आमच्या संग्रहातून
आपल्या इतिहासातील रत्ने जतन करणे
यहोवाच्या लोकांजवळ अतिशय समृद्ध असा आध्यात्मिक वारसा आहे. त्या वारशाचा मनोवेधक अहवाल केवळ आपल्या प्रकाशनांतूनच नव्हे, तर छायाचित्रांतून, पत्रांतून, वैयक्तिक अनुभवांतून, तसेच आपल्या उपासनेशी निगडित मानवनिर्मित वस्तूंतून, आपल्या प्रचार कार्यातून व इतिहासातून वेचला जाऊ शकतो. पण, अशा प्रकारच्या साहित्याची जपणूक करण्याचा व आपल्या इतिहासात डोकावण्याचा काही फायदा आहे का? प्राचीन इस्राएलातील कुटुंबप्रमुखांवर, आपल्या मुलाबाळांना यहोवाच्या नियमांची व त्याच्या अद्भुत कृत्यांची माहिती देण्याची जबाबदारी होती. यामुळे, त्यांची मुलेबाळे स्वतः ‘देवावर भाव ठेवू’ शकत होती.—स्तो. ७८:१-७.
संग्रहित माहितीने, यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उदाहरणार्थ, विरोधकांनी जेरूसलेममधील मंदिराचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेदी प्रांताच्या अखमथा या राजधानी नगरातील दफ्तरखान्यात अर्थात संग्रहात असलेल्या अहवालांचे अधिकृत संशोधन केल्यानंतर, या बांधकामाला कोरेश राजाने परवानगी दिल्याचा दस्तऐवज सापडला. (एज्रा ६:१-४, १२) अशा प्रकारे, देवाच्या इच्छेनुसार मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. तसेच, शुभवर्तमानाचा लेखक लूक यानेदेखील संग्रहित माहितीसूत्रांचा उपयोग करून “सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध” केला.—लूक १:१-४.
नियमन मंडळाला आपल्या ईश्वरशासित इतिहासामध्ये गाढ आस्था आहे. आपला आध्यात्मिक वारसा जतन करण्याच्या, त्याची नोंद करण्याच्या व तो पुढे चालवण्याच्या गरजेविषयी बोलताना नियमन मंडळाच्या एका सदस्याने म्हटले, “आपण कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहोत हे जाणून घेण्यासाठी आपला इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे.” त्यासाठी, ब्रुकलिन, न्यू यॉर्कमध्ये अलीकडेच लेखन संग्रह विभागाची स्थापना करण्यात आली आहे. हा विभाग, लेखन समितीच्या निर्देशनाखाली कार्य करतो.
आपल्या “कुटुंबाचा अल्बम” व “वडिलोपार्जित संपत्ती”
काळाच्या ओघात, आठवणी धूसर होत जातात आणि आपण आपल्या कुटुंबाबद्दल अधिक सविस्तर माहिती जतन करून का ठेवली नाही याची खंत आपल्यापैकी बहुतेकांना वाटते. लेखन संग्रह विभागामध्ये, आपला समृद्ध व उत्तरोत्तर वाढत चाललेला वारसा जतन करण्यासाठी व त्याची नोंद करण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले जात आहेत. संग्रहात काळजीपूर्वक जतन करून ठेवलेली छायाचित्रे जणू आपल्या “कुटुंबाचा अल्बम” आहे असे म्हटले जाऊ शकते. आपली सुरुवातीची प्रकाशने, आपल्या बंधुभगिनींचे वैयक्तिक अनुभव आणि अमूल्य स्मृतिचिन्हे यांसारख्या रत्नांचेही आपल्या संग्रहात जतन करण्यात आले आहे. अशा सर्व वस्तू जणू आपली “वडिलोपार्जित संपत्ती” आहे. या वस्तूंमुळे आपल्याला आपल्या ईश्वरशासित वारशाची माहिती तर मिळतेच, शिवाय आपल्या आध्यात्मिक कुटुंबासाठी राखून ठेवलेल्या भवितव्याकडे आत्मविश्वासाने पाहण्यास आपल्याला मदतही मिळते.
“आमच्या संग्रहातून” या नवीन सदराच्या साहाय्याने लेखन संग्रहाचे अवलोकन करण्याचे आमंत्रण आम्ही तुम्हाला देतो. हे नवीन सदर, टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्तीत वेळोवेळी दिले जाईल. उदाहरणार्थ, “डॉन मोबाईल काय होते? त्याचा उपयोग कोणी केला होता? ते केव्हा व कशासाठी वापरले जात होते? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही येत्या एका अंकात एक सचित्र वृत्तान्त प्रकाशित करण्याचा विचार करत आहोत.
ज्याप्रमाणे कुटुंबाचा अल्बम जुन्या आठवणींना उजाळा देतो, त्याचप्रमाणे लेखन संग्रह आपल्याला आपल्याबद्दल व आपल्या आध्यात्मिक पूर्वजांबद्दल बरेच काही सांगतो. जसे की, पूर्वी होऊन गेलेल्या देवाच्या सेवकांचा विश्वास व धैर्य, आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची सेवा करण्यातील आनंदाचे व आव्हानात्मक प्रसंग आणि देवाने आपल्या लोकांचे केलेले मार्गदर्शन व त्यांना दिलेला अढळ आधार. (अनु. ३३:२७) आपण यहोवाची इच्छा आणखी एकजुटीने पूर्ण करावी व आध्यात्मिक रीत्या आणखी सामर्थ्यवान व्हावे म्हणून आपला आध्यात्मिक इतिहास जतन करण्याचे आमचे अथक प्रयत्न यहोवा आशीर्वादित करेल याची आम्हाला खातरी आहे.
[३१ पानांवरील चौकट/चित्र]
लेखन संग्रहाचे जवळून अवलोकन
ख्रिस्ती साहित्य, डीव्हीडी, आणि बायबलवर आधारित इतर साहित्य तयार करताना आपले लेखक, चित्रकार, संशोधक व यात गोवलेले इतर जण संग्रहित माहितीचा उपयोग करतात. त्यामुळे शाखा कार्यालये, बेथेल विभाग, मंडळ्या, व्यक्ती व बाहेरच्या संस्था यांसारख्या सूत्रांकडून ऐतिहासिक माहिती गोळा करण्यासाठी व ती जतन करण्यासाठी लेखन संग्रह विभाग अत्यंत काळजीपूर्वक व व्यावहारिक पावले उचलतो. या कार्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ या:
संपादन व विश्लेषण: लेखन संग्रहात सतत दुर्मिळ वस्तू जमा केल्या जात आहेत. यांपैकी बऱ्याच वस्तू, अनेक दशकांपासून विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आलेल्या कुटुंबांतील व्यक्तींनी प्रेमळपणे दान केलेल्या किंवा उसनवारी दिलेल्या असतात. अशा साहित्याचे विश्लेषण व तुलना केल्यामुळे आपल्याला आपल्या इतिहासाची व त्या काळात जगलेल्या लोकांविषयीची अधिक माहिती मिळवण्यास मदत होते.
यादी करणे: लेखन संग्रहात हजारो वस्तू असून त्यांपैकी काही एका शतकाहून अधिक जुन्या आहेत. त्या निरनिराळ्या आकाराच्या व स्वरूपाच्या असून भविष्यात उपयोग करण्यासाठी त्यांची काळजीपूर्वक यादी तयार करावी लागते.
दुरुस्ती व जतन: व्यावसायिक दुरुस्ती पद्धतींनी नाजूक पुस्तके व हस्तनिर्मित वस्तू दुरुस्त करून जतन केल्या जातात. दस्तऐवज, छायाचित्रे, वृत्तपत्रांची कात्रणे, चित्रपट, आणि ध्वनिमुद्रणे यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर केले जाते. त्यामुळे ऐतिहासिक मूल्य असलेले मूळ दस्तऐवज किंवा इतर वस्तू प्रत्यक्ष हाताळण्याऐवजी त्या इलेक्ट्रॉनिक रीत्या हाताळल्या जाऊ शकतात.
साठवणे व पुन्हा मिळवणे: संग्रहित साहित्य गहाळ होऊ नये, तसेच प्रकाशामुळे व आर्द्रतेमुळे ते खराब होऊ नये म्हणून ते सुव्यवस्थितपणे व सुरक्षितपणे साठवले जाते. आपल्या इतिहासातील या मौल्यवान रत्नांचे संशोधन करण्यासाठी व ही रत्ने हवी तेव्हा परत मिळवण्यासाठी एक कॉम्प्युटर प्रोग्राम तयार केला जात आहे.
[३२ पानांवरील चित्र]
१. ‘फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशनसाठी’ तयार केलेले पोस्टर. २. वर्गणीचे रजिस्टर. ३. साउंड कार. ४. टेहळणी बुरूज, १५ एप्रिल १९१२ अंकाचे मुखपृष्ठ. ५. जे. एफ. रदरफोर्डला पाठवलेली तुरुंगवासाची नोटीस. ६. डब्ल्यूबीबीआर माइक्रोफोन. ७. फोनोग्राफ. ८. पुस्तके वाहून नेणारी छोटी पेटी. ९. वैयक्तिक टिपण्या. १०. जे. एफ. रदरफोर्डला पाठवलेली तार.