यिर्मयाप्रमाणे जागृत राहा
“मी [यहोवा] आपले वचन पूर्ण करण्यास जागृत राहीन.”—यिर्म. १:१२, NW.
१, २. यहोवाच्या ‘जागृत राहण्याची’ तुलना बदामाच्या झाडाशी का करण्यात आली आहे?
लबानोन आणि इस्राएलच्या टेकड्यांवर सगळ्यात आधी बहर येतो तो बदामाच्या झाडाला. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच त्याची सुंदर गुलाबी किंवा पांढरी फुले दिसू लागतात. इब्री भाषेत, या झाडाच्या नावाचा शाब्दिक अर्थ, “जागे करणारा” असा होतो.
२ यहोवाने यिर्मयाला आपला संदेष्टा म्हणून नेमले तेव्हा एका महत्त्वपूर्ण सत्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने उचितपणे बदामाच्या झाडाच्या या वैशिष्ट्याचा उदाहरणादाखल उपयोग केला. संदेष्टा या नात्याने यिर्मयाने आपले सेवाकार्य सुरू केले त्याच्या सुरुवातीला त्याला एका दृष्टान्तात बदामाच्या झाडाची एक डहाळी दाखवण्यात आली होती. त्याचा काय अर्थ होता? यहोवाने याचा खुलासा केला: “मी आपले वचन पूर्ण करण्यास जागृत राहीन.” (यिर्म. १:११, १२, NW) ज्याप्रमाणे बदामाच्या झाडाला लवकर ‘जाग’ येते, त्याचप्रमाणे यहोवासुद्धा लाक्षणिक अर्थाने “रोज पहाटेस उठून,” आपल्या संदेष्ट्यांना आपल्या लोकांकडे पाठवत होता. त्याच्या आज्ञांचे उल्लंघन करण्याचे काय परिणाम होतील याचा इशारा देण्यासाठी त्याने असे केले. (यिर्म. ७:२५, पं.र.भा.) आपले भविष्यसूचक वचन पूर्ण होईपर्यंत तो विश्रांती घेणार नव्हता—तो ‘जागृत राहणार’ होता. आणि अगदी नियुक्त वेळी म्हणजे इ.स.पू. ६०७ मध्ये धर्मत्यागी यहूदा राष्ट्रावर यहोवाचा न्यायदंड आला.
३. यहोवाच्या बाबतीत आपण कोणती खातरी बाळगू शकतो?
३ त्याचप्रमाणे, आजसुद्धा यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्यासंबंधी जागृत आहे, जागरूक आहे. आपले वचन पूर्ण करण्याच्या बाबतीत तो हयगय करेल हे अशक्य आहे. यहोवाच्या या जागरूकतेचा तुमच्यावर काय परिणाम होतो? आपली अभिवचने पूर्ण करण्याच्या बाबतीत या वर्षी म्हणजे २०११ मध्ये यहोवा “जागृत” आहे असा विश्वास तुम्ही बाळगता का? यहोवाच्या विश्वसनीय अभिवचनांच्या बाबतीत तुमच्या मनात थोडी जरी शंका असेल, तर आध्यात्मिक झोपेतून जागे होण्याची हीच वेळ आहे. (रोम. १३:११) यहोवाचा संदेष्टा या नात्याने यिर्मया नेहमी जागृत राहिला. यिर्मयाला देवाकडून मिळालेल्या कामगिरीसंबंधी तो का व कसा जागृत राहिला याचे परीक्षण केल्याने, यहोवाने आपल्यावर सोपवलेले कार्य चिकाटीने करत राहण्यास आपल्याला मदत मिळेल.
एक तातडीचा संदेश
४. आपला संदेश घोषित करताना यिर्मयाला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले, आणि कोणत्या गोष्टीमुळे त्याचा संदेश तातडीचा होता?
४ यहोवाने यिर्मयाला एक पहारेकरी म्हणून नेमले तेव्हा तो कदाचित २५ वर्षांचा असावा. (यिर्म. १:१, २) पण, त्याला वाटले, की आपण केवळ बाळ आहोत आणि वयाने मोठे असलेल्या व अधिकारपदावर असलेल्या इस्राएल राष्ट्रातील वडीलजनांशी बोलण्याची आपली पात्रता नाही. (यिर्म. १:६) त्याला खासकरून याजकांना, खोट्या संदेष्ट्यांना आणि शासकांना, तसेच “कपटाला चिकटून” राहणाऱ्यांना व ‘आपल्या मार्गांवर जाणाऱ्यांना’ जळजळीत न्यायसंदेश व भयंकर न्यायदंड घोषित करायचा होता. (यिर्म. ६:१३; ८:५, ६) जवळजवळ चार शतके खऱ्या उपासनेचे केंद्रस्थान असलेले शलमोन राजाचे वैभवशाली मंदिर भुईसपाट होणार होते. जेरूसलेम व यहूदा ओसाड पडणार होते आणि त्यांच्या रहिवाशांना बंदी करून नेले जाणार होते. यावरून स्पष्टपणे दिसून येते, की यिर्मयाला जो संदेश घोषित करण्यास सांगितला होता तो तातडीचा होता!
५, ६. (क) आज यहोवा कशा प्रकारे यिर्मया वर्गाचा उपयोग करत आहे? (ख) आपला अभ्यास कशावर केंद्रित असेल?
५ आधुनिक काळात, यहोवाने मानवजातीसाठी अभिषिक्त ख्रिश्चनांच्या एका गटाची प्रेमळ तरतूद केली आहे. हा गट, या जगावर येणाऱ्या न्यायदंडाचा इशारा देण्यासाठी लाक्षणिक अर्थाने एका पहारेकऱ्याचे काम करतो. गेल्या कित्येक दशकांपासून हा यिर्मया वर्ग लोकांना आपल्या काळाची निकड ओळखण्याचा आर्जव करत आला आहे. (यिर्म. ६:१७) बायबल या गोष्टीवर जोर देते, की वेळेचे उत्तम नियोजन करणारा व त्याचे तंतोतंत पालन करणारा यहोवा उशीर करत नाही. त्याचा दिवस अगदी वेळेवर व लोक अपेक्षाही करणार नाहीत अशा वेळी येईल.—सफ. ३:८; मार्क १३:३३; २ पेत्र ३:९, १०.
६ हे लक्षात असू द्या, की यहोवा जागृत आहे आणि तो अगदी वेळेवर आपले नीतिमान नवीन जग अस्तित्वात आणेल. या जाणिवेने, यिर्मया वर्गातील लोकांना व त्यांच्या समर्पित सोबत्यांना दिवसेंदिवस अधिकाधिक तातडीचा होत चाललेला संदेश इतरांना सांगण्याच्या आपल्या कामगिरीसंबंधी जागृत राहण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. तर मग, तुम्ही काय करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे? येशूने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी देवाच्या राज्याच्या बाजूने खंबीर भूमिका घेतली पाहिजे. आता आपण तीन गुणांचे परीक्षण करू या. या गुणांनी यिर्मयाला त्याच्या कामगिरीसंबंधी जागृत राहण्यास मदत केली आणि हे गुण आपल्यालाही जागृत राहण्यास मदत करतील.
लोकांबद्दल प्रेम
७. यिर्मयाला कठीण परिस्थितीतही प्रचार करत राहण्याची प्रेरणा प्रेमामुळे कशी मिळाली हे स्पष्ट करून सांगा.
७ यिर्मयासमोर अनेक अडचणी आल्या तरीसुद्धा तो प्रचार करत राहिला. कोणत्या गोष्टीने त्याला आपले प्रचार कार्य करत राहण्याची प्रेरणा दिली होती? लोकांबद्दल असलेल्या त्याच्या प्रेमाने. लोक जो काही त्रास सहन करत होते त्याला बऱ्याचशा प्रमाणात खोटे मेंढपाळ कारणीभूत होते हे यिर्मयाला माहीत होते. (यिर्म. २३:१, २) या माहितीमुळे त्याला आपले कार्य प्रेमळपणे व दयाळूपणे पार पाडण्यास मदत मिळाली. आपल्या देशबांधवांनी देवाची वचने ऐकावीत आणि जिवंत राहावे अशी त्याची इच्छा होती. त्याला त्यांची इतकी काळजी वाटत होती की त्यांच्यावर येणार असलेल्या अनर्थामुळे तो अक्षरशः रडला. (यिर्मया ८:२१; ९:१ वाचा.) यिर्मयाला यहोवाच्या नावाबद्दल व लोकांबद्दल किती प्रेम व काळजी होती याचे स्पष्ट रेखाटन विलापगीत पुस्तकात करण्यात आले आहे. (विलाप. ४:६, ९) आज लोक ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले व पांगलेले’ असल्याचे तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला त्यांना देवाच्या राज्याचा सांत्वनपर संदेश सांगावासा वाटत नाही का?—मत्त. ९:३६.
८. छळामुळे यिर्मया कटू बनला नाही हे कशावरून दिसते?
८ यिर्मया ज्या लोकांना मदत करू इच्छित होता त्याच लोकांनी त्याचा छळ केला. तरीसुद्धा यिर्मयाने मनात सूड भावना किंवा कटुता बाळगली नाही. दुष्ट राजा सिद्कीया याच्याशीदेखील तो सहनशीलतेने व प्रेमळपणे वागला! सिद्कीयाने त्याला जिवे मारून टाकण्यास सरदारांच्या हवाली केले, तरीसुद्धा यिर्मयाने त्याला यहोवाची वाणी ऐकण्याची विनवणी केली. (यिर्म. ३८:४, ५, १९, २०) यिर्मयाप्रमाणे आपल्यालाही लोकांबद्दल इतकेच गाढ प्रेम वाटते का?
देवाकडील धैर्य
९. यिर्मयाला देवाकडून धैर्य मिळाले होते हे आपण कसे सांगू शकतो?
९ यहोवा पहिल्यांदा यिर्मयाशी बोलला तेव्हा त्याने कारणे सांगण्याचा प्रयत्न केला. यावरून दिसून येते, की त्याने पुढे जे धाडस व खंबीरपणा दाखवला तो जन्मतःच त्याच्यामध्ये नव्हता. तर, संदेष्टा या नात्याने यिर्मयाने आपल्या कार्यकाळात दाखवलेले असामान्य सामर्थ्य त्याला खरेतर पूर्णपणे देवावर विसंबून राहिल्यामुळे मिळाले होते. होय, यहोवा एका “पराक्रमी वीराप्रमाणे” यिर्मया संदेष्ट्याबरोबर होता. याचा अर्थ, यहोवा त्याच्या पाठीशी होता आणि त्याची कामगिरी पार पाडण्यास यहोवाने त्याला सामर्थ्य दिले. (यिर्म. २०:११) यिर्मया आपल्या धाडसासाठी व धैर्यासाठी इतका प्रसिद्ध होता, की पृथ्वीवरील येशूच्या सेवाकार्यादरम्यान काहींना असे वाटले की यिर्मयाच पुन्हा जिवंत होऊन आला आहे!—मत्त. १६:१३, १४.
१०. अभिषिक्त शेष जनांना ‘राष्ट्रांवर व राज्यांवर नेमण्यात’ आले आहे असे का म्हणता येईल?
१० यहोवा ‘राष्ट्रांचा राजा’ असल्यामुळे त्याने यिर्मयाला राष्ट्रांना व राज्यांना न्यायदंडाचा संदेश घोषित करण्यास सांगितले. (यिर्म. १०:६, ७) पण आज कोणत्या अर्थी अभिषिक्त शेष जनांना ‘राष्ट्रांवर व राज्यांवर नेमण्यात’ आले आहे? (यिर्म. १:१०) प्राचीन काळच्या यिर्मया संदेष्ट्याप्रमाणे आज यिर्मया वर्गाला या विश्वाच्या सार्वभौम अधिपतीकडून एक कामगिरी मिळाली आहे. त्याअर्थी, देवाच्या अभिषिक्त सेवकांना जगव्याप्त पातळीवर राष्ट्रांना व राज्यांना न्यायाचे संदेश घोषित करण्याचा पूर्ण अधिकार मिळाला आहे. सर्वोच्च देवाकडून मिळालेला अधिकार व त्याच्या वचनातील सुस्पष्ट वाणी यांचा उपयोग करून यिर्मया वर्ग घोषणा करत आहे, की देवाच्या नियुक्त वेळी व त्याने निवडलेल्या माध्यमाद्वारे सध्याची राष्ट्रे व राज्ये समूळ उपटून नष्ट केली जातील. (यिर्म. १८:७-१०; प्रकटी. ११:१८) सबंध जगभरात यहोवाच्या न्यायदंडाचे संदेश घोषित करण्याची देवाकडून मिळालेली कामगिरी अखंडपणे करत राहण्याचा यिर्मया वर्गाचा निर्धार आहे.
११. कठीण परिस्थितीतही कोणती गोष्ट आपल्याला अखंडपणे प्रचार करत राहण्यास मदत करेल?
११ लोक आपला विरोध करतात, राज्य संदेशाला थंड प्रतिसाद देतात किंवा आपल्या जीवनात संकटे येतात तेव्हा निराश होणे स्वाभाविक आहे. (२ करिंथ. १:८) पण, आपण खचून न जाता यिर्मयाप्रमाणे आपले कार्य करत राहू या. आपण सर्व जण देवाला विनवणी करत राहू या, त्याच्यावर विसंबून राहू या आणि ‘धैर्यासाठी’ यहोवाकडे डोळे लावू या. (१ थेस्सलनी. २:२) आपण खरे उपासक असल्यामुळे, देवाकडून मिळालेल्या जबाबदाऱ्यांसंबंधी आपण नेहमी जागृत असले पाहिजे. प्राचीन काळी अविश्वासू जेरूसलेमचा नाश करण्यात आला होता आणि हा नाश ख्रिस्ती धर्मजगतावर येणाऱ्या नाशाची एक पूर्वझलक होती. तेव्हा, येणाऱ्या या नाशाचा अखंडपणे प्रचार करत राहण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. यिर्मया वर्ग धैर्याने केवळ ‘परमेश्वराच्या प्रसादाचे वर्षच’ नव्हे, तर ‘देवाचा सूड घेण्याचा दिवसदेखील’ घोषित करतो.—यश. ६१:१, २; २ करिंथ. ६:२.
मनस्वी आनंद
१२. यिर्मयाने आपला आनंद टिकवून ठेवला असे आपण का म्हणू शकतो, आणि असे करण्यासाठी प्रामुख्याने कशामुळे त्याला मदत मिळाली?
१२ यिर्मयाला आपल्या कामात आनंद मिळाला. त्याने यहोवाला म्हटले: “मला तुझी वचने प्राप्त झाली ती मी स्वीकारली; तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवितो.” (यिर्म. १५:१६) खऱ्या देवाचे प्रतिनिधित्व करणे आणि त्याच्या वचनाचा प्रचार करणे हा यिर्मयासाठी एक विशेषाधिकार होता. लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही, की यिर्मयाने लोकांच्या थट्टेवर आपले लक्ष केंद्रित केले तेव्हा त्याने आपला आनंद गमावला. पण, आपला संदेश किती उत्तम व महत्त्वाचा आहे यावर त्याने आपले लक्ष केंद्रित केले तेव्हा गमावलेला आनंद त्याला परत मिळाला.—यिर्म. २०:८, ९.
१३. सेवाकार्यातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी गहन आध्यात्मिक सत्यांचा सखोल अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे?
१३ आज आपल्या काळात, प्रचार कार्यातील आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण “जड अन्न” सेवन केले पाहिजे अर्थात देवाच्या वचनातील गहन सत्यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. (इब्री ५:१४) सखोल अभ्यासामुळे विश्वास दृढ होतो. (कलस्सै. २:६, ७) आपल्या प्रत्येक कृतीचा यहोवावर कसा परिणाम होतो ही गोष्ट बायबलच्या अभ्यासामुळे आपल्या मनावर बिंबवली जाते. बायबलचे वाचन किंवा अभ्यास करण्यासाठी वेळ काढणे आपल्याला कठीण जात असेल, तर आपण पुन्हा एकदा आपल्या वेळापत्रकाचे परीक्षण केले पाहिजे. बायबलचा अभ्यास व मनन करण्यासाठी आपण दररोज केवळ काही मिनिटे जरी काढली, तरी आपण यहोवाच्या अधिक जवळ जाऊ आणि यिर्मयाप्रमाणेच आपल्याही मनाला ‘आनंद व उल्लास’ प्राप्त होईल.
१४, १५. (क) यिर्मयाने आपले सेवाकार्य चिकाटीने पार पाडले याचा काय परिणाम झाला? (ख) प्रचार कार्याच्या बाबतीत देवाचे लोक काय जाणून आहेत?
१४ यिर्मयाने अखंडपणे यहोवाचे इशारे व न्यायदंड घोषित केले. पण, त्याच वेळी त्याने ‘बांधण्याचे व लागवड करण्याचे’ कार्यही जीव ओतून केले. (यिर्म. १:१०) बांधण्याच्या व लागवड करण्याच्या या कार्यात त्याला नक्कीच यश आले. इ.स.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमचा नाश झाला तेव्हा काही यहुद्यांचा व गैर-यहुदी लोकांचा त्यातून बचाव झाला. उदाहरणार्थ रेखाबी लोक, एबद-मलेख व बारूख यांच्याविषयी तर आपल्याला माहीतच आहे. (यिर्म. ३५:१९; ३९:१५-१८; ४३:५-७) यिर्मयाचे हे निष्ठावान व देवभीरू मित्र आज यिर्मया वर्गाच्या सोबत्यांना चित्रित करतात ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे. या ‘मोठ्या लोकसमुदायाची’ आध्यात्मिक रीत्या बांधणी करण्यात यिर्मया वर्गाला मोठा आनंद होतो. (प्रकटी. ७:९) त्याचप्रमाणे, सत्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत करण्यात अभिषिक्त जनांच्या या निष्ठावान सोबत्यांना मनस्वी समाधान मिळते.
१५ देवाच्या लोकांना याची जाणीव आहे, की सुवार्तेचा प्रचार करणे ही फक्त लोकांसाठी आपण करत असलेली एक सार्वजनिक सेवा नव्हे, तर आपल्या देवाच्या उपासनेचा एक भागदेखील आहे. तेव्हा, लोक आपला संदेश ऐकोत अगर न ऐकोत, आपल्या प्रचार कार्याद्वारे देवाला पवित्र सेवा सादर केल्याने आपल्याला अपार आनंद मिळतो.—स्तो. ७१:२३; रोमकर १:९, १० वाचा.
आपल्या जबाबदारीसंबंधी ‘जागृत राहा!’
१६, १७. प्रकटीकरण १७:१० व हबक्कूक २:३ या वचनांतून आपल्या काळाची निकड कशी दिसून येते?
१६ प्रकटीकरण १७:१० मध्ये दिलेली भविष्यवाणी आपण विचारात घेतो तेव्हा आपल्या काळाची निकड आपल्याला आणखीन तीव्रतेने जाणवते. सातवा राजा अर्थात अँग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्य अस्तित्वात आले आहे. त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “तो [सातवे जागतिक साम्राज्य] आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल.” (प्रकटी. १७:१०) तो “थोडा वेळ” आता संपण्याच्याच बेतात असावा. या दुष्ट जगाच्या अंतासंबंधी हबक्कूक संदेष्टा आपल्याला असे आश्वासन देतो: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे . . . त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.”—हब. २:३.
१७ स्वतःला विचारा: ‘माझ्या एकंदरित जीवनावरून सध्याचा काळ खरोखर निकडीचा आहे हे दिसून येते का? अंत लवकर येण्याची मी वाट पाहत आहे हे माझ्या जीवनक्रमावरून दिसून येते का? की जीवनात मी जे काही निर्णय घेतो व ज्या गोष्टींना प्राधान्य देतो त्यांवरून अंत लवकर येण्याची मी अपेक्षा करत नाही किंवा अंत कधी येईल की नाही याचीदेखील मला शंका वाटत असल्याचे दिसून येते?’
१८, १९. राज्याशी संबंधित कार्यांत धीमे होण्याची ही वेळ नाही असे का म्हणता येईल?
१८ पहारेकरी वर्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. (यिर्मया १:१७-१९ वाचा.) अभिषिक्त शेष जन ‘लोहस्तंभाप्रमाणे’ व ‘तटबंदी नगराप्रमाणे’ अगदी स्थिर उभे आहेत ही किती आनंदाची गोष्ट आहे! त्यांनी ‘आपली कंबर सत्याने कसली’ आहे. याचा अर्थ, देवाने त्यांना नेमून दिलेले कार्य पूर्ण होईपर्यंत देवाच्या वचनाद्वारे स्वतःला आध्यात्मिक रीत्या सुदृढ ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. (इफिस. ६:१४) मोठा लोकसमुदायदेखील याच निर्धाराने, यिर्मया वर्गाला देवाकडून मिळालेली कामगिरी पूर्ण करण्यास क्रियाशीलपणे त्यास पाठिंबा देतो.
१९ सध्याची वेळ ही राज्याशी संबंधित कार्यांत धीमे पडण्याची वेळ नाही; तर यिर्मया १२:५ मधील शब्द किती महत्त्वाचे आहेत हे विचारात घेण्याची वेळ आहे. (यिर्मया १२:५ वाचा.) आपल्या सर्वांवर परीक्षा येतात आणि त्यांचा आपण धीराने सामना केला पाहिजे. विश्वासाच्या या परीक्षांची तुलना “पायी चालणाऱ्यांबरोबर” केली जाऊ शकते ज्यांच्यासोबत आपल्याला धावावे लागते. पण, “मोठे संकट” जवळ येते तसतशा या परीक्षा अधिकाधिक वाढण्याची अपेक्षा आपण करू शकतो. (मत्त. २४:२१) पुढे येणाऱ्या अधिक आव्हानात्मक समस्यांशी संघर्ष करण्याची तुलना “घोडेस्वारांबरोबर” धावण्याशी केली जाऊ शकते. भरधाव धावणाऱ्या घोडेस्वारांच्या सोबतीने धीराने धावण्यासाठी एका व्यक्तीला कितीतरी मोठ्या प्रमाणात शक्तीची गरज असते. तेव्हा, आज आपल्यावर येणाऱ्या परीक्षांना धीराने तोंड देणे महत्त्वाचे आहे, कारण असे केल्याने पुढे येणाऱ्या परीक्षांना धीराने तोंड देण्यास आपण सज्ज असू.
२०. तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?
२० आपण सर्व जण यिर्मयाचे अनुकरण करू शकतो व आपल्याला नेमून दिलेले प्रचाराचे कार्य यशस्वी रीत्या पूर्ण करू शकतो! यिर्मयाला आपले ६७ वर्षांचे दीर्घ सेवाकार्य विश्वासूपणे करत राहण्यास प्रेम, धैर्य आणि आनंद या गुणांनी साहाय्य केले. बदामाच्या झाडाचा सुंदर बहर आपल्याला याची आठवण करून देतो, की यहोवा आपले वचन पूर्ण करण्यास ‘जागृत राहील.’ जागृत राहण्यासाठी यापेक्षा चांगले कारण काय असू शकते? यिर्मया ‘जागृत राहिला,’ आणि आपणही नक्कीच ‘जागृत राहू’ शकतो.
तुम्हाला आठवते का?
• यिर्मयाला ‘जागृत राहण्यास’ प्रेमामुळे कशी मदत मिळाली?
• आपल्याला देवाकडून मिळणाऱ्या धैर्याची गरज का आहे?
• कोणत्या गोष्टीने यिर्मयाला आपला आनंद टिकवून ठेवण्यास मदत केली?
• तुम्ही का ‘जागृत राहू’ इच्छिता?
[३१ पानांवरील चित्रे]
विरोध होत असतानाही तुम्ही प्रचाराचे कार्य करत राहाल का?