतो! यशया ४१:१० या वचनात यहोवा आपल्या सेवकांना असं अभिवचन देतो: “घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.” आज आम्हाला अतिशय आनंद वाटतो, कारण या अभिवचनानुसार आजपर्यंत यहोवानं खरोखरच आम्हाला सदोदित साहाय्य व मदत केली आहे.