वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 ३/१५ पृ. २४-२८
  • तयार असा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तयार असा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नोहाप्रमाणे तयार असा
  • नोहाने व त्याच्या कुटुंबाने तयार असल्याचे दाखवले
  • मोशे जागरूक राहिला
  • जागृत राहा!
  • तो “देवाबरोबर चालला”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • त्याचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • तुम्ही आपल्या विश्‍वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • नोहाचा विश्‍वास जगाला दोषी ठरवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 ३/१५ पृ. २४-२८

तयार असा!

“तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—मत्त. २४:४४.

१, २. (क) बायबलमध्ये पूर्वभाकीत केलेल्या कोणत्या घटनांची तुलना वाघाच्या हल्ल्याशी करता येईल? (ख) भविष्यात होणाऱ्‍या हल्ल्याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?

प्राण्यांचा खेळ दाखवणाऱ्‍या एका प्रसिद्ध कलाकाराने अगदी निश्‍चिंतपणे आपल्या सुप्रशिक्षित बंगाली वाघांचा खेळ करून कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्याने म्हटले: “तुम्ही एखाद्या प्राण्याचा भरवसा जिंकता, तेव्हा जणू तुम्हाला जगातील सगळ्यात सुंदर वरदान मिळाले आहे असे तुम्हाला वाटते.” पण, ३ ऑक्टोबर २००३ रोजी त्याच्या या भरवशाला तडा गेला. १७२ किलो वजनाच्या त्याच्या एका पांढऱ्‍या वाघाने, कोणतेही कारण नसताना त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला सर्वस्वी अनपेक्षित होता आणि प्रशिक्षक त्याकरता तयार नव्हता.

२ लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, बायबलमध्ये एका ‘श्‍वापदाच्या’ हल्ल्याविषयी आधीपासूनच सांगितले आहे; आणि या हल्ल्याकरता आपण तयार असले पाहिजे. (प्रकटीकरण १७:१५-१८ वाचा.) हे श्‍वापद कोणावर हल्ला करते? दियाबलाच्या जगाचे वेगवेगळे भाग अचानक एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. किरमिजी रंगाचे श्‍वापद राष्ट्रसंघाला सूचित करते, आणि “दहा शिंगे” जगातील सर्व राजकीय सत्तांना सूचित करतात. हे सर्व मिळून कलावंतिणीप्रमाणे असलेल्या मोठ्या बाबेलीवर म्हणजे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यावर हल्ला करून तिचा क्रूरपणे अंत करतील. ही घटना केव्हा घडेल? या घटनेचा नेमका दिवस व नेमकी घटका आपल्याला माहीत नाही. (मत्त. २४:३६) पण, एक मात्र आपल्याला नक्की माहीत आहे की आपण अपेक्षा केली नसेल अशा वेळी हे घडेल आणि हल्ला होण्याआधीचा समय कमी करण्यात आला आहे. (मत्त. २४:४४; १ करिंथ. ७:२९) म्हणून, यहोवा आणि येशू जे काही करणार आहेत त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. (लूक २१:२८) त्यासाठी गतकाळातील देवाच्या सेवकांची चांगली उदाहरणे आपल्याला मदत करू शकतील. देवाने दुष्ट लोकांचा नाश केला तेव्हा देवाचे सेवक तयार होते आणि त्यामुळे देवाने त्यांचा बचाव केला. देव जे काही म्हणतो ते तो पूर्ण करतो हे त्यांनी स्वतः अनुभवले होते. त्यांच्यापैकी काहींनी काय केले आणि आपण त्यांच्या उदाहरणांचे अनुकरण कसे करू शकतो हे आपण पाहू या.

नोहाप्रमाणे तयार असा

३. कोणत्या परिस्थितीमुळे नोहाला देवाची सेवा विश्‍वासूपणे करणे आव्हानात्मक वाटले?

३ नोहाच्या काळात जगाची परिस्थिती अतिशय घृणास्पद होती. असे असूनही, देवाने दिलेले वचन पूर्ण होताना पाहण्यासाठी नोहा सिद्ध होता. बंडखोर देवदूतांनी मानवी रूप धारण करून सुंदर स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवले, तेव्हा नोहाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले असेल याची कल्पना करा! या अनैसर्गिक संबंधामुळे जन्मलेली मुले अतिमानवी, “महावीर” होती, ज्यांनी इतरांना धाक दाखवण्यासाठी आपल्या ताकदीचा उपयोग केला. (उत्प. ६:४) हे महाकाय मानव जेथे कोठे गेले तेथे त्यांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे हिंसाचाराला किती उत्तेजन मिळाले असेल याचा विचार करा. परिणामस्वरूप, सर्वत्र दुष्टाई पसरली आणि मनुष्यांचे आचार-विचार अगदी खालच्या पातळीला गेले. तेव्हा, सार्वभौम प्रभू यहोवाने एक फरमान काढून त्या दुष्ट जगाचा नाश करण्याची वेळ निश्‍चित केली.—उत्पत्ति ६:३, ५, ११, १२ वाचा.a

४, ५. कोणकोणत्या मार्गांनी आज आपल्या काळातील परिस्थिती नोहाच्या दिवसांतील परिस्थितीसारखीच आहे?

४ येशूने पूर्वभाकीत केले होते की आपल्या काळातील परिस्थिती नोहाच्या दिवसांतील परिस्थितीसारखीच असेल. (मत्त. २४:३७) उदाहरणार्थ, दुष्टात्मे आजही मानवी जीवनात हस्तक्षेप करत असल्याचे आपण पाहतो. (प्रकटी. १२:७-९, १२) या दुरात्म्यांनी नोहाच्या दिवसांत मानवी शरीरे धारण केली होती. आज ते मानवी रूप धारण करू शकत नसले, तरी लहान-मोठ्या सर्वांवर ते ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. लैंगिकतेचा विपर्यास करणारे हे दुरात्मे आज पडद्याआडून कार्य करतात. ते पृथ्वीवर अनेकांना दुष्ट व नीच कामे करण्यास प्रवृत्त करतात आणि त्यापासून विकृत आनंद घेतात.—इफिस. ६:११, १२.

५ दियाबल एक “मनुष्यघातक” आहे असे देवाचे वचन त्याचे वर्णन करते आणि त्याच्याजवळ “मृत्यूचे सामर्थ्य” आहे असेही ते म्हणते. (योहा. ८:४४; इब्री २:१४, सुबोध भाषांतर) असे असले, तरी तो वाटेल त्याचा मृत्यू घडवून आणू शकतो असे नाही. पण, तो लोकांना अशा गोष्टी करण्यास लावतो ज्यांमुळे शेवटी त्यांच्यावर दुःख व मृत्यू ओढवतो. तो लोकांना इतरांचा द्वेष करण्यास व त्यांना मारून टाकण्यास उद्युक्‍त करतो. उदाहरणार्थ, अमेरिकेत जन्मणाऱ्‍या दर १४२ मुलांपैकी १ मूल खुनाचा बळी ठरेल. यहोवाने नोहाच्या दिवसांतील हिंसाचाराची दखल घेतली होती. तर मग, आज इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्‍या हिंसाचाराची तो दखल घेणार नाही का? तो काही कारवाई करणार नाही का?

६, ७. नोहाने व त्याच्या कुटुंबाने देवाबद्दल गाढ विश्‍वास व भय असल्याचे कसे दाखवले?

६ नंतर, देवाने पृथ्वीवर जलप्रलय आणून सर्व मानवांचा व प्राण्यांचा नाश करण्याचा आपला निर्णय नोहाला सांगितला. (उत्प. ६:१३, १७) यहोवाने नोहाला एक अतिशय मोठे पेटीसारखे तारू बनवण्यास सांगितले. नोहाने आणि त्याच्या कुटुंबाने तारू बनवण्यास सुरुवात केली. देवाने न्यायदंड बजावला तेव्हा कोणत्या गोष्टीने नोहा व त्याच्या कुटुंबाला देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास व तयार राहण्यास मदत केली?

७ नोहाला व त्याच्या कुटुंबाला देवाबद्दल गाढ विश्‍वास व भय असल्यामुळे देवाच्या आज्ञेचे पालन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. (उत्प. ६:२२; इब्री ११:७) एक कुटुंबप्रमुख या नात्याने, नोहा आध्यात्मिक रीत्या जागरूक राहिला आणि त्याने त्या भ्रष्ट प्राचीन जगाचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. (उत्प. ६:९) नोहाला माहीत होते की त्याच्या कुटुंबाने त्या जगातील हिंसक मार्गांचे व सभोवताली असलेल्या लोकांच्या उद्धट मनोवृत्तीचे अनुकरण करण्यापासून स्वतःचे रक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी जीवनातील रोजच्या गोष्टींत गढून न जाणे महत्त्वाचे होते. देवाने त्यांच्यावर एक काम सोपवले होते, आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाने त्या कामावर आपले लक्ष केंद्रित करणे अतिशय जरुरीचे होते.—उत्पत्ति ६:१४, १८ वाचा.

नोहाने व त्याच्या कुटुंबाने तयार असल्याचे दाखवले

८. नोहाच्या कुटुंबातील सदस्य यहोवाचे उपासक होते हे कशावरून दिसून येते?

८ बायबलमधील वृत्तान्तात खासकरून कुटुंबप्रमुख नोहा याबद्दल सांगितले असले, तरी त्याची पत्नी, त्याची मुले व त्यांच्या बायका हे सर्वदेखील यहोवाचे उपासक होते. या गोष्टीला यहेज्केल संदेष्ट्याने दुजोरा दिला. त्याने म्हटले की नोहा त्याच्या दिवसांत राहत असता, तर केवळ नोहाच्या नीतिमत्त्वाच्या आधारावर त्याच्या मुलांची सुटका झाली नसती. देवाची आज्ञा मानायची की नाही हे ठरवण्याइतके ते मोठे होते. यावरून दिसून येते, की त्यांनी देवाबद्दल व त्याच्या मार्गांबद्दल असलेले त्यांचे प्रेम व्यक्‍तिगत रीत्या प्रदर्शित केले होते. (यहे. १४:१९, २०) नोहाच्या कुटुंबाने त्याच्या सूचनांचे पालन केले, त्याच्यासारखाच विश्‍वास बाळगला आणि देवाने त्यांच्यावर सोपवलेल्या कामात त्यांनी इतरांना अडथळा आणू दिला नाही.

९. आज नोहाच्या विश्‍वासाचे अनुकरण कोण करत आहेत?

९ जगभरातील आपल्या बंधुसमाजातील कुटुंबप्रमुख, नोहाचे अनुकरण करण्यासाठी होता होईल तितके करत आहेत हे पाहून आपल्याला किती उत्तेजन मिळते! कुटुंबप्रमुखांना याची जाणीव आहे की आपल्या कुटुंबांना केवळ अन्‍न, वस्त्र, निवारा व शिक्षण यांची तरतूद करणे पुरेसे नाही. तर, त्यांनी कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजादेखील पूर्ण केल्या पाहिजेत. असे करण्याद्वारे ते दाखवून देतात, की यहोवा लवकरच जे काही करणार आहे त्याच्याकरता ते तयार आहेत.

१०, ११. (क) तारवात असताना नोहाला व त्याच्या कुटुंबाला नक्कीच कसे वाटले असावे? (ख) आपण स्वतःला कोणता प्रश्‍न विचारला पाहिजे?

१० नोहा, त्याची पत्नी, त्याची मुले आणि मुलांच्या बायका या सर्वांनी सुमारे ५० वर्षे तारू बनवण्याचे काम केले असावे. तारू बांधत असताना त्यांनी कितीतरी वेळा तारवात ये-जा केली असावी. तारवात पाण्याची गळती होऊ नये म्हणून त्यांनी त्याला डांबर लावले, त्यात अन्‍नसामग्री साठवली, आणि प्राण्यांना आत नेले. आता हे चित्र डोळ्यांसमोर उभे करा. तो मोठा दिवस, म्हणजे इ.स.पू. २३७० सालच्या दुसऱ्‍या महिन्याचा सतरावा दिवस उजाडतो आणि ते सर्व जण तारवात जातात. यहोवा तारवाचे दार बंद करतो आणि पाऊस पडायला सुरुवात होते. हा काही छोटा-मोठा पाऊस नाही. तर, महाजलाशयाचे सर्व झरे फुटतात आणि आकाशाची दारे उघडून मुसळधार पाऊस तारवाला झोडपून काढतो. (उत्प. ७:११, १६) तारवाच्या बाहेर असलेले लोक मरू लागतात, पण आत असलेले लोक मात्र सुरक्षित आहेत. नोहाच्या कुटुंबाला कसे वाटले असावे? होय, त्यांना देवाबद्दल गाढ कृतज्ञता वाटली असावी. त्यांनी नक्कीच असा विचार केला असेल, ‘आपण खऱ्‍या देवाचे ऐकले आणि स्वतःला तयार ठेवले हे किती बरे झाले!’ (उत्प. ६:९) आता असे चित्र डोळ्यांसमोर उभे करा, की तुम्ही हर्मगिदोन पार केले आहे. तुमच्याही मनात तितकीच कृतज्ञता दाटून येते का?

११ सर्वशक्‍तिमान देवाने सैतानाच्या या जगाचा अंत करण्याचे वचन दिले आहे. कोणतीही गोष्ट त्याला आपले हे वचन पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. स्वतःला विचारा, ‘देवाने दिलेल्या अभिवचनांचा लहानातला लहान तपशीलदेखील फोल ठरणार नाही आणि त्याची सर्व अभिवचने त्याच्या नियुक्‍त वेळी पूर्ण होतील याचा मला पूर्ण भरवसा आहे का?’ असल्यास, वेगाने येणारा यहोवाचा तो दिवस लक्षात ठेवून तयार असा.—२ पेत्र ३:१२.

मोशे जागरूक राहिला

१२. कोणत्या गोष्टी मोशेची आध्यात्मिक दृष्टी विकर्षित करू शकल्या असत्या?

१२ आणखी एक उदाहरण पाहू या. मानवी दृष्टिकोनातून पाहता, इजिप्तच्या साम्राज्यात मोशेचे स्थान अतिशय फायद्याचे होते असे वाटते. फारोच्या मुलीचा दत्तक पुत्र या नात्याने त्याला नक्कीच खूप मान होता, त्याने सर्वोत्तम जेवणाचा आस्वाद घेतला, उत्तम पेहराव केला, आणि भव्य राजमहालात राहिला. त्याला निरनिराळ्या विषयांचे उत्तम शिक्षण मिळाले. (प्रेषितांची कृत्ये ७:२०-२२ वाचा.) पुढे कदाचित त्याला मोठा वारसादेखील मिळाला असता.

१३. मोशेने देवाच्या अभिवचनांवर आपले लक्ष कसे केंद्रित केले?

१३ मोशेच्या आईवडिलांनी त्याला लहानपणी दिलेल्या प्रशिक्षणामुळे, इजिप्तचे लोक करत असलेली मूर्तिपूजा किती व्यर्थ आहे हे बहुधा त्याला समजले असावे. (निर्ग. ३२:८) इजिप्तमधील शिक्षण व्यवस्था आणि राजघराण्याचे वैभव यांमुळे त्याने खरी उपासना सोडून दिली नाही. देवाने त्याच्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनांवर त्याने खोलवर मनन केले असेल आणि त्यामुळे देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला तयार ठेवण्याची त्याला तीव्र इच्छा होती. कारण, मोशेने इस्राएल लोकांना असे सांगितले: “अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्‍वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.”—निर्गम ३:१५-१७ वाचा.

१४. मोशेच्या विश्‍वासाची व धैर्याची परीक्षा कशी झाली?

१४ इजिप्तच्या निर्जीव दैवतांचे प्रतीक असलेल्या सर्व मूर्तींच्या विपरित मोशेसाठी सत्य देव यहोवा खराखुरा देव होता. “जो अदृश्‍य आहे त्याला” जणू पाहत असल्याप्रमाणे मोशे जीवन जगला. देवाच्या लोकांची सुटका होईल याचा मोशेला विश्‍वास होता, पण असे केव्हा घडेल हे त्याला माहीत नव्हते. (इब्री ११:२४, २५, २७) एका इस्राएली दासासोबत दुर्व्यवहार होत असल्याचे पाहून मोशे त्याच्या संरक्षणासाठी धावून आला. यावरून, इब्री लोकांची सुटका झालेली पाहण्याची त्याला किती प्रबळ इच्छा होती हे दिसून येते. (निर्ग. २:११, १२) पण, त्यांची सुटका करण्याची ही यहोवाची वेळ नव्हती. त्यामुळे, मोशेला एका दूर देशात फराऱ्‍याचे जीवन जगावे लागले. इजिप्तच्या राजमहालातील ऐशआरामाचे जीवन सोडून अरण्यात राहणे त्याला नक्कीच कठीण गेले असेल. तरीसुद्धा, यहोवाने सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचे जागरूकतेने पालन करून त्याने तयार असल्याचे दाखवून दिले. अशा प्रकारे, त्याने मिद्यान देशात ४० वर्षे घालवल्यावर, त्याच्या बांधवांची सुटका करण्यासाठी देव त्याचा उपयोग करू शकला. देवाने सांगितल्यानुसार, मोशे आज्ञाधारकपणे इजिप्तला परतला. एव्हाना, मोशेला देवाकडून मिळालेली एक कामगिरी पार पाडण्याची आणि ती देवाच्या सांगण्यानुसार पार पाडण्याची वेळ आली होती. (निर्ग. ३:२, ७, ८, १०) इजिप्तला परतल्यावर, “सर्व मनुष्यांपेक्षा नम्र” असलेल्या मोशेला फारोपुढे उभे राहण्यासाठी विश्‍वासाची आणि धैर्याची गरज होती. (गण. १२:३) तो फारोकडे गेला; केवळ एकदाच नव्हे, तर एकापाठोपाठ एक अनेक पीडा आल्या तसा तो अनेकदा फारोकडे गेला. असे करत असताना आणखी कितीदा फारोकडे जावे लागेल हे त्याला माहीत नव्हते.

१५. अनेकदा अपेक्षाभंग होऊनही, कोणत्या गोष्टीने मोशेला नेहमी आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करण्यास प्रवृत्त केले?

१५ पुढच्या ४० वर्षांत, म्हणजे इ.स.पू. १५१३ ते इ.स.पू. १४७३ या दरम्यान मोशेच्या वाट्याला अनेकदा निराशा आली. तरीसुद्धा, यहोवाचा सन्मान करण्याची एकही संधी त्याने चुकवली नाही आणि आपल्या इस्राएली बांधवांनीही यहोवाचा सन्मान करावा म्हणून त्याने त्यांना मनापासून प्रोत्साहन दिले. (अनु. ३१:१-८) का? कारण त्याचे यहोवाच्या नावावर व त्याच्या सार्वभौमत्वावर स्वतःच्या नावापेक्षा जास्त प्रेम होते. (निर्ग. ३२:१०-१३; गण. १४:११-१६) आपल्या वाट्याला निराशा आली किंवा आपला अपेक्षाभंग झाला, तरीही आपणसुद्धा या विश्‍वावर शासन करण्याच्या देवाच्या अधिकाराचे समर्थन करत राहिले पाहिजे. यावरून, यहोवा जे काही करतो ते जास्त बुद्धिमानीचे, जास्त नीतिमत्त्वाचे, आणि इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त चांगले असल्याचा विश्‍वास आपण बाळगतो. (यश. ५५:८-११; यिर्म. १०:२३) तुम्हालादेखील असेच वाटते का?

जागृत राहा!

१६, १७. मार्क १३:३५-३७ या वचनांचा तुमच्याकरता गहिरा अर्थ का होतो?

१६ “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.” (मार्क १३:३३) येशूने या दुष्ट जगाच्या शेवटल्या दिवसांची सुरुवात केव्हा होईल याच्या चिन्हाबद्दल चर्चा करताना वरील ताकीद दिली. मार्कच्या अहवालात सांगितल्याप्रमाणे, येशूच्या मोठ्या भविष्यवाणीच्या शेवटच्या शब्दांकडे लक्ष द्या: “जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हाला माहीत नाही; नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हाला झोपा काढीत असलेले पाहील. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”—मार्क १३:३५-३७.

१७ येशूने दिलेला सल्ला विचार करायला लावणारा आहे. त्याने रात्रीच्या चार विविध प्रहरांचा उल्लेख केला. शेवटच्या प्रहरी जागृत राहणे अतिशय कठीण ठरणार होते. कारण, हा प्रहर पहाटे सुमारे तीन वाजता सुरू होऊन सूर्योदयाच्या वेळी संपायचा. लढाईचे डावपेच रचणाऱ्‍यांच्या मते शत्रूवर हल्ला करण्याची हीच सगळ्यात योग्य वेळ आहे. कारण, या वेळी शत्रूला ‘झोपेत’ पकडण्याची सगळ्यात उत्तम संधी मिळते. त्याचप्रमाणे, आज हे जग आध्यात्मिकदृष्ट्या गाढ झोपेत असताना, जागृत राहणे आपल्याकरता सर्वात मुश्‍कील असू शकते. पूर्वभाकीत केलेल्या अंतासाठी आणि आपल्या सुटकेसाठी ‘जागृत राहण्याची’ व ‘सावध असण्याची’ गरज आहे याबद्दल आपल्याला काही शंका आहे का?

१८. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला कोणती अमूल्य संधी लाभली आहे?

१८ लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला प्राण्यांचा प्रशिक्षक, बंगाली वाघाच्या हल्ल्यातून बचावला. पण, बायबलमधील भविष्यवाणी अचूकपणे दाखवते की पुढे येणाऱ्‍या अंतातून खोटा धर्म आणि या दुष्ट जगाचा उर्वरित भाग बचावणार नाही. (प्रकटी. १८:४-८) तेव्हा, नोहा व त्याच्या कुटुंबाप्रमाणे, देवाच्या सर्व सेवकांनी, मग ते लहान असोत अथवा मोठे, यहोवाच्या दिवसाकरता तयार असण्यासाठी होता होईल तितके करण्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. आज आपण अशा एका जगात राहत आहोत ज्यात खोट्या धर्माचे शिक्षक, तसेच अज्ञेयवादी व नास्तिक लोक सृष्टिकर्त्याची थट्टा करतात. त्यांचा आपल्यावर प्रभाव पडण्याची जोखीम आपण घेऊ शकत नाही. तेव्हा, आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या उदाहरणांचे मनापासून अनुकरण करू या आणि “देवाधिदेव,” “महान, पराक्रमी व भययोग्य देव” यहोवा याचा सन्मान व समर्थन करण्याची एकही संधी न चुकवण्यास जागरूक राहू या.—अनु. १०:१७.

[तळटीप]

a उत्पत्ति ६:३ मध्ये उल्लेख केलेल्या ‘एकशेवीस वर्षांच्या काळाबद्दल’ टेहळणी बुरूज, १५ डिसेंबर २०१०, पृष्ठ ३० पाहा.

तुम्हाला आठवते का?

• नोहाला आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांना सर्वात जास्त महत्त्व देण्याची आवश्‍यकता का होती?

• आपल्या आणि नोहाच्या दिवसांतील परिस्थितीत कोणते उल्लेखनीय साम्य आहे?

• मोशेच्या वाट्याला अनेकदा निराशा आली, तरी त्याने यहोवाच्या अभिवचनांवर आपले लक्ष केंद्रित का केले?

• बायबलच्या कोणत्या भविष्यवाण्यांमुळे तुम्ही आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्यास प्रवृत्त होता?

[२५ पानांवरील चित्र]

नोहा व त्याच्या कुटुंबाने यहोवाच्या कामावर आपले लक्ष केंद्रित केले

[२६ पानांवरील चित्र]

देवाने दिलेल्या विश्‍वसनीय अभिवचनांमुळे मोशेला जागरूक राहण्यास मदत मिळाली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा