यहोवावर प्रेम करणाऱ्यांना “अडखळण्याचे कारण पडणार नाही”
“तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही.”—स्तो. ११९:१६५.
१. कधीही हिंमत न हारण्याचा आपला निर्धार एका धावपटूच्या मनोवृत्तीवरून कशा प्रकारे दिसून येतो?
मेरी डेक्कर ही किशोरवयापासूनच जागतिक ख्यातीची धावपटू होती. १९८४ सालच्या ऑलिम्पिक्स खेळांत, ३,००० मीटर अंतराच्या शर्यतीत तिला सुवर्णपदक मिळेल अशी सर्वांनाच खातरी वाटत होती. पण, ती अंतिम रेषेपर्यंत पोचलीच नाही. दुसऱ्या एका धावपटूच्या पायात पाय अडकून ती धावपट्टीवरच पडली. दुखापत झालेली मेरी रडू लागली; तिला उचलून मैदानाबाहेर न्यावे लागले. पण हिंमत हरेल ती मेरी डेक्कर कसली! एका वर्षाच्या आतच ती पुन्हा शर्यतींत धावू लागली आणि १९८५ साली तिने महिलांच्या एक मैल अंतराच्या शर्यतीत नवा जागतिक विक्रम नोंदवला.
२. खरे ख्रिस्ती कोणत्या अर्थाने एका धावण्याच्या शर्यतीत सहभागी आहेत, आणि या शर्यतीत धावताना आपले ध्येय काय असले पाहिजे?
२ ख्रिस्ती या नात्याने लाक्षणिक रीत्या आपणही एका धावण्याच्या शर्यतीत सहभागी आहोत. ही शर्यत जिंकण्याचे आपले ध्येय असायला हवे. ही शर्यत कमी अंतरावर वेगवानपणे धावण्याच्या शर्यतींसारखी नाही; अशा शर्यतींत सहसा जो सर्वात वेगवान असेल तोच जिंकतो. शिवाय, काही लोक नुसतेच व्यायामासाठी हळूहळू धावतात त्यासारखी आपली शर्यत नक्कीच नाही. तर आपल्या या शर्यतीची तुलना एका मॅराथॉन शर्यतीशी करता येऊ शकते, जिच्यात विजयी होण्यासाठी धीराने धावत राहण्याची गरज असते. करिंथ हे प्राचीन शहर मैदानी खेळांच्या शर्यतींसाठी नावाजलेले होते. तेथे राहणाऱ्या ख्रिश्चनांना पत्र लिहिताना प्रेषित पौलाने एका धावपटूचे उदाहरण वापरले. त्याने लिहिले: “शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल.”—१ करिंथ. ९:२४.
३. सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत सहभागी होणारे सर्वच जण शर्यत जिंकू शकतात असे का म्हणता येईल?
३ बायबल आपल्याला या लाक्षणिक शर्यतीत धावण्यास सांगते. (१ करिंथकर ९:२५-२७ वाचा.) विजयी होणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळते; अभिषिक्त ख्रिश्चनांना स्वर्गात तर इतरांना पृथ्वीवर. सहसा, धावण्याच्या शर्यतींत केवळ एकच विजेता असतो. पण, या लाक्षणिक शर्यतीत जो कोणी सहभागी होतो आणि शेवटपर्यंत धीराने धावतो तो विजयी ठरेल व त्याला बक्षीस मिळेल. (मत्त. २४:१३) फक्त नियमांनुसार न धावल्यास किंवा अंतिम रेषेपर्यंत न पोचल्यास या शर्यतीत धावणारे शर्यत हारतात. शिवाय, ही एकमेव शर्यत आहे जिच्यात सार्वकालिक जीवनाचे बक्षीस देऊ करण्यात आले आहे.
४. सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत धावणे सोपे का नाही?
४ अंतिम रेषा पार करणे सोपे नाही. यासाठी कडक अनुशासनाची आणि ध्येय डोळ्यांपुढे ठेवून धावण्याची गरज आहे. या शर्यतीत एकदाही न अडखळता अंतिम रेषा पार करू शकलेली एकमेव व्यक्ती म्हणजे येशू ख्रिस्त. पण त्याचा शिष्य असलेल्या याकोबाने असे लिहिले की ख्रिस्ताचे अनुयायी असलेले आपण “सर्वच जण पुष्कळ प्रकारांनी अडखळतो.” (याको. ३:२, सुबोधभाषांतर) ही गोष्ट किती खरी आहे! आपल्या सर्वांनाच स्वतःच्या व इतरांच्या अपरिपूर्णतांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे, कधीकधी आपण अडखळतो आणि तोल जाऊन आपला धावण्याचा वेग कमी होतो. कदाचित आपण खालीही पडू; पण तरीसुद्धा आपण पुन्हा उठतो आणि धावत राहतो. काही जण इतक्या वाईट रीतीने पडले आहेत की त्यांना पुन्हा उठून शर्यतीत धावू लागण्यासाठी इतरांच्या मदतीची गरज पडली आहे. तेव्हा, या शर्यतीत धावत असताना आपण एखाद्या वेळी किंवा वारंवार अडखळण्याची किंवा खाली पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.—१ राजे ८:४६.
अडखळून पडल्यास, मदत स्वीकारा आणि पुन्हा उठा!
अडखळलात, तरी हार मानू नका
५, ६. (क) एका ख्रिस्ती व्यक्तीला कोणत्या अर्थाने “अडखळण्याचे कारण पडणार नाही,” आणि तिला पुन्हा उठण्यास कशामुळे साहाय्य मिळेल? (ख) काही जण अडखळल्यानंतर पुन्हा सावरत नाहीत, असे का?
५ एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक स्थितीविषयी बोलताना कदाचित तुम्ही “अडखळणे” आणि “पडणे” हे शब्द आलटून पालटून वापरले असतील. बायबलमध्ये वापरलेल्या या शब्दांचा एकच अर्थ होऊ शकतो, पण नेहमीच तो तसा नसतो. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे २४:१६ या वचनातील शब्दांकडे लक्ष द्या: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात [“अडखळतात,” NW].”
६ जे यहोवावर भरवसा ठेवतात त्यांना तो अडखळू किंवा पडू देणार नाही. दुसऱ्या शब्दांत, त्याची उपासना करत असताना, तो त्यांच्यावर असे कोणतेही संकट किंवा समस्या येऊ देणार नाही, ज्यातून ते सावरू शकत नाहीत. यहोवा आपल्याला आश्वासन देतो की तो आपल्याला पुन्हा उठण्यास मदत करेल, जेणेकरून त्याची पुढेही मनोभावे उपासना करत राहणे आपल्याला शक्य होईल. यहोवावर मनापासून प्रेम करणाऱ्यांसाठी हे किती सांत्वनदायक आश्वासन आहे! पण दुष्टांना मात्र पुन्हा उठण्याची इच्छा नसते. ते देवाच्या पवित्र आत्म्याची व त्याच्या लोकांची मदत मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. किंबहुना अशी मदत दिली जाते तेव्हा ते ती स्वीकारण्यास नकार देतात. याउलट, यहोवाचे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांसाठी असे कोणतेही अडखळण नाही जे त्यांना सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीतून कायमचे बाहेर घालवू शकेल.—स्तोत्र ११९:१६५ वाचा.
७, ८. एखादी व्यक्ती ‘पडली’ तरी ती देवाची संमती कशा प्रकारे मिळवू शकते?
७ काही जण एखाद्या दुर्बलतेमुळे अधूनमधून, किंवा वारंवारही लहानसहान पाप करून बसतात. पण असे घडले, तरी जर प्रत्येक वेळी ते पुन्हा उठले, म्हणजेच जर त्यांनी मनापासून पश्चात्ताप केला आणि पुन्हा यहोवाची विश्वासूपणे सेवा करण्याचा प्रयत्न केला तर यहोवाच्या दृष्टीत ते पुढेही नीतिमान राहतात. प्राचीन काळी देवाने इस्राएल राष्ट्रासोबत ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून हे दिसून येते. (यश. ४१:९, १०) याआधी उद्धृत केलेल्या नीतिसूत्रे २४:१६ या वचनात, नकारात्मक गोष्टीवर, म्हणजे ‘पडण्यावर’ नव्हे, तर सकारात्मक गोष्टीवर म्हणजे आपल्या क्षमाशील देवाच्या साहाय्याने ‘पुन्हा उठण्यावर’ भर दिला आहे. (यशया ५५:७ वाचा.) यहोवा देव व येशू ख्रिस्त हे आपल्यावर असलेला त्यांचा भरवसा व्यक्त करतात आणि म्हणूनच ते आपल्याला पुन्हा उठण्याचे प्रोत्साहन देतात.—स्तो. ८६:५; योहा. ५:१९.
८ मॅराथॉनच्या शर्यतीत धावणारा, अडखळला किंवा पडला, तरी त्याने लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न केल्यास तो पुन्हा सावरून शर्यत संपवू शकतो; इतका वेळ त्याच्याजवळ असतो. सार्वकालिक जीवनाच्या आपल्या शर्यतीच्या बाबतीत पाहिल्यास, या शर्यतीचा जेव्हा अंत होईल “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी” आपल्याला माहीत नाही. (मत्त. २४:३६) पण, आपण जितक्या कमी वेळा अडखळू तितक्याच सातत्याने आपल्याला शर्यतीत धावत राहणे आणि ती यशस्वी रीत्या संपवणे शक्य होईल. तर मग, अडखळण्याचे टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल?
प्रगतीत बाधा ठरणारी अडखळणे
९. अडखळायला लावू शकतील अशा कोणत्या काही गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत?
९ आता आपण अशा पाच गोष्टींची चर्चा करू या, ज्या आपल्याला अडखळायला लावू शकतात—वैयक्तिक दुर्बलता, शारीरिक वासना, बांधवांकडून झालेला अन्याय, संकट किंवा छळ आणि इतरांच्या उणिवा. जरी आपण अडखळलो असलो, तरी हे आठवणीत असू द्या की यहोवा अतिशय सहनशील आहे. तो लगेच आपल्याला अविश्वासू ठरवत नाही.
१०, ११. दाविदाला कोणत्या वैयक्तिक दुर्बलतेशी संघर्ष करावा लागला?
१० वैयक्तिक दुर्बलता या धावपट्टीवर पडलेल्या दगडगोट्यांसारख्या असतात, ज्यांवर अडखळून धावणारा खाली पडू शकतो. दावीद राजाच्या व प्रेषित पेत्राच्या जीवनातील काही घटनांकडे पाहिल्यास, आपल्याला अशा दोन दुर्बलता आढळतात—आत्मसंयमाचा अभाव आणि मानवांचे भय.
११ आत्मसंयम दाखवण्याच्या बाबतीत दावीद राजाची दुर्बलता, बथशेबासंबंधी त्याच्या कार्यांवरून दिसून आले. शिवाय, नाबालाने दाविदाचा अवमान केला तेव्हासुद्धा दावीद उतावीळपणे पाऊल उचलणार होता. त्याअर्थी, आत्मसंयमाच्या बाबतीत दाविदाला समस्या होती हे उघड आहे. पण त्याने यहोवाला आनंदित करण्याचा प्रयत्न करणे कधीही सोडले नाही. इतरांनी दिलेली मदत स्वीकारून त्याला आपला आध्यात्मिक तोल पुन्हा सावरणे शक्य झाले.—१ शमु. २५:५-१३, ३२, ३३; २ शमु. १२:१-१३.
१२. पेत्र अडखळला तरीसुद्धा तो कशा प्रकारे शर्यतीत धावत राहिला?
१२ पेत्राला मानवाचे भय होते. काही वेळा तर यामुळे तो वाईट रीतीने अडखळला; तरीसुद्धा, तो येशूला व यहोवाला एकनिष्ठ राहिला. उदाहरणार्थ, त्याने आपल्या प्रभूला ओळखत असल्याचे जाहीर रीत्या एकदा नव्हे, तर तीनदा नाकारले. (लूक २२:५४-६२) कालांतराने, पेत्र पुन्हा एकदा ख्रिश्चनांना शोभणार नाही अशा पद्धतीने वागला; तो विदेशी ख्रिश्चनांशी अशा प्रकारे वागला जणू ते सुंता झालेल्या यहुदी ख्रिश्चनांइतके चांगले नव्हते. पण प्रेषित पौलाचे याबाबतीत अगदी स्पष्ट मत होते—ख्रिस्ती मंडळीत वर्गभेदाला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे पेत्राचे वागणे नक्कीच चुकीचे होते. म्हणून, पेत्राच्या अयोग्य व्यवहारामुळे बंधुवर्गावर वाईट परिणाम होण्याआधीच पौलाने समोरासमोर जाऊन पेत्राची कानउघाडणी केली. (गलती. २:११-१४) या घटनेमुळे पेत्राचा अहं इतका दुखावला का, की त्याने जीवनाच्या शर्यतीत धावण्याचेच सोडून दिले? नाही. त्याने पौलाच्या सल्ल्यावर गांभीर्याने विचार केला, तो अवलंबला आणि जीवनाच्या शर्यतीत पेत्र सातत्याने धावत राहिला.
१३. शारीरिक दुर्बलता कशा प्रकारे अडखळण्याचे कारण ठरू शकते?
१३ कधीकधी आरोग्याची समस्या एक वैयक्तिक दुर्बलता बनून अडखळण्याचे कारण ठरू शकते. यामुळे आपण आपल्या आध्यात्मिक शर्यतीत मागे पडू शकतो, डळमळू शकतो व थकून गेल्यामुळे धावण्याचे बंद करू शकतो. उदाहरणार्थ, एका जपानी बहिणीचा बाप्तिस्मा झाल्यानंतर १७ वर्षांनी तिला एका आरोग्याच्या समस्येने ग्रासले. आपल्या प्रकृतीविषयी ती इतकी चिंतातूर झाली की ती आध्यात्मिक रीत्या कमजोर बनली. काही काळाने तर ती अक्रियाशील झाली. दोन वडिलांनी तिची भेट घेतली. त्यांच्या प्रेमळ शब्दांमुळे तिला प्रोत्साहन मिळाले आणि ती पुन्हा एकदा सभांना येऊ लागली. ती सांगते, “बांधव माझ्याशी इतक्या प्रेमानं बोलले की माझ्या डोळ्यांत अश्रू आले.” आज आपली ही बहीण पुन्हा एकदा शर्यतीत धावू लागली आहे.
१४, १५. अनैतिक इच्छा आपल्या मनात येतात तेव्हा कोणती कडक पावले उचलणे गरजेचे आहे? उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.
१४ शारीरिक वासना अनेकांसाठी अडखळण्याचे कारण ठरल्या आहेत. जेव्हा आपल्यासमोर या स्वरूपाचे प्रलोभन येते तेव्हा आपण मानसिक, नैतिक व आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहण्याकरता कडक पावले उचलली पाहिजेत. तुम्हाला आठवत असेल, की येशूने आपल्याला अडखळायला लावू शकेल अशी कोणतीही गोष्ट, मग तो आपला डोळा किंवा आपला हात असला तरीसुद्धा तो उपटून किंवा तोडून “टाकून दे” असा सल्ला दिला होता. मग यात अनैतिक विचारांचा व कृतींचाही समावेश होणार नाही का, ज्यांमुळे काही जण जीवनाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत?—मत्तय ५:२९, ३० वाचा.
१५ ख्रिस्ती कुटुंबात संगोपन झालेल्या एका बांधवाने लिहिले की फार पूर्वीपासूनच त्याला समलैंगिक भावनांशी संघर्ष करावा लागला आहे. तो म्हणतो: “मला नेहमीच विचित्र वाटायचं, मी इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटायचं.” २० वर्षांचा होईपर्यंत तो एक सामान्य पायनियर व मंडळीत सेवा सेवक बनला होता. पण त्यानंतर तो वाईट रीतीने अडखळला, त्याला बायबलनुसार ताडन देण्यात आले आणि वडिलांनी त्याला मदतदेखील दिली. प्रार्थना व देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे आणि इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तो पुन्हा सावरला आणि परत एकदा आध्यात्मिक कार्यांत सक्रिय बनला. आज कित्येक वर्षांनंतर तो कबूल करतो: “अजूनही कधीकधी माझ्या मनात त्या भावना येतात, पण मी त्यांना स्वतःवर नियंत्रण करू देत नाही. आपल्या शक्तीपलीकडे यहोवा कधीही आपली परीक्षा होऊ देणार नाही याची मला जाणीव झाली आहे. त्यामुळं, मी या समस्येवर मात करू शकतो असा देवाला माझ्या बाबतीत भरवसा वाटतो असं मी मानतो.” शेवटी हा बांधव म्हणतो: “आजपर्यंत मी जो काही संघर्ष केला आहे त्या सर्वाचे फळ मला नव्या जगात मिळेल. आणि मला ते हवे आहे! तोपर्यंत मी संघर्ष करत राहणार.” या बांधवाने जीवनाच्या शर्यतीत टिकून राहण्याचा निर्धार केला आहे.
१६, १७. (क) आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटलेल्या एका बांधवाला कशामुळे मदत मिळाली? (ख) अडखळण्याचे टाळण्याकरता आपण कोठे लक्ष केंद्रित केले पाहिजे?
१६ बांधवांकडून झालेल्या अन्यायामुळे काही जण अडखळू शकतात. फ्रांसमध्ये पूर्वी वडील म्हणून सेवा करणाऱ्या एका बांधवाला, आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटल्यामुळे त्याच्या मनात कटू भावना उत्पन्न झाल्या. त्याने सभांना येण्याचे बंद केले आणि तो अक्रियाशील बनला. दोन वडिलांनी त्याची भेट घेऊन सहानुभूतीपूर्वक त्याचे ऐकून घेतले. त्याच्या दृष्टिकोनातून त्याने सर्व हकिगत सांगेपर्यंत त्यांनी त्याला बोलू दिले. त्यांनी या बांधवाला आपला सर्व भार यहोवावर टाकून देण्याचे प्रोत्साहन दिले आणि देवाचे मन आनंदित करणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे यावर भर दिला. बांधवाने त्यांच्या सल्ल्याला चांगला प्रतिसाद दिला आणि लवकरच तो जीवनाच्या शर्यतीत पुन्हा धावू लागला व मंडळीच्या सर्व कार्यांत भाग घेऊ लागला.
१७ सर्वच ख्रिश्चनांनी अपरिपूर्ण मानवांवर नव्हे, तर मंडळीचे नियुक्त मस्तक असलेल्या येशू ख्रिस्तावर आपले लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. येशूचे डोळे “अग्नीच्या ज्वालेसारखे” आहेत. तो कोणत्याही गोष्टीच्या सर्व बाजू पाहू शकतो आणि आपण ज्या गोष्टी पाहू वा समजू शकत नाही त्या तो जाणतो. (प्रकटी. १:१३-१६) उदाहरणार्थ, आपल्याला जी गोष्ट अन्यायी वाटते, ती एखाद्या घटनेचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे किंवा गैरसमज झाल्यामुळे आपल्याला तशी वाटत असेल हे तो ओळखतो. मंडळीच्या गरजांसंबंधी येशू योग्य वेळेवर, अगदी योग्य प्रकारची कारवाई नक्कीच करेल. म्हणूनच, आपण कोणत्याही बांधवाच्या कृतींना किंवा निर्णयांना आपल्या मार्गातील अडखळण बनू देता कामा नये.
१८. संकटांना व कठीण परिस्थितींना आपण तोंड कसे देऊ शकतो?
१८ अडखळण्याचे कारण बनू शकतील अशा आणखी दोन गोष्टी म्हणजे संकट किंवा छळ आणि मंडळीतील इतरांच्या उणिवा. बी पेरणाऱ्याचा दृष्टान्त देताना येशूने म्हटले की वचनामुळे “संकट आले किंवा छळ झाला” तर काही जण अडखळतील. छळ मग तो कुटुंबीयांकडून होवो किंवा शेजाऱ्यांकडून अथवा सरकारी अधिकाऱ्यांकडून होवो, ज्याने “मूळ” धरलेले नाही, म्हणजेच जो सत्यात स्थिर नाही त्याच्यावर याचा लगेच प्रभाव पडतो. (मत्त. १३:२१) पण जर आपण योग्य मनोवृत्ती राखली तर राज्याचे बी आपल्याला विश्वासात मुळावण्यास व दृढ होण्यास साहाय्य करेल. संकटे येतात तेव्हा प्रशंसनीय गोष्टींवर प्रार्थनापूर्वक मनन करण्याचा प्रयत्न करा. (फिलिप्पैकर ४:६-९ वाचा.) यहोवाच्या साहाय्याने आपल्याला संकटांना तोंड देणे शक्य होईल आणि कठीण परिस्थितींमुळे आपण अडखळणार नाही.
शर्यत पूर्ण करण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला परावृत्त करू नये!
१९. इतरांनी आपले मन दुखावल्यास, हे आपल्याकरता अडखळण्याचे कारण ठरू नये म्हणून आपण काय करू शकतो?
१९ दुःखाची गोष्ट म्हणजे, जीवनाच्या शर्यतीत धावताना काहींनी इतरांच्या उणिवांना आपल्यासाठी अडखळण्याचे कारण बनू दिले आहे. ज्या गोष्टी विवेकाच्या आधारावर ठरवायच्या असतात त्यांच्या बाबतीत एखाद्या बांधवाचा आपल्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन असल्यामुळे काही जण अडखळले आहेत. (१ करिंथ. ८:१२, १३) जर कोणी आपले मन दुखावले असेल, तर आपण या गोष्टीचे एका मोठ्या समस्येत रूपांतर होऊ देणार का? बायबल ख्रिश्चनांना असा सल्ला देते की त्यांनी इतरांना दोषी ठरवण्याचे बंद करावे, इतरांना क्षमा करावी आणि स्वतःचे हक्क मिळवण्याचा अट्टहास करू नये. (लूक ६:३७) अडखळण्यास कारण ठरू शकणारी एखादी परिस्थिती तुमच्यासमोर येते तेव्हा स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘मी स्वतःच्या आवडीनिवडींच्या तराजूत इतरांना तोलतो का? माझे बांधव अपरिपूर्ण आहेत हे माहीत असूनही, मी दुसऱ्यांच्या अपरिपूर्णतेमुळे जीवनाच्या शर्यतीतून बाहेर पडावे का?’ यहोवावरील प्रेम आपल्याला इतरांच्या कोणत्याही कृतीमुळे जीवनाच्या शर्यतीत अंतिम रेषेपर्यंत पोचण्यापासून परावृत्त न होण्यास साहाय्य करेल.
धीराने धावत राहा —अडखळण्याचे टाळा
२०, २१. जीवनाच्या शर्यतीत धावण्याच्या बाबतीत तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?
२० जीवनाच्या शर्यतीत धाव संपवून अंतिम रेषा पार करण्याचा तुमचा निर्धार आहे का? (२ तीम. ४:७, ८) असल्यास, वैयक्तिक अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. कोणत्या गोष्टी आपल्याला अडखळण्याचे कारण बनू शकतात हे ओळखण्यासाठी बायबलचा व आपल्या बायबल-आधारित प्रकाशनांचा उपयोग करून संशोधन व मनन करा. शर्यतीत धावत राहण्यासाठी ताकद मिळावी म्हणून पवित्र आत्मा मिळण्यासाठी यहोवाला प्रार्थनेत विनंती करा. आठवणीत असू द्या, एखादी व्यक्ती अडखळली किंवा पडली म्हणून ती जीवनाच्या शर्यतीत कायमची अयशस्वी ठरली असे म्हणता येत नाही. ती व्यक्ती पुन्हा उठून, शर्यतीत धावण्यास सुरुवात करू शकते. किंबहुना, कोणत्या गोष्टींमुळे आपण अडखळलो हे ओळखून पुढे त्या गोष्टी टाळण्याद्वारे ही व्यक्ती आपल्या मार्गातील अडथळ्यांपासून मोलाचे धडे घेऊ शकते.
२१ सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत भाग घेणाऱ्यांचा या शर्यतीत सक्रिय सहभाग असतो असे बायबल म्हणते. लोक एखाद्या बसमध्ये नुसते बसून राहतात आणि ती बस त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी नेते, त्यासारखी ही जीवनाची शर्यत नाही. या शर्यतीत जिंकण्यासाठी आपल्याला धावावे लागेल. असे करत असताना यहोवाकडून मिळणारी “शांती” पदोपदी आपल्याला प्रोत्साहन देईल. (स्तो. ११९:१६५) आपण ही खातरी बाळगू शकतो की यहोवा आजही आपल्याला अनेक आशीर्वाद देईल आणि शर्यतीत अंतिम रेषा पार करणाऱ्यांवर तो सार्वकालिक आशीर्वादांचा वर्षाव करेल.—याको. १:१२.