प्रार्थना ऐकणारा देव आपले दुःख नाहीसे का करत नाही?
काही लोक प्रार्थना करत असले, तरी देव आहे की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका असते. त्यांच्या शंकेचे कारण काय असू शकते? आज जगात इतके दुःख आहे, की ते पाहून लोकांच्या मनात अशी शंका निर्माण होणे साहजिक आहे. देव आपले दुःख नाहीसे का करत नाही असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?
आज सर्व मानव अपरिपूर्ण व दुःखी आहेत. पण, देवाने मुळातच मानवांना असे बनवले होते का? देवाने जर मानवांना दुःख भोगण्यासाठी बनवले असते तर अशा देवाचा आपण आदर करू शकलो असतो का? एक उदाहरण विचारात घ्या: समजा तुम्ही एक नवीन कार न्याहाळत आहात आणि पाहता-पाहता तुमचे लक्ष कारच्या चेपलेल्या एका भागावर जाते. त्यावरून, उत्पादकाने मुळातच कार तशी बनवली असा निष्कर्ष तुम्ही काढाल का? मुळीच नाही! तुम्ही म्हणाल, की उत्पादकाने कार बनवली तेव्हा तिच्यात काहीच ‘खोट’ नव्हती. पण, कुठल्यातरी कारणामुळे कारचा तो भाग चेपला गेला असेल.
त्याचप्रमाणे, आपण जेव्हा निसर्गातील उत्कृष्ट सुव्यवस्था व रचना पाहतो आणि त्याच वेळी मानव समाजाला कीड लावणारा भ्रष्टाचार व अव्यवस्था पाहतो तेव्हा आपण कोणता निष्कर्ष काढला पाहिजे? बायबल असे शिकवते, की देवाने पहिल्या मानवी दांपत्याला बनवले तेव्हा त्याने त्यांना परिपूर्ण बनवले होते, त्यांच्यात कोणतीच खोट नव्हती. पण, पुढे या दांपत्यानेच स्वतःवर नुकसान ओढवून घेतले. (अनुवाद ३२:४, ५) मात्र आनंदाची गोष्ट अशी आहे, की देवाने हे नुकसान भरून काढण्याचे, म्हणजे सर्व आज्ञाधारक मानवांना पुन्हा परिपूर्ण स्थितीत आणण्याचे अभिवचन दिले आहे. पण, तसे करण्यासाठी तो इतका वेळ का लावत आहे?
इतका वेळ का?
याचे उत्तर, मानवजातीवर राज्य करण्यास कोण योग्य आहे या प्रश्नाशी निगडित आहे. देवाने मानवांना एकमेकांवर राज्य करण्यास मुळीच बनवले नव्हते. देव स्वतः त्यांच्यावर राज्य करणार होता. बायबलमध्ये असे म्हटले आहे: “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) पण दुःखाची गोष्ट म्हणजे पहिल्या मानवी दांपत्याने देवाच्या शासनाविरुद्ध बंड केले. त्यांच्या या स्वैराचारी वृत्तीमुळे ते पापी बनले. (१ योहान ३:४) याचा परिणाम असा झाला, की ते आपली परिपूर्ण स्थिती गमावून बसले आणि त्यांनी स्वतःवर व आपल्या मुलाबाळांवर नुकसान ओढवून घेतले.
गेल्या हजारो वर्षांपासून यहोवाने मानवांना एकमेकांवर राज्य करू दिले आहे. पण मानवात राज्य करण्याची क्षमता नाही याला इतिहास साक्ष आहे. इतिहासाने दाखवून दिले आहे, की सर्व प्रकारच्या मानवी सरकारांनी मानवांना दुःख दिले आहे. एकाही सरकारला युद्धे, गुन्हे, अन्याय किंवा रोगराईचे समूळ उच्चाटन करण्यात यश आलेले नाही.
देव नुकसान कसे भरून काढेल?
बायबल असे अभिवचन देते, की देव लवकरच एक नीतिमान नवीन जग आणेल. (२ पेत्र ३:१३) जे लोक मनापासून एकमेकांवर व देवावर प्रेम करतात केवळ अशाच लोकांना त्या नवीन जगात राहण्याची संधी मिळेल.—अनुवाद ३०:१५, १६, १९, २०.
बायबल असेही म्हणते, की वेगाने येणाऱ्या ‘न्यायाच्या दिवशी’ देव दुःखाचा आणि इतरांना दुःख देणाऱ्या लोकांचा अंत करेल. (२ पेत्र ३:७) त्यानंतर, देवाने नियुक्त केलेला शासक अर्थात येशू ख्रिस्त आज्ञाधारक मानवांवर राज्य करेल. (दानीएल ७:१३, १४) येशू ख्रिस्ताच्या शासनाधीन मानवांना कोणते आशीर्वाद मिळतील? बायबल म्हणते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.
मानवांनी “जीवनाचा झरा” असलेल्या यहोवाविरुद्ध बंड केल्यामुळे स्वतःवर रोगराई, वार्धक्य, आणि मृत्यू ओढवून घेतला आहे. पण स्वर्ग व पृथ्वीचा राजा या नात्याने येशू हे सर्व नुकसान भरून काढेल. (स्तोत्र ३६:९) त्याचे प्रेमळ शासन स्वीकारणाऱ्या सर्व लोकांना तो बरे करेल. त्याच्या शासनाधीन बायबलमधील पुढील अभिवचने पूर्ण होतील:
◼ “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.”—यशया ३३:२४.
◼ “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
देव सर्व दुःखांचा अंत करण्याचे आपले अभिवचन लवकरच पूर्ण करेल ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! दरम्यान काही काळासाठी देवाने दुःखाला अनुमती दिली त्यामुळे तो आपल्या प्रार्थना ऐकेल की नाही अशी शंका न बाळगता आपण पूर्ण विश्वासाने त्याला प्रार्थना करत राहू या.
होय, देव नक्कीच अस्तित्वात आहे. तो तुमच्या प्रार्थना, इतकेच नव्हे तर तुमचे कण्हणेही ऐकू शकतो. देव लवकरच तुमच्या मनातील सर्व शंका आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे करून तुम्हाला आनंदी जीवन देईल. किंबहुना, तुम्हाला असे जीवन देण्यास तो आतुर आहे. (w१२-E ०७/०१)